संतश्रेष्ठ महिला भाग ११ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संतश्रेष्ठ महिला भाग ११

संतश्रेष्ठ महिला भाग ११

यानंतर नाव या परंपरेत येते संत वेणाबाई यांचे ..

जवळपास श्रीकृष्णाला उद्देशुन लिहीलेल्या 1200 ते 1300 रचना
आजही त्यांच्या भगवद्भक्तिची साक्ष देतात.

संत वेणाबाई यांचा जन्म इ.स. १६२७ मध्ये झाला.
त्या मुळच्या मिरज येथील देशपांडे यांच्या कन्या.
विवाहानंतर कोल्हापूरला गेल्या व काही काळातच, वयाच्या दहाव्या वर्षी विधवा झाल्या.
कोल्हापूर हे त्यांचे माहेर तर मिरज हे सासर होते.
‘धन्य वेणाई वेणुमोहित !
वेणुविण गाय सप्रेमयुक्त !!
सतराव्या शतकाचा प्रारंभ (सन १६२७) म्हणजे सामाजिक परिस्थिती कशी असेल हे काही वेगळं सांगायला नको.
कोल्हापूरचे देशपांडे-साधेसुधे सश्रद्ध धर्मप्रवण पण सुशिक्षित कुटुंब.
प्रथेप्रमाणे लाडक्या लेकीचा विवाह बालपणीच करून दिला.
पण मुलीला समज येण्यापूर्वीच ती विधवा झाली.
आता या प्राक्तनाला कोण काय करणार?

वयाच्या दहाव्या वर्षी घरच्यांनी या बालविधवेच्या हाती एकनाथी भागवत सोपवले .
सुदैवाने देशपांडय़ांच्या घरात मुलीला अक्षर ओळख झाली होती.
त्यामुळे निदान या भक्तिमार्गावरची वाटचाल तरी सुरू झाली.
वयाच्या दहाव्या वर्षी.. असे ऐकले की लक्षात येते ती किती कठीण गोष्ट असेल .

एकदा मिरजेला, आपल्या सासरघरच्या अंगणात वेणाबाई एकनाथी भागवत वाचत बसलेली असता
दारात एक तेजपुंज व्यक्ती उभी राहिली.
त्यावेळी सासूबाईंनी त्यांना दुधाची भिक्षा वाढली नाही, म्हणून वेणाबाई नाराज झाली.

पुढे पुन्हा समर्थाची अशीच अंगणात हाक आल्यावर वेणाबाईंनी त्यांना अनेक प्रश्न विचारले.
समर्थानी प्रश्न आणि उत्तरं अभंगात गुंफून वेणाबाईंना दिले.
वेणाबाई समर्थाच्या व्यक्तिमत्त्वानं खूप भारावून गेल्या.
पुढे समर्थाकडून त्यांना राममंत्रोपदेश मिळाला होता .

कृष्णभक्तीनं मीरेच्या हाती विषाचा प्याला आला.

कान्होपात्रेनं विठ्ठलाच्या पायी प्राणत्याग केला.
पण ते तर देवच होते.
तरीही समाजाकडून दोघींना काय काय सहन करावे लागले.
इथे वेणाबाई रामनाम तर जपतच होत्या.
पण तरुण, तेजस्वी, विवाहवेदीवरून सावधान होऊन निघून गेलेल्या ब्रह्मचा-याचा आदर करत होत्या.
त्यांच्या प्रत्येक कीर्तनाला जात होत्या.
अनुग्रह मागत होत्या.
काय नसेल वाटयाला आले त्यांच्या?
एखाद्या बालविधवेने समर्थ दर्शनासाठी उत्सुक असणे, कीर्तन, प्रवचनाला जाणे,याने टवाळांचे चांगलेच फावले . आई-वडिलांना लोकनिंदेला तोंड द्यावे लागले .
ते पाहून वेणाबाईही आर्तपणे म्हणाल्या,

तुझी तुझी तुझी तुझी पावना रामा।।

भावे, अभावे, कुभावे, परि तुझी, पावना रामा।। १।।

सुष्ट हो, दुष्ट हो, नष्ट हो, परि तुझी, पावना रामा।। २।।

हीन दीन अपराधी, वेणी म्हणे, परि तुझी, पावना रामा।। ३।।

आर्तपणे श्रीरामरायाला विनवताना वेणाबाईंनी श्रीसमर्थानाही अनुग्रहासाठी साकडे घातले.
पण ‘अजून ती वेळ आली नाही’ असं म्हणत समर्थ देशाटनाला निघून गेले.

वेणाबाई विषयी जननिंदा असह्य होऊन घरच्यांनी तिला विष पाजायचा प्रयत्न केला असे म्हणतात.
त्यातून समर्थानीच वेणाबाईंना वाचवले अशीही आख्यायिका आहे.
नंतर मात्र समर्थानीही वेणाबाईंना वा-यावर सोडले नाही.
घरच्यांनीही वेणाबाईला मठात जाण्यास परवानगी दिली.
तेथेच त्यांनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारले.

नंतर त्या मिरज येथे परत आल्या.

समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची अनुमती दिली होती.

त्या मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही एक क्रांतीच होती.

मळलेली वाट सोडून समाजाच्या उद्धारासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या

सर्वच संतांना जननिंदेला सामोरे जावे लागले होते .

स्वामी समर्थ सुद्धा त्याला अपवाद नव्हते.

वेणाबाई, अक्काबाई,अंबिकाबाई या स्त्रियांना त्यांनी अभ्यासास प्रवृत्त केले.

वेणाबाईंना तर खूप त्रास सहन करावा लागला.

त्यांचे समर्पण म्हणजे एक कसोटीच होती.
मठात उपाहाराचे नित्यकर्म आटोपले की, वेणाबाई वाचन, मनन आणि आपली प्रगती साधत गेल्या.
श्री रामदास स्वामींच्या स्त्री-शिष्यांपैकी फक्त वेणाबाईंनाच उभे राहून कीर्तन करण्याचा अधिकार मिळाला होता. त्यांचा स्वत:चा शिष्य संप्रदाय निर्माण झाला होता, ही गोष्ट विशेष होती .

समर्थाच्या सहवासात वेणाबाईंचे लेखन-वाचन वाढले, फुलले.
एवढेच नव्हे तर समर्थाच्या शैलीतला जोरकसपणा, यमक अनुयायांचा प्रवाहीपणा,
थेट नेमका आशय मांडण्याचा धीटपणा, असे अनेक गुण उचलले वेणाबाईंच्या शैलीनं!
त्या गीतरचना, अभंग रचना करतच, पण गोड गळयाने गात सुद्धा.
वेणाबाईंचे त्या वेळचे वर्णन फार छान आहे .

‘धन्य वेणाई वेणुमोहित। वेणुविण गाय सप्रेमयुक्त।।

वेणुधर हरि होय तटस्थ वेणांकधरवाणी मोहळे।।’

समर्थ मिरजेला आणि कोल्हापूरला नेहमी जात.
तिथे नेहमी समर्थांची कीर्तने होत असत .
वेणाबाई त्यांच्या कीर्तनांना आवर्जून जात.
सासू-सासरे एकनाथ महाराजांचे अनुगृहीत होते.
त्यामुळे घरातून कोणताच विरोध नव्हता

समर्थ प्रत्येक रामनवमी उत्सवाच्या आधी निवडक शिष्य घेऊन भिक्षेसाठी जात असत.
त्या काळात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला चाफळमध्ये ठेऊन
उत्सवाची सर्व जबाबदारी त्याच्यावर सोपविली जात असे.
एक वर्ष ही जबाबदारी वेणाबाईंच्यावर सोपविण्यात आली.
नेतृत्वाचे गुण प्रत्येक माणसामध्ये असतात.
विशिष्ट पद्धतीने त्याचा विकास घडवून आणावा लागतो.
वेणाबाईंनी मठाची जबाबदारी स्वीकारली.
समर्थांनी पाठवलेली भिक्षा कोठीघरात व्यवस्थित लावून ठेवणे .
इतर सर्व प्रकारची कामे तेथे करावी लागत.
रामरायाची ही सेवा वेणाबाई मनापासून करीत असत.
त्यांना त्यांच्या सेवेची पावती द्यावी, असे रामचंद्रांच्या मनात येऊन गेले असावे .
पण ऐन उत्सवाच्या १५ दिवस आधी वेणाबाई आजारी पडल्या.
त्या तापाने एवढ्या फणफणल्या की, त्यांना चालताही येईना.
ज्याप्रमाणे नाना रूपे धारण करून संत जनाबाई, संत एकनाथ या संतांची देवाने सेवा केली
त्याप्रमाणे रामचंद्रांनी रामाबाईंच्या रूपात येऊन उत्सवाची सर्व तयारी केली.
रामाबाई नावाची एक स्त्री मठात दाखल झाली .
मी बत्तीस शिराळ्याची असून रामदास स्वामींनी मला तुमच्या मदतीसाठी पाठविले आहे, असे रामाबाईंनी वेणाबाईंना खोटेच सांगितले.
मठात सर्व प्रकारची तयारी त्यांनी केली .
समर्थ भिक्षेहून परतल्यावर सर्व गोष्टींचा उलगडा झाला पण तोवर रामाबाई ही गुप्त झाल्या होत्या .

वेणाबाईंचा मुळात वाचन-व्यासंग अभ्यास झालेला होता.
रामायण, महाभारत, भागवत संत चरित्रे वाचली होती.
समर्थाच्या मठात त्याचं लेखनही बहरले .
कित्येक अभंग, पदे, आरत्या याबरोबरच कौल (२६ श्लोकांचे) आणि ४४ श्लोकांचा श्री रामगृह संवाद ही दोन प्रकरणे त्यांनी लिहिली आहेत.
कौल म्हणजे राम वनवासातून परत आल्यावर, प्रजा त्याच्याकडे एक एक मागणे मागते
आणि राम ते लक्ष्मणास लिहून ठेवायला सांगतो,
असा हृद्य प्रसंग मोठया विस्तारानं रंगवला आहे वेणाबाईंनी .

बहू कष्टलो पातलो जी स्वदेशा। प्रजा बोलती कौल दे राघवेशा।।

भुमीने कदा पीक सांडू नये रे। वदे राम लक्ष्मुणा हे लिही रे।।

वेणाबाईच्या काव्यप्रतिभेचे , रसाळपणाचे , साधेपणाचे आणि बारकावे टिपण्याचे सामर्थ्य,
‘सीता स्वयंवर या त्यांच्या लिखणात प्रत्ययाला येते .
त्या काळात रुक्मिणी स्वयंवर, सीता स्वयंवरावर अनेकांनी लिहिले होते .
पण बहुतांश रचना या श्लोकबद्ध आहेत.
पण वेणाबाईंनी मात्र एवढी मोठी रचना ओवीबद्ध केलेली आहे.
फार प्रतिभासंपन्न-ज्ञानसंपन्न असे हे काव्य नसेल,
पण वाचकांना खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य त्यांच्या शैलीत आहे.

विश्वामित्रांबरोबर श्रीराम यागरक्षणासाठी निघाले.
कौसल्येचा निरोप घ्यायला गेले. वेणाबाई लिहितात,

नमस्कारिली निजजननी।
उभा राहिला चापपाणी।
वदे माते ये क्षणी।
आज्ञा दिली पाहिजे।।

मुख न्याहाळी सुंदरा।
पंकजनयना मनोहरा |
प्राणाच्या प्राणा रघुवीरा।
माझ्या, कोठे जातोस।।

..आणि कौसल्येची अवस्था बघा..

पाहता रूपाचे बरवेपण।
कोटी मदनाचे निंबलोण
मी वोवाळीन आपुले प्राण।
दृष्टी घाली सुंदरा।।

स्वत: प्रापंचिक आयुष्य न अनुभवलेल्या वेणाबाईंनी आईच्या भावना उत्कटपणे टिपल्या आहेत.

.

शके १५४९चा जन्म आणि शके १६०० मध्ये निर्वाण,
थोडया काळात एक स्त्री मठाधिपती झाली.
संस्कृती-विचारधारेचा प्रसार करत राहिली.
विपुल लेखन केले आणि आध्यात्मिक अधिकारानं आपले जीवन उजळून टाकले!
श्रीराम आणि श्रीस्वामी समर्थमय जीवन जगणा-या वेणाबाईंची ही चटका लावणारी कहाणी!
वेणाबाईंनी आपल्या एका कीर्तनानंतर समर्थाच्या पायाशीच देह ठेवला असे म्हणतात .
वेणाबाईंची समाधी सज्जनगड येथे आहे.
रामदासस्वामींनी इ.स.१६५६ मध्ये बांधलेला वेणाबाईंचा मठ मिरज येथे आहे.

क्रमशः