समर्पण - २३ अनु... द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

समर्पण - २३

साथ छूटता गया,
रीश्ता तुटता गया।
सवाँरने की कोशिश मे,
सब बिख़रता गया।


कधी कधी सत्य परिस्थिती आपण जेवढ्या लवकर स्वीकारतो तेवढं चांगलं असत आपल्यासाठी...आणि ते बरोबर ही असतं...प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीत भावनाविवश होऊन चालत नाही...सगळं माहीत असूनही उगाच भावनांच्या उंबरठ्यावर येऊन अश्रू गाळण्यात काही अर्थ नसतो....पण दुर्दैवाने आज हे जे मी बोलत आहे त्यावेळी ते पचवायला जमलंच नाही.....माझ्या समोर दोन पर्याय होते एक आहे ती परिस्थिती स्वीकारणं आणि दुसरा सगळं काही सोडून लांब जाणं...पण ती परिस्थिती मला स्वीकारायला जड जात होती आणि लांब जायचा विचार केला होता पण माझ्या नशिबाला ते मंजूर नव्हतं....

असं म्हणतात प्रेम ही जगातली सगळ्यांत सुंदर भावना आहे...मी ती अनुभवली असूनही आता मला त्या गोष्टींचा वीट आला आहे, नको वाटत ते सगळं आठवायला....पण काही गोष्टी अश्या असतात की कितीही प्रयत्न करून त्या आपल्या पिच्छा सोडत नाही...भुंग्या सारख्या भुनभुन करत राहतात...विक्रमच्या आठवणी तश्याच माझ्या मनात घर करून बसल्या आहेत....विक्रम बोलायचा "सोनू आपण एवढा चांगला वेळ घालवला आहे ना सोबत, कधी ते आठवून एवढं हसायला येईल की हसता हसता डोळ्यात पाणी येईल......." डोळे तर आजही भरभरून वाहतात माझे जेंव्हा त्याची आठवण होते, आणि त्यासोबत तेही आठवत की कसे काही गैरसमज माझ्यापासून माझ्या गोड आठवणी हिरावून घेऊन गेले....

खूप प्रयत्न केले विक्रमसोबत संपर्क साधण्याचे...पण काहीही उपयोग झाला नाही, एक आठवडा उलटून गेला..मी प्रयत्न करत राहिली पण काही उपयोग झाला नाही...माझी तब्येत मात्र खुप खालावली एक आठवड्यात... अभयच ते तुटक बोलणं अजूनही टोचत होत मला, एक मात्र काम तो आठवणीने करायचा...मी औषध वेळेवर घेतले की नाही याची विचारपूस नक्की करण्याचा..त्याच्या स्वभाव माझ्या समजण्याच्या पलीकडे जात होता...एक दिवस तो घरी लवकर आला, मी त्याला सहज बोलली,

"अभय, मला बोलायचं आहे ... आपल्याबद्दल."

"बोलायचं असेल तर बोल...पण 'आपल्याबदल' बोलायला माझ्याकडे काहीच नाही..."

"बरोबर...'आपल्याबद्दल' बोलायला आधीही काही नव्हतं आताही काहीच नाही...पण माझ्या प्रेग्नन्सी बद्दल तर बोलावच लागेल ना....घरी सांगावं लागणार नाही का हे???"

"घरी काही सांगायची गरज नाही..."

"अरे पण ही लपवण्यासारखी गोष्ट आहे का?? थोड्या दिवसांनी कळूनच जाईल ना हे...."

"त्याची वेळच येऊ द्यायची नाही ना..."

"वेळ नाही येउ द्यायची म्हणजे???"

"म्हणजे असं की तू हे बाळ ठेवायचं नाहीस..अबोर्ट करायचं..."

"क्क..काय..? तू काय बोलतो आहेस तुझं तुला तरी भान आहे का??"

"मी नेहमी भान ठेवूनच वागलो आहे...अन हे पण विचार करूनच बोलत आहे मी..."

"मला हे मान्य नाही....आणि मला एक ठोस कारण दे तुझ्या ह्या निर्दयी निर्णयासाठी...."

"तुला कोणतही कारण देण्यासाठी मी बांधील नाही नैना...हा माझा निर्णय आहे आणि तुला हे मान्य करावंच लागेल...."

"आणि नाही मान्य केला तर....???"

"मान्य तर तुला करावंच लागेल...जर माझ्यासोबत राहायचं असेल तर...आणि चार दिवसांनंतर ची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आहे मी डॉक्टरची....आणि हो आता याबद्दल मला कोणतीच चर्चा करायची नाही"

"ठीक आहे जर तुझा हाच निर्णय असेल तर माझंही ऐकून घे...मी हे अबोर्ट तर करेल पण तुला या घरातही दिसणार नाही, मी नेहमीसाठी नागपूरला निघून जाईल..."

मला माझ्याच बोलण्यावर आश्चर्य वाटत होतं की मी इतकी निर्दयी आहे...एक स्त्री असूनही माझ्यात ते आईपण का निर्माण नाही झालं त्यावेळी, पण खरं तर मी अश्या परिस्थिती मध्ये अडकली होती जिथे काय योग्य आणि काय अयोग्य यातली निर्णयक्षमता गमावून बसली होती कदाचित...पण मला हे वाटत होतं की जिथे माझं आणि अभयच्या नात्याची शाश्वती मी देऊ शकत नाही तिथे ह्या निष्पाप जीवाला आणून तरी काय करू... खर तर खूप जास्त दुःखी असताना कोणताच निर्णय घेणे योग्य नसतं, तो निर्णय खूपदा चुकीचाच निघतो....मी माझ्या आयुष्यातले काही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेतलेत जे मला खूप महागात पडले....

खूप उलथापालथ झाली होती आयुष्यात, यापेक्षा अजून काही सहन करण्याची ताकत नव्हती कदाचित माझ्यात...पण हे मला वाटायचं असं... खर तर हे आहे की जेवढ्या अडचणी माझ्या कान्हाने माझ्यासाठी निर्माण केल्या होत्या, त्याहीपेक्षा जास्त मला सहनशक्ती दिली होती, हिम्मत दिली होती...काही जुने, काही नवे असे मिञ ही दिले ज्यांनी मला यातून लढण्यासाठी प्रोत्साहन दिलं....आणि अभय....त्यावेळी अभय सारखा समंजस व्यक्ती अशी काही भाषा बोलू शकतो यावर माझा विश्वास च बसत नव्हता, पण माझ्या डोळ्यासमोर जे त्याच वागणं होत, त्याची सत्यता ही नाकारता येण्यासारखी नव्हती....कधी कधी जे डोळ्यांना दिसतं तेही खरंच आहे असं नसतं बरं.... समोर दिसणाऱ्या गोष्टी खूप वेळी सत्याचा आव आणून आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो, पण ते सत्य नसतंच, त्या बनावटी सत्यामागे नेमकं काय दडलेलं असतं हे ओळखण्याची क्षमता असायला हवी आपल्यात.... आणि हीच क्षमता नव्हती माझ्यात त्यामुळे काय खरं काय खोटं यातला फरक नाही कळू शकला मला.... विक्रमच्या दुराव्याने बिथरलेली मी, काहीच जाणुन समजून घेण्याच्या मानसिकतेत नव्हती....विक्रमच वागणं आणि अभयचे कटू शब्द यात काय लपलेलं होत ते खूप उशिराने ओळखलं मी....

किती विचार करायचा विक्रमचा?? एवढ्या दिवसांत त्याला काय माझा विचारच येत नसेल का?? तस तर दोन तास कधी उशीर झाला मला त्याच्याशी बोलायला तर कासावीस व्हायचा तो, मग आता नेमकी माशी शिंकली कुठे???? पण गडबड तर नक्कीच होती काहीतरी.....आणि हीच परीक्षा होती माझ्या विक्रम वरच्या विश्वासाची...'माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे' हे सांगणं जेवढं सोप्प असतं तेवढच कठीण असत त्या 'विश्वासाच्या' अग्निपरिक्षेवर उतरणं....

हे सगळं होत असताना मी हे का विसरली होती की विक्रम विवाहित आहे, त्याचा ही संसार आहे, त्याच्या काही जबाबदाऱ्या असतील ज्या त्याला अडवत असतील....आणि मी हे विसरली नव्हतीच, फक्त काही दिवसात त्याने मला जे आपुलकी दाखवली होती त्यामुळे कदाचित माझ्या मनात ईर्ष्या निर्माण झाली असावी दिशाबद्दल.... आणि हिच ईर्ष्या, त्यात अभयची अशी वागणूक, नम्रताने त्याच्या बद्दल काढलेले निष्कर्ष आणि या सगळया भावनांच्या दोरखंडानी जखडलेली मी....यासगळ्या गोष्टी माझ्या आणि विक्रम च्या मैत्रियुक्त नात्याला नजर लावायला पुरेश्या होत्या माझ्या बाजूने.....
---------------------------------------------------------------
दोन तीन दिवस विक्रमच्या विचारांत निघून गेले, दुसऱ्या दिवशी मला डॉक्टर कडे जायचं होतं...रागारागात मी निर्णय घेतला तर होता अबोर्शन चा पण मनात कुठे तरी अपराधीपणाची भावना होती, माझं वागणं मलाच पटत नव्हतं. पण मला हे वाटत होतं की माझं आणि अभयच नातं जास्त दिवस तग धरून बसणार नाही त्यामुळे माझा पारा अजून चढायचा....पण हे करण्याआधी मला एकदा तर अभय कडून क्लिअर करून घ्यायच होत की मला न विचारता त्याने हा निर्णय का घेतला...दिवसेंदिवस जितकी माझी तब्येत खालावत होती तितकीच माझी चिडचिड वाढत होती त्यामुळे माझा सगळा राग साहजिकच अभय वर निघणार होता...
अभय ला मी विचारलच शेवटी.....

"अभय, तुला नको आहे बाळ....पण माझं काय? मला एकदा ही विचारलं नाही माझा निर्णय काय असेल....मला न सांगता एवढा मोठा निर्णय घेतलास? का अस केलं? आपल्यात मधात आता बोलणं ही शिल्लक नाही राहील का?"

"आपल्या मधात आता फक्त विक्रम आहे...."

"त्याला का आणतो आहेस तू मधात?"

"त्याला मी नाही तू आणलं आहेस नैना....आज हे जे सगळं होत आहे ना ते फक्त तुझ्यामुळे होत आहे...पण जाऊदे आता मला त्याबद्दल काही बोलायचं नाही, उद्या सकाळी जायचं आहे आपल्याला हॉस्पिटलमध्ये..."

असं बोलून अभय बाहेर जाणार तोच मी उठुन त्याला अडवायला गेली तर माझा पायात पाय अडकला, आणि धडपडणार इतक्यात अभयने मला पकडलं...पण यामध्ये मात्र तळपायाला चांगलीच ठेच लागली आणि माझ्या उजव्या पायाच्या बोटात माझी जोडवी चांगलीच फसली....अभय ने मला बसवलं, आणि काळजीच्या सुरात मला बोलला,

"वेडी आहेस का तू? जरा पण स्वतःची काळजी घेता येत नाही का तुला? सध्या कोणत्या परिस्थिती मध्ये आहेस तू हे कळत नाही का तुला? काही झालं असत म्हणजे....?"

अभयच हे वागणं अतिशय चमत्कारीक होतं माझ्यासाठी, अचानक माझ्यासाठी एवढी काळजी का उफाळून येत आहे याची....खूपच आश्चर्यकारक होतं हे, मी विचार करायला लागली की क्षणाक्षणाला या माणसाचे रंग बदलतात, पूर्ण आयुष्य जर याच्या सोबत काढायचं झालं तर मला कती रंग बघायचे आहेत याचे अजून....मी त्याच्याकडे टक लावून पाहत होती,

"आता एवढं पाहायला काय झालं मला ??? आणि ही जोडवी इतकी टोचतात तर काढून का नाही टाकत ती..?"

"........"

"मी काहीतरी बोलत आहे तुला नैना..."

"नाही काढू शकत आहे मी ते.....जोडवी...कितीही टोचली तरी नाही काढू शकत आहे...अडकून पडली त्यात तरीही..."

"आता मात्र काढून टाक...कश्यातच अडकून राहू नको....ठीक आहे अराम कर आता...आता काही नाही त्याबद्दल बोलायला माझ्याजवळ..."

"त्याबद्दल नाही...किमान या बाळाबद्दल तरी बोलू शकतो ना रे आपण...या सगळ्या मध्ये याची काय चूक आहे अभय...?की तुला हे वाटतं की हे बाळ तुझं ना...."

"नैना....पुढे एक शब्द ही बोलू नको प्लिज...."

"का नको बोलू....तू मला कधीच बोलू नाही दिलंस, सगळं स्वतःच्या मनानेच ठरवलं... आता मी बोलणार...तुला माझा राग आहे, कदाचित माझं तिरस्कार ही असेल, पण आज मला जाणून घ्यायचं आहे तुझ्या नजरेत मी किती पडली आहे....खरंच तुला हे वाटतं का की मी इतकी चरित्रहीन आहे...आपण इतके दिवस सोबत राहत आहोत, तू एवढंच ओळखलस का मला???"

अभयने येऊन माझ्या तोंडावर हात ठेवला...आज हे काय बघितलं मी? अभयला त्रास झाला.... माझ्यासाठी??? म्हणजे मी खरच माणसं ओळखण्यात चुकते का? संकटं आली तर सगळीकडून येतात हे खर आहे, आणि त्या संकटात आपली बुद्धी काम करत नाही हे आर्यसत्य आहे...कमीतकमी माझं तरी डोकं काम करत नव्हतं, काय खर काय खोटं समजायला मार्गच नव्हता...

"हो...ओळखलं... एवढंच ओळखलं मी तुला....मी नाही सहन करू शकलो की जी नैना घरच्यांचा तर सोड, परक्या लोकांच्या मनाचा एवढा विचार करते, जी कोणाला दुखवू शकत नाही, ती अश्याप्रकारे माझं मन दुखवेल... हे नाही सहन करू शकलो मी...हवं तर मला स्वार्थी समज तू नैना...पण सत्य हे आहे की मला नाही सहन झालं की माझ्याशिवाय तुझ्या मनात कोणासाठीही अश्या प्रकारच्या भावना निर्माण व्हाव्या... तू जरी माझं आणि साफियाच नातं स्वीकारलं असलं तरी मी तुझ्या इतका महान नाही जे हे सहजासहजी हे सगळं पचवू....खूप राग आला मला तुझा, तुला माझ्या डोळ्यासमोर बघण्याचीही ईच्छा नव्हती मला पण त्या दिवशी तू जे काही बोलली मला, माझ्या मनाला खूप लागलं ते....जेंव्हा तू हॉस्पिटलमध्ये होतीस मी हाच विचार करत बसलो की खरच मी किती चुकीचे शब्द बोललो तुला...खूप वाईट वाटलं मला की, जेव्हापासून मला विक्रमबद्दल कळलं त्यादिवसापासून किती घालून पाडुन बोललो तुला, पण तू मात्र तेवढ्याच संयमाने सगळं ऐकत गेलीस आणि तीच तुझी चूक झाली त्यामुळे मी अजूनच रागवत गेलो तुझ्यावर...पण मी तुला त्रासात नाही पाहू शकत नैना...आणि मी तुला आधीच खूप काही बोलून दुखावलं आहे त्यामुळे तू स्वतःबद्दल असे शब्द वापरून मला अजून लज्जित करू नको...."

"जर इतकीच काळजी वाटत आहे तुला माझ्याबद्दल, तर हॉस्पिटलमध्ये असल्यापासून आजपर्यंत का नाही बोलला मला आणि हे अबोर्शन च का आणलं मनात??"

"मी नाही बोललो कारण तुला अजून स्ट्रेस द्यायला नाही बोलले डॉक्टर, मी जर काही विषय काढला असता तर तुला सहन झालं नसतं... आणि विक्रम बद्दल तर तू काहीच ऐकून घेऊ शकत नाही ना...हे बघ मला तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो पण विक्रम वर नाही... तुझ्या नजरेत तो महान असेल माझ्या नजरेत तो फक्त एक सामान्य व्यक्ती आहे, ज्याने माझ्या संसारात विरजन टाकलं आहे... आणि राहिला प्रश्न अबोर्शन चा तर त्याच कारण हेच समज की मला आताच हे मुलं नको..."

"आता मुलं नको म्हणजे???? आता नाही तर मग कधी अभय?? मला तुझा हा निर्णय पटत नाही...आणि विक्रम चुकीचा नाही"

"खरच नैना??? इतके दिवस तू त्याला फोन लावत आहेस, लागला फोन? किंवा त्याने केली काही काळजी तुझी? तुझ्या इतकी प्रेमात आंधळी मी कोणीच पाहिली नाही...आताही समजून घे तो तुला फक्त फसवण्याचा प्रयत्न करत होता...मी तुला या तीन वर्षात जो त्रास दिला त्याचा बदला अश्याप्रकारे नको घेऊ...मला भांड, रागव त्यासाठी..पण त्याला विसर... मी आताही विचारतोय, मी सगळं विसरून नव्याने सुरू करेल आयुष्य तुझ्यासोबत, पण मला तुझ्या तोंडून त्या व्यक्तीच नावही नको...."

"आणि हे मुलं का नको??? याच उत्तर नाही दिलंस?"

"बोललो ना, नकोय मला आता...आता मला जास्त चर्चा नको यावर, उद्या आपण जात आहोत हॉस्पिटलमध्ये..."

पुन्हा एकदा अभय निर्णय घेऊन मोकळा झाला, माझं काहीही मत न घेता...आणि आता तर अभय जे काही बोलला मला ते खरं असेल का? विक्रमने मला खरच फसवलं असेल का??? आणि याच विचारात मी पुन्हा त्याला फोन करून बघितले...परत तेच...फोन बंद...आता माझा राग अनावर झाला होता... आज विक्रमने त्याला नाही मला चुकीचं सिद्ध केलं होतं अभय समोर, मी त्याच्यासाठी अभयला इतकं काही बोलली, नम्रताच ऐकलं नाही आणि याला मात्र माझी काही काळजीच नाही...खरच मला विक्रमने फसवलं, त्यामुळेच तर त्यानी मला संपर्क करायला दुसरा काही मार्ग दिला नाही...विक्रम वरच्या माझ्या विश्वासावर अभय ची थोडीशी काळजी खूप भारी पडली आणि तावातावात मी त्याला मेसेज केला...."

📱"माझ्या विश्वासाच खूप चांगलं फळ दिलंस रे...फक्त माझ्यासारख्या मुलीच्या मनाशी खेळता येतं तुला..मानलं पाहिजे तुला, पण मीच मूर्ख जे तुझ्या कचाट्यात सापडली... तुझं बोलणं, माझी काळजी करणं सगळं काही खोटं होत...खुप वाईट वाटत आहे मला जे मी तुझ्यासारख्या व्यक्तीवर विश्वास ठेवला...आता कधीच तुला भेटणार नाही...."

रागारागत मी काय बोलून गेली विक्रम ला याच भानच राहिलं नाही मला, कदाचित त्या परिस्थितीत तेच योग्य वाटलं मला...प्रेम आणि विश्वास...एकाच नाण्याच्या दोन बाजू...दोन्ही बाजू सांभाळणं फार कठीण...मी आणि विक्रम ने फक्त एकच बाजू बघितली... प्रेमाची....विश्वासाची खरी परीक्षा तर अजून दिलीच नव्हती, त्यामुळे हे नातं किती टिकतं याची सत्वपरिक्षा सुरू झाली होती...आणि अभयने हे मुलं न ठेवण्याचा तडकाफडकी निर्णय का घेतला असेल हेही कळत नव्हतं...पण मी मात्र आता खूप कंटाळली होती या नशिबाच्या जाचाला हे नक्की......

---------------------------------------------------------------

क्रमशः

( डिअर Readers...तुम्हाला कथा आवडत आहे हे बघून खरच खूप आनंद होतो आहे. तुमच्या समीक्षा, तुमचे मेसेजेस मला खरच प्रोत्साहन देतात लिहायला...मी काही प्रोफेशनल रायटर नाही, आणि एवढं चांगल माझं लिखाणही नाही तरीही तुम्ही माझ्या पहिल्याच लिखाणाच मनापासून कौतुक करत आहेत त्यासाठी मी तुमचे जेवढे आभार मानले तेवढे कमी आहेत.....मी आधीही सांगितले आहे आणि आताही सांगते, मी लिहिलेला विषय नक्कीच विवादास्पद आहे पण कुठे काय होतं, समाजात काय मान्य आहे काय नाही हे मला माहित नाही...माझी कथा फक्त निष्पाप प्रेम आणि नितळ मैत्रीची आहे त्यामुळे कथेला कथेसारखं घ्या ही विनंती..... माझ्याकडून जर कळत नकळत कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून माफी मागते.....जर खरच तुम्हाला कथा आवडली असेल तर आपल्या समीक्षाद्वारे मला नक्कीच कळवा....)

तुमचीच,
अनु....