solo backpacking in varanasi - 4 books and stories free download online pdf in Marathi

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 4

असे एकंदरीत माझे नियोजन होते. पुढचा श्री राजेंद्र प्रसाद घाट होता. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती श्री राजेंद्र प्रसाद यांचे नाव या घाटाला १९८४ मध्ये पक्के बांधकाम झाल्यावर दिले. या आधी या घाटाचे नाव ‘घोडा घाट’ असे होते. मौर्य काळात या ठिकाणी घोड्यांचा मोठा बाजार भरत असे, त्यामुळे कदाचित हे नाव पडले असावे. नौका विहारासाठी येथे अतिशय मोठ्या प्रमाणात नौका उपलब्ध असतात. येथे विस्तीर्ण आणि लांब पायऱ्या आहेत. तसेच दोन भव्य जलशुद्धीकरणाचे टॅन्क आहेत. फोटोसेशन साठी हे अतिशय उत्तम ठिकाण आहे. लांब आणि विस्तीर्ण अशा पायऱ्यांवर सुमारे ५०-६० जणांचा ग्रुप हास्यविनोद करत होता. एक परदेशी पर्यटक त्या घोळक्याचे फोटो काढण्यात गुंतला होता. आम्हा सावळ्या भारतीयांमध्ये या गोऱ्याला असे काय दिसले की हा चक्क फोटो घेऊ लागला होता. सहज कुतूहल म्हणून मी त्याला पृच्छा केली असता तो म्हणाला,

“The joy on the faces of these people, which is diminishing these days (या लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद, जो दिवसेंदिवस कमी होत आहे.)”

“Yes, you're right brother. But we can find joy everywhere only you need that spec who will show you happiness everywhere. (तुझे म्हणणे बरोबर आहे मित्रा, आपण आनंद कोठेही शोधू शकतो फक्त आपल्या तो चष्मा हवा जो आपल्याला सर्वदूर आनंद दाखवेल.)”

“Yes, I think you're partially right man. But sorry I want to go now before this group leave, Thanks (होय, तुझे म्हणणे काही अंशी बरोबर आहे, पण मला माफ कर हा ग्रुप इथून निघायच्या आधी मला जावे लागेल, धन्यवाद)”

“Ok, brother enjoy. (ठीक आहे भावा, मजा कर)”, असे म्हणून मी पुढे मोर्चा वळवला.

जवळच जंतर-मंतर आहे. सन १७३७ मध्ये जयपूरचे महाराज जयसिंग दुसरे यांच्या नेतृत्वाखाली याची निर्मिती झाली. भारतात उज्जैन, मथुरा, दिल्ली, वाराणसी आणि जयपूर या पाच ठिकाणी जंतरमंतर आहे. पैकी मी उज्जैनचं जंतर-मंतर पहिलं असल्याने इथे गाईड वगैरेची मदत नाही लागली. सूर्यप्रकाशावरून स्थानिक वेळ, तसेच ग्रहांची स्थिती आणि इतर खगोलशास्त्रीय बाबींची सद्यस्थिती कोणत्याही उपकरणाशिवाय मिळते. हे ठिकाण म्हणजे भारतीय स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. हे बघून भारताविषयी ऊर अभिमानाने भरून येतो. जंतरमंतर बघण्यासाठी दहा रुपये नाममात्र शुल्क आहे.

इथून पुढे मी मान मंदिर घाटावर आलो. सोळाव्या शतकात जयपूरचे राजा मानसिंह यांनी या घाटाची बांधणी केली. यात त्यांनी घाट, मंदिर आणि महालाची निर्मिती केली. महाल हा राजपूत शैलीत बांधला असून भव्य आहे. आधी उल्लेख केलेल्या जंतरमंतरचे बांधकाम मानसिंहांच्या वंशजांनीच केले आहे. ऐतिहासिक दस्तावेजांनुसार या घाटाचे आधीचे नाव सोमेश्वर घाट असे होते. नंतर पुढे मीर घाटावरून सरळ ललिता घाटावर आलो. येथे श्री ललिता देवीचे मंदिर आहे. ललिता देवी म्हणजे हृदयची देवता अशी मान्यता आहे. हे मंदिर अतिशय पुरातन आहे. याच्या पुढेच काही अंतरावर नेपाळी मंदिर आहे. हे मंदिर नेपाळी शैलीत बांधले असल्याने याला नेपाळी मंदिर असे म्हटले जाते. संपूर्ण बांधकाम लाकडाचे असून त्यावर अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत. इथे एक मोठे शिवलिंग आहे. नंतर फिरून पुढे विश्वनाथ गल्लीतून दोन वेळा त्याच जागेवर येऊन कसतरी मूळ रस्त्याला लागलो. दुपारचे दोन वाजले होते आणि मला एवढी विशेष भूक नव्हती. चव अजून जिभेवर रेंगाळत होती. श्री काशी विश्वनाथ मंदिरापासून गोदौलीया पर्यंत परत चालत जाण्याचे ठरवले. मी प्रवासात ‘शक्यतो’ पायी फिरणेच पसंत करतो. हळूहळू पायी फिरून आपल्याला ती जागा, लोकं चांगल्या प्रकारे समजतात. पण काही वेळा नाईलाज असतो.

चौकात पोहोचल्यावर मी अस्सी घाटापर्यंत शेअर-रिक्षा केली. तीन वाजेच्या सुमारास मी रूमवर पोहोचलो. समोरच्या बेडवरील सामानावरून कुणीतरी आले असल्याचे समजले. पहाटेचे जागरण आणि तब्बल आठ किलोमीटर पायी चालल्यामुळे मी कमालीचा थकलो होतो. आणि वेळ न दडवता मी पलंगावर आडवा झालो. जाग आली तेव्हा सायंकाळचे सहा वाजले होते. बाहेर बघितले तर चक्क काळोख पडला होता. या दिवसांत साडेपाच वाजताच काळोख पडतो. रात्री लागणारे आवश्यक समान आणि ‘सोलो टेंट’ घेऊन मी रूमबाहेर पडलो.

इथे एक बॅनर दिसले. – “श्री भागवत सप्ताह, आयोजक- श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र.”

माझं कुतूहल जागं झालं. मी तिथं गेलो, तिथं सुमारे पाच हजार लोकांचा जनसागर श्री भागवत ग्रंथाचे पारायण करत होता. या लोकांच्या जेवणासाठी तिथंच किचन होतं. त्यांना विचारल्यावर अशी माहिती मिळाली की, भारतावरील तथा जगावरील सर्व मानवनिर्मित, नैसर्गिक संकटांचा समूळ नाश व्हावा असा ‘वैश्विक महासंकल्प’ करून या अनुष्ठानाची सुरुवात झाली होती. मी मराठी आहे कळल्यावर त्यांनी जेवणाचा भरपूर आग्रह केला पण आधीच भरपूर वेळ झाला असल्याने मी त्यांचे आभार मानून निघालो. मला त्या सेवेकर्‍यांचे खूप आश्चर्य वाटले. घरापासून हजारो किलोमीटर दूर येऊन देशासाठी आध्यात्मिक अनुष्ठान करणे म्हणजे एक दिव्यच होतं आणि हे फक्त मराठी माणूसच करू शकतो हे “याची देही याची डोळा” अनुभवलं. मी अस्सी घाटाला वळसा घालून लंकेकडे वळलो.

पुष्कर कुंडापासून लंकेपर्यंतचे सुमारे दीड किलोमीटर अंतर पायीच जाण्याचे ठरवले. शहराचा हा भाग नेहमीच गजबजलेला असतो. बनारस हिंदू विद्यापीठाच्या या परिसरास लंका असे म्हणतात. विद्यार्थी वर्गाची येथे नेहमीच वर्दळ असते. सुटसुटीत आणि प्रशस्त रस्ते, आजूबाजूला पुस्तकांची दुकाने आणि हॉटेल्स असा हा भाग बघून आपण सकाळी फिरलो तो याच शहराचा भाग आहे की आपण कुणी दुसरीकडे आलो आहे असे वाटते. ही मॉडर्न वाराणसी आहे. या महानगरीचं हेच तर वैशिष्ट्य आहे. म्हटलं तर इतिहासाच्या आधी आणि म्हटलं तर नित्यनूतन!!! लंकेपासून पाच किलोमीटर अंतरावर गडवाघाट आश्रम आहे. आजची रात्र मी तिथे टेंट टाकून रहाणार होतो. ‘तनिष डायनींग हॉल’ येथे मी रात्रीचे जेवण घेणार होतो. हॉटेलमध्ये जास्त गर्दी नव्हती, एक थाळी ऑर्डर केली. जेवणासाठीची ठिकाणं मी आधीच ठरवून घेतली होती. वाराणसीत बाटी-चोखा हा प्रकार जास्त प्रसिद्ध आहे. पण मी मुळचा खान्देशी असल्यामुळे वरण-बट्टी आमच्यासाठी विशेष नाही. बाटी-चोखा, शिवाय, तनिष यांसारखे हॉटेल त्यांच्या थळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मी सकाळपासून फक्त पुरीभाजी आणि लस्सीवर असल्याने मला प्रचंड प्रमाणात भुक लागली होती. मी व्हेज डिलक्स थाळी ऑर्डर केली होती. जवळजवळ दहा मिनिटं वाट बघितल्यावर माझी थाळी आली. व्हेज डिलक्स थाळीत पनीर, मिक्स व्हेज, रायते, जिरा राईस, डाळ,तंदुरी रोटी आणि गुलाबजाम हे पदार्थ होते. पनीर म्हणावं तसं तिखट नव्हतं, पण भरपूर ग्रेव्ही होती. त्यामानाने मिक्स व्हेज चांगली होती. गुलाबजाम मेडियम साईझचे होते. मला ते बनारस स्पेशल जायंट गुलाबजाम खायचे होते. माझी अपेक्षा होती की इथं ते असतील, पण माझा भ्रमनिरास झाला. हॉटेलमधले वातावरणसुद्धा छान होते. त्यामुळे माझं डिनर किमतीला न्याय देणारं झालं.

लंका चौकातली ती एक रम्य सायंकाळ होती. दिव्यांच्या झगमगटामुळे चौकला अजून शोभा आली होती. थंड वारे वाहत होते. बराच वेळ वाट बघितल्यावर शेअर रिक्षा न मिळाल्याने गडवा घाट आश्रम पर्यंत मी स्पेशल रिक्षा केली. रात्री शक्यतो इकडे कुणी नसतं. कारण गडवा घाट हा जवळपास शेवटचा घाट आहे. मला संतमत अनुयायी आश्रम येथे जायचे होते. मुख्य दरवाजातुन आत गेल्यावर मला तेथे बरेच अनुयायी भेटले. मी त्यांना मला इथे आजची रात्र राहू देण्याची विनंती केली. त्यांनी लगेच मान्य केले, कारण तिथे भरपूर रूम्स होत्या. विशेष म्हणजे नाममात्र शुल्क होते.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED