१६)शेवटी रितूचा विश्वास जिंकला...
इकडे इन्स्पेक्टर राठोड आज जरा सुट्टीवर होता.सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज परत त्याने चिकन बनवली होती.त्यामुळे त्यालाच पोलीस चौकीवर पोचायला वेळ झाला होता.अन्यथा सगळेजण केव्हाच पोचले होते. मागाहून जाऊन सुद्धा इतरांवर जरा राठोड खेकसला.
माझ्या अगोदर येऊन जमा झाले. चांगली गोष्ट आहे. पण इथे तोंड काय पाहता माझं.काढा ती जीप. आपण येथे कशासाठी आलो हे ठाऊक नाही काय तुम्हाला? चला लवकर.. तोंड बघताय नुसती...
आणि पोलीस चौकीतून गाडी निघाली पेरजागडाच्या दिशेने. काही तासात सोनापूर ओलांडून गाडी पेरजागडाच्या खालच्या आवारात जमा झाली. रोजच्या सारखं तसं गडावर कोणी नव्हतं.मंदिरात असणारा गृहस्थ पिण्याच्या पाण्यासाठी गावाकडे गेला असल्यामुळे मंदिरात असं कुणीच नव्हतं.त्यामुळे सर्वात आधी आपण गडावरून येऊ अशी सूचना त्याने सगळ्यांना दिली.
गेटपाशी जाताच तो बोर्ड शिंदेने वाचला की मास मटण दारू सेवन करणारा व मासिक पाळी असलेल्या महिलांनी गडावर प्रवेश करू नये.
अरे अशा नियमांना काय करतोस ?येथे कोणते देव बसलेत?चला काय ते नियम वाचायला बसलेत. लय बघितलं असे नियम.. माणूस नियम बनवतोस कशासाठी..तोडण्यासाठी...चला..
असे म्हणून गडाची वाटचाल करण्यास त्यांनी सुरुवात केली. दम घेत पाणी पीत मजल-दरमजल करीत त्यांनी पायथ्याचा टप्पा गाठला. आणि जलकुंभाजवळ येऊन थोडावेळ बसले. अचानक त्यांना कशाचा तरी गुरगुरण्याचा आवाज आला. गडाकडे जायचा वाटेवरुन एक वाघ त्यांच्याकडे येत होता व जलकुंभाच्या बाजूने एक अस्वल पण इकडे येताना दिसत होती.
राठोडने इकडे तिकडे बघितले. कधी वाघाकडे तर कधी अस्वलाकडे. पण एक मात्र होतं, वाघ आणि अस्वल जवळ जवळ येऊन त्यांच्यात वाद नव्हता.कारण कित्येकदा राठोडने असं बघितलं होतं की वाघ आणि अस्वल कधीच एक सोबत नसतात. पण येथे दोघांनाही सामोरी पाहून तो घाबरला होता. आणि उंचावर असलेल्या दगडावर चढून बसला पण त्या जनावरांची नजर मात्र त्यांच्यावर येऊन होती.काय करावं? त्यांच्या चेहऱ्यावरून फक्त घामाचे ओघळ निघत होते. आता कदाचित आपले श्वास केव्हाही बंद पडू शकते याची त्यांना जाणीव झाली.राठोड तर खुपच घाबरुन गेला होता. आता वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. शेवटी वाघाने एक डरकाळी मारली आणि सगळ्यांची भीतीने गाळण उडाली. कारण संबंध रानात ती काही बऱ्यापैकी गाजली होती. आता आपलं काही खरं नाही हे त्याने जाणले. आणि कमरेच्या बॉक्समधून त्याने पिस्तूल बाहेर काढले.
सगळ्यांना एक सोबत पळून जाण्याचा संकेत दिला. आणि हवेत त्याने गोळीबार केला. पण इतका आवाज होऊनही वाघही जागचं हलेना आणि अस्वलही जागची हलेना. एक-दोन-तीन अशा वरच्यावर त्याने गोळ्या झाडल्या पण कुणाला काहीच फरक झाला नाही. आता मात्र राठोडला कळून चुकलं होतं. की आपलं काही खरं नाही. कारण आता जवळ काहीच साधन पण नव्हतं.
बंदुकी मधल्या गोळ्या पण संपायला आल्या होत्या. आता पळ काढण्याशिवाय काहीच मार्ग नव्हते. पण वाटेवरच अगदी वाघ बसून होता. आणि तिकडे जंगलात पळावे म्हटलं तर अस्वल वाटेवर बसून होती. त्यामुळे कुणाकडे जावं हाही प्रश्न होता. आणि गड चढण काही प्रत्येकाला जमलेलं नव्हतं. वेळ मात्र भीती ने निघून जात होती.अचानक कानाशी काहीतरी गुणगुणण्याचा आवाज तीव्रतेने येत होता.
सगळ्यांनी मान उंचावून डोळे उघडून वर बघितले तर गडावरुन मधमाशांच्या थवेचे थवे त्यांना त्यांच्या अंगावर येतांना दिसले.यावेळेस मात्र राठोडची घाबरगुंडी उडाली. सोबत असणाऱ्या शिंदे आणि इतर, आता काही पर्याय नाही असे समजून दगडावरून खाली उतरले. आणि दोन्ही हातांनी मधमाशांना हाकलत गडाच्या खाली उतरू लागले. वाटेवरच्या वाघाला भ्यायचं काही त्यांच्या मनात आलं नाही. फक्त जीव वाचवण्याच्या नादात पळापळ करू लागले.
परत एकदा वाघाने जोरदार अशी आरोळी ठोकली. जंगल दणाणून गेलं होतं.सगळ्यांची धावपळ चालू होती. कुणी घसरून पडत होते.दगडावरून तर कोणी वाटेत येणाऱ्या झाडांना जाऊन आपटत होते. पण प्रत्येकाला घाई होती आपलं जीव वाचवण्याची. त्यामुळे कोणीच कुणाला ऑर्डर देत नव्हते. आणि कुणीच कुणासाठी थांबतसुद्धा नव्हते.शेवटी कुठेही न थांबता धावतच राहिले. राठोडला तर आयुष्यात ट्रेनिंग मध्ये पण इतकं धावणे आठवत नव्हतं.प्रत्येकाच्या चेहर्यावर दरदरून फुटलेला घाम भीतीची जाणीव करून देत होता.गडावर जाणाऱ्या गेटला ओलांडून ते मंदिराच्या मोकळ्या मैदानात आले, आणि उघड्यावरच जमिनीवर लोळत धापा टाकत बसले.
एव्हाना इतक्या पर्यंत मंदिरात असलेला तो गृहस्थ पिण्याच्या पाण्यासाठी गावाकडे पायपीट करत गेला होता. नुकताच पोहोचला होता. आणि अशा पद्धतीने पोलिसांना बघून तो त्यांच्या जवळ आला.प्रत्येकांचे चेहरे मधमाशांनी चावून चावून सुजवून टाकले होते.जिथे तिथे पडल्यामुळे पायाचे गुडघे खरचटले होते.तर कुणाचे हात पाय वगैरे त्याच प्रमाणात गंभीर झाले होते.त्या गृहस्थाला त्यांची दया आली व त्याने उचलून त्यांना पाणी वगैरे पाजले. मुळात कारण काय आहे? हे आधीच त्याने जाणून घेतलं होतं.
पाणी वगैरे पिऊन थोड्या वेळाच्या मोकळ्या उसास्याने त्यांना थोडी हिंमत आली. राठोड उठले आणि त्यांनी त्या सूचना फलकाकडे बघितले. तो गृहस्थ त्यांच्याकडे गेला व म्हणाला. साहेब चुकी लोक करतात.विसरून जातात की ईथे राजकारण चालत नाही, उच्च-नीच भेदभाव काही चालत नाही, इथे फक्त श्रद्धा चालते आणि श्रध्देचे नियम आहेत. आपण एक निसर्गाचे घटक असून सुद्धा बघा ना निसर्गात आणि आपल्यात किती फरक आहे.जेव्हा आपण प्रत्येकाला बघतो पण या दृष्टीने, पण आस्वाद घ्यायचं असल्यास त्यांच्या मनाप्रमाणे आपण वागतो काय? काय त्यांना थोडीशी तडजोड, ती पण आपल्याच समाधानासाठी, पण आपण तर तेही त्यांना देऊ शकत नाही.
इथे सगळं लिहून असल्यावरही माणसाचा अहंकार जागृत होतो. मग काय त्याची शिक्षा नको व्हायला? येथे कायदे नसतात साहेब, फक्त एक माया असते. आणि ज्याला ती कळते तोच गडावर जाऊन भक्ती करू शकतो. असे कितीतरी प्रसंग घडत असतात. आमच्यासाठी काही नवीन नाही हे.
राठोडला त्याची केलेली चूक फार प्रमाणात नडली होती. त्याची शिक्षा इतर लोकांनी पण भोगली होती. त्याला आता कळून गेले होते की श्रद्धा म्हणजे काय असतं?त्याच्या जीवनाचा हा प्रसंग नेहमी एक आठवण बनून असणार होता.वाल्याचा वाल्मिकी झाला आहे असे त्यांनी ऐकले जरूर होते पण नास्तिकतेच्या थराला जाऊन आजपर्यंत त्याने कित्येक गोष्टींचा विरोध केला हे आता त्याला पटायला लागले होते.
मग त्याने नेमक आता काय घडलं याची इत्यंभूत माहिती सगळी त्या गृहस्थाला सांगितली. आणि केलेल्या गैरवर्तनाबद्दल तो पश्चाताप व्यक्त करू लागला. त्यामुळे तो त्यांना म्हणाला,
"आता पश्चाताप करून काही उपयोग नाही साहेब. कारण तुम्ही शिक्षेस पात्र झालात. आणि त्यामुळे जर तुम्हाला माफी मागायची आहे तर त्या गडाची मागा. ज्याचे निवासी तुम्ही अवहेलना केली. उद्या कोणत्याही वाईट गोष्टीचे सेवन न करता चांगल्या प्रकारे या गडावर, मनात कसली भीती न घेता. आता निघा तुम्ही... नाही तर हे जंगल तुम्हाला अजून खायला उठेल.
गाडीत बसून येताना इन्स्पेक्टर राठोड बऱ्याच प्रमाणात विस्तारले होते. माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांना एक प्रकारचं खरं रूप डोळ्यासमोर दिसत होतं.ज्यामुळे आभास काय असते? किंवा अस्तित्व काय असते? याचा म्हणून त्यांनी अभ्यास केला होता. प्रत्येक बाबतीत आता बारकाईने बघत होते एव्हाना घरी जाण्यापेक्षा त्यांनी पोलिस स्टेशनला आधी भेट घेतली. आणि परत सगळे फाईल चेक करू लागले. माझ्या मित्रांच्या किंवा त्यांचे व्हिडिओ रिपिट करू करू बघत होते.त्यामुळे त्यांना अस्तित्वाची जाणीव होत होती.
हे सगळं चल-बिचल चालू असताना. एक अचानक त्यांच्या मनात पाल चुकचुकली. आज त्यांनी मला विसरून जाण्याची खंत व्यक्त केली आणि ताबडतोब गाडी काढून हॉस्पिटलकडे लावली. जाताना नेहमीसारखंच आवाज मात्र येत नव्हतं. कारण मधमाश्यांच्या हल्ल्यात वाटेवर घसरून पडल्यामुळे पायाला जराशी दुखापत झाली होती. आणि दोन-तीन जागी थोडं सुजन होती.त्यामुळे थोडा बंडेज लावलं होतं. बाकी तोच दरारा होता.आता फक्त सल्ले मात्र बदलले होते. त्याची गुणवत्ता थोड्याफार प्रमाणात घसरली होती.
पॅरानॉर्मल ॲक्टिव्हीटीचा एक प्रकार आहे असं त्यांना वाटू लागलं होतं.नेहमीसारखे दोन शिपाई दरवाजावर ठेवले होते. सलामी म्हणून त्यांनी साहेबांचं एक आदर्श ठेवलं.
कुणी आलं होतं का रे मीडिया वगैरे?
शिपाई= नाही साहेब.
राठोड =ठीक आहे ठीक आहे जा कामावर.
असं म्हणून त्यांनी आत प्रवेश केला. तर माझ्या शेजारी नेहमीप्रमाणे रितू बसलेली त्यांना आढळली पण साहेबांची ही अवस्था बघून तिला थोडी चिंता आली.
काय झालं सर... तुमची अवस्था अशी कशामुळे झाली..
नियम तोडण्याचे दुष्कृत्य केले मी आज.. ज्यामुळे आज मला ही शिक्षा मिळाली.
नियम म्हणजे मी काही समजलं नाही सर.
मग राठोडने काही वेळापूर्वी झालेला पूर्ण वृत्तांत रितू समोर कथन केला. ज्यामुळे रीतू परत एकदा विवंचनेत पडली. कारण ज्या रस्त्याच्या शोधाअंती ती होती.अजूनही ती तितक्याच दूर उभी होती, जीतक्यात ती आजपर्यंत होती. या प्रसंगामुळे तिलाही मात्र हे नक्की कळलं होतं की हे काही साधंसुध प्रसंग नाही आहे.
इतक्यात सूर्या हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सहारे येऊन गेले होते.
राठोड =काय म्हणाले ते?
रितू =काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे पण असाच एक पेशंट होता त्याची सुद्धा हीच परिस्थिती होती. रोज त्याच्या पाठीवर वळ असायची.
राठोड =काय नाव काय म्हणालात ते त्याचं?
रितू =नाव आठवत नाही पण रुग्ण स्वतः हॉस्पिटल मधून निघून गेला होता. आणि त्याच्या आधाराला पण कोणीच नव्हते. त्यांनी त्याला शोधायचा प्रयत्न केला पण तो रुग्ण मग त्यांना मिळालाच नाही.काही वेळापूर्वी हि केससुद्धा अगदी त्यांच्यासारखीच आहे असं म्हणाले ते.
राठोड =अच्छा आणखी काही म्हणाले, शुद्धीवर वगैरे केव्हा येईल म्हणून.
रितू= हा नमंन देसाई असे त्या रुग्णाचे नाव
राठोड =काय नाव म्हटलं?
रितू= नमन देसाई
राठोड =कसा असू शकतो... तो तर केव्हाच मृत्यू पावला. त्याची केवढी मोठी खिंडार आजही सोशल मीडियावर गाजते आहे.तुला माहिती नाही का नमन हा पवनचां मित्र होता. त्याची बॉडी माझ्यापाशीच पोलीस चौकीत होती. स्वतःहून पवनच तर तो न्यायला आला होता.बरं ते जाऊदे रात्री पुन्हा काही झालं होतं का म्हणजे परत वार वगैरे झालेत काय.
हा प्रश्न रितूसाठी तसा गरजेचा होताच. पण एकाकी वातावरणात अश्रुंचे ढग जमा व्हायला वेळ लागला नाही. कारण परिस्थिती अजून तरी कायम तशीच होती. काही फरक त्यामध्ये पडला नव्हता.
काल सायंकाळच्या सुमारास आई निघून गेली होती आणि रितू माझ्या जवळ एकटीच उभी होती. रोज होणारे चाबकाचे फटके त्यामुळे रीतू कधीच झोपत नव्हती, अगदी छोट्या-छोट्या हालचालीमुळे सुद्धा तिला जाग यायची. आणि माझं रोज तिळतिळ मरणं ही सुद्धा तिच्या जीवाची एक तितकीच खंत होती. सकाळी झालेल्या आवाजामुळे तिला जाग आली. थोड्याफार प्रमाणात प्रतिकार करायची तीव्रता तिच्या अंगी होती आणि माझ्यासाठी म्हणजे तिला मी सर्वस्व होतो.
अगदी सकाळी तिचे आई वडील आले होते. माझी भेट घेऊन तिला परत न्यायला. पण ती तिच्या वडिलांना म्हणाली.. अख्खं जग सोडून त्याच्याच मागे धावण्याचं सौभाग्य माझं. प्रत्येक वेळी मंगळसूत्र टाकून निभवता नाही येत.त्यासाठी सहवास तितकाच महत्त्वाचा असतो बाबा. आणि आयुष्यातील माझी वाट त्याच्याच पायापर्यंत येऊन थांबते. या वेळात जरी मी त्याच्यापासून लांब झाले तर काय अर्थ उरेल माझ्या नात्याला. मला स्वार्थी नाही व्हायचं बाबा. कधीच नाही. इतकं प्रेम दिले त्याने मला, कदाचित स्वतःला जोपासण्यासाठी त्याने ठेवलंय मला. तुम्हीच सांगा बाबा कसं सोडू त्याला.माझ्यापर्यंत काळाची नजर येऊ नये म्हणून आधीच त्याने मला खूप वेळा टाळलं आहे.रोज तडफडतो माझ्याशी बोलण्यासाठी आणि अशा वेळेला तुम्ही म्हणता मी त्याला सोडून जाऊ. अहो आता तर बाबा आयुष्य हरवले त्याच्यात.त्याचं नुसतं श्वास जरी चालू असेल ना तरी इथे माझं श्वास चालते. कारण मी ठरवलंय, आता घरी येणार तर त्याला घेऊनच नाहीतर जाणार तर त्याच्या सोबतच.
खरंच आई-वडिलांचे तिच्या डोळे पाणावले. शेवटी मुलीच्या त्या अनोख्या संसाराला डोळे टिपत आणि प्रणाम करत निघून गेले. शेवटी आईवडीलच ते, मुलीच्या सुखाचाच स्वार्थ करतील. कारण तसे न केल्यास त्यांना आई-वडील होण्याचा अधिकारच कोणता. शेवटी मुली जवळ ते एकच बोलू शकले, "शहाणी झाली हा माझी बाळ... आज वडिलांना शिकवते ...सुखाने रहा ग..माझी पोर... आणि खात्री करतो की तू लवकर यावं. आणि त्याला घेऊन यावं. येतो आम्ही काळजी घे.. आणि काही लागलं असल्यास कळव आम्हाला.'
हे नाते किती विचित्र असतात. सख्यांना कदर नसते आणि परके नाते जीव सुद्धा ओवाळून टाकतात. दृष्टांत मांडला तर आपल्या सख्यांना मागे टाकतील अशी त्यांची स्थिती असते.नशीबवान होतो मी बेडवर लोटुन असताना देखील कितीतरी मनांच्या वर राज्य करत होतो.आणि तेही एकदम आपुलकीनं, विश्वासानं आणि प्रेमानं.
रात्रीला तसं यावेळी सगळे तयार होते. कारण दरवेळेस रात्रीला कसले भयानक कृत्य चालते हे सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये माहीत होऊन गेलं होतं. रितू मघापासून दंडावर बांधून असलेल्या ताईतावर नजर ठेवुन बसली होती.कारण तिला त्यावर विश्वास वाटत होता.
रात्रीचा तो सुमार चालू झाला.रितु बेडच्या आसपास येरझारा घालू लागली होती.प्रत्येक सेकंदाला मागे तीची नजर माझ्यावर पडत होती. कारण मृत्यू कोणत्याही वेळी आता माझ्या मागावर येऊ शकत होता. गेले काही दिवस तिने याची पूर्तता केली होती.कुठेतरी बाहेर नर्सची कुजबुज ऐकू येत होती. याचा अर्थ अजून बरेच जण जागे होऊन हॉस्पिटलमध्ये वाट बघत होते. दारावर असलेले राठोडचे पहारेकरी केव्हाच निद्रेच्या स्वाधीन झाले होते. फक्त एक रितुच काळजीच्या स्वराने गुंतलेली माझ्यासाठी रात्र जागत होती.
अचानक वातावरणात कसलासा बदल होऊ लागला. रीतुने ओळखले की आता मृत्यूचे सावट माझ्या अंगावर यायला लागले आहेत.ती कसलाही विचार न करता माझ्याजवळ आली. ऑक्सिजन मास्क माझा चेक करून बघितला .जिकडेतिकडे त्रुटी आहे का नाही एक शोधक नजर टाकली. आणि चादर व्यवस्थित छातीपर्यंत पांघरली. व बेडपाशी एक खुर्ची लावून माझ्यापाशी येऊन विसावली.
कसल्याशा भासाने तिने कान टवकारले आणि मान उंचावून गेट पासून काही अंतरावर एक हालचाल तिच्या दृष्टीस पडली.एक पुसटशी सावली हळूहळू माझ्या बेड कडे सरकत होती.पण या वेळेस एक विचित्र हास्य रीतुच्या कानावर येत होते. अगदी स्पष्ट... ....हा ...हा ...हा.. हा ..हा...
अगदी थोड्याच अंतरावर येऊन ती सावली उभी झाली. आणि एका कडक वाणीच्या स्वरूपात म्हणाली, सोडणार नाही तुला... तुला नेणार म्हणजे नेणारच ....अजुन किती दिवस राहशील ...आज निश्चितच... पण सोडणार नाही... नेणारच तुला .....आणि चाबकाचा सड... असा आवाज हवेत भिरकावला.
रितूला आज स्पष्टपणे ऐकायला येत होते.मी आहे तोपर्यंत त्याला कधीच जाऊ देणार नाही. असं म्हणून ती त्या सावलीला आडवी झाली. पुन्हा एकदा तोच भयानक हसण्याचा आवाज कानात भिरकाव करू लागला.शेवटी ती सावली चालता-चालता केव्हा तिच्या आरपार झाली तिला कळलेच नाही. ती सावली जाऊन माझ्या छातीवर उभी झाली. आणि परत एकदा चाबूक हवेत भिरकावला.
आता काय घडणार आहे हे रितुला निश्चितच माहित होतं.ती परत माझ्याकडे आली.त्या सावलीला म्हणाली सोड त्याला...हवं तर मला ने पण सोड त्याला... पण ती सावली उठायची नाव घेत नव्हती. आणि मग त्याने ते फटके मारण्यास सुरुवात केली. पण काय आश्चर्य? यावेळेस एकही फटका माझ्या शरीरावर पडत नव्हता.चाबकाचे सगळे वार असे खाली जात होते.
रितू हे सगळं बाजूलाच उभी होऊन बघत होती.कारण ठरल्याप्रमाणे तिचा विश्वास जिंकला होता. कारण डॉक्टरने तो ताईत काढल्यानंतर रीतूने तो ताईत आपल्या हाताने परत बांधला होता.माझा एक विश्वास म्हणून तिने तेवढी एक खून माझ्या दंडावर ठेवली होती.शेवटी ती सावली त्रासली आणि सभोवार नजर टाकत असताना त्याने माझ्या हातावर असलेल्या ताईतकडे बघितलं. आणि नकळत ती सावली माझ्या छाती वरून खाली उतरली.माझ्या पुढ्यात उभे होऊन एक भयानक हास्य गाजवू लागली.
तुला काय वाटतं? तू त्याला वाचवू शकणार. अगं जीव त्याचा इथं नाही... तो अडकलाय.आता तिथून त्याची सुटका कधीच नाही.हा ...हा... हा...हा...हा...ह...हा... निघू दे त्याला केव्हाही.पण मी परत येणार..त्याला नेणार.
आभाळ गरजल्यासारखे त्याचे शब्द तिच्या कानात गुंजत होते. आणि ती सावली परत एकदा माझ्यातून आरपार झाली.आणि बघताबघता दिसेनाशी झाली.त्या ताईतनं मला वाचवलं जरूर होतं. पण मी शेवटी होतो कुठे?कुठे अडकलो होतो?
रितू माझ्यापाशी निश्चलपणे बसून होती. कारण आता तिला स्वतःबद्दल एक किळस येऊ लागली होती. डोळे बंद करून मनात एक निश्चय करत होती.आता आपण पवनला आणायचे म्हणजे आणायचं ...जगाच्या कोणत्याच कोपऱ्याला जरी तो अडकला असेल तरी आपण त्याला आणायचं.
तर मित्रांनो आतापर्यंत बऱ्याच प्रमाणात आपण पवनची कथा वाचली.पण बेडवर पडून असतानासुद्धा पवन होता कुठे? तुम्हालाही प्रश्न पडला असेल नाही का?रीतुने मनाशी काय निश्चय केला?इन्स्पेक्टर राठोडला खरच पवनशी निगडित असलेल्या रहस्यांचा शोध लागेल काय? तर बघूया समोर आणखी काय घडते ते.त्यासाठी सविस्तर वाचत रहा...