सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 6 Shubham Patil द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 6

या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर अर्धेअधिक पाण्यात बुडालेले असते. वर्षाचे सुमारे आठ महिने मंदिराचे गर्भगृह पाण्यात असते. उन्हाळ्यात चार महिने पाणी ओसरल्यावर जाता येते. मंदिर एका बाजूला झुकलेले असल्याची चार कारणे किंवा दंतकथा सांगितल्या जातात. तसेच मंदिर कुणी बनविले यावरून देखील बऱ्याच आख्यायिका आहेत. रत्नेशवर महादेवचे मंदिर हे ‘नऊ’ अंशात झुकले आहे किंवा तशा पद्धतीने बांधले गेलेले आहे. त्यामुळे ‘चार’ अंशात झुकलेला पीसाचा मनोरा बघण्याआधी किंवा त्याचं कौतुक करण्याआधी लोकांनी हे मांदिर आवर्जून बघावं. हे मंदिर दुरूनच बघीतलं. कारण अर्धेअधिक मंदिर पाण्यात होते. नंतर मी पुढच्या गंगा महाल घाटाकडे वळलो. या घाटाचे निर्माण सन १८६४ मध्ये जिवाजी राव शिंदे यांनी केले. या घाटाबरोबर त्यांनी एका भव्य महालाची देखील निर्मिती केली. हा महाल म्हणजे राजस्थानी तसेच स्थानिक स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. शक्यतो येथे स्नान करण्यासाठी स्थानिक लोकांचा कल असतो. याचे कारण म्हणजे इथे जास्त पर्यटक नसतात, त्यामुळे शांतता असते.

हा घाट बघून मी संकठा घाटाकडे आलो. या घाटाचे पक्के बांधकाम १८२५ मध्ये झाले. येथे नवदुर्गांपैकी एक श्री कात्यायनी तथा संकठा देवीचे मंदिर आहे त्यामुळे या घाटाचे नाव पडले आहे. पुढे भोसले घाट लागला. १७९५ मध्ये नागपूरकर भोसल्यांनी याची निर्मिती केली. या आधी या घाटाचे नाव नागेश्वर घाट असे होते. घाटावर बांधलेला महाल हा अतिशय भव्य असून नागपूरकर भोसल्यांच्या श्रीमंतीची साक्ष आजही देत आहे.

पुढे मी गणेश घाट इथं आलो. खरं म्हणजे माझी हा घाट बघण्याची आधीपासूनच फार इच्छा होती. सन १८०७ मध्ये अमृतराव पेशव्यांनी याची निर्मिती केली. येथे श्री गणपतीचे अमृत विनायक गणेश मंदिर आहे. प्रस्तुत मंदिर हे नागर शैलीत बांधले असून श्री गणेशाची विलोभनीय मूर्ती आहे. तिथे फोटो काढायला सक्त मनाई केली आहे, तरी मी लपूनछपून फोटो काढलाच. पेशव्यांच्या वापरातील काही वस्तू आणि त्यांच्या वंशजांच्या तसबिरी पहायला मिळतात. तत्पूर्वी, फोटो काढताना मला वरच्या मजल्यावरून कुणीतरी बघितलं आणि ती व्यक्ती माझ्यावर ओरडली तेव्हा मी पटकन मोबाइल खिशात ठेवला आणि लगेच निघालो.

मंदिरातून बाहेर पडल्यावर मी परत एकदा वाट चुकण्यासाठी गल्ल्यांत शिरलो आणि वाट दोन-तीन वेळा चुकलो देखील. मजल-दरमजल करत विश्वनाथ गल्लीतून मूळ रस्त्याला लागलो. त्या दिवशी एकादशी होती (कार्तिकी एकादशी), त्यामुळे असंख्य भाविक विश्वनाथ दर्शनाला आले होते. समोरच मला ‘मलाइयो’ वाला दिसला आणि पावले तिकडे वळली. हा पदार्थ दुधापासून बनविला जातो आणि सबंध वाराणसीत फक्त हिवाळ्यात मिळतो. हा पदार्थ डोळ्यासाठी चांगला असतो असं म्हणतात. मातीच्या कुल्हड मध्ये मलाइयो आणि ते झाल्यावर गरम दूध असा हा प्रकार असतो. आता पुढे मला लंकेला जायचे होते. डायरेक्ट रिक्षा मिळणार नव्हती म्हणून गोदौलीया चौकापर्यंत चालणं पसंत केलं. यथावकाश चौकातून मला रिक्षा मिळाली आणि मी लंका गाठली. मी घाईत असल्याने लगेच रिक्षात बसलो, तर रिक्षा चालक हा एक साधारणतः सोळा वर्षांचा मुलगा होता. त्याला लगेच पोलिसांनी अडवलं आणि त्यांच्यात बरीच बाचाबाची झाली. शेवटी पोलिसाने त्याला सोडलं आणि आम्ही निघालो.

लंकेला पोहोचल्यावर समोरच असलेल्या पहिलवान लस्सी मध्ये गेलो आणि एक रबडी-लस्सी मागवली. पहिलवान लस्सी हेदेखील लस्सीसाठी प्रसिद्ध आहे. रबडी आणि लस्सी यांचे मिश्रण खरंच खूप छान होते.

समोरच बनारस हिंदू विद्यापीठाचे गेट होते. पण मला माझ्या नियोजनानुसार तिकडे उद्या जायचे होते. त्यामुळे मी तिथून वळालो आणि दुर्गाकुंड कडे निघालो. दुर्गकुंडच्या बाजूलाच दुर्गा मंदिर आहे. प्रस्तुत मंदिर वाराणसीतल्या महत्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर बंगालच्या राणी भवानी यांनी बांधले आहे. भडक लाल रंगात हे मंदिर असून १७६० साली बांधले गेले आहे. त्या काळी या मंदिरासाठी पन्नास हजार रुपये खर्च आला होता. मंदिराच्या सभमंडपाचे तथा आजूबाजूच्या परिसराचे काम दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी केलेले आहे. मंदीरातील घंटा श्री नेपाळ नरेश यांनी अर्पण केली आहे. मंदिरात प्रवेशासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. मंदिराची रचना नागर शैलीत आहे. मंदिराच्या बाजूला असलेले कुंड हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले आहे. मंदिर परिसर अतिशय उत्तम असून भरपूर स्वच्छता आहे. मंदिर परिसरात श्री सुक्ताचे हवन चालले होते. धगधगत्या यज्ञकुंडात आहुती पडत होती आणि धुराच्या स्वरूपाने निसर्गदेवतेला अर्पण होत होती.

नंतर मी पुढे कवडीमाता मंदिर पाहिले. येथे शक्यतो महाराष्ट्रातील लोकं येत असतात. मंदिर अतिशय लहान आहे. कवडीमाता ही शंकराची बहीण म्हणून ओळखली जाते. इथे देवीला पांढर्‍या कवड्या अर्पण करण्याची प्रथा आहे. तिथून पुढे मी सत्यनारायण तुलसी मानस मंदिरात आलो. याचे उद्घाटन श्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केले आहे. मंदिर अतिशय भव्य असून आजूबाजूला उद्यान फुलवले आहे. मंदिराच्या सर्व भिंतींवर रामायण आणि इतर शास्त्र वचनं कोरली आहेत. वरच्या मजल्यावर रामायण आणि महाभारतातले प्रसंग हलत्या देखाव्याच्या स्वरुपात पर्यटकांसाठी म्हणून उपलब्ध आहेत. इथं पाच रुपये नाममात्र फी आहे. पण सर्व प्रसंग इतक्या सुंदरपणे दाखवले आहेत की पाहावंच वाटतं. सर्व देखाव्यांच्या प्रसंगातल्या मूर्त्यांच्या चेहर्‍यावरील भाव, विविध रंगांच्या लाईट्सचा वापर हे इतके हटके आहे की, त्यात जीवंतपणा आला आहे.

दुपारचे चार वाजत आले होते आणि माझी “काशी चाट भंडार” ला जाण्याची वेळ झाली होती. काशी चाट भंडार हे आपल्या चाट प्रकारच्या पदार्थांसाठी प्रसिध्द आहे. अशा पदार्थांसाठी प्रसिद्ध अजून एक बिना चाट भंडार म्हणून आहे. पण ते कालभैरव मंदिर परिसरात आहे, त्यामुळे तिकडे जाण्यासाठी बराच वेळ वाया गेला असता. काशी चाट भंडारला गेल्यावर सुमारे पंधरा मिनिटं माझा नंबरच लागला नाही. त्यामुळे चेन्नईच्या घटनेची पुनरावृत्ती होते की काय असे वाटू लागले. (सुमारे अर्धा तास वाट बघूनही मुरुगन इडली शॉप ला नंबर लागला नव्हता.) शेवटी एकदाची जागा भेटली. येथील टमाटर चाट प्रसिद्ध आहे. मी टमाटर चाट, आलू चाट आणि गुलाबजाम अशी ऑर्डर दिली. माझ्यासमोर दोन परदेशी पर्यटक दही पुरी खात होते. ती अतिशय तिखट असल्याने अर्धवट सोडून चालले गेले. त्यांच्या डोळ्यांतून अक्षरशः पाणी येत होते. त्यांना सवय नसेल बहुतेक. बऱ्याच वेळाने माझी ऑर्डर आली आणि मोहोरीच्या तेलात बनलेल्या चाटचा आस्वाद घेतला. दोघी चाटची चव अप्रतिम होती. विशेष म्हणजे हे पदार्थ तयार करण्यासाठी मोहोरीचं तेल वापरतात, त्यमुळे एक वेगळीच चव आणि सुगंध प्राप्त होते गरम असल्याने ते थोडे तिखट वाटत होते, पण सर्व चविंचे एक अप्रतिम मिश्रण होते ते. नंतर गुलाबजाम कडे वळलो. त्या गुलाबजामचा आकार लाडूंएवढा होता. मी इतके मोठे गुलाबजाम पहिल्यांदा बघत - खात होतो. ते माझ्यासमोरच तळले आणि पाकातून काढले गेले असल्याने खूप गरम होते. त्या प्रचंड मोठ्या गुलबजाम्सला खायला चमचा दिला होता. चमच्याने गुलाबजाम फोडून खाण्यात एक वेगळीच मजा होती. त्यांची चव देखील अप्रतिम होती. इथून पुढे मी रूमवर गेलो. लगेच अर्ध्या तासाने मला बाहेर पडायचे होते.

पावणेसहाच्या आसपास मी बाहेर पडलो आणि पाच मिनिटांवर असलेल्या अस्सी घाटावर आलो. काळोख पडत होता आणि सर्वदूर विद्युत रोषणाईने परिसर झगमगत होता. अस्सी घाटाला यात्रेचे स्वरूप आले होते. सुबह ए बनारसच्या व्यासपिठावर शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम सुरू होता. तिथं बरीच गर्दी जमली होती. घाटावर होणाऱ्या गंगा आरतीची तयारी सुरू होत होती. मी पटकन अगदी पहिल्याच बाकावर ठाण मांडले. समोर संथ पण अथांग असलेली गंगा वहात होती. सोबत असंख्य जलबिंदू होते. काही हिमालयापासून सोबत होते, काही वारणेतुन सोबती झाले होते, तर काही आकाशातून ‘पाऊस’ असे नाव धारण करून आले होते. पुढे प्रयागराजला अजून मिळणार होते. पण सर्वांचे गंतव्य ठिकाण एकच होते समुद्र ! परत तिथून बाष्पीभवन नाव घेऊन नभाच्या मदतीने भूमीवर येणार होते. असे त्या जलबिंदूंचे जीवनचक्र होते. माणसांचे कुठे वेगळे असते. असो,