सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 2 Shubham Patil द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 2

ह्या अरुंद नागमोडी रस्त्यांवर मनाचा संयम ठेऊन ज्याने गाडी चालावली तो काय उद्या जगातल्या कुठल्याही रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी सज्ज होईल. नुकतीच दिवाळी झाली असल्याने ठिकठिकाणी अर्धवट जळलेले फटाके दिसत होते. चौकात दिवाळीचे शुभेच्छाफलक नजर वेधून घेत होते. नागमोडी वळणं घेत द राम भांडार ला पोहोचलो. गरम-गरम जिलेबी नुकतीच तळण्यास सुरुवात झाली होती. कचोरी (आपल्याकडील पुरी) बटाट्याची भाजी , त्यावर अनेक चटण्या आणि जिलेबी हा वाराणसीचा जगप्रसिद्ध नाश्ता आहे. द राम भांडार हे खवय्यांना तसेच पर्यटकांना नेहमीपासूनच आकर्षित करत आले आहे. आपल्याकडे आपण ज्याला पुरी म्हणतो, तशीच पण थोडी उडदाची डाळ घालून तयार केलेली पुरी, याला ते गोल कचोरी म्हणतत आणि लाडूंसारख्या आकाराने लहान असणाऱ्या कचोरीला फक्त कचोरी म्हणतात. सकाळी देखील इथे बरीच मंडळी होती. शेवटी एका बाकावर जागा पकडून मी एक प्लेट कचोरी-भाजी आणि जिलेबीची ऑर्डर दिली. यथावकाश माझी ऑर्डर आली. बटाट्याच्या भाजीत टाकलेल्या विविध चटण्यांमुळे भाजीची चव अतिशय सुंदर होती आणि गरम जिलेबी तर अप्रतिम होती. ऐन सकाळी थंडीत वाराणसीत असा नाश्ता करणे म्हणजे स्वर्गसुखापेक्षा कमी नाही. अहाहा...!!!, आता लिहितानासुद्धा तोंडाला पाणी सुटतंय. दुकानाचे मालक श्री राजेंद्रजी आपल्या दोन सहकाऱ्यांसह खवय्यांची भूक भागवण्याचे काम अव्याहतपणे करत आहेत. त्यांचे या उत्कृष्ट नाश्त्याबद्दल आभार मानायचे असं ठरवलं. मी त्यांना म्हटलो, “जी बोहोत स्वादिष्ट था सबकुछ.”

त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, “शुक्रिया, आपाको पसंद आया. हमको अच्छा लगा. धन्यवावाद.” त्यांनी हसून निरोप दिला आणि मी पुढील मार्गाला लागलो.

आता मी श्री काशी विश्वनाथ मंदिरात जाणार होतो. परत गल्लीबोळातून जायचे होते. एका पानवाल्याला रस्ता विचारून निघालो. जवळपास पंधरा-वीस मिनिटं पायपीट करून मी श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या गेट नंबर ३ जवळ आलो. मागच्या वेळी दोन नंबर गेटने गेलो होतो. तो रस्ता नदीकडून आहे. आता गर्दी बरीच वाढली होती. सकाळी याच रस्त्यावरून गेलो तेव्हा चिटपाखरूही नव्हते, आणि आता गर्दीतून वाट काढावी लागत होती. याला कारणही तसेच होते, कार्तिक पौर्णिमेचा तथा देव दिपावलीचा कार्यक्रम काही दिवसांवर येऊन ठेपला होता. या दिवशी सर्वात जास्त गर्दी असते. तिथे जागोजागी पूजा साहित्य विक्रेते बसलेले असतात. त्यांच्याकडे लॉकर सुविधा असते. आपण आपले मोबाईल वा तत्सम साहित्य सुमारे १०० रुपये देऊन त्यांच्याकडे ठेवायचे असते. अशी एकूण पध्दत इथे सुरू आहे. पण श्री काशी विश्वेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून मोफत साहित्य देखील ठेवता येते. मी हा दुसरा पर्याय निवडला. रांगेत न लागता साडेतीनशे रुपयांत डायरेक्ट दर्शन घेण्याची सुविधा देखील आहे. मंदिरात जाण्याआधी पोलिसांनी तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी कसून तपासणी केली.

गेट नंबर तीन ने गेल्यास आपल्याला “ज्ञानवापी मशीद” नजरेस पडते. आधी येथेच मूळ श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर होते. नंदी आजही मशिदीच्या दिशेने तोंड करून आहे. हे असे एकमेव मंदिर आहे जिथे नंदीचे तोंड उलट दिशेने आहे. ज्ञानवापी मशिदीच्या भोवती भक्कम लोखंडी गज उभारले असून आणि जागोजागी सशस्त्र सैनिक पहारा देत उभे आहेत. मुघल सम्राट औरंगजेब याने ०९ एप्रिल १६६९ ला मूळ काशी विश्वनाथ मंदिर नष्ट करण्याचे आदेश दिले. ज्याचा परिणाम म्हणून ऑगस्ट १६६९ ला मंदिर नष्ट करून ज्ञानवापी मशिदीची निर्मिती झाली. या आदेशाची मूळ प्रत कोलकाता येथील ‘एशियाटिक लायब्ररी’त ठेवली आहे. हे स्थान शिवपार्वतीचे आदी स्थान आहे. महाभारत आणि उपनिषदांत याचा उल्लेख आढळतो. आग्र्याला जात असताना छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी येथे भेट दिली होती. इसवीसन पूर्व अकराव्या शतकात सत्य बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या राजा हरिश्चंद्राने मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्या नंतर अवंती नगरीचा तथा विक्रम शक सुरू करणारा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य याने जीर्णोद्धार केला. तदनंतर सन ११९४ मध्ये मुहम्मद घोरीने मंदिर लुटून तोडले. मंदिराचे पुनर्निर्माण परत झाले पण १४४७ मध्ये सुलतान महमूद शाह याने मंदिर उध्वस्त केले. नंतर पुन्हा १५८५ मध्ये तोरडमल राजाच्या सहाय्याने पंडित नारायण भट्ट यांनी एका भव्य मंदिराची उभारणी केली. या मंदिराला १६३२ मध्ये शहाजहानने पाडण्याचे आदेश दिले पण त्याची सेना हिंदूंच्या प्रखर विरोधापुढे नमली, पण इतर ६३ मंदिरे तोडली गेली. यानंतर औरंगजेबने मंदिर तोडले व ज्ञानवापी मशीद उभारली. मंदिराच्या विध्वंसाचे वर्णन ‘मशीद ए आलमगिरी’ या पुस्तकात आहे. मराठा साम्राज्याचे शूर सरदार दत्ताजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांनी १७५२ ते १७८० या काळात मंदिर मुक्तीचे प्रयत्न केले. ७ ऑगस्ट १७७० ला महादजी शिंदे यांनी दिल्लीच्या बादशहाला करवसुलीचा आदेश दिला पण तोपर्यंत तिथे ईस्ट इंडिया कंपनीचे कायदे लागू झाले होते. त्यामुळे परत एकदा मंदिर नूतनीकरणाचे काम थांबले. सन १७७०-१७८० मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्या परिसरात प्रस्तुत मंदीर बांधले. प्रस्तुत शिवलिंग हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्थापन केले असून ते त्यांना ओंकारेश्वरच्या नर्मदेत एका दृष्टांतानुसार सापडले आहे.

तत्पूर्वी, सद्यस्थितीत आपण दर्शन घेत असलेल्या शिवलिंगचा इतिहास हा बाहुतेक जनतेला ज्ञात नाहीये. तो काहीसा असा आहे, औरंगजेब याने जेव्हा मंदिर लुटून रत्नखचित अशा लिंगाचा नाश केला तेव्हा काशीतले समस्त पंडित घोर चिंतेत पडले. तेव्हा श्री महादेवांनी त्यांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला की, माझी या युगातली सर्वश्रेष्ठ भक्त (पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर), नर्मदेच्या तीरी ओंकारेश्वर जवळ वास करत आहे, तिला नर्मदेच्या पाण्यात जे लिंग सापडेल त्याची येथे स्थापना करावी.ते लिंगसुद्धा नष्ट झालेल्या लिंगास्वरूप मानून त्याची स्थापना आणि पूजा करावी करण नष्ट झालेल्या लिंगाचे अवशेष ज्ञानवापी मार्गे ‘हाटकेश्वर’ला जाऊन मिळाले आणि त्यांचे आत्मतत्त्व नर्मदेतल्या लिंगात विलीन झाले आहेत. त्यामुळे शंकेला वाव नाही. असं म्हटलं जातं की श्री विश्वेश्वराचे मूळ लिंग हे नवग्रहांच्या रत्नांनी बनले होते. जर काशीत कुणी आजारी पडला तर त्याला या लिंगासमोर उभं केलं जाई, रत्नांच्या केवळ प्रकाशने तो व्यक्ति बरा होत असे. असो,

सुमारे पाऊण तास रांगेत उभे राहिल्यावर दर्शन झाले. गाभाऱ्यात जाताना तीनही रांगेतील भाविकांची मिळून एकच रांग होते. त्यामुळे थोडा गोंधळ होतो. दर्शन करण्यासाठी जेमतेम काही सेकंद मिळतात. त्यात शिवलिंगावर बिल्वपत्र आणि फुलांचा खच पडला नसेल तर आपलं नशीब चांगलं की शिवलिंग आपल्या दृष्टीला पडते आणि नकळतचं तोंडातून शब्द बाहेर पडतात,

“कैलास राणा शिवचंद्र मौळी ।

फणिंद्र माथा मुकुटी झळाळी ।।

कारुण्य सिंधू भवदु:खहारी ।

तुजवीण शंभो मज कोण तारी ।।”

अतिशय प्रसन्न अशा वातावरणातून बाहेर पडावेसे वाटत नव्हते. असंख्य चैतन्याच्या सागरात विलीन झाल्याचा अनुभव येत होता. सकारात्मक ऊर्जेचा अविरत वर्षाव होऊन आपण त्यात नखशिखांत चिंब होतोय असं वाटत होतं. एक वेगळाच आणि अविस्मरणीय अनुभव, समस्त विश्वाला ऊर्जा प्रदान करणार्‍या भंडारातून....

सभामंडपात थोडा वेळ बसलो. गर्दीचा ओघ सुरूच होता. मंदिराच्या आवारात पार्वती माता व अन्नपूर्णा मातेचे मंदिर आहे. भाविकांचा ओघ वाढत होता. माझ्या शेजारी एक परदेशी जोडपे पुजा करण्यासाठी बसले होते. गुरुजी आले आणि त्यांनी पुजा सुरू केली. आचमन वगैरे झाल्यावर गोत्राचा उल्लेख आला, तोच मी कान टवकारले कारण मला उत्सुकता होती की परदेशी लोकं गोत्राचे नाव कसे घेतील? पण गुरुजींनी ती स्टेप डायरेक्ट स्कीप केली आणि पुढे कंटीन्यू केले. परत एकदा मनोमन प्रार्थना करून मी बाहेर निघालो. सकाळी सव्वाअकरा ते साडेबारा पर्यंत आरती मुळे दर्शन बंद असते. नंतर दर्शन सुरू झाल्यावर खूप झुंबड उडते. मागच्या वेळी नेमका याच वेळी रांगेत अडकलो होतो. लॉकर मधून मोबाईल घेतला आणि शेजारीच मणिकर्णिका घाट लिहिलेल्या मोठ्या प्रवेशद्वारातून आत शिरलो.