solo backpacking in varanasi - 7 books and stories free download online pdf in Marathi

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 7

हळूहळू गर्दी जमा होत होती. परदेशी पाहुणे देखील उत्सुकतेने कॅमेरे घेऊन येत होते. साडेसहा झाले आणि एकसारख्या पोशाखात पाच तरुण आरती करण्यासाठी म्हणून आले. पिवळं पितांबर आणि मरूण रंगाचा कुर्ता घातलेले ते पाचजण आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले. धुपाचा सुगंध सर्वदूर दरवळत होता. घंटानादाने वातावरणात अतिशय सात्विकता येत होती. पुरोहितांचे मंत्रोच्चारण, सुमधुर संगीत याने भारावून जायला होत होते आणि आपसूकच तोंडातून शब्द बाहेर पडतात – “नमामी गंगे...!!!”

प्रथमतः शंखनादाने सुरुवात झाली. एका विशिष्ट सुरात शंखनाद ऐकत असताना कान तृप्त होत होते. नंतर त्वमेव माता, गुरुरब्रम्हा, शिवध्यान, पार्वती ध्यान, गंगा ध्यान, सर्वे भवन्तु सुखीन आदि श्लोकांचे पठन सुरू असताना आरती करत असणारा पूरोहितवर्ग गेंगेकडे तोंड करून अगरबत्ती एका वेगळ्याच लयीत ओवाळत होता. त्यांच्या दुसर्‍या हातात घंटा होती, त्यांची ती घंटानाद करण्याची विशिष्ट पद्धती मन मोहून टाकणारी होती. शेवटचा श्लोक सुरू असताना सर्वजण उजव्या बाजूने नव्वद अंशात वळले आणि परत ओवाळू लागले, मग परत नव्वद अंशात आणि परत एकदा. थोडक्यात काय तर त्यांनी एक स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली. नंतर त्यांनी धूप ओवाळायला सुरुवात केली. परत त्याच विशिष्ट लयीत, धूपाच्या धुरामुळे सात्विक ढग तयार होत होते आणि एका वेगळ्याच आनंदाचा वर्षाव करत होते. शेवटचा श्लोक झाला आणि पुरोहितांनी हातातले धूप खाली ठेऊन प्रचंड मोठ्या आरत्या हातात घेतल्या. त्या एक विशिष्ट प्रकारच्या आरत्या होत्या. सुमारे एकशे आठ वाती असाव्यात बहुतेक. थोडक्यात त्या मला दीपमाळ भासल्या आणि कानावर शब्द पडले, “जय गंगे माता, मैया जय गंगे माता” आणि आरती सुरू झाली. आरतीचे बोल, सुर, ताल आणि सोबतचं धुंद करणारं सात्विक संगीत इतके अप्रतिम होते की हे कधीच संपू नये असं वाटत होतं. सोबत एकाच विशिष्ट ढंगात आरती ओवाळणारे पूरोहित बघून असं वाटतं की, बस्स. आता काही नको आयुष्यात. हे बघूनच डोळ्यांचे पारणे फिटले. सुमारधूर स्वरात गंगा आरती ऐकताना हरवून जायला होतं. आरती संपल्यावर आता कर्पुरार्तीची वेळ होती. आपल्या हातातली आरती खाली ठेऊन पुरोहितांनी कर्पुरार्ती हातात घेतली आणि शांत स्वर ऐकू लागले, “जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले गलेऽव लम्ब्यलम्बितां भुजंगतुंग मालिकाम्‌ ।” ते शिव तांडव स्तोत्र होते, हळूहळू स्तोत्राचा वेग वाढत होता आणि आपल्या धमन्यांतून वाहणारे रक्त नेहमीपेक्षा जास्त वेगाने वाहत असल्याचा भास होत होता. हे स्तोत्र मला पाठ आहे, पण तिथली म्हणण्याची लय इतकी सुरेल होती की ते ऐकत राहावंस वाटत होतं. तांडव स्तोत्राची सुरुवात आणि शेवट अतिशय संथ झाली. पण संपूर्ण स्तोत्र इतकं सुरेख म्हटलं होतं की, रावणाने सुद्धा काय म्हटलं असेल?

आता गंगा स्तोत्राची वेळ होती. गंगा स्तोत्र म्हणत असताना पुरोहितांनी मोरपिसांचा झाडा सुरू केला, आणि नंतर शंखनाद...!!! पाच मधुर शाखांचा एकाच सुरात नाद येत होता. ब्रह्मनाद म्हणतात तो हाच असावा बहुतेक...नंतर सर्वांना पुष्पांजली वाटण्यात आली आणि भगवान शकरांचे भजन सुरू झाले. आम्ही सर्वजण मोठ्या उत्साहात भजन गात होतो आणि तिथे आलेल्या परदेशी पर्यटक आम्हा भारतीयांकडे स्तिमित होऊन बघत होते. सुमारे दहा मिनिटांच्या भजनानंतर पुष्पांजली गंगार्पण करायला सांगण्यात आले आणि “नमः पार्वतीपते हऽऽर हऽऽर महादेऽऽव” च्या जयघोषात आसमंत दणाणून गेले.

आपण रोज आयुष्य जगत असतो. पण नेमके काही सुखाचे आणि दुःखाचे क्षणच आपल्याला आठवत असतात. मेंदू रिकाम्या आठवणींचे ओझे लक्षात ठेवत नाही आणि माझ्या मते यालाच आयुष्य म्हणतात. त्यात आज आणखी एका आनंददायी आठवणीची भर पडली होती आणि ती पुसली जाणार नव्हती. काही मंडळी रिव्हरफ्रंटने आरतीचा आनंद घेत होती. माझ्या शेजारील फ्रेंच युवकाचा मला विलक्षण हेवा वाटत होता. एका हातात त्याने कॅमेरा सेट केला होता. दुसऱ्या हातात मोबाईलने कुणालातरी व्हिडिओ कॉल केला होता आणि तो या दोघांवर लक्ष ठेऊन मिळालेल्या वेळेत आरतीचा आनंद घेत होता. सुमासे साडेसात वाजले होते आणि अस्सी घाटाचे हे रुप विलोभनीय होते. आरतीनंतर भाविकांची नदीत अर्पण केलेल्या दिव्यांमुळे आकाशातील तारे गंगेत उतरल्याचा भास होत होता. आकाशमंडळातील तार्‍यांना गंगेतल्या तार्‍यांचा हेवाच वातर होता. पण गंगेच्या पाण्यात आपलेच प्रतिबिंब पाहून ते मनाची समजूत घालत होते. हळूहळू घाटावरील गर्दी कमी होत होती.

दुपारी पोटभर खाल्यामुळे विशेष भूक नव्हती. त्यामुळे मी जवळच असलेल्या मोनालीसा कॅफेला जायचे ठरवले. तिथे ब्राऊनी ऑर्डर केली, अजून बरेच ऑप्शन होते पण जास्त भूक नसल्यामुळे ब्राऊनीच घेतली. ब्राऊनीची चव छान होती आणि येथील मेन्यूकार्ड वरील मोनालीसाला भारतीय पध्दतीने सजविले होते. तिथून बाहेर पडल्यावर मला अचानक थंडाईची आठवण झाली. वाराणसीत आल्यावर थंडाई न पिणे म्हणजे वरणभातात तूप न घेण्यासारखे होते. ‘बाबा थंडाई’ या प्रसिद्ध दुकानात मी गेलो. तिथे त्याने मला एकच प्रश्न विचारला, “भांगवाली या साधी ?” मी आश्चर्यचकित होऊन बघतच राहिलो, कारण तिथे जवळजवळ सर्वांनीच थंडाईमध्ये भांग घेतली होती. मी त्याला “साधी” असे सांगून आजूबाजूची गंमत बघत बसलो. येणारा जवळपास प्रत्येकजण भांगयुक्त थंडाई घेत होता. माझी थंडाई आली. वातावरणात गारवा असताना थंडगार थंडाई पिण्याची मजाच काही और होती. विशेष म्हणजे थंडाई हा पदार्थ मी पहिल्यांदाच घेत असल्यामुळे उत्सुकता तर होतीच.

साडेनऊचा सुमार झाला होता. मी रूमवर आलो आणि माझी ओळख माझ्या दोन नवीन मित्रांशी झाली. हॅरीसन (Harrison) आणि सॅम्युअल (Samuel) हे दोन अमेरिकन तरुण माझ्या रूममध्ये आले होते. Dormetry मध्ये माझ्या बेडच्या खालीच दोघांनी बुक केले होते. मी रूममध्ये जाताच त्यांनी हसत माझे स्वागत केले, जणू काही आम्ही कधीपासून मित्र आहोत. परदेशी लोकांची ही एक गोष्ट चांगली आहे. नाहीतर आपल्याकडे माणसाला बघून दुर्लक्ष करतात. असो, हॅरीसन हा फ्लोरिडा राज्यातील कुठल्याश्या गावातील होता. त्याचे वडील पेशाने वकील होते. तो कॉमर्स मध्ये शिक्षण घेत होता. सॅम्युअल हा कधीकाळी रशियाच्या असलेल्या अलास्का प्रांतातील होता. त्याच्या परिवाराचा बेकरी प्रॉडक्ट्सचा व्यवसाय होता. तोदेखील परिवाराला पुढे मदत म्हणून फूड टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेत होता. दोघेही भारतातच भेटले होते. सुट्टीनिमित्त चार महिन्यांच्या पर्यटनासाठी ते भारतात आले होते. रात्री त्यांच्यासोबत बर्‍याच गप्पा वगैरे झाल्या. त्यांच्यासोबत झालेल्या त्या तास-दीड तसच्या गप्पांनी त्यांनी माझ्यासमोर भारत विश्वगुरु का आहे हे आजाणतेपणाने सांगितलं. सॅम्युअलला भारतभूमी त्याची “ऑक्सफर्ड” वाटत होती. त्याचं कारण म्हणजे भारतातली अन्न विविधता. त्याचा भारतात येण्याचा उद्देशच वेगळा होता. त्याला भारतीय जेवणाने भुरळ घातली होती. भारतीय पाकशास्त्राचे प्रचंड व्हिडिओ बघून तो भारतात आला होता. इथून पुढे तो दक्षिण भारतात जाणार होता. मला त्याचे विचार आणि जिद्द बघून विचार करायला भाग पाडले. लोकं विदेशातून आपले पदार्थ शिकण्यासाठी येतात आणि आपण मात्र फास्ट फूड वगैरेचे चाहते आहोत. दूध-हळद आपण (म्हणजे आमच्याकडे तरी) लहानपणापासून घेतो. त्याचे फायदे माहीत आहेत. पण बहुसंख्य भारतीय ह्या दुधाचं नाव ऐकून नाक मुरडतात. पण आता अमेरिकेने संशोधन करून त्याचे फायदे सांगितल्यावर आम्ही घेऊ, अमेरिका घेतेय ना. मग ठीक आहे. चांगलं असेल. ही विचारसारणी बदलायला हवी. असो, हॅरीसन वाराणसीहून केदारनाथ जाणार होता, पुढे दिल्ली आणि थेट अमेरिका.

सॅम्युअलला भारतविषयी खूप मोठ्या प्रमाणात आदर, प्रेम, उत्सुकता आणि बरंच काही होतं हे त्याच्या बोलण्यावरून समजलं. सॅम्युअल हृषीकेशहून वाराणसीला आला होता. नंतर तो राजस्थान, हिमाचल आणि मग नेपाळला जाणार होता. तो आधी मुंबईला आला होता. एकूणच भारतात येण्याचा त्याचा उद्देश सफल झाला. त्याने फिरलेल्या प्रत्येक शहरातून एक वस्तु विकत घेतली होती.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED