solo backpacking in varanasi - 5 books and stories free download online pdf in Marathi

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 5

पण मी जेव्हा त्यांना सांगितले की, मला रूममध्ये रहायचे नसून मोकळ्या जागेत टेंट टाकून रहावे लागेल तेव्हा मात्र त्यांनी असमर्थता दर्शविली. मी त्यांना परत विनंती केली तेव्हा त्यांनी विशेष परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यांच्यापैकी एक जण स्वतःहून परवानगी घ्यायला मध्ये गेला. तो पर्यंत अनुयायी आणि माझ्यात काही असा संवाद झाला. -

“आप कबसे हैं यहांपर?” मी थोडे भीतच विचारले.

“हमार तो जनम ही वाराणसी मे हुआ. कुछ दस साल के थे तबसे इधर हैं.” हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अभिमान दिसत होता. कदाचित त्याला असे कोणी विचारले नसावे.

“तो फिर आप क्या करते हैं दिनभर?” मी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं कारण माझी कॅम्पिंगची इच्छा काही पूर्ण होईल असे एकूणच वाटत होते.

“हम तो गोशाला में रहते हैं, दिन कब निकलता हैं पता ही नही चलता.”

“और कुछ सुनाइये?” मी उत्सुकता म्हणून विचारले.

जी आपने पुछा इसलीये बता रहे हैं. आप यहा आये ये शिवजी की मर्झी हैं, क्योंकी लगभग दो साल पहले शायद इसी दिन यहा विश्वशांती के लिये अतिरुद्र की पूजा हुई और आज जो आप ये सब शांती इस देश मे देख रहे हैं, वो इसिका परीणाम हैं.”

त्याचे बोलणे पूर्ण होते न होते तोच परवानगी घ्यायला गेलेली व्यक्ती परत आली, त्याने सांगितले की तुम्हाला परवानगी भेटली आहे पण सकाळी सात वाजेच्या आत निघावं लागेल. मी त्यांच्या सगळ्या सुचना मान्य करून मी लगेच टेंट टाकला. कितीतरी दिवसांत म्हणजे जवळपास वर्षभरापूर्वी मी भीमाशंकरला कॅम्पिंग केलें होते. त्यानंतर तब्बल एका वर्षाने ही संधी चालून आली होती. दोघी ठिकाणं ज्योतिर्लिंग होती हा निव्वळ योगायोग होता. या सर्वांत एक वाईट गोष्ट घडली होती ती म्हणजे मोबाईल मध्ये अजिबात चार्जिंग नव्हती. दुपारी वामकुक्षीच्या वेळी मी मोबाईल चार्जिंग लावायला विसरलो होतो. आडवं होताच मला दिवसभरच्या श्रमाने आणि रात्रीच्या अप्रतिम जेवणाने तात्काळ झोप लागली. पहाटेच्या सुमारास जाग आली तेव्हा टेंटच्या छतावर पाण्याचे थेंब पडल्यासारखे वाटत होते, मी बाहेर डोकावून पाहिले तर पाऊस वगैरे काही पडत नव्हता. जमीनीवरील गवतावर हात फिरवला तर हात अक्षरशः ओला झाला. इतक्या मोठ्या प्रमाणात दव पडलं होतं. सर्वत्र अंधार होता, त्यामुळे बाहेर पडून काही उपयोग नव्हता, झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही येत नव्हती. काही वेळाने काहीतरी आवाज येऊ लागला, मी टेंटमधून बाहेर पडलो. काही अंतरावर ज्वारीचे शेत होते, तिथे काही लोकं ज्वारीचे धांडे कापत होते. मी त्यांना पृच्छा केली असता ते धांडे चारा म्हणून गायींसाठी कापले जात होते. इतक्यात मला कोणत्यातरी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला. असा आवाज आधी ऐकला नव्हता, तो नेमका आवाज कशाचा हे बघण्यासाठी म्हणून मी गेलो तर समोरील दृश्याने मला आत्यंतिक आनंद झाला. समोर काही अंतरावर १५-२० मोरांचा घोळका मुक्तपणे केकाटत फिरत होता. इतके मोर मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले होते. खरंच अशा प्रकारच्या दिवसाची सुरुवात म्हणजे स्वर्गसुख असते. ते इतका आक्रोश करत इकडे तिकडे पळत होते की नेमका कोणता मोर आणि कोणता क्षण मनात साठवू असं झालं होतं. बाजूलाच विविध प्रकारच्या फळभाज्या पालेभाज्या खुडण्याचे काम चालू होते. मंडळी सकाळीच कामाला लागली होती. मी जवळपास अर्धा तास तिथं फिरत होतो. ते मोर माणसाळलेले होते बहुतेक. कारण ज्या ठिकाणी गाजर लावले होते तिथे ते बिनधास्तपणे पिंगा घालत होते. साडेसहा झाले होते मी टेंट वगैरे आवरून बाहेर पडलो आणि मार्गाला लागलो.

हाकेच्या अंतरावर गंगा वहात होती. त्यामुळे वातावरणात गारवा जास्त वाटत होता. नुकत्याच साखर झोपेतून उठलेल्या आणि आपल्याला तयार होऊन शाळेत जाण्यावाचून गत्यंतर नाही अशी हळूहळू मनाची तयारी करणाऱ्या लहान मुलासारखी वाराणसी दिवसभरासाठी तयार होत होती. साडेसात वाजेपर्यंत मी रूमवर पोहोचलो. शांतपणे तयारी करून सव्वा आठच्या सुमारास बाहेर पडलो. परत एकदा नाश्ता करायला राम भंडार ला आलो आणि कालच्या दिवसाची उजळणी केली. जी चव काल होती त्या चवीत आज यत्किंचितही फरक पडला नव्हता. परत एकदा राजेंद्रजींचे आभार मानले.

आज मणिकर्णिका घाट ते गणपती घाट पहायचे होते. राम भांडार ते मणिकर्णिका घाट या रस्त्यात जवळपास तीन ते चार वेळा भरकटुन त्याच जागेवर आलो. शेवटी एका ठिकाणी शांतपणे गुगल मॅप्स आणि बनारसी लोकांवर विश्वास ठेऊन एकाच दिशेने वाटचाल सुरू केली. एका गल्लीतून जाताना मला भलामोठा लाकडांचा ढिग दिसला. मी त्या घरापाशी गेलो तोच एक अरुंद गल्लीत लाकडे मोजण्याचे काम सुरू होते. मी त्याच गल्लीतून जात राहिलो आणि शेवटी घाटाजवळ येऊन पोहोचलो. तोच मणिकर्णिका घाट होता. शक्यतो तिथे पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही आपण दुरून बघू शकतो. समोरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. अनेक चिता अविरतपणे जळत होत्या, आणि जळणाऱ्या प्रेतांनंतर अनेक प्रेतं अक्षरशः जळण्यासाठी प्रतीक्षेत होती. माझ्यासमोर जे होते तेच जीवनाचे खरे अंतिम सत्य होते – “मृत्यू.”

कितीतरी वेळ मी त्या दृष्याकडे बघत होतो. असे म्हणतात की येथे दहन केल्यावर मोक्षाची प्राप्ती होते, त्यामुळेच कदाचित येथे दहन करून घेण्याचा ओढा असावा. इसवीसन १७३० मध्ये सदाशिव नाईक यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या मदतीने या घाटाचे पक्के बांधकाम केले. येथे बरीचशी जुनी मंदिरे असून त्यातील अर्धीअधिक श्री शिवाला समर्पित आहेत. त्यांचे निर्माण बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार तसेच गुजरात मधील वेगवेगळ्या राजवटींच्या काळात झाले आहे. धार्मिक तसेच सांस्कृतिक दृष्टीने हा घाट अतिशय महत्वपूर्ण आहे. सुमारे अठराव्या शतकाच्या सुरुवातीला येथे शव दहनाची प्रथा सुरू झाल्यापासून हा घाट तीर्थ तसेच स्मशान म्हणून प्रसिद्ध आहे. स्मशानभूमीच्या काही अंतरावर स्नान करण्यासाठी जागा आहे. कार्तिक महिना, सूर्य - चन्द्र ग्रहण, एकादशी, संक्रांत, गंगा दशहरा या दिवशी स्नानासाठी खूप गर्दी असते. पिंडदान, तर्पण असे विधी देखील येथे होत असल्याने बऱ्याच प्रमाणात न्हावी लोकं आहेत. ही जागा तंत्र साधनेसाठी अतिशय प्रभावशाली मानली जाते. त्यामुळे देशविदेशातील तांत्रिक येथे साधनेसाठी येतात. येथे अघोरी साधूंचे देखील मोठ्या प्रमाणात वास्तव्य असते. मणिकर्णिका घाटानंतर मी पुढच्या घाटाकडे वळलो. सिंधीया घाटाकडे जात असताना एका ठिकाणी गंगेचे अप्रतिम सौंदर्य न्याहाळायला थांबलो. पाच मिनिटांनंतर पायर्‍यांवरुन जात असताना नदीकडेच लक्ष होते. समोर बघितलं तर एक आकृती दिसली आणि तिने अचानक डोळे उघडले, मी दचकलोच अचानक. तो एक नागा साधू होता. सर्वांगाला भस्मलेपन करून शांतपणे पद्मासनात बसला होता. आधी मी त्याला पाहून घाबरलोच होतो. कारण वाढलेल्या जटा, भस्माने माखलेले पांढरे शरीर असं अचानक बघितल्यावर कुणाची त्रेधातिरपीट उडणार नाही.

पुढचा घाट होता सिंधिया घाट किंवा शिंदे घाट. इसवीसन १८३५ मध्ये ग्वाल्हेरच्या राणी बायजाबाई शिंदे यांनी या घाटाची पक्की बांधणी केली. त्यानंतर याला सिंधिया किंवा शिंदे घाट असे म्हटले जाऊ लागले. तत्पूर्वी सन १३०२ मध्ये विरेश्वर नावाच्या कुणी व्यक्तीने हा घाट बांधला असल्याने विरेश्वर घाट म्हणून ओळखला जायचा. अशी मान्यता आहे की या जागेवर अग्नी देवतेचा जन्म झाला. सर्वांत सुंदर आणि स्वच्छ घाटांपैकी हा एक आहे. त्यामुळे येथे योगासन तथा ध्यानधारणेसाठी बरीच गर्दी असते. शकतो परदेशी पर्यटक योगाभ्यास करण्यासाठी येथेच असतात. त्याचप्रमाणे हा घाट रत्नेश्वर महादेव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED