Santshrestha Mahila Part 2 books and stories free download online pdf in Marathi

संतश्रेष्ठ महिला भाग २

संतश्रेष्ठ महिला भाग २

संत परंपरेतील महिलांमध्ये प्रथम नाव मुक्ताबाईंचे घेतले जाते .

संत मुक्ताबाईंचा उल्लेख फार आदराने केला जातो .

अत्यंत लहान वयात उत्तम समज असणारी जुनी व जाणकार संत
त्यांना आद्य संत म्हणून संबोधले जाते .

ज्यांच्यामुळे मराठी साहित्याचे दालन परिपूर्ण झाले.

ज्यांनी मायमराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलविलेला आहे.

अशा संत ज्ञानदेवाच्या भगिनी संत मुक्ताबाईंचा जन्म इंद्रायणीतीरी वसलेल्या आळंदी गावाजवळील
सिद्धबेटावर अश्विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार शके १२०१ म्हणजेच इ. सन. १२७९ मध्ये झाला.

त्यांच्या आई-वडिलांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव होते .

स्त्री शक्तीच्या जोरावर त्यांनी तेराव्या शतकातही आपल्या साहित्य कृतीतून
परंपरेच्या जोखडातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला.

स्त्री जन्म येऊनही उदास होऊ नये असे त्या ठामपणे सांगत.

इतका आत्मविश्वास त्यांच्याकडे होता .

“ज्ञानियांचा राजा” म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्या ज्ञानदेवांची मुक्ताई ही धाकटी बहीण.

पैठणपासून जवळ असलेल्या आपेगावचे त्र्यंबकपंत कुलकर्णी हे मुक्ताईंचे पणजोबा
आणि गोविंदपंत हे आजोबा.

ते नाथपंथाचे अनुयायी आणि कृष्णभक्त होते.

वडील विठ्ठलपंत, मुक्ताईची आई रुक्मीणी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान असा त्यांचा परिवार होता.
त्यांच्या वडिलांनी, विठ्ठलपंतांनी मुले होण्यापूर्वी संन्यास घेतला होता .

पण नंतर त्यांचे मन पुन्हा गृहस्थाश्रमाकडे ओढ घेऊ लागले.

अशात त्यांनी परत गृहस्थाश्रम स्वीकारला .

त्यानंतर या चार भावंडांचा जन्म झाला .

पण समाजाला हे मान्य नव्हते .

समाजाने त्यांना वाळीत टाकले .

जेव्हा विठ्ठलपंत संन्यासी जीवन सोडून गृहस्थाश्रमात प्रवेश करते झाले,

तेव्हा धर्मांध लोकांच्या छळाला त्यांना सामोरे जावे लागले .

पोरवयातच संत निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना स्वजातीयांनी संन्याशाची पोर म्हणून वाळीत टाकून

त्यांची विटंबना केली, पण हे सारे भोग सोसत ह्या चारही बहिण-भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली.

आपल्यानंतर आपली मुलं तरी सुखी राहावीत या आशेने श्री विठ्ठलपंत व रुक्मिणी यांनी निर्दयी समाजाने दिलेल्या देहांत प्रायःश्चिताचा निर्णय शिरसावंद्य मान्य करून त्रिवेणी संगमात देहविसर्जन केले.

मात्यापित्यांच्या या देहत्यागानंतर या कुटुंबाचा आधारवड मुक्ताबाई बनल्या .

आपलं बालपण विसरून त्या आपल्या लहान भावंडांची आई झाल्या .

गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी सुद्धा मुक्ताबाईंवर पडली.

ती तितक्याच समर्थपणे तिने उचलली आणि पेलली.

त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या बालवयातच मुक्ताई प्रौढ गंभीर, सोशिक समंजस बनली.

हळव्या निरागस वयात जीवनाच्या वास्तव सत्याकडे आणि कठोर स्वरूपाकडे निर्लीप्तपणे पाहण्याचे प्रगल्भ प्रौढत्व त्यांच्यात आलेले होते.

एक दिवस ज्ञानदेवांना पाहून कोणा टवाळाने त्यांना संन्याशाचा पोर म्हणून हिणवले तेव्हा ज्ञानदेव मनात खिन्न होऊन झोपडीत जाऊन बसले व काही केल्या झोपडीचे दार उघडेनात.

त्या वेळी मुक्ताईने त्यांच्या ज्या विनवण्या केल्या ती कवने 'ताटीचे अभंग' म्हणून प्रसिद्ध आहेत.

त्यांत जसा वडील भावावर रुसलेल्या धाकट्या बहिणीचा लडिवाळपणा आहे, तसाच परिणत प्रौढत्वाला साजेल असा समंजसपणाही आहे!!!

त्या वेळेस विकल झालेल्या ज्ञानेश्वरांना ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरां’ असं धीराने मुक्ताबाईने सांगितले .

आपल्या अभंगातून जगण्याचे बोधामृत त्यांनी दिले .

आपल्या कर्तव्यापासून ढळणाऱ्या आपल्या थोरल्या भावाला त्याच्या भूमिकेचे स्मरण करून दिले .

त्यांच्या या प्रेरणेतून विश्वाला ‘ज्ञानेश्वरी’ मिळाली. संत मुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील.

मुक्ताईचे ताटीचे अभंग आजच्या काळाशी देखील सुसंगत आहेत.

ताटीच्या अभंगातून मनाचे दरवाजे उघडून जगाच्या कल्याणासाठी कसे झिजावे याचा नवा मार्ग सांगितला .
एके दिवशी ज्ञानेश्वर रस्त्याने जात होते.
काही विरोधक समोरून येत होते. त्यापैकी एकजण म्हणाला, ”असे कोणते ज्ञान आहे तुझ्याजवळ ?
म्हणून तुला ज्ञानदेव म्हणतात ?
ज्ञानदेव हे नाव ठेवल्याने काही ज्ञान मिळत नाही.”
इतक्यात समोरून एक पखालवाला रेडा घेऊन येत होता. त्याकडे बोट दाखवून तो म्हणाला,
”हा जो रेडा चालला आहे, त्याचे नाव ज्ञाना ठेवले तर त्याला काही ज्ञान येणार आहे का ?”
यावर ज्ञानेश्वर म्हणाले, ”माझ्यात आणि रेड्यात काही फरक नाही.
ईश्वर सर्व ठिकाणी सारखाच आहे.”
तेव्हा तो विरोधक म्हणाला, ”तुझ्यात आणि त्या रेड्यात काहीच फरक नाही तर त्याच्या मुखातून वेद बोलून दाखव बर !”
ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवताच तो “वेद” बोलू लागला.
त्या विरोधकाची खात्री झाली की, ज्ञानेश्वर हे “अवतारी” पुरुष आहेत.

तसेच एकदा पैठणमधील विद्वान पंडिताकडून शुद्धीपत्र मिळविण्यासाठी ते पैठणला एका ब्राह्मणाच्या घरी राहिले होते.
त्या ब्राह्मणाकडे एकदा त्याच्या वडिलांचे श्राद्ध होते .
परंतु श्राद्धास कोणी ब्राह्मण मिळेना.
त्याने हे ज्ञानेश्वरांना सांगितले. ते ऐकून ज्ञानेश्वर म्हणाले,
”मी तुमचे पितरच इथे भोजनासाठी आणवितो.
तुम्ही स्वयंपाक तयार करावा.”
ब्राह्मणाने सर्व सिद्धता केली.
ज्ञानेश्वरांनी त्या ब्राह्मणाचे प्रत्यक्ष पितर बोलावून आणले.
पंचपक्वानांचे भोजन, वस्त्रालंकार, दक्षिणा देऊन सर्व कार्य संपल्यानंतर
‘स्वस्थानेवासः’ असे ज्ञानेश्वरांनी म्हणताच ते पितर अदृश्य झाले.
हे वर्तमान पैठणात सर्वत्र पसरले, तेव्हा सर्व विरोधकांना पश्चाताप झाला.
त्यांनी ज्ञानेश्वरांचा सत्कार केला. ‘तुम्ही साक्षात ईश्वराचे अवतार आहात. तुम्हाला प्रायश्चित्ताची जरुरी नाही.’ अशा तऱ्हेचे पत्र त्यांनी लिहून दिले.

ज्ञानेश्वरांनी पैठण येथे केलेले चमत्कार आळंदीच्या लोकांना समजले.
साक्षात ईश्वरच अवतरले आहेत असे ते समजू लागले.
मराठी भाषेतील सर्वांत मोठा प्राचीन असा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ ज्ञानदेवांनी नेवासे येथे लिहिला.
त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरी’ म्हणजे मराठी भाषेतील धर्मग्रंथरूपी अजरामर लेणेच होय !
अशा ज्ञानेश्वरांची मुक्ताईच गुरु होती.

जीवन अहंकार विरहीत जगण्याचा मोलाचा संदेश त्यांच्या अभंगातून मिळतो.
घातक रुढी परंपरेला त्या विरोध करतात .
ज्ञानावर प्रगाढ विश्वास असणाऱ्या मुक्ताबाई गुरुकडून ज्ञान मिळवायला हवे असे आवर्जून सांगतात .

जगाला बंधुत्वाची शिकवण देताना समतेच्या वाटेवर समाजाला नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता .

भक्तीला ज्ञानाची जोड द्यायला हवी पण त्याचा अहंकार मात्र येता कामा नये असे त्यांचे म्हणणे होते .

आध्यात्मिक प्रगती म्हणजे माणूसपणाच्या वाटेवर चालणे होय.

त्यांचे अभंग हे धार्मिक, सामाजिक, विकासाचे नवे प्रतिबिंब आहे .
स्त्री शक्तींचा सन्मान आणि तिला अधिकारवाणीनं जगण्याचा हक्क आहे हे त्या काळातही त्या ठणकावून सांगत.

सामाजिक समतेच्या दृष्टीने विचार करता मुक्ताई आजच्या पिढींच्या प्रतिनिधी आहेत .

सामाजिक भेदाभेद असतानाही प्रबोधनाच्या वाटेवर चालणारे विचार मांडणे हा धैर्याचा भाग म्हणावा लागेल.

त्यांनी ज्ञान, समता आणि विषमतेवर प्रहार करत एका अथांग तत्वज्ञानाची ओळख जगाला आपल्या अभंगातून करून दिली आहे.

अध्यात्म, विज्ञान आणि विवेकानुसार वाटचाल करताना आजच्या घडीला मुक्ताईचे विचार आवश्यक वाटतात.

सर्व तत्कालीन संतांनी एकमुखाने मुक्ताबाईचा ज्ञानाधिकार मान्य केला होता .

लहान असूनही तिचा प्रत्येक आदेश स्वीकारला.

संत मुक्ताबाईचे गुरु म्हणजे त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ होते .

मुक्ताबाईंनी बालपणीच त्यांच्या समकालीन समाजाचे उग्र कठोर वास्तव अनुभवले आणि ते पचवून लौकिक जीवनसंघर्षाकडे पाठही फिरविली.

त्यांच्या वाणीत सांसारिक सुखदुःखाचा वा क्लेश पीडांचा प्रतिसाद नाही.

सारे जीवनच त्यांनी अलौकिक रंगात रंगवून टाकले आहे.

ज्यांना मुक्ताबाईंनी गुरुमंत्र दिला ते म्हणजे विसोबा खेचर आणि हठयोगी चांगदेव हे दोघे होते .

आळंदीस विसोबा नावाचा एक कुटील विरोधक होता.

तो या चार भावंडांचा खूप द्वेष करीत असे.

एकदा निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईस मांडे करण्यास सांगितले.

तिने सर्व सामान आणले व मांडे भाजण्याकरिता खापर आणण्यासाठी ती कुंभाराकडे गेली.

तिथे विसोबा होता.

त्याने कुंभारास तिला खापर देऊ नकोस म्हणून बजावले.

तो कुंभार विसोबांचा देणेकरी असल्यामुळे त्याला ते कबूल करणे भाग पडले.

मुक्ताबाई खिन्न होऊन घरी आली.

ज्ञानेश्वरांना म्हणाली, ”मांडे करणार कसे ?

कुंभाराने खापर दिले नाही !”

यावर ज्ञानेश्वर लगेच आपला जठराग्नि प्रदीप्त करून म्हणाले, ”माझ्या पाठीवर मांडे भाज. ”

मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले.

नंतर सर्वजण भोजनास बसले.

विसोबा हा सर्व प्रकार दुरून पाहत होता.

आणि तो चमत्कार पाहताच तो धावत जाऊन त्यांना शरण गेला.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED