Samarpan - 26 books and stories free download online pdf in Marathi

समर्पण - २६


शाम की तन्हाई सी मै,
राह दिखाता तू सितारा।
मंजिल पाऊँ भी तो कैसे
खो गया सारा उजियारा।


आयुष्यच्या वाटेत आपल्याला खूप लोक भेटतात, कोणी आपलं होऊन थांबत तर कोणी अनोळखी होऊन निघून जात...जे आपलं म्हणून थांबतात, त्यांना आपण जीव लावतो, त्यांना आपल्या आयुष्यात थांबावं यासाठी किती तडजोड ही करतो, पण ही 'आपली' असलेली माणसं राहतात का शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत?? अर्थात आपली खूप ईच्छा असते की अश्या लोकांची साथ आपल्याला नेहमी मिळावी पण ईच्छा आणि वास्तविकता खूप वेगळी असतात....खर तर आपल्या आयुष्यात काही माणसं स्वतःहून सोडून जातात, काहींना आपण सोडून देतो आणि काहींना परिस्थिती दूर घेऊन जाते...माझ्या आणि विक्रमच्या वाटा ही परिस्थितीनेच वेगळ्या केल्या, काढलं आम्ही एकमेकांनच्या आयुष्यातुन एकमेकांना....पण मनातुन काढू शकलो का??? काय उत्तर द्यावं याचं?? 'नाही' हे उत्तर देऊ शकत नाही आणि 'हो' हे जबरस्तीने तोंडातुन निघणार नाही....त्यामुळे जस आहे जे आहे ते ठीक आहे, मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवलंय त्याला, नाही बाहेर येऊ देत कधी, आणि ज्यावेळेला तो बाहेर आला, महापुर येतो त्यावेळी...

भावनेच्या तराजूत जर प्रेम आणि कर्तव्ये ठेवली तर कोणाची बाजू जास्त वजनदार असेल??? कर्तव्यांची...हो ना...पण मी हे चुकीच मानते, जर प्रेम आणि कर्तव्ये तोलायचीच असतील तर प्रेमाचं वजन नक्कीच जास्त आहे...खर प्रेम तुम्हाला कधीच तुमच्या कर्तव्यांपासून परावृत्त करत नाही, खर प्रेम तुम्हाला नेहमीच तुमच्या कर्त्यव्यांची जाणीव करून देत, कारण खर प्रेम कधीच स्वार्थी नसतं... खऱ्या प्रेमात फक्त 'देणं' असतं, 'मागण' काहीच नसतं, आणि ज्याला ही गोष्ट कळाली तो दु:खातही आनंद शोधूनच घेतो...

मी माझ्या कोणत्याही कर्त्यव्यांपासून दूर व्हावी असं कधीच विक्रम मला काही बोलला नाही किंवा तसा वागला नाही, मी अभयशी कस वागावं यापासून तर त्याच्या बर्थडे ला मी काय गिफ्ट द्यावं, या सगळ्यामध्ये विक्रम होता... आणि या सगळ्या चुकीच्या गोष्टी त्याने केल्या...हो चुकीच्याच होत्या या गोष्टी....या सगळ्यामुळेचं तो माझ्या मनात कधी शिरला याचा पत्ता नाही लागला मला आणि कधीही न भरणारा एकाकीपणा देऊन गेला मला.....आता मला नको वाटतं विक्रम किंवा त्याची एकही गोष्ट आठवायला पण त्याच्या आठवणी इतक्या हट्टी आहेत, मूळ पकडून बसल्या आहेत माझ्या मनात, जेवढं काढण्याचा प्रयत्न करते, तेवढाच त्रास मला होतो....किती चांगलं झालं असतं जर आठवणी पुसून टाकू शकलो असतो तर, पण दुर्दैवाने अस काहीही होत नाही....

त्यादिवशी कॅफेतुन बाहेर पडताना अंतःकरण जड झालं होतं, मेघ दाटून आल्याप्रमाणे मनाच्या खोलीत अंधार पसरला होता, सगळं काही अंधुक झालं होतं...नियतीचा इशारा समजलीच नाही मी. विक्रम मला बाहेरपर्यंत सोडायला आला,

"चल निघू मी आता??"
मी जड मनाने त्याला बोलली,

"तुला माहीत आहे ना सोनू?"

"काय?"

"माझी परमिशन घेत बसलीस तर कधीच जाऊ शकणार नाहीस, त्यामुळे निघ लवकर..."
आणि अस बोलून त्याने मान दुसरीकडे वळवली, कदाचित माझ्या नजरेला नजर तोही देऊ शकत नव्हता, मीही बघितल नाही त्याच्याकडे आणि न बघताच बोलली,

"ठीक आहे, येते मी.." मी जायला निघाली, त्याने मला पुन्हा आवाज दिला,

"सोनू...थांब.." आणि माझ्या जवळ आला, आणि बोलला,

"माहित आहे, सध्या तरी जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतेस तेवढी आनंदी नाहीस तू, पण माझा विश्वास आहे एक दिवस नक्कीच एवढी आनंदी असशील तू अभयसोबत की या नालायक मित्राच नावंही आठवणार नाही तुला....."

"माझं माहीत नाही, पण मला एक खात्री जरूर आहे, तू कितीही व्यस्त झालास तुझ्या आयुष्यात, कितीही आनंदी असलास दिशासोबत तरी मला मात्र विसरू शकणार नाहीस....असो...तू आनंदी राहावास हीच ईच्छा आणि प्रार्थना आहे माझी.."

"काळजी घे, तुझी आणि अभयचीही..."
माझ्या डोक्यावर हात ठेवत विक्रम बोलला मला..अवघड झालं होतं मला तिथून निघणं, पण त्यादिवशी 'तिथून' निघाली नसती तर आज 'इथे' पोहोचली नसती...
------------------------------------------------------------
कॅफेतून मी आणि नम्रता हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे माझे काही टेस्ट झाले आणि टेस्ट चे रिपोर्ट दोन दिवसांनी मिळणार होते, तोपर्यंत तरी मला आराम करायचा होता...पूर्ण रस्ताभर मी हाच विचार करत होती की विक्रम आणि दिशाच नक्कीच काहीतरी बिनसलं आहे आणि कुठे ना कुठे त्याची कारणीभूत मीच असायला पाहिजे, माझंच मन मला खात होत...आपल्यामुळे कोणाचं मन दुखावल्या जाणं यापेक्षा मोठं पाप कोणतच नाही, आणि माझ्या हातून कळत नकळत हे घडलं होतं, अनेकांची मनं मी दुखवली होती, त्यामुळे आता मला काहीतरी ठोस पाऊल उचलणं गरजेचं होतं...याच विचारात मी आणि नम्रता घरी पोचलो तर अभय आमची वाट पाहत होता, घरात पाय ठेवल्याबरोबर अभयच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली, सध्यातरी त्याला उत्तर देण्याची माझी मनस्थिती नव्हती कारण मला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता...अभयला काही उत्तर न देता मी आतमध्ये निघून गेली,

"हे बघ नम्रता, हा असा अटीट्यूड आहे हिचा, किती चुका माफ करायच्या मी हिच्या, माझ्या जागी दुसरा कोणी असता तर एवढा नरमीने घेतला असता का हा विषय??"
अभय तावातावात नम्रताला बोलला,

"हो अभय, तुझ्या जागेवर दुसरा कोणी असता तर त्याने नैनाला अशी चूक करायला स्कोप च दिला नसता..."

"म्हणजे,??मला नाही कळाल?"

"तस मला तुमच्या वयक्तिक गोष्टीत पडायचा काही अधिकार नाही पण मागच्या काही दिवसात तुमच्या दोघांनाही बघते आहे मी.....मला हेच वाटत अभय की काहीही व्हावं पण तुमचं नातं अबाधित राहावं, मान्य आहे नैना चुकली किंवा अजूनही चुकत असेल, पण तुला काय वाटत तू बरोबर आहेस??"

"हे बघ नम्रता, माझा भूतकाळ आहे पण आता माझ्या आयुष्यात फक्त नैना आहे, पण ती काय करत आहे हे नाही दिसत का तुला?"

"मी बोलली ना अभय, ती नक्कीच चुकली, आणि राहिला तुझ्या भूतकाळाचा प्रश्न तर जेंव्हा तुमचं लग्न झालं तेंव्हापासून तर कितीतरी दिवस तुझ्या लाईफ मध्ये कोणीतरी होतं, तेंव्हा तू नाही चुकलास?? मान्य आहे आज तुझ्या मनात फक्त नैनाच असेल पण तिने तुला तीन वर्ष दिलीत अभय, मी पाहिलं तिला, ती काय परिस्थितीतुन गेली आणि तरीही ती संयम ठेऊन प्रयत्न करत राहिली तुला मिळवण्याच्या, आणि तू तर तिला फक्त तीस दिवसातच कंटाळला... जर आधीपासून तुमच्यात सगळं व्यवस्थित असत तर नैनाला कोणाची गरजच वाटली नसती, तुला त्रास होतोय मान्य आहे आणि त्यासाठी तिला मी रागवली पण आहे खूप, पण तू ही थोडा संयम ठेऊन बघ...जबरस्तीने गोष्टी फक्त हातातून निसटतात अभय...शेवटी मला हेच वाटत अजूनही वेळ गेली नाही, सगळं काही निस्तारु शकत, मी तिलाही सांगेन आणि तू ही शांती ठेव आणि प्लिज आता विक्रम च नाव तिच्यासमोर तरी तोंडातून काढू नको..."

अभय आणि नम्रताच बोलणं सुरूच होत, तेवढ्यात मी बाहेर आली आणि अभयला बोलली,

"मला बोलायचं आहे महत्त्वाच....अभय मला नाही माहीत माझी चूक झाली किंवा नाही झाली, तू माझ्याबद्दल काय विचार करतो पण एक सांगते, जेव्हापासून लग्न करून आली आहे तेंव्हापासून खूप प्रयत्न केले की आपलं नातं घट्ट व्हावं, तुझ्या मनात माझी जागा बनवावी पण नकळत माझ्या हातून अस काहीतरी झालं ज्याचा त्रास तुला होतोय आणि तुझं मन दु:खाव असा माझा हेतु कधीच नव्हता पण तरीही माझ्यामुळे तुला त्रास झाला पण आता पुढे नाही होणार...."

"पुढे नाही होणार म्हणजे??" नम्रता बोलली,

"अभय, मला जायचंय नागपूर ला....नेहमीसाठी....मला नाही वाटत आपण एकमेकांसोबत खुश राहू शकतो, मला वाटत सोबत राहून त्रास करून घेण्यापेक्षा, वेगळं झालेलं बरं..."

"वेडी झालीयेस का तू नैना.....खेळ वाटला का तुला हा सगळा?"
नम्रताला खूप वाईट वाटत होतं,

"बोलू दे तिला नम्रता, तू बोल नैना, हा तुझा शेवटचा निर्णय आहे का?" अभय बोलला,

"हो अभय, कस आहे ना, खुप प्रयत्न केले मी आणि तुही, पण हे खूप गुंतागुंतीच झालं आहे आणि मी हे काही रागात सांगत नाही आहे, तू खरच खूप चांगला व्यक्ती आहेस अभय, पण आपण एकमेकांना सुख देऊ शकत नाही हेही तितकंच खरं आहे, त्यामुळे आपण वेगळं होऊ.."

"ठीक आहे जशी तुझी ईच्छा, पण जोपर्यंत तुझे रिपोर्ट येत नाही तोपर्यंत वेळ दे मला, कारण हे अस अचानक घरी सांगावं लागेल आणि तुझी ट्रीटमेंट आणि तिकीट ही करावं लागेल मला त्यामुळे थोडा वेळ हवा मला..."

एवढं बोलून अभय निघून गेला बाहेर, त्याला दुःख झालं असेल पण माझ्या निर्णय अटळ होता, नम्रता मात्र चांगलीच भडकली माझ्यावर....,
"अस काय सांगितलं आज विक्रमने तुला नैना, जो इतका मोठा निर्णय घेतला तू?? यासाठी भेटायला गेली होती का तू त्याला? मी आताच अभयला किती बोलली तुझ्यासाठी आणि तू इतका स्वार्थी विचार केलास... खूप राग आलाय मला तुझा आता..."

"मी स्वार्थीच आहे ग राणी....माझ्या स्वार्थासाठी अभय खुश नसून पण इतके दिवस राहिली त्याच्यासोबत, माझ्या स्वार्थासाठी च मी विक्रमला वारंवार भेटत राहिली आणि बघ ना ग आज माझ्या स्वार्थामुळे ना अभय खुश आहे ना विक्रम...त्याच्याही आयुष्यात अडचण निर्माण करून ठेवली मी, आणि अभयलाही त्रास होतो माझ्यामुळे, मी जर इथे राहिली ना नम्रता, मी विक्रमला भेटत राहणार किंवा फोन करत राहणार आणि त्याचा त्रास विक्रमला तर होणारच आणि अभयलाही होणार...विक्रम आणि माझ्या वाटा खूप वेगळ्या आहेत आणि अभयच्या मनात तर मी कधी नव्हतीच, मग आता सोबत राहून काय करू...त्यामुळे हेच बरोबर आहे..."

"आणि तुझं काय नैना?? माझं ऐक ग, अभय खरच खुश ठेवेल तुला, नको असा निर्णय घेऊ...."

"तो मला खुश ठेवेल यात शंकाच नाही पण मी त्याला नाही सुखी ठेऊ शकत... "

खर तर हा निर्णय घेणं माझ्यासाठी ही सोप्प नव्हतं, पण मला हे कळून चुकलं होतं की माझ्या मनातून विक्रम निघणार नाही आणि अश्या परिस्थितीत मी अभयला फक्त दुःखच देऊ शकते...आणि विक्रम आणि दिशाच्या आयुष्यात तर मी गैरसमज निर्माण केलेच होते, अजून मला कोणाचं आयुष्य नरक बनवायचं नव्हतं, त्यामुळे सध्या परिस्थितीत मला हा एकच मार्ग दिसत होता...अभयला नक्कीच खूप त्रास झाला होता माझे शब्द ऐकून पण जर सोबत राहिलो असतो तर त्याच्या मनात शंका येत राहिल्या असत्या आणि त्याच्या दुःखात मला भर टाकायची नव्हती...माझ्या बुद्धीला त्यावेळेला जे योग्य वाटलं ते करण्याचा प्रयत्न केला मी, ते चूक होत, बरोबर होत याचा विचार नाही केला...माझी आणि विक्रमची ती शेवटची भेट समजून घेतली मी, यानंतर मला त्याच्या बद्दल विचारही करायचा नव्हता....

लग्न हे खरच खुप पवित्र बंधन असतं, पण जर हे बंधन गळ्यातला फास बनत असेल तर जीव गुदमरायला लागतो आणि मोकळा श्वास घेण्यासाठी नाईलाजाने हा फास तोडावाच लागतो... माझ्या इतकं दुर्दैवी आयुष्य कोणाचच नसावं, मी कोणत्याच नात्याला न्याय देऊ शकली नाही असं मला वाटत होतं...त्यावेळेला मला अभयसोबत घालवलेले एक एक क्षण आठवत होते, लग्न झाल्यापासुन तो किती दुःखी राहायचा, कशी मी जबरदस्ती त्याच्या आयुष्यात घुसवल्या गेली होती आणि फक्त जबाबदारी किंवा ओझं म्हणून तो मला संभाळत गेला, त्यांनतर कशाप्रकारे विक्रम आला आणि माझं आयुष्य बदललं...खूप मोठं वादळ होतं माझ्या आयुष्यातल हे आणि मी त्या वादळातल्या सुकलेल्या पानाच्या कणासारखी होती...वादळ शमल्यावर हे कण कुठे जाऊन पडेल याची काहीच कल्पना नव्हती मला....
-------------------------------------------------------------
क्रमशः

( Dear readers....तुम्ही आतापर्यंत या कथेल्या दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी खूप खूप आभारी आहे, सगळ्यांत आधी तर एक सांगावस वाटत की तुम्ही दिलेल्या समीक्षा किंवा मेसेजेस ला कधी रिप्लाय देणं शक्य होत कधी होत नाही त्यामुळे त्यासाठी माफी असावी, पण तुम्ही दिलेले अभिप्राय मला नक्कीच प्रेरित करतात चांगलं लिहायला...अजून एक सांगावस वाटत, जे मी आधीही बोलली आहे, ही कथा काल्पनिक आहे आणि प्लिज कथेला कथे सारख घ्या, मान्य आहे हा विषय खूप विवादास्पद आहे मांडायला पण तरीही मी लिहिण्याचा प्रयत्न केला यावर..ते किती चांगल्या पद्धतीने मी मांडला आहे हे फक्त तुम्हीच सांगू शकता...पण अगदी मनातून सांगते की जेंव्हा लिहायला सुरू केलं होतं तेंव्हा मला ही कल्पना नव्हती की ही कथा आवडेल सगळ्याना आणि यामुळे कोणाचं मन दुखावलं जाईल याचीही कल्पना नव्हती, त्यामुळे त्या लोकांची माफीही मागते...आता येऊ या मूळ मुद्यावर, काय म्हणतात ते..हा, 'etxra marital affair' , खर तर खुप जास्त समज मला आहे याबद्दल बोलायला अस मला वाटत नाही तरी सांगते... या कथेत मी फक्त आणि फक्त निखळ मैत्री आणि प्रेमाचं नातं मांडण्याचा प्रयत्न केला...जेंव्हा आपण 'extra marital affair' बद्दल बोलतो तेंव्हा त्यात दोन लोक फक्त स्वतःचा विचार करतात, त्यात ते त्यांना सुख कस मिळेल याचाच विचार जास्त करतात, कोणाच्या भावनांशी त्यांना काही घेणं देणं नसत आणि सगळ्यात महत्त्वाचे ते कधीच त्या नात्यामधल्या दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या जोडीदाराबद्दल चांगलं सांगत नाही, त्याच्या जबाबदाऱ्या पासून दूर करण्याचा प्रयत्न करतात....पण प्रेमात अस होत नाही, जस की मी बोलली प्रेम स्वार्थी नसतं, त्यामुळे खर प्रेम करणारे लोक कधीच त्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचण निर्माण व्हावी अस वागत नाहीत...माझ्या कथेत तर तुम्ही अगदी पहिल्या भागापासून बघा कधीच विक्रम किंवा नैनाने एकमेकांना वाईट मार्गदर्शन केलं नाही.....पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जोडीदाराशी प्रतारणा करा..आणि असा काही संदेशही मी देऊ पाहत नाही..हे तर मी बोलली प्रेमा बद्दल, लग्न या बद्दल ही खुप काही आहे लिहायला आणि मी ते अगदी थोडक्या शब्दांत माझ्या 'आत्ममिलन' या लेखात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, तुमची इच्छा असेल तर नक्की वाचू शकता.... वाचक म्हणून तुम्ही दिलेले सगळे comments मला मनापासून मान्य आहेत, पण हेही सांगावस वाटत की एक चांगला वाचक सगळी कथा वाचून त्याचा आशय समजून घेतो आणि समीक्षा देतो आणि जेंव्हा एक वाचक समीक्षा देतो तेंव्हाच एका लेखकाची प्रगती होते, वाचकाशिवाय लेखक नगण्य आहे...

ही कथा लिहीताना जास्त विचार नव्हता केला मी की ही गोष्टी कोणाच्या आयुष्यातही घडू शकते, पण जसे जसे एक एक भाग टाकत गेली मला मसेजेस येत गेले की कशी ही कथा काही लोकांच्या आयुष्याचा एक भाग आहे, तेंव्हा कळाल की अरे खरच, आपल्या आजूबाजूला पण कित्येक नैना, विक्रम आणि अभय राहतात.... ज्यांच्यासोबत हे घडलं आहे त्याना चूक किंवा बरोबर म्हणण्याचा अधिकार मला नाही... कारण मला माहित नाही त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय काय बघीतल असेल, काय काय सोसलं असेल.... त्यामुळे जे कोणी असे " नैना विक्रम किंवा अभय" आहेत त्यांच्या भावनांचा मी आदर करते...लांब राहून लोकांना jugde करणं खूप सोप्प असत पण ती व्यक्ती कोणत्या परिस्थिती मध्ये तशी वागली हे समजून घेणं महत्त्वाच असतं अस मला वाटत...आपल्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित आहे त्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यातही असेल असं नाही होऊ शकत.... पण तरीही प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा...मला कोणीतरी बोललं की आपण ज्या रंगाचा चष्म्या लावतो आपल्याला दुनिया त्या रंगाची दिसते, या एका वाक्याने मला खुपच धीर दिला, नाहीतर मला खरच दडपण आल होत की मी काही चुकीचं लिहिते आहे का....त्यामुळे जे कोणी असे 'विक्रम नैना किंवा अभय' ही कथा वाचत असतील किंवा या समाजात असतील त्यांना कोणी काहीही म्हणो, मी तरी त्यांच्या भावनांचा आदरच करते...पण या लोकांना मी एक सांगू इच्छिते की आपल्याला काय हवंय हे आपल्याला माहीत असत आणि ते मिळवणं ही सोप्प असत पण आपल्या लोकांना आपल्या कडून काय हवंय हे जाऊन घेणं आणि ते त्याना देणं आणि कोणत्याही प्रकारे त्यांचं मन न दुखावण हेच खरं प्रेम आहे आणि हेच खरं समर्पण आहे....पण हे सगळे माझे मत आहेत आणि मी ते कोणावर लादू शकत नाही, तुमचे मत वेगळे ही असु शकते....आता शेवटचे दोन भाग उरले आहेत कथेचे त्यामुळे एक विनंती आहे की जोपर्यंत कथा पूर्ण होत नाही तोपर्यंत चुकीचे काही निष्कर्ष नका काढू.....पुन्हा एकदा आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल खुप खूप धन्यवाद....

तुमचीच,
अनु..🍁🍁


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED