पेरजागढ- एक रहस्य... - १३ कार्तिक हजारे द्वारा कादंबरी भाग मराठी में पीडीएफ

पेरजागढ- एक रहस्य... - १३

१३) रहस्याचा थोडाफार खुलासा आणि पवनचे सोनापुरात आगमन...काही दिवसांपूर्वीच मला आपले नातेवाईक सोनापूरला असतात मला असे कळले.आधीपासूनच मी रिलेशनमध्ये कुठे गेलो नसल्यामुळे माझी कित्येकांची ओळखी अशी अर्धवटच होती. त्यामुळे तिथले नाते माझ्यासाठीतरी अपरिचितच होते. काही दिवसांपूर्वी ते गावाकडे आले होते. त्यावेळी माझा आणि त्यांचा परिचय झाला. मला त्यांनी आवर्जून आपल्या गावाकडे यायला सांगितलं आणि यावेळी तशी संधी पण चांगली होती.

   त्यांचा नंबर बघत मी त्यांना कॉल केला आणि मी येत असल्याचा खुलासा केला. मी येत असल्यामुळे त्यांनी पण आनंदाने मला, अगदी आवर्जून ये म्हणून म्हटलं. कारण त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी तरी मी पहिल्यांदाच तिथे चाललो होतो. त्यामुळे जितका आनंद मला तिथे जाण्याचा होता तितकाच आनंद माझ्या जाण्याने त्यांना सुद्धा होता.

   गडावर जायच्या आनंदात असताना मी इकडे तिकडे रूम मधून चकरा मारू लागलो. अचानक त्या साधूने दिलेल्या त्या थैलीची आठवण झाली आणि परत एकदा थैलीतून ताम्रपत्राची ती पाने काढली आणि डोक्यात परत एकदा विचारांचं काहूर जमा झालं. अचानक दारावर ठक ठक आली दरवाजा उघडला दारावर गोड स्मित पसरवून रितू उभी होती.

  "तू आहे का ये आत ये"

"का अजून दुसरा कोणी  येणार होतं काय?"

तिचं मात्र खरं होतं चेहऱ्यावरली भाषा अगदी पुस्तकाचं पान वाचल्यागत टिपून घ्यायची. आणि कदाचित याच गोष्टीवर मी तिच्यावर फिदा झालो होतो.चेहऱ्यावरचे बारा बघून ती म्हणाली... तू बस मी पाणी घेऊन आले..

रितू माझी अगदी बालपणीची मैत्रीण होती. शेजारच्या गजेंद्र मामाजीची मुलगी. संबंध सोयर तसे चांगले होते.आतल्या भाकरीचे दोन तुकडे करून खाणारे माणसं आणि आमचं भेटकोट आधीपासूनच असायचं. त्यामुळे कुणाला काही बोलायची भारी भीती.पण जे चालत होतं ते प्रत्येकाच्या नजरेत होतं.कुणाला कुणावर संशय नव्हता. फक्त असायची ती जबाबदारी. त्यामुळे आमच्या प्रेमाला असं कोणाचाच विरोध नव्हता.अगदी आम्ही एकमेकांसाठी आहोत अशीच चर्चा चालायची आमच्या मोहल्ल्यात.

     आधीपासूनच चंचल, समजूतदार आणि साजेशी...ज्यामुळे स्वतःचं स्थान तिने तेव्हापासूनच घरात कायम करून ठेवलं होतं.माझ मृत्यू प्रकरण जेव्हा पासून चालू झालं तेव्हापासून माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी आणि आधार देणारी ही तीच होती. त्यामुळे तिचं येणं मला आवडायचं.

ग्लास माझ्या हातात देत म्हणाली
आता काय झालं परत? चेहऱ्यावरचं रूप मावळायला...

अगं काही नाही..उद्या निघणार होतो, पण अचानक ईथे लक्ष गेली.आणि मला परत काहीसं सुचायला लागलं...

 काय?

तू तुझ्या मोबाईलचं मॅप चालू कर माझी चार्जिंग संपलीय.

तिने तिच्या मोबाईलचा मॅप चालू केला. आणि पेरजागढापाशी जाण्याचा प्रयत्न करत होती. आणि मी ते ताम्रपत्र काढलं.आतापर्यंत निसर्गाचे जे चित्र मी बघत होतो ते योगायोग नव्हते.ताम्रपत्रावर पूर्ण पर्वतमाला उमटली होती. ज्यात काही खुणा होत्या.

    मघाशी ज्या त्रिशूल आणि शंख विषय मी बोलत होतो ते मी डोळ्यांनी टिपलं असं मला वाटलं. पण त्या सर्व आकृत्या अगदी स्पष्टपणे ताम्रपत्रावर कोरलेल्या होत्या. क्षणभर ताम्रपत्राकडे आणि तिच्या मोबाईल कडे बघत होतो. काहीच कळत नव्हते. हा कशाचा संयोग आहे? कशाच्या खुणा आहेत या सगळ्या?

     माझ्या अजूनही त्या लक्षात येत नव्हत्या. रीतुही सारखी सैरभैर माझ्याकडे बघत होती. तिला ह्यातलं गुपित काहीच कळलं नव्हतं. कारण जी रचना आज आपण डोळ्यांनी बघत आहोत याची पूर्ती याआधीच झाली आहे, आणि आतापर्यंत मी काय काय शोधत होतो? खरं तर माझ्यासाठी ही एक नवलाचीच गोष्ट होती. पण एक समाधान मात्र नक्की चेहऱ्यावर उघडलं होतं.

    कदाचित इतक्या दिवसांच्या अप्रतिम कष्टानंतर मिळालेलं हे पहिलं समाधान होतं. नक्की मी माझ्या मृत्यूच्या रहस्याच्या कुठेतरी जवळ आलो आहे, याचा भास वाटू लागला होता.शेवटी मी ते ताम्रपत्र थैलीत टाकलं आणि रितुला म्हणालो उद्या निघायचं आहे मला. कदाचित हाच आधार मला माझ्या मृत्यूपर्यंत नेण्याचं मार्ग अडवु शकतो.

   प्लीज यार... असं नको बोलूस... जाताना कधीही येते म्हणावं!! आणि मला खात्री आहे, तू नक्की येशील. निदान माझ्यासाठी तरी. झोप आता..कारण  मी उद्या तुला भेटणार नाही. बाबांसोबत तालुक्याला जात आहे  आणि नातेवाईकांकडे पण.सांगायला आली होती. हलकेच कपाळाची किसी घेऊन तिने माघार घेतली आणि दरवाजा बंद करून ती निघून गेली.रोजच्या सारखा दिवसभराच्या घटनाक्रमाचा अभ्यास करत मी सुद्धा केव्हां झोपेच्या स्वाधीन गेलो मला सुद्धा कळलंच नाही.

   सकाळी सांगितल्याप्रमाणे रितुतर आलीच नाही पण मी निघालो प्रवासाला. दोन ते अडीच तासाचा प्रवास असल्यामुळे फारसा काही थकवा आला नाही.नैसर्गिकतेचा आस्वाद घेत मी त्या गावात जाताना फक्त इतकाच विचार करत होतो, की जंगल भागात राहणे म्हणजे, कसे राहात असतील ईथले गृहस्थ? हा एक प्रश्न होता की सर्वसाधारणपणे असलेल्या माणसाला कदाचित पडलाच असता.सतत असलेल्या दृष्टिकोनात गोष्टींची माणसाला इतकी सवय होऊन जाते, की भय कशाला म्हणतात हे सुद्धा कळत नाही.कारण आपल्याला नुसत्या जंगलाचा भय वाटतो पण त्याचं तर वन्य प्राण्यासोबत रोजचा वावर असतो. अगदी शुल्लक कारणावरूनही ते त्या घनदाट जंगलात जात असतात मग काय आणि कशाचं असेल त्यांना भय?

    सोनापूर पाच दहा मिनिटात अंतर असेल,तर खिडकितुन पेरजागढचं शिखर अगदी स्वच्छंदपणे डोळ्यात दिसत होते. परत एकदा आडवी नजर टाकून जेव्हा मी बघितलं, तर खरंच एखाद्या महिलेला आकाशाकडे बघत लेटण्याचं चित्र डोळ्यांत होतं.गाव तसं छोटं होतं त्यामुळे कुठे भरकटनार तर नाहीच होतो.पण काकांचे घर माहित नसल्याकारणाने बस मधूनच मी फोन केला होता की बस स्टॉप वर येऊन राहा म्हणून.बसच्या खिडकीतूनच काका हात हलवताना दिसला आणि आपलं कोणीतरी आहे याची जाणीव झाली. शेवटी एकदाचा सोनापुरात मी दाखल झालो.

   काकांचा म्हणजे घर तसं जवळच होतं. पण घरी नात्यांची अशी गुंतवणूक होती की तितकीच मजा यावी. कारण काकाला जसं काका म्हणावं तर  त्यांच्या मिसेसला काकुच म्हणावं लागेल आणि बहिणी तर भाऊच म्हणतील ना. पण त्याच बहिणी जर मामा म्हटलं तर..!!! आणि त्या म्हणूही शकत होत्या.

    गावखेड्यात जुनाट परंपरा असतात. आजही काही पद्धती चालू असतात.सध्याच्या विवाह पद्धतीत तो कायदा नसतो म्हणून सतत घटस्फोट होऊन कोर्टाच्या चकरा माराव्या लागतात आणि जीवन मोडकळीस येतं. पण गावाच्या लग्नाची मजाच काही और असते.

  काकांची सौ आईच्या माहेरातली आणि माहेरच्या नात्यात ती माझी बहीण.मग झालो की मी मुलींचा मामा त्यामुळे जर कधी गमतीची वेळ आली तर सहज म्हणायचं की मी तुम्हाला काकू म्हणायचं की ताई म्हणायचं. मग सगळे हसायला लागायचे कारण बहिणींना मामा म्हणण्यापेक्षा मला भाऊ म्हणने केव्हाही चांगले वाटायचे. असो हे प्रकरण आमचं घरचं होतं पण ज्या कामासाठी मी इथे आलो त्याचा विचार करूया.

   गावठाण भाग आणि गावठी दारू. जंगलात राहणारे नेहमी मोहाची घेतात त्यामुळे  मी पण घेतली.गेल्यावर वार एकदम मटणावर होऊन गेला.जेवण झाल्यावर बाहेर बसलो होतो की आजूबाजूची मंडळी भरली आणि जाम गमती होऊ लागल्या. प्रत्येकासाठी नवीन असलेला मी, पण माझ्यासाठी मला नवीन काहीच वाटलं नव्हतं.दोन दिवसात मी माझी ओळख, माझं नाव असं गाजवून ठेवलं होतं.

      काकाला मग एकांतात जाऊन विचारलं की पेरजागडावर इतक्यात जाता येईल का ?कारण आधीच ऐकलय की फॉरेस्ट डिपार्टमेंटने ते स्थळ आपल्या ताब्यात घेतलं आहे म्हणून.

फिरायला तसं जाता येते, पण काही स्वयंपाक वगैरे म्हटलं, की त्याची परमिशन वगैरे घ्यावी लागते.

  सध्या तरी मला फक्त फिरायचं आहे. कारण त्यासाठीच मी इथे आलो आहे.जितके फिरता येईल तितके फिरणार, जिथे जाता येईल तिथे जाणार.

मी तर नाही येऊ शकणार, पण एक सोबती मिळवून देतो तुला. ज्याला या जंगलाची संपूर्ण माहिती आहे.तो भेटणार तुला परवा. उद्या एक काम कर पेरजागढ फिरुन ये. चालुच असते ते.. कोणीही जाऊ शकतो तिथे....

तिथे कोणी राहात असेल तर ठीक, नाहीतर एकटा जाणेही अवघड व्हायचं. कारण जंगलात मी आधीच नवीन आहे.

अरे काही नाही होत, फक्त उद्या सकाळी आंघोळ कर, मटण वगैरे नको खाऊस. कारण ते तिथे चालत नाही.

असं का?

ते त्या जंगलाचं सत्व आहे. सत्व तुमच्या शहरी भागातलं जातं.असल्या खेड्यातलं नाही. कारण आम्ही त्यांची राखण करतो, आणि स्वतः ते सुद्धा स्वतःला जोपासत असतात.

म्हणजे?

अरे ज्या बहिणी लुप्त पावलेल्या आहेत.त्या ठिकाणी  त्या अविवाहित होत्या. त्यामुळे हळद लागलेली मुले यांचं सहवास या गडाला भावत नाही. मासिक पाळी असलेल्या किंवा मास सेवन केलेल्यांना हे असलं काही तिथे चालत नाही. ते जंगलच त्याला खाऊन टाकते.

म्हणजे तुमचं म्हणणं अस आहे, की यापैकी एकही वस्तू केलेली व्यक्ती असली तर त्याचं वाईट होतं.

हो... तुला काय वाटलं. नियम फक्त माणसंच बनवू शकतात.जगात सत्वाशिवाय आणखी काहीच खरं नाही. फरक फक्त इतकाच असतो, की त्याचं अस्तित्व दिसण्यापेक्षा त्याच्या असण्याला महत्त्व देते.

म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आजही सत्व तिथे कायम आहे.

अरे हे माझे एकट्याचे बोल नाही. जनहिताचे बोल आहेत.त्यात अनुभव प्रत्येकाचाच निराळा असतो. कितीतरी जण असे मृत्युमुखी मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे. आणि त्यात प्रत्येकांची चुकीपण आहे.

हो काका पण हेच जर जगाला सांगितलं तर काय म्हणेल जग?

 जग म्हणजे काय? आपण मान्य म्हणजे जग मान्य. कारण प्रत्येकाला त्याच्या प्राणाशिवाय हवंय तरी काय असते? कारण जीवावर बितल्याशिवाय कुणालाच त्याची चुकी दिसत नाही. शेवटी अहंकार किती वेळ चालणार.झोप आता रात्र झाली.

बरं काका शुभ रात्री.

    लाईट बंद झाला मी मोबाईल विचकने चालू केले. कारण खेड्यातील लोक सातच्या आत घरात आणि दहा म्हणजे खाटेवर झोपून पहा अशा पद्धतीचे वातावरण असते. रात्री आपण बारा वाजेपर्यंत जागणारे, आपल्याला काय माहिती झोपण्याचे फायदे.डॉक्टरांनी म्हटले आहे की आपण रात्रीच्या वेळी आराम करतो तेव्हा आपला मेंदू पण फ्रेश झाल्यागत काम करत असतो. कारण म्हणजे आपले सगळे अवयव आराम करतात.

     रात्री दहाला सगळी शांतता गावात पसरते.अगदी निरव शांतता. बाहेर हिंस्त्र श्वापदांचा वावर गावापर्यंत असतो. म्हणून फारसे कोणी फिरकत नाही, पण जंगलातलं एकदम साफ वातावरण मन अगदी प्रसन्न करून टाकते. रात्रीची फुलझाडे बहिणींनी दरवाज्यापाशी संगोपली होती.त्यामुळे रात्रभर सुवास पसरत होता.मनात कसलेही त्राण येत नव्हते क्षणभर असं वाटलं की आपण इथेच स्थायिक होऊन जाऊ या.

रेट करा आणि टिप्पणी द्या

G Kadam

G Kadam 6 महिना पूर्वी

Its Adi

Its Adi 9 महिना पूर्वी

rekha bhaskar

rekha bhaskar 1 वर्ष पूर्वी

ya pudhil part kadhi yenar

Anil Kalambe

Anil Kalambe 1 वर्ष पूर्वी

Dilip Yeole

Dilip Yeole 1 वर्ष पूर्वी