solo backpacking in varanasi - 1 books and stories free download online pdf in Marathi

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 1

“गोदौलीया चलोगे?”

“जी हां चलीये.”

“कितना समय लगेगा?”

“कुछ नाही जी दस मिनिट मे चले जाओगे.”

मी व्यवस्थित बॅग ठेऊन ई रिक्षात बसलो, आम्ही तिघेजण होतो, त्यांनापण तिकडेच जायचे होते. इतक्या सकाळीसुद्धा चहा बनवायला सुरुवात झाली होती. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर जास्त वर्दळ नव्हती. ड्रायव्हर लोकांनी आपापली वाहनं पुसायला सुरुवात केली होती. मी रस्त्यावरील गंमत बघत होतो, नागमोडी वळणं घेत रिक्षा वेगाने अंतर कापत होती. दहा मिनिटात गोदौलीया चौक आले. ड्रायव्हर ने आवाज दिला तसा मी भानावर आलो.

“कितने हुए?”

“जी दस रुपये, सामनेसे आपको अस्सी घाट के लिये गाडी मिल जाएगी.”

“जी धन्यवाद.”

गोदौलीया चौकातून पुढे गेल्यावर अस्सी घाट, लंका येथे जाण्यासाठी वाहतुकीची साधने उपलब्ध असतात. तिथे एक तीन चाकी सायकलला हात देऊन बसलो. सकाळचे पाच वाजले होते, वाराणसीचा थंड वारा शरीराचीच नव्हे तर मनाची मरगळही सोबत घेऊन जात होता. तब्बल २१ तासांचा रेल्वेचा कंटाळवाणा प्रवास करून मी वाराणसीला पोहोचलो होतो. (भारतीय रेल्वेचे विशेष आभार, गाडी वेळेत पोहोचविल्या बद्दल) तसं माझं आरक्षण वाराणसी जंक्शन पर्यंतच होते, पण मी काशी स्टेशनलाच उतरलो, याने माझा भरपूर वेळ वाचला. माझे सहप्रवासी मूळ वाराणसीच्या आसपासचे असल्याने त्यांना कुठे उतरणं सोईचं ठरेल? हे विचारणं फायद्याचं ठरलं. काशी स्टेशन ते वाराणसी जंक्शन हे अंतर सुमारे ४ किलोमीटरचे आहे, पण गाडीला सिग्नल मिळेपर्यंत खुप वेळ लागतो. त्यामुळे इथे उतरणे केव्हाही सोपे आहे. प्रवासात पुलंचे ‘गोळाबेरीज’ आणि चिं. वि. जोशींचे ‘चिमणरावांचे च-हाट’ असल्याने बराच वेळ प्रवास चांगला झाला. मी प्रवासात नेहमी पुलंची पुस्तके किंवा अभिवाचन बाळगून असतो. पुलंची पुस्तके वाचताना किंवा अभिवाचन ऐकताना आपण देखील त्याच चष्म्यातून बघायला लागतो, आणि गंमत म्हणजे ती पात्रेदेखील काही अंशी खरीच वाटतात.

सकाळचे पाच वाजले होते. सम्पूर्ण वाराणसी साखर झोपेत होते. थंडी तशी जास्त नव्हती पण गार वारा अंगाला झोंबत होता. गंतव्य ठिकाण सुमारे ०३ किलोमीटर दूर होते. आम्ही हळूहळू रस्ता कापत होतो. अर्ध्या टन वजनाचा मी, माझी बॅग असे ओझे तो बिचारा सायकलस्वार वहात होता आणि रस्त्यावरच्या ओळखीच्या लोकांना “जय शंभू” म्हणत रस्ता कापत होता. आता तर फक्त सकाळचे ५ वाजले होते, आणि त्याला दिवसभर असेच लोकांना वाहायचे होते. पोटासाठी चाललेली त्याची धडपड पाहून मला त्याची कीव आली. कितीही झाले तरी, तो माझ्यामुळे शारीरीक दृष्ट्या थकत होता. त्यामुळे मी मनोमन असे ठरवले की वराणसीतच काय यापुढे कुठेही अशा तिचाकी वर बसायचे नाही. अस्सी घाट येथे उतरल्यावर तिथून जवळच असलेल्या हॉटेल ‘लेक व्ह्यू’ मध्ये माझी रूम बुक केली होती. हॉटेल मध्ये चेक इन करून मी रूम नंबर २०६ मध्ये गेलो. रूममध्ये dometry पद्धतीने शयनकक्षा होती. अतिशय माफक दरात हे होस्टेल मी बुक केले होते आणि याबद्दल मी मलाच शाबासकी दिली. याचे कारण असे की, मी ज्या दिवसांत वाराणसीला आलो होतो, तो वर्षातला अतिशय गर्दीचा काळ असतो आणि या वेळेत माफक दरात हॉस्टेल भेटणे हा म्हणजे दुग्धशर्करा योग्य असतो. जवळपास दोन महीने आधी गाडीचे तिकीट बुकिंग आणि हॉटेल बुकिंग एकाच दिवशी केलं होतं. गावात अनेक हॉस्टेल आहेत पण त्या अरुंद गल्लीबोळात हॉस्टेल शोधायला खूप पंचाईत झाली असती. खरं म्हणजे माझी स्काऊट सर्फिंग करण्याची इच्छा होती पण अरुंद गल्लीबोळात जीव गुदमरला असता. माझ्या मते हा प्रकार सोलो बॅकपकर्स लोकांसाठी अतिशय उत्तम आहे. तिथल्या स्थानिक लोकांकडे पाहुणा म्हणून रहाणे आणि तिथले अस्सल जेवण करणे हा एक भन्नाट प्रकार असतो आणि मुख्य म्हणजे होस्टेल किंवा स्काऊट सर्फिंग हे दोन्ही प्रकार अतिशय स्वस्त असतात. त्यामुळे प्रवासाला पैसे लागतात ही सबब खोटी ठरते. शिवाय तिथल्या प्रॉपर लोकांसोबत राहिल्याने त्याठिकाणची संस्कृती, चालीरीती वगैरे अनुभवण्यास एक संधी प्राप्त होते. पुष्कर कुंडाजवळ माझे होस्टेल होते, अस्सी घाट पाच मिनिटांवर होता आणि लंका दहा मिनिटांवर होती. आशा मोक्याच्या ठिकाणी मला रूम भेटली होती. खिडकीतून समोर बघितल्यावर पुष्कर कुंडाचे दर्शन होत होते. पण त्याच्यावर जलपर्णी सचल्याने पाणी मात्र दिसत नव्हते. मला शक्य तितक्या लवकर निघायचे होते, सुमारे साडे पाच वाजता मी आवरून बाहेर पडलो.

बाहेर पडताच मला एक स्पॅनिश जोडपे (?) भेटले, त्यांना ‘सुबह-ए-बनारस’ला जायचे होते. मी शेवटच्या दिवशी तिथे जाणार होतो त्यामुळे मी त्यांना दुरूनच रस्ता दाखवून मार्गाला लागलो. इथून पुढे मी पायीच फिरणार होतो. गोदौलीया चौकाच्या दिशेने मी निघालो. तेथून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर माझे गंतव्य ठिकाण होते, ‘बाबा कालभैरव मंदिर.’ जाताना वाटेत मला एका ठिकाणी गलका दिसला. मी कुतूहल म्हणून डोकावले तर स्टेट बँकेच्या ‘अस्सी घाट’ शाखेला आग लागली होती आणि धूर बाहेर येत होता. तिथे विचारपूस केली असता जीवितहानी वा वित्तहानी झाली नव्हती. लोकं बाहेरूनच छायाचित्र काढण्यात दंग होते. तिथून मी पुढे निघालो आणि गुगल मॅप्सच्या भरवशावर तब्बल पाऊण तास पायपीट करून बाबा कालभैरव मंदिरात पोहोचलो. हे मंदिर वेगळं होतं. म्हणजे मला मूळ कालभैरव मंदिरात जायचं होतं. हे ते मांदिर नव्हतं. मी डोक्यावर हात मारून घेतला. माझा पाऊण तास वाया गेला होता आणि सोबत एनर्जीसुद्धा. मी सरळ रिक्षा केली आणि मंदिराकडे निघालो. सुमारे पाचशे मीटर अंतर दूर रिक्षा लावण्यात आली. बाबा कालभैरव मंदिरात जाताना पादत्राणे ठेवण्यासाठी सोय नाही, तेथील पूजा-साहित्य विक्री करणाऱ्यांकडे पादत्राणे ठेवावी लागतात. तसे न केल्यास ते उचलून डायरेक्ट कचराकुंडीत टाकली जातात. असे म्हटले जाते की, श्री कालभैरव हे या महानगरीचे क्षेत्रपाल तथा कोतवाल आहेत, त्यांच्या इच्छेनुसार काशीत कुणीही राहू शकत नाही. हे मंदिर इसवी सन १७१५ मध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी बांधले आहे. संपूर्ण बांधकाम दगडाचे आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करता येतो. सभामंडप हेमाडपंथी असून कोठेही बसले तरी मुखदर्शन होते अशी रचना आहे. श्री कालभैरवांची मूर्ती चांदीची असून सुमारे अर्धा पुरुष उंचीची आहे. चेहऱ्यावरील भाव बोलके असून मूर्ती हसतमुख आहे. हे कालभैरवांचे मूळ स्थान आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत मंदिर बंद असते. (मागच्या वेळी नेमका याच वेळी आलो होतो.) वेळ सकाळची असल्याने दर्शन लवकर झाले आणि मग थोडा वेळ सभामंडपात बसलो. “फोटो खिंचना मना है.” अशी सुचना कुठंही नाहीये, पण मोबाईल काढल्यावर तिथले लोकं जोरात ओरडतात. काही वेळ बसून मी पुढील स्थानाकडे जाण्यासाठी निघालो.

येथून जवळपास एक किलोमीटर अंतरावर ठठेरी बाजारात “द राम भांडार हे” नाश्त्यासाठी सुप्रसिद्ध असे दुकान आहे. तब्बल २०१ वर्ष जुने हे दुकान इसवी सन १८१८ मध्ये स्थापन झाले होते. परत एकदा अरुंद गल्लीबोळातुन वाट काढत मी चालू लागलो. या अरुंद गल्लीबोळातुन सकाळी फिरण्याची मजाच काही औरच असते. बनारसी लोकांची लगबग सुरू झालेली असते. लहनांची शाळेत जाण्यासाठी घाई सुरू असते तर कुणी दुकान लावण्याच्या तयारीत असतं. कुणी जानवं सावरत पुजेसाठी तयारी करून जात असते तर कोणी शांतपणे पान खात वर्तमानपत्र वाचत बसलेले असते. मध्येच गोमातांनी ठिय्या मांडलेला असतो. आजूबाजू असलेल्या खानावळींमधून तळण्याचा खमंग वास दरवळत असतो. जेमतेम दोन माणसे जातील इतक्या अरुंद वाटा असतात. या भाऊगर्दीतही दुचाकीस्वार भन्नाट वेगात गाड्या पळवत असतात. आशा परिस्थितीत चालताना रस्ता चुकवून त्रेधातिरपीट उडाली नाही तर नवलच.

इतर रसदार पर्याय