सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 8 Shubham Patil द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 8

त्यांच्यासोबत UNO खेळायला खूप मजा आली. तब्बल दोन वर्षांनंतर मी UNO खेळत होतो. पुण्याला शिक्षणासाठी असताना रुममेट्स सोबत परीक्षेच्या आदल्या रात्री UNO खेळण्याची मजा काही औरच होती. आमच्या रूममध्ये आमच्या तिघांव्यतिरिक्त अजून एक जण होता. तीशीच्या घरात असेल बहुतेक. तो काहीच बोलला नाही. अंतर्मुख प्रकारचा व्यक्ती असावा बहुतेक. दिवसभर फिरल्यामुळे कमालीचा थकलो होतो त्यामुळे बेडवर आडवं होताच निद्रादेवीच्या आधीन झालो.

तिसरा आणि शेवटचा दिवस उजडण्याआधीच मी पाच वाजता उठलो. बाकी मंडळी झोपली होती. साडेपाच वाजता तयार होऊन “सुबह - ए – बनारस” कार्यक्रम बघायला निघालो. सामान्यपणे सकाळी पाच वाजता सुरू होणारा हा कार्यक्रम हिवाळ्यामुळे साडेपाच ला सुरू होतो. आज तेथे मूळ कर्नाटकच्या असलेल्या पण मुंबईत स्थायिक झालेल्या गायिका आल्या होत्या. मला त्यांचे नाव या क्षणाला आठवत नाहीये. त्यांनी कानडी तसेच मराठी गायकीचे शिक्षण घेतले आहे. सुमारे एक ते सव्वा तास त्यांनी अप्रतिम भजनं, बंदिशी, रचना गायल्या. उत्तर प्रदेशातील वाराणसीत महाराष्ट्रातील गायिका कानडी पद्धतीने गात होत्या. हीच भारताची खरी खासियत आहे – “विविधतेत एकता.” गंगा किनारी सकाळचा थंड वारा..., मंत्रमुग्ध करणारे संगीत... असे ते वातावरण खरंच भारावून टाकणारे होते. इतक्यात सूर्योदय झाला. तरीही गंगा तटावर धुक्याची चादर होती. एक बाजूने पाहिल्यास सम्पूर्ण वाराणसी धुक्यात हरवलेले दिसते. ते दृश्य अतिशय छान दिसते. दुपारी बारा वाजेपर्यंत धुके हळूहळू विरते. सुबह - ए - बनारस कार्यक्रमाची सांगता झाल्यावर तिथे योगासनांचा कार्यक्रम असतो. तत्पूर्वी कार्यक्रमास हजेरी लावणाऱ्या मान्यवरांपैकी उत्तर प्रदेशच्या स्थानिक गायिका सौ. अग्रवाल यांनी आग्रहाखातर ब्रज भाषेतील एक छोटंसं कडवं सादर केलं. त्यांच्या मुलाच्या पदवीप्रदान समारंभासाठी त्या आल्या होत्या. त्यांच्या मुलाला सांभाळून घेतल्याबद्दल श्री काशी विश्वेश्वर आणि समस्त वाराणसीचे त्यांनी आभार मानले नंतर मुळ बनारसी असलेले पण कामानिमित्त दिल्लीत स्थयिक झालेले श्री मिश्राजी आले होते. ते डिस्कव्हरी चॅनलचे हेड आहेत. त्यांनी लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “शाळेतून आल्यावर अस्सी घाटावर खेळयचो तेव्हा इथे काहीच नव्हतं. माझं बालपण इथंच गेलं, पण आज या घाटाचा चेहरा पुर्णपणे बदलून टाकला आहे, त्याबद्दल धन्यवाद. देव दीपावलीच्या निमित्ताने बर्‍याच वर्षानी वराणसीत येण्याचा योग आला. पण एका गोष्टीची खंत आहे, आमचं लहानपणीचं शिवाला मधलं घर आता नाहीये, त्या घराशी कितीतरी आठवणी आहेत.” एवढं बोलून ते थांबले. नंतर कुठल्यातरी मासिकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कार्यक्रम समितीतर्फे तमाम देशवासियांना शांततेचे आवाहन करण्यात आले. कारण बहुचर्चित ऐतिहासिक अयोध्या राम मंदिर खटल्याचा आज निकाल होता. योगासने सुरू झाली तशी परदेशी पर्यटकांची संख्या वाढली. परदेशी लोकांना मांडी घालून बसता येत नसावे बहुतेक, कारण त्या दिवशी विश्वनाथ मंदिरातील पर्यटक आणि आताचे हे लोकं बसण्याची सारखीच पद्धत होती. योगासन आणि नंतर प्राणायाम व शेवटी हास्यासनाने कार्यक्रमाची सांगता होते.

सुबह ए बनारस बघताना – ऐकताना मला खरंच भरून आलं होतं. आता नक्की आठवत नाही कुणी म्हटलंय पण ते शत – प्रतिशत खरं वाटलं, अगदी सोन्याहून पिवळं....

“वैसे तो हर जगह की सुबह आपना एक अलग अंदाज लेकर आती है,

पर बनारस मे दो सुबह होती है, एक जो पूर्वाकाश में होती है और दुसरी हृदयाकाश में.....”

ऐतिहासिक दिवसाची अविस्मरणीय सुरुवात करून मी मार्गस्थ झालो. आज दशाश्वमेध घाट ते अस्सी घाट फिरण्यासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत वेळ होता. मी फिरत-फिरत अहिल्या घाटावर आलो. १७८५ माघे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी हा घाट बांधला. तत्पूर्वी हा घाट केवलगिरी घाट म्हणून ओळखला जात होता. येथेच अहिल्याबाई यांचा वाडादेखील आहे. पुढे मुंशी घाट होता. त्याचे निर्माण नागपूर येथील श्री श्रीधर मुंशी यांनी १८१२ मध्ये केले. याला छोटे बंदर म्हणण्यास हरकत नाही कारण येथे नाविक मोठ्या संख्येने आपापल्या होड्या बांधत असतात. या घाटाला लागूनच असलेला दरभंगा घाट हा मुंशी घाटाचाच एक भाग होता. पण १९२० मध्ये बिहारच्या राजाने हा भाग विकत घेतला आणि प्रस्तुत घाट दरभंगा घाट नावाने ओळखला जाऊ लागला. विशेष धार्मिक महत्व नसल्याकारणाने येथे स्नानासाठी कमी गर्दी असते. पुढचा घाट होता - राणा महल घाट, उदयपूरचे राजे जगत सिंह यांनी सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात १७६५ मध्ये घाटाचे निर्माण केले. येथे राजस्थानी स्थापत्यशैलीचा सुंदर नमुना पहायला मिळतो. पुढे चौसट्टी घाट आहे. बंगालचे राजे प्रतापादित्य यांनी सोळाव्या शतकात या घाटाचे बांधकाम केले होते. येथे चौसष्ट योगिनींचे मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिराचे बांधकाम नविन असले तरी धार्मिकदृष्ट्या महत्वाचे आहे. याला लागूनच दिग्पतिया घाट घाट आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीस बंगालच्या दिग्पति नावाच्या राजाने हा घाट बांधला. घाटावरील महालाचे नक्षीकाम बंगाली कलाकुसरीची साक्ष देते.

पुढे पांडे तथा बाबुआ पांडे घाट आहे. हा घाट छपरा येथील याच नावाच्या व्यक्तीने बांधला. येथे कपडे धुण्याची परंपरा आहे, त्यामुळे वाराणसीतील धोबी येथेच कपडे धुतात. धार्मिकदृष्ट्या महत्त्व कमी असल्याने स्नानार्थींची गर्दी कमी असते.

कधीकधी प्रवासात किंवा अनोळखी ठिकाणी अशा काही अकल्पित गोष्टी घडतात की ज्यांच्यामुळे आपल्याला घाबरायला होते. पण त्या घटनांमुळे आपला पूर्वपार असलेला दृष्टीकोन बदलून जातो. कायमचाच. तर झाले असे की, बबूआ पांडे घाटाच्या पुढे राजाघाट होता. याची निर्मिती पेशवे अमृतराव पटवर्धन यांनी केली होती. येथे अन्नछत्र चालते. माझी अमृतराव पेशवा हवेली बघण्याची फार इच्छा होती पण हवेलीच्या चारही बाजूने पाहूनही कुठेच आत जायला जागा दिसत नव्हती. मी याविषयी भरपूर वाचलं होतं त्यामुळे तीव्र कुतूहल होतं. आजूबाजूच्या स्थानिक लोकांना विचारले पण त्यांनाही काही माहिती नव्हते. तरी मी हवेलीमध्ये जाण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आणि येथेच चूक झाली. मोबाईलचा जीपीएस सिग्नल लॉस्ट झाला. मी परत एकदा रस्ता भरकटलो. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. या भागात बहुसंख्य मुस्लिम बांधव होते आणि मी तिथल्या तिथे फिरत होतो. फिरून परत त्याच जागेवर येत होतो. थोड्या-थोड्या अंतरावर मशिदी दिसत होत्या. रस्ता सांगण्यासाठी देखील कुणी नव्हते. राम मंदिराचा निकाल लागल्यावर मिळणारा प्रतिसाद कसा असेल हे कुणीच सांगू शकत नव्हते. पण इथले वातावरण मात्र शांत होते. किंबहुना नित्यनियमाने रोजची कामे चालली होती. जणूकाही त्यांना निकालाशी काही देणंघेणं नव्हतंच. अयोध्या देखील जवळच होती, त्याचे लोण पसरण्यास वेळ लागणार नव्हता. तिथं शांतता असली तरी दंगल उसळायला वेळ लागत नाही हे मी जाणून होतो. मी एकटाच, त्यात अशा दिवशी, अशा भागात म्हणजे खरंचं कठीण काळ होता. माझं रस्ता भटकणं माझ्या अंगलट येतं की काय असं वाटत होतं. मी त्या आपत्तीचे चिंतन करीत होतो तोच मला केदार घाटाकडे जाण्याचा मार्ग दिसला आणि मी निश्चींत झालो. केदार घाट ते राजा घाट यांत माझे दोन - तीन घाट सुटले होते. त्यात एक “नारद घाट” होता. हे एक बरं झालं, कारण असं म्हटलं जातं की नारद घाटावर शक्यतो जाऊ नये आणि गेलात तर तिथे असलेल्या नरदाच्या मंदिरात दर्शन करू नये. कारण पुराणकथांमध्ये नारद मुनींचा उल्लेख कळीचा नारद असा केलेला आहे. त्यामुळे इथे दर्शन केल्यावर घरी भांडणं होतात असा समाज जनसामान्यांत प्रचलित आहे. मला स्पष्टपणे आठवतंय की, मी मागच्या वेळी आलो तेव्हा आजीने मला या घाटावर न जाण्याविषयी आवर्जून सांगितलं होतं आणि या वेळी सुद्धा. तुम्ही या प्रकरला अंधश्रद्धा म्हणा किंवा अजून काही. पण आपले पूर्वज काही दूधखुळे नव्हते. जर सोन्याचा धूर निघत असलेल्या भारताच्या जडणघडणीत त्यांचा वाटा होता तर त्यामागे काहीतरी विज्ञान असतंच असतं. पराधर्माच्या आक्रमणामुळे म्हणा किंवा काळाच्या ओघात म्हणा, ते एकतर चोरून नेलं किंवा आपल्या मनावर हे चुकीचं आहे असं बिंबवलं गेलं.