सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 3 Shubham Patil द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 3

मी आता विश्वनाथ गल्लीत होतो आणि मला ‘ब्लू लस्सी शॉप’, कचोरी गल्ली येथे जायचे होते. मंदिराच्या अवतीभवती विश्वनाथ गल्ली आहे. ह्या गल्लीत बनारसी साड्या, खादीचे कपडे, खेळणी तथा कंदी पेढ्यांची दुकाने आहेत. येथे नेहमीच वर्दळ असते. सलग कचोरीची दुकाने सुरू झाली तशी कचोरी गल्ली सुरू झाल्याचे मी ओळखले. येथिल बहुतांश दुकाने ही कचोरीची असल्यामुळे या गल्लीला ‘कचोरी गल्ली’ असे म्हटले जाते. तसेच इथे धार्मिक ग्रंथ, पौराणिक पुस्तकांची दुकाने भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. वाराणसीला गल्ल्यांचे शहर असे म्हणतात ते खोटे नाही, इथे तब्बल ५५ पेक्षा जास्त गल्ल्या आहेत. वाराणसीच्या गल्ल्यांबाबत असे म्हटले जाते की, जो रस्ता तुम्हला तुमच्या घरापर्यंत नेतो तोच तुम्हाला स्मशानाकडे सुद्धा नेतो. सकाळी नाश्ता झाल्यावर मंदिरात जात असतानाचा एक प्रसंग -

“जी, नमस्ते.”

“नमस्ते जी,”

आप यहा कितने साल से रहते हैं?” मिस्किलपणे त्याने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला,

“जी हमार जनम ही इधर हुआ है, लेकिन आप इ सब काहे पुछत हो हमसे?”

“जी मुझे जनाना हैं की आपको वरणसीकी सब गलीयां पता हैं क्या?”

“नाही जी ये तो नामुमकीन हैं भाई, इ सब भुलभुलैया हैं, सब शिवजी की क्रीपा हैं.”

“हां जी वो तो हैं, चलीये धन्यवाद.”

मला तो प्रसंग आठवला. अर्धचंद्राकृती गंगेच्या तीरी वसलेली वाराणसी ही खरचं मोठी भुलभुलैया आहे. वाराणसी हे जर मानवी शरीर मानले तर गल्ल्या म्हणजे रक्तवाहिन्या आहेत. वाराणसीत गल्ल्या आहेत की गल्ल्यांत वाराणसी हेच कळत नाही. झाले, मी वाराणसीच्या भुलभुलैयात फसलो. GPS सिग्नल लॉस्ट झाला आणि मी अक्षरशः भरकटलो. परत फिरून तिथेच आलो जिथून सुरुवात केली होती. परत कशीतरी वाट विचारत ब्ल्यू लस्सी शॉप ला पोहोचलो. या शॉपचा रंग निळा असल्यामुळे याला ब्ल्यू लस्सी शॉप नाव पडले. येथील लस्सी फार प्रसिद्ध आहे. आत काही गर्दी नव्हती म्हणून आतच बसणे पसंत केले. शॉपचे मालक निवांतपणे त्यांच्या वडिलांसोबत गप्पा मारत बसले होते. स्मितवादनाने त्यांनी मला मेन्यूकार्ड दिले. मी एकंदर त्यावर नजर फिरवली आणि फ्लेवर्ड लस्सीपेक्षा साधी लस्सी ऑर्डर केली. कारण बनाना फक्त लस्सीमध्ये ते खरं केळं मिक्स करायचे. बाकी सर्व फ्लेवर्स वगैरे टाकून द्यायचे. शॉपच्या सर्व भिंतींवर पासपोर्ट फोटो चिकटवले होते. मी या कार्यक्रमासाठी माझा एक पासपोर्ट फोटो सोबत ठेवलाच होता. मी मालकाकडे गेलो, तसा तो म्हणाला,

“क्या हुआ सहब?”

“आपके पास ये फोटो स्टिक करने के लिये कुछ हैं?”

“हा, है ना. ये लिजीए.”

आणि त्याने मला फोटो चिकटविण्यासाठी फेविकॉल दिला. मी यथासांग नीट जागा निवडून माझा फोटो चिकटवला आणि फेविकॉल त्याच्याकडे दिले.

“क्या आप मुझे बता सकते हैं की ये फोटो स्टिक कारनेकीं प्रथा कबसे शुरु हुई?”

“जी मैं भी ठिकसे नही बता सकता, लेकीन आप यहा आये थे इसकी याद में लोग फोटो लगाके जाते हैं.”

इतक्यात माझी लस्सी आली. लस्सीची चव अप्रतिम होती. एका भल्यामोठ्या मातीच्या भांड्यात (कुल्हड) मध्ये अगदी काठोकाठ भरून लस्सी माझ्या टेबलावर ठेवली. येथिल लस्सी बनवण्याची पद्धत देखील निराळी आहे. एका भांड्यात दही साखर यांचे मिश्रण एकजीव होईपर्यंत लाकडी रवीने घुसळतात. जवळपास सर्वच ठिकाणी अशी लस्सी बनवतात. मी पुण्यात असताना एका ठिकाणी पाटी वाचली होती की आमच्या येथील लस्सी प्यावी नाही तर खावी लागते. मला ही लस्सी खाताना ते दुकान आठवले. येथील लस्सी खरचं खावी लागत होती. (विनापाटीची!!!) मी येथे जाण्यासाठी शक्यतो सायंकाळ किंवा रात्रीची वेळ सुचवेन कारण, मणिकर्णिका घाट जवळच असल्याने थोड्या थोड्या वेळाने प्रेतयात्रा जात असतात. या अप्रतिम लस्सीसाठी मी आभार मानून बाहेर पडलो. ही लस्सी चाखल्यावर “पोट गार होणे” या वाक्याची प्रचिती आली. परत एकदा विश्वनाथ गल्लीतून दशाश्वमेध घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. याच रस्त्याला भाजीबाजार भरतो. गर्दीतून वाट काढत सुमारे एक किलोमीटरवर हा घाट आहे. विश्वनाथ गल्लीतून मूळ रस्त्याला लागल्यावर दशाश्वमेध घाटाकडे जाण्यासाठी एक मोठी कमान लागते.

काशीमधील विश्वनाथ मंदिराशेजारी गंगा नदीच्या काठावर असलेला दशाश्वमेध घाट एक सर्वात जुना, नेत्रदीपक आणि महत्वाचा घाट आहे. इथे स्नान केल्यावर दहा दशाश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे. त्यामुळे इथे स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी असते. इसवी सन १७४० मध्ये मध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी दशाश्वमेध घाटाची पुनर्बांधणी केली. नंतर १७७४ मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी घाटाची पुनर्रचना केली. संध्याकाळी गंगेची आरती केली जाते तेव्हा या घाटाचे वास्तविक आकर्षण पाहून खूप आनंद होतो. (मागील वेळी आलो तेव्हा तत्कालीन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार असल्याने सुरक्षा कारणास्तव आम्हाला येथे जाऊ देणास मज्जाव करण्यात आला होता. असो,) सायंकाळी गंगा आरती सुरू असताना ‘रिव्हरफ्रंट दृश्य’ बघण्याची एक वेगळीच मजा असते. हा घाट वर्षानुवर्षे तसेच भाविक आणि पर्यटकांसाठी धार्मिक स्थळ बनला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, हिंदू भाविकांमध्ये हा सर्वात आवडता आणि मुख्य घाट मानला जातो. दशाश्वमेध घाटाजवळ अनेक धार्मिक मंदिरे तसेच पर्यटकांची स्थळे आहेत. विविध धार्मिक विधी आणि धार्मिक उपक्रम करण्यासाठी यात्रेकरू येथे येतात. हळूहळू घाटाच्या पायऱ्या उतरलो आणि तसतशे पवित्र गंगा नदीचे विशाल पात्र दिसू लागले. अथांग आणि प्रचंड गंगा. थोडा वेळ उभं राहूनच गंमत बघीतली. शेकडो भाविक गंगास्नानाचा आनंद घेऊन कृतकृत्य होत होते. कोणी सूर्याला अर्घ्यदान करीत होते, तर काही गंगेत डुबकी मारत होते. पट्टीचे पोहोणारे मात्र जरा लांबवर जाऊन पोहण्याचा आनंद घेत होते. त्यांच्या सोबत आलेले मात्र काळजीने त्यांच्याकडे बघत होते आणि जास्त लांब न जाण्याची सूचनावजा विनंती काळजीपोटी करत होते असे एकंदरीतच त्यांच्या देहबोलीवरून कळले. नावाडी लोकांची लगबग सुरु होती. थोड्या बाजूला जाऊन मी पायऱ्यांवर बसलो. अगदी प्रसन्न वातावरण होते. माझ्या बाजूला एक आयरिश व्यक्ती बसली होती, आणि या नयनरम्य वातावरणाचा आनंद न घेता मोबाईल मध्ये गुंतली होती. नंतर त्याने घरी व्हिडीओ कॉल करून घाट वगैरे दाखवले.

तत्पूर्वी, वाराणसीत आल्यावर नावेवर स्वार होऊन पवित्र गंगेची सैर करणं म्हणजे सोन्याहून पिवळं. Peak Hours असल्याने नाव लकर भारत होत्या. मी वेळ न दडवता नावेत बसलो. आमची नाव ‘वल्हव रे नाखवा’ टाईपची नव्हती, जनरेटर स्टार्ट असल्याने आमची फेरी लवकर पूर्ण होणार होती. आम्ही एकूण दहा जण होतो. नाव सुरू झाली आणि इतिहासाच्या आधीपासून इतिहास असलेले बनारस अजून एका वेगळ्या अॅंगलने दृष्टीला पडू लागले. महास्मशान दृष्टीला पडताच अंगावर काटा उभा राहिला. अविरत जळणारी प्रेतं..... जळणारी प्रेतं काही वेळापूर्वी जीवंत असतील. पण आता? आता त्यांच्या शरीराचं पूर्ण दहन होतंय की नाही हे पहाण्यासाठीसुद्धा कुणी नव्हतं.

कुठल्यातरी घाटावर शूटिंग सुरू होतं. तिथं थोडा वेळ नाव थांबवण्याचा आग्रह नावेतल्या काही मंडळींनी धरला. पण नावाड्याने ऐकले नाही. पायी घाट फिरणाची मजा वेगळी असते आणि नावेतून डोळ्यांत न मावणारे घाट बघण्याची मजा त्याहून वेगळी. बघताबघता अर्धा तास कसा गेला तेच कळलं नाही. आमच्या नावेतल्या बर्‍याच लोकांनी सर्व वेळ फोटो वगैरे काढण्यात घालवले. ते क्षण मनात साठवण्याऐवजी कॅमेर्‍यात टिपणं त्यांना चांगलं वाटलं. दशाश्वमेध घाटावर अजून पाच-दहा मिनिटं बसून मी पुढच्या घाटाकडे निघालो आज मी दशाश्वमेध घाट ते मणिकर्णिका घाट बघणार होतो. उद्या मणिकर्णिका घाट ते गणेश घाट आणि परवा दशाश्वमेध घाट ते अस्सी घाट.