Saint Best Woman Part 6 books and stories free download online pdf in Marathi

संतश्रेष्ठ महिला भाग ६

संतश्रेष्ठ महिला भाग ६

संत नामदेव हे संत जनाबाईंचे गुरु असल्याने आणि त्यांच्याकडे सर्व संतांचे येणे जाणे असल्याने
संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले होते .

त्यांना संत नामदेवांमुळे सतत संतसंग घडला होता.

त्यामुळे जनाबाईंनी आपल्या अभंगांची नावे ‘दासी जनी’, ‘नामयाची दासी’ आणि ‘जनी नामयाची’, अशी ठेवली आहेत.

या दासीपणाची, स्वत:च्या शूद्र जातीची आणि स्वत:च्या ‘स्त्री’पणाचीही जाणीव व्यक्त करणारे

अनेक अभंग संत जनाबाई यांच्या मनातून त्यांच्या शब्दांत उमटले आहेत.

विठ्ठलाला मायबाप आणि प्रसंगी ‘सखा’, ‘जिवाचा मैतर’ समजणार्‍या जनीने विठ्ठलाशी त्याबद्दल संवाद साधलेला तिच्या अनेक हृद्य अभंगांतून दिसतो.

अतिशय सामान्यातली सामान्य, अशी जनाबाईची ओळख. पण आयुष्यभर मोलकरणीचे काम करणार्‍या या दासीनं एक असामान्य काम केलं.
ते म्हणजे, तिनं काळजाचा ठाव घेणारे अभंग लिहिले.

आणि मराठवाड्यातल्या गंगाखेडची जनी “संत जनाबाई” बनली.

तत्कालीन खालच्या सामाजिक स्तरातून वर उठून स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करणार्‍या संत अशी जनाबाईची ओळख आहे .

जनाबाईच्या मनातील श्रेष्ठ गुरूभाव ही तिची शक्ती होती.

आयुष्यभर नामदेवांच्या भक्तीमार्गाच्या पाऊलखुणांवरून प्रवास करणारी जनाबाई अखेरच्या क्षणीदेखील गुरूची “सावली” बनून राहिली.

“दास्यभावाचे” मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई

जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती एकदा संत कबीरांच्या कानी गेली.

इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले.

तिथे आल्यावर त्यांना की ती नामदेवांच्या घरी कामास आहे.

तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल.

दासी म्हणून घरकाम करणारी, गोव-या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले .

आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले.

तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले.

त्या दोघींच्या मधे गोव-यांचा मोठा ढीग होता, गोव-या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.

कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले.

अन् मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, ‘‘इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का?

’’त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -‘‘ही काय, हीच की जनी! चोरटी!

माझ्या गोव-या चोरून माझ्याशी भांडण करत्येय!

अन् वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय.’’

त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्का बसला.

कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते.

तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही.

ते तिथेच त्यांचे भांडण बघत उभे राहिले.

त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की, ‘‘तूच जनी आहेस का?’’

यावर ती हातातल्या गोव-या खाली टाकून बोलती झाली,

‘‘होय बाबा, मीच ती जनी.

तुला काही त्रास आहे का माझा?’’

तिच्या या उत्तराने अन् तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर

आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मन:स्थितीत होते.

मात्र जनाईच्या होकाराने दुस-या बाईला अजून बळ आले.

ती कबिरांना म्हणाली, ‘‘हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई,

पर तुमी एक काम करा.

आमच्या दोघींच्या बी गोव-या यात आहेत.

तुमी आमच्या आमच्या गोव-या निवडून वेचून द्या.

तुमी एव्हढं काम करा अन् मग हिथून जावा.’’

आता गोव-या सारख्याच दिसतात.

शेणाच्या, गोल आकाराच्या त्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार
याचं कोडे कबीरजींना पडले .
कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली,

‘‘त्यात काय इतका विचार करायचा? अगदी सोप्पं काम आहे.’’

आता कबीरजी चकित झाले होते.

सारख्या दिसणा-या शेणाच्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं
मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे.

हे कसे काय सोपे असू शकते किंवा तिच्याकडे या समस्येचे काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले.

त्यांची आतुरता त्यांच्या चेह-यावर झळकली.

कबिरांच्या चेह-यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली,

‘‘अहो, महाराज हे अगदी सोपे काम आहे.

सर्व गोव-या एके ठिकाणी करा.

अन् त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा.

ज्या गोवरीतून ‘विठ्ठल, विठ्ठल’ आवाज येईल ती गोवरी माझी.

अन् ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची!’’

जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला.

अन् त्या दुस-या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.

कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोव-या उचलल्या.

गोव-या उचलून कानी लावल्या अन् काय आश्चर्य, त्या गोव-यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही.

आपण एका महान संत कवयित्रीला भेटत आहोत.

जिच्या विचारात देव वसतो आहे’

हे त्यांच्या लक्षात आले .

कबिरांनी सा-या गोव-यांची वाटणी केली.

त्या बाईच्या काही मोजक्याच गोव-या होत्या तर बहुतांश गोव-या जनाबाईच्या होत्या.

गोव-यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह कायम होते.

जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली,

‘‘या गोव-यातून हा आवाज कसा आला याचे तुम्हाला कोडे पडलंय का?

एकदम साधी गोष्ट आहे.

मी या गोव-या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन् माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो,

तोच या गोव-यातसुद्धा असतो.’’

कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन् मग त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली.

कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.

एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना
सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला
तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे.

भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासूनची असावी, ती सच्ची असली की आपल्यालादेखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.

संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत.

हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आ

हे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ती मिळाली होती.

संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे.

पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत.

“एक ना, अवघे सार। वरकड अवघड ते असार।

नाम फुकट चोखट। नाम घेता न ये वीट।।”

संत बनलेल्या जनाबाईची गावकर्‍यांनी त्यांच्या गावात त्यांची समाधी बांधली.

जनाबाईला जाते ओढू लागणार्‍या देवाची मूर्ती इथे दिसते

. तिच्या सर्व घरकामांत मदत करणारा विठूराया भिंतीवरच्या चित्रांमध्ये दिसतो.

दासी जनीचं संत कबीरांनी केलेल्या कौतुकाचा प्रसंगही इथं चितारण्यात आला आहे .

इथून दरवर्षी जनाबाईची दिंडी पंढरपूरला जाते.

संत जनाबाई आयुष्यभर राहिल्या त्या पंढरपुरात संत नामदेवांच्या घरी.

दासी म्हणून राहिलेल्या जनाबाईंच्या वाट्याला इथे जरी काबाडकष्ट आले.

पण तिला या कामांमध्ये मदत केली प्रत्यक्ष विठूरायानं !!!

जातं, मडकी, गोवर्‍या असा सगळा जनीचा संसारच पंढरपूरकरांनी इथं जपून ठेवलाय

तिचा हा संसार पाहिल्याशिवाय वारकरी पंढरपुरातून परतत नाहीत

इ. स. १३५० मध्ये आषाढ महिन्यात, कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवांनी देह ठेवला.

त्यानंतर पंढरपुर या तिर्थक्षेत्री विठ्ठलाच्या महाव्दारी
जनाबाई आषाढ कृष्ण त्रयोदशी ला समाधिस्थ झाल्या.
पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्या…..

अभंग, गवळणी, ओव्यांच्या रुपात अजूनही संत जनाबाई खेडोपाड्यांतील घराघरांत जागती आहे.
लाडक्या जनाईच्या आठवणी तिच्या भक्तांनी जीवापाड जपून ठेवल्या आहेत.

असा हा अत्यंत साध्या असलेल्या स्त्रीचा संतपदापर्यंत पोचलेला प्रवास !!

जो वाचून आपण थक्क होतो !!

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED