solo backpacking in varanasi - 9 books and stories free download online pdf in Marathi

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 9

केदार घाटावरील मंदिर हे काशीच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे असे म्हणतात. त्यामुळे घाटाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. येथे बर्‍यापैकी गर्दी असते.

पुढे हरिश्चंद्र घाट आहे. आपल्या सत्य बोलण्यासाठी सम्पूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध असलेल्या राजा हरिश्चंद्र यांची कथा याच ठिकाणी घडली असे सांगितले जाते. त्रेता युगातील हरिश्चंद्र हे अयोध्येच्या इश्वांकू वंशीय ३७ वे राजे होते.त्यांच्या कार्यकाळात सुख,शांतता आणि समृद्धी राज्यात नांदत होती. चक्रवर्ती सम्राट सागर हरिश्चंद्राच्या नंतरच्या १३ व्या पिढीतले. त्यनाची कहाणी काही अशी आहे, -

एकदा राजा हरिश्चंद्र आपली राणी तारामती आणि मुलगा रोहित सह शिकारीला गेले होते. तुटे त्यांना एका महिलेच्या रडण्याचा आवाज येतो. ते तिथे जातात तेव्हा समजते की ते एक मृगजळ होते. तेव्हा विश्वामित्र ऋषींची तपश्चर्या भंग कारणासाठी ‘विघ्नराज’ राजाच्या शरीरात प्रवेश करतो. तेव्हा विश्वामित्र ऋषींची तपस्या भंग होते आणि त्यांनी त्या द्वारे मिळवलेलं सर्व ज्ञान सुद्धा नष्ट होतं. जेव्हा हरिश्चंद्र भानावर येतो तेव्हा त्याला आपल्या करणीचा उलगडा होतो. तो ऋषींची माफी मागतो. तेव्हा तेव्हा विश्वामित्र त्याला आपल्या राजसूय यज्ञा साठी दान मागतात. राजा हरिश्चंद्र तात्काळ आपलं सर्व ऐश्वर्य ,साम्राज्य गुरू विश्वामित्रांना दान करतो ,अगदी स्वतःचे वस्त्र सुद्धा! त्यानंतर जेव्हा राजा आपल्या कुटुंबासह जाण्यास निघतो तेव्हा गुरू विश्वामित्र अजून संपत्ती दान करण्याची मागणी करतात. तेव्हा निराश राजा हरिश्चंद्र त्यांना सांगतात की, “जे काही होतं ते सर्व मी दान करून टाकलं आहे. कृपया मला एक महिना द्यावा त्या नंतर परत मी काही धन दान म्हणून देऊ शकेन.” नंतर आपल्याच राज्यात अत्यंत हालाखीत हरिश्चंद्र आणि त्याचा परिवार राहत असतो. यथावकाश महिना उलटतो, आता उद्या गुरुंना दान देण्यासाठी धन कुठून आणायचं? या विवंचनेत राजा पडतो. तेव्हा त्याची पत्नी स्वतःच्या विक्रीचा प्रस्ताव समोर ठेवते जेणेकरून काही धन गुरूंना दान देता येईल. शेवटी काही पैसे घेऊन रोहित ला सुध्दा आई सोबत विकण्यात येतं. दुसऱ्या दिवशी विश्वामित्र येतात आणि दानाची मागणी करतात. राजा त्यांना पत्नी आणि मुलगा विकून आलेलं सर्व धन देऊन टाकतात तरी सुद्धा विश्वामित्रांच समाधान होत नाही!

ते अजून दानाची मागणी करतात. मग कफल्लक राजा हरिश्चंद्र शेवटी स्वतःला विकायचं ठरवतो. तेव्हा चांडाळ देवता राजाला विकत घेण्याची इच्छा व्यक्त करतो. राजा या गोष्टीला नकार देतो. तेव्हा विश्वामित्र ऋषी राजाला विकत घेऊन चांडाळाला विकतो. चांडाळ हरिश्चंद्राला घेऊन आपल्या राज्यात येतो आणि त्याची स्मशानात कामासाठी नियुक्ती करतो. तिथे येणाऱ्या प्रत्येक मृतदेहाचे दहन करण्यासाठी तो लोकांकडून काही पैसे घेण्याचा आदेश देतो. या पैश्यातील एक हिस्सा चांडाळ ,दुसरा हिस्सा तिथल्या राजाला आणि राहिलेला हिस्सा हरिश्चंद्राला मिळणार असतो. हरिश्चंद्र स्मशानातील नेमून दिलेलं काम करून आपलं जीवन व्यतीत करत असतो. एके रात्री त्याला स्वप्नात आपली पत्नी रडताना दिसते झोपेतून जागा होऊन पाहतो तर खरंच त्याची पत्नी रडत असते. तिच्याजवळ सर्पदंशाने मृत्यू झालेला त्यांचा एकुलता एक मुलगा असतो. हरिश्चंद्र दुःखाने वेडा-पिसा होतो आणि आत्महत्येचा विचार करतो मात्र आपली पापं आपल्याला पुढच्या जन्मी सुद्धा भोगावी लागतीलच या विचाराने तो भानावर येतो. राणी तारामती आपल्या मृत मुलाचे अंत्यसंस्कार त्या स्मशानात करण्यास तयार होते परंतु, पैसे दिल्याशिवाय रोहित चे अंत्यसंस्कार इथे होणार नाहीत या भूमिकेवर हरिश्चंद्र ठाम राहतो. त्याची वचनबद्धता पाहून सर्व देव प्रसन्न होऊन तिथे प्रकट होतात. राजा हरिश्चंद्राच्या सत्यवचनी स्वभावाची स्तुती करून ते त्याला स्वर्ग लोकी येण्याचे निमंत्रण देतात. पण आपल्या प्रामाणिक सेवकांशिवाय एकटा स्वर्गात जाण्यास तो तयार होत नाही.

हा असा प्रचंड जुना आणि जाज्वल्य इतिहास आहे भारतवर्षाचा...

हे काशीतील दुसरे स्मशान आहे. येथेदेखील शव दहन होत असते. राजा हरिश्चंद्र आणि त्यांची पत्नी तारामती यांचे मंदिर तिथे बांधले आहे. मंदिराचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की, हे राजा हरिश्चंद्र, तुझ्यातला सत्य बोलण्याचा थोडासा अंश तरी माझ्यात आयुष्यभर राहू दे.

घाटाजवळच कमकोटीश्वर शिव मंदिर आहे. दक्षिण भारतीय शैलीत बांधलेले हे मंदिर अतिशय सुरेख आहे. या घाटाललागूनच हनुमान घाट आहे. असे म्हटले जाते की या घाटावरील हनुमान मंदिराची स्थापना गोस्वामी तुलसीदास यांनी केली आहे. या घाटावर नागा साधूंचा आखाडा आहे. या घाटाच्या पायऱ्यांबद्दल सांगितले जाते की, ‘नन्दादास’ या वाराणसीतील जुगाऱ्याने आपल्या एका दिवसाच्या जुगाराच्या पैशांनी या पायऱ्या बांधल्या आहेत. येथे दाक्षिणात्य भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच घाटाच्या मागच्या बाजूला भरपुर दाक्षिणात्य धर्मशाळा आहेत. पुढे शिवाला घाट आहे. या घाटाची निर्मिती अठराव्या शतकातील तत्कालीन काशी नरेश बळवंत सिंह यांनी केली. या घाटावरील काशी नरेशांनी बांधलेल्या ब्राम्हेंद्र मठात दक्षिण भारतीय बांधवांची रहाण्याची सोय आहे. पुढचा घाट होता - श्री निरंजनी घाट. या घाटावर नागा साधूंचे वास्तव्य असते. मी आखड्यातील कुस्त्यांचा सराव पहायला गेलो पण खूप उशीर झाला होता. पुढे चेतसिंह घाट आहे. घाटाच्या पायऱ्यांवर एक चित्रकार घाटाचे सुंदर चित्र काढत बसला होता. याचे निर्माण काशी नरेश बळवंत सिंह यांनी केले. त्यांच्या पूर्वजांचे - चेतसिंह यांचे नाव या घाटाला दिले. काशी नगरीच्या ऐतिहासिक दृष्टीने हा घाट अतिशय महत्त्वाचा आहे. सन १७८१ मध्ये वॅरेन हेस्टिंग आणि चेतसिंह यांचे युद्ध याच किल्ल्यावर झाले. यात चेतसिंह यांचा पराभव झाला आणि किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. तदनंतर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस महाराज प्रभुणारायण सिंह यांनी किल्ला इंग्रजांकडून पुन्हा प्राप्त करून घेतला आणि अर्धा भाग नागा साधूंना दान केला. पुढे मी तुलसी घाटावर आलो. श्रीं तुलसीदास यांनी येथे रामचरित मानस ग्रंथाचे काही खंड येथे लिहिले. येथे त्यांचे घर देखील आहे आणि येथेचं ते ब्रम्हानंदी लिन झाले होते. पुढचा आणि माझ्या नियोजनातला शेवटचा घाट होता - अस्सी घाट. वारणा नदी आणि अस्सी घाट यांमुळे या महानगरीला वाराणसी नाव पडले. येथे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधलेले लक्ष्मी नारायण मंदिर पंचयातन शैलीत बांधले आहे. तसेच यात नागर शैलीचा परभणी देखील आहे. सुबह ए बनारस, गंगा आरती तसेच विविध कार्यक्रमांमुळे या घाटाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. इथून मी सरळ लंकेकडे निघालो.

रविदास गेट मधून वळल्यावर “केशव तांबूल भांडार” लागते. वाराणसीत आल्यावर पान नाही खाल्ले म्हणजे काय ? वाराणसी तिच्या धार्मीकतेइतकीच पानां साठी प्रसिद्ध आहे. सुमारे पंधरा मिनीटांनी माझा नंबर आला. मी पान खात नाही पण वाराणसीत आल्यावर हा मोह आवरता आला नाही. प्रचंड मोठे ते पान अतिशय स्वादिष्ट होते. केशव पान भंडार हे त्यांच्या गोड पानांसाठी प्रसिद्ध आहेत. तब्बल ५६ वर्षांपासून ते अव्याहतपणे ग्राहकांची हौस भागवत आहेत. २०१४ च्या प्रचाराच्या वेळी श्री नरेंद्र मोदींनी तिथलं पान खाल्लं होतं. म्हणजे असा फोटो तिथं लावला होता आणि मी विचारल्यावर त्यांनी तसं सांगितलं. त्या दुकानाचे मालक श्री राजेंद्र चौरसिया यांना मी धन्यवाद दिले आणि तेथील काही स्थानिक व्यक्तींना मी रोज किती पान खातात? असे विचारले असता त्यांनी दिलेली उत्तरे आश्चर्यचकित करणारी होती. काही दहा, काही पंधरा तर काही वीस पानं दिवसाला खातात. बनारसच्या प्रत्येक ठिकाणच पान सारखंच लागतं असं म्हणतात. ते मोठे आणि गोड पान चघळत मी संकटमोचन हनुमान मंदिराचा रस्ता धरला. मंदिरात मोबाईल घेऊन जाता येत नाही. गेटवर मोबाईल जमा करुन आत गेलो. आत गेल्यावर बरीच हिरवळ आणि झाडं आहेत. शनिवार असल्याकारणाने बरीच गर्दी होती.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED