Santshrestha Mahila Part 9 books and stories free download online pdf in Marathi

संतश्रेष्ठ महिला भाग ९

संतश्रेष्ठ महिला भाग ९

यामध्ये नंतर नाव येते बहिणाबाई यांचे ..
संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील असुन
मराठी संत कवयित्री आणि संत तुकाराम महाराजांच्या शिष्या म्हणुन ओळखल्या जातात.
महाराष्ट्रात ज्या प्रमुख स्त्री संत होउन गेल्या
जनाबाई, मुक्ताबाई, वेणाबाई, कान्होपात्रा, मीराबाई, आक्काबाई
यांमध्ये संत बहिणाबाईंचे देखील मानाचे स्थान आहे.
प्रपंच परमार्थ चालवी समान|| तिनेच गगन झेलियेले।
संत बहिणाबाईंचे हे उपकारच म्हणावयास हवेत की त्यांनी आत्मनिवेदन लिहिले.
संत तुकारामांच्या शिष्या म्हणून त्या प्रसिद्ध आहेत.
इ.स. १६२८ ते १७०० हा त्यांचा कार्यकाल.
संत बहिणाबाईंच्या अभंगात आरंभी आदिनाथ शंकरापासून गुरूपरंपरा दिलेली आहे.
त्यानंतर आत्मनिवेदनपर अभंगातून त्यांचे जीवन उलगडते.
हे अभंग त्यांचे खास वैशिष्ट्य आहे .

मराठीतील पहिल्या आत्मचरित्र लिहिलेल्या रमाबाई रानडे यांच्या तीन शतके आधी
बहिणाबाईंचे आत्मनिवेदन आलेले आहे.
त्या तुकोबांच्या समकालीन होत्या .
तुकोबांचे दर्शन लाभलेल्या.
तुकोबांबरोबर वावरलेल्या.
त्यांचे अभंग त्यांच्याच तोंडून ऐकण्याचे भाग्य मिळालेल्या.
११६ अभंगांचे ते आत्मचरित्र त्यांनी लिहून ठेवले म्हणून आज आपणास तत्कालीन समाजाचा सनातनी विचारांमुळे विद्रुप झालेला चेहरा दिसू शकला.
तुकोबांचे देहू कसे होते ते समजू शकले आणि मंबाजी गोसावी नावाचा खलपुरुष तुकोबांचा कशा प्रकारे छळ करीत होता हे कळू शकले.
संत बहिणाबाई (जन्म १६२८) या वैजापूर तालुक्यातील देवगावच्या.
बहिणाबाईंच्या घरात भक्ती परंपरा पूर्वीपासूनच होतीच.

वेद, उपनिषदे, भागवत कथा यांचे नित्य चिंतन त्यांना घडलेले होते.

कोणतेही काम करत असतांना भक्तिभावाने सतत नामस्मरण सुरू असे.

बहिणाबाई तीन वर्षांच्या असताना गंगाधरपंत पाठक या तीस वर्षीय बिजवराशी त्यांचा विवाह लावून देण्यात आला.
आई-वडिलांनी आंदण देऊन कन्यादान केले.

त्यांचे यजमान हुशार होते .
त्यांचा व्यवसाय भिक्षुकीचाहोता . वैद्यकीही करीत.
स्वभावाने मात्र भलतेच तापट आणि वेदांचे अभिमानी होते .
बहिणाबाई सांगतात-
‘नामाचा विटाळ आमुचीये घरीं। गीताशास्त्र वैरी कुळीं आम्हां।।
देव तीर्थ यात्रा नावडती हरी। ऐसीयांचे घरीं संग दिला।।’

याचा मनस्ताप बहिणाबाईंना फार झाला.
मुलीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज फेडणे त्यांचे वडील 'आऊजी कुळकर्णी' यांना शक्य झाले नाही.
जावयाने त्यातून मार्ग काढला व सारे कुटुंबिय गाव सोडुन बाहेर पडले .
प्रवरासंगम, शिंगणापूर, नरसिंगपूर, पंढरपूर, रहिमतपूर असे करीत ते कोल्हापूरला आहे.
अखेर कोल्हापूर येथे वास्तव्य करायचे त्यांनी ठरवले.

कोल्हापुरात 'हिरंभट' नामक वेदांती ब्राह्मणाकडे राहत असताना,

त्याला दानात मिळालेली सवत्स धेनू बहिणाईच्या पतीला द्यावी, असे त्याच्या स्वप्नात ब्राह्मणाने सांगितले.

त्याप्रमाणे त्याने केले.

बहिणाबाई गायवासरांची प्रेमाने सेवा करू लागली.

वासराला तिचा लळा लागला.

'जयराम गोसावीं'ची कथा ऐकत असताना वासरू तिच्याजवळ असे.

लोकांना बसायला जागा नाही म्हणून त्याला बाहेर ठेवताच ते ओरडू लागले.

पती गंगाधरपंत संतापले व बहिणाबाईला मारहाण केली.

तिचे हातपाय बांधून गायवासरासमोर टाकले.

तिचे दु:ख बघून गायवासरांनी चारापाणी वर्ज्य केले.

मग मात्र पतीचे मन द्रवले.

त्यांनी बहिणाबाईला मुक्त केले.
पण, दु:खाने गायवासरू काही खात नाही, हे बघून बहिणानेही अन्नपाणी घेतले नाही.
हे ऐकताच 'जयराम स्वामी' तेथे आले.
त्यांनी तिच्या पतीला समज दिली.

हिरंभटाने श्लोक म्हणताच वासराने म्हटलेला लोकांनी ऐकला, अशी अद्भूत कथा बहिणाबाई निर्व्याजपणे अभंगात लिहितात.

जयराम स्वामी यांची कथा-कीर्तने ऐकण्याची संधी बहिणाबाईना मिळाली.

त्यातून त्यांची भक्ती अधिकाधिक “परिपक्व” होत गेली.

त्यावेळी मावळ प्रांतात तुकोबांनी भक्तीचा डांगोरा पिटला होता.

त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती.

जयराम स्वामी यांच्या कीर्तनातही तुकारामांच्या अभंगांचे अनेक संदर्भ येत.

त्यात स्त्री-क्षुद्रांना वेदाचा अधिकार नाकारणा-यांना तुकोबांनी खडसावले.

त्याचा अर्थ आपल्यालाच केवळ ‘ठाऊक’ असल्याचे सांगितले.

या विचारांचा बहिणाबाईंवर परिणाम झाला असावा.

त्यातून त्यांनी तुकोबांचे अनेक अभंग मुखोद्गत केले.
. तेव्हा बाईंचे वय साधारण नऊ वर्षांचे होते.
बहिणाबाईंना याच काळात हरिकथा श्रवणाची गोडी लागली.
जयरामस्वामीनी त्यांच्यातील “संतत्व” ओळखले.
त्यांच्याकडूनच बहिणाबाईंच्या कानावर पडलेल्या तुकारामांच्या
अभंगांनी बाईंना जणू वेडच लावले.
त्या सांगतात-

‘तुकोबाचीं पदें अद्वैत प्रसिद्ध। त्यांचा अनुवाद चित्त झुरवीं।।
ऐसीं ज्याची पदें तो मज भेटतां। जीवास या होतां तोष बहू।।’
माहेरी आणि सासरी दोन्हीकडे भक्ती परंपरा असल्याने त्यांना लहानपणापासून भक्तीची गोडी होतीच .

तुकोबांचा छंद त्या बारा वर्षांच्या मुलीला लागल्याचे पाहून लोक नवल व्यक्त करू लागले.
तिला भेटण्यासाठी येऊ लागले.
ते पाहून बहिणाबाईंच्या पतीचा मात्र मस्तकशूळ उठला.
तो बहिणाबाईंना छळू लागला.

‘भ्रतार हा माझा देखोनी तयासी। माझीया देहासी पीडा करी।।

न देखवे तया द्वेषी जनाप्रती। क्षणाक्षणा चित्तीं द्वेष वाढे।।

म्हणे ही बाईल मरे तरी बरें। इस कां पामरें भेटताती।।’

हा केवळ आपल्या बायकोला मिळणारा मानसन्मान पाहून पेटलेला द्वेषाचा जाळ नव्हता .
पुरुषत्वाचा गंड त्यात होताच परंतु त्यात वैदिक धर्माचा अभिमानही होता .
गंगाधरपंत बहिणाबाईंना सांगत होते-

‘भ्रतार म्हणतसे आम्हीं कीं ब्राह्मण। वेदाचे पठण सदा करूं।।’

आपण ब्राह्मण आहोत.
आपण वेदांचे पठण करायचे.
तू कसली त्या शूद्राच्या नादी लागली आहेस!

‘कैचा शूद्र तुका स्वप्नींचे दर्शनीं। बिघडली पत्नी काय करूं।’

गंगाधरपंतांचे खरे दुखणे हे होते.
त्यामुळे ते तिला सोडून निघाले. म्हणाले-
‘न पाहे मी मुख सर्वथा इयेचें। हीनत्व आमुचें कोण फेडी।।’

ब्राह्मण स्त्रीने क्षुद्राचे गुरुत्व स्वीकारण्याचा.
ती नीच जातीची व्यक्ती तुकाराम असली म्हणून काय झाले?
सनातन धर्म बुडालाच ना त्याने!

दुसऱ्या दिवशी गंगाधरपंत घर सोडून जाणार, तर त्याच रात्री त्यांना ताप भरला.
महिना झाला तरी औषधाचा गुण येईना.
कसे काय कोण जाणे त्यांना वाटले, आपण तुकोबांची निंदा केली म्हणूनच हे झाले.
पश्चात्तापाने त्यांचे मन निवले.
बहिणाबाईंनी केलेल्या सेवेने ते आजारातून बरे झाले.
आणि मग तेच म्हणू लागले-

‘होवो आतां कल्याण किंवा अकल्याण। आम्ही तो संपूर्ण भक्ती करूं।।

तुकोबाचे गांवां जाऊनीया राहीं। मनींचा दृढावा धरोनीया।।’

यानंतर बहिणाबाई सहपरिवार देहूला आल्या.
इंद्रायणीत स्नान केले आणि तुकोबांच्या दर्शनाला देवळात गेल्या.
त्या सांगतात-

‘तुकोबा आरती करित होते तेथ। नमस्कारें स्वस्थ चित्त केलें।।

स्वप्नीं जो देखीला तेंच ध्यान तेथें। देखीले नेमस्त पूर्ण दृष्टी।।’

बहिणाबाईंनी डोळे भरून तुकोबांचे दर्शन घेतले.
-‘सावळे रूप बापा, याचें लागलें पीसें।। वर्तुळ दोंद पोट, नेत्र नासिका नीट।

देखिल्या दंत-पंक्ती, लघु आरक्त वोट।। उंच ना ठेंगणें हो, ध्यान हेंचि हे राहो।’

बहिणाबाई आणि त्यांच्या पतीने या मूर्तीचे दर्शन घेतले.
.
आजवर नवऱ्याने त्यांना कमालीचे छळले, मारले होते.
त्या सांगतात- ‘सोसियले क्लेश जिवें बहू फार..’ खूप कष्ट सोसले या जीवाने.
पण आता तो नवरा वळणावर आला होता.
त्यांच्या अभंगात 'देवगाव माझे माहेर साजणी', असे सखीला सांगत आपले गाव, परिसर अशी सारी माहिती देतात.
'मौनस गोत्र माझ्या पित्याचे वरिष्ठ' असे सुक्ष्म तपशीलही त्यात येतात. एकूण ७८ अभंगांतून हे अद्भूत आत्मचरित्र आले आहे.
यानंतर आता मात्र अवघ्या बारा वर्षांच्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या भेटीचा ध्यास घेतला.
तुकोबांनी आपणास “शिष्यत्व” द्यावे यासाठी त्यांचे मन आक्रंदू लागले.
या ध्यासाने त्या आजारीच पडल्या.
परंतु तोपर्यंत तुकाराम सदेह वैकुंठास गेले होते .

‘त्रिविध तापानें तापलें मी बहू। जाईना कां जीऊ प्राण माझा।।’ असे त्यांना झाले.

त्या अवस्थेतच सात दिवस गेले आणि अचानक एके दिवशी तुकोबांनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले.
त्या सांगतात-

ठेवोनीया कर मस्तकीं बोलींला। मंत्र सांगीतला कर्णरंध्री।।

म्यांही पायांवरी ठेविलें मस्तक। दिधलें पुस्तक मंत्र गीता।।’

स्वप्नातील गुरूपदेशाच्या या घटनेनंतर बहिणाबाईंनी तुकोबाचे वर्णन करतात ..

‘पांडुरंग- तुका पांडुरंग- तुका। वेगळीक देखा होय केवीं।।

कलियुगीं बौद्धरूप धरी हरी। तुकोबा शरीरीं प्रवेशला।।..

तुकोबाचे हात लिहिताती जें जें। तेंचि तें सहजें पांडुरंग।।’

बहेणी म्हणे तुका सद्गुरू सहोदर | भेटता अपार सुख होय।

क्रमशः

इतर रसदार पर्याय