Santashrestha Mahila Part 5 books and stories free download online pdf in Marathi

संतश्रेष्ठ महिला भाग ५

संतश्रेष्ठ महिला भाग ५

या परंपरेतील दुसरे नाव आहे संत जनाबाई यांचे

जनाबाईंचा जन्माचा ठोस काळ जरी माहित नसला तरी देखील अंदाज त्यांचा जन्म हा 1258 काळातील असल्याचे काही पुरावे आढळुन येतात

जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला.

जनाबाईंच्या एका अभंगातील
"माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||"
या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील विठ्ठल भक्त होते हे समजते .
त्यांच्या आईचे नाव करुंड.
त्याही भगवद्भक्त होत्या.
ते उभयता दरवर्षी पंढरीची वारी करत होते.
आपल्या मुलीचे पालन पोषण करण्यास आर्थिक दृष्ट्या अक्षम असल्याचे समजल्यामुळे,
पिता दामा यांनीत्यांना संत नामदेव यांचे वडील दमाशेती यांच्याकडे सोपविले.

यानंतर जनाबाई संत नामदेवाच्या घरात दासी म्हणून राहायला लागल्या.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांचा वाडा असल्यामुळे जनाबाईला विठूरायाचं दर्शन रोज घडायचे .

त्यातच नामदेवांच्या घरी विठूभक्तीचा सातत्याने गजर होत असल्याने

त्यांच्या जीवनात पंढरपूर, पंढरीनाथ आणि नामदेव यांना विशेष स्थान होतं.

नामदेवांच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला.

ते जनाबाईचे पारमार्थिक गुरु बनले होते .
त्यामुळेच जनाबाईना “नामयाची दासी” म्हणूनही ओळखलं जातं.

जनाबाई नामदेवाबाबत इतकी कृतज्ञता बाळगत की त्यांनी शेवटपर्यंत स्वत:ला त्यांची दासी म्हणवून घेण्यात धन्यता मानली .

संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत.
त्यांच्या ओव्या सहज साध्या असल्याने
महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना
आजही त्यांच्या ओव्या गायल्या जातात .

संत नामदेव हे विठ्ठल भक्त असल्यामुळे जनाबाईंनाही विठ्ठलाच्या भक्तिविषयी गोडी निर्माण झाली.
कोणतेही काम करत असतांना त्या सतत परमेश्वराच्या नावात तल्लीन राहात असत.
‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’
असे जनाबाई अभंगात म्हणत असत .
काम करतांना त्या नामात एवढया तल्लीन होउन जात असत
की ते कार्य त्यांच्याकरता देवाचे कार्य होऊन जात असे.

संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता.

‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत.

संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते.

श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी ही गुरुपरंपरा आहे.

संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता.

‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’

असे त्यांनी ज्ञानदेवांविषयी म्हटले आहे.

गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.

संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे.

पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत.

आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत.

संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत.

संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो.

त्यांच्या अभंगातून वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत.

‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, या स्त्रीपाशी असणाऱ्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात.

तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत.

त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते.
संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत.

संत परंपरा असणाऱ्या समृद्ध पार्श्वभूमीवर जनाबाईंचे नाव दुर्लक्षित
पण बहुपक्षीय संत कवयित्री म्हणून घ्यावे लागेल.

मनाची अभिव्यक्ती व्यक्त केलेली महाराष्ट्राची एकमेव संत कवी असलेल्या जनाबाई आहेत.

आत्मबुद्धीची शुद्ध भावना म्हणजे जनाबाईंच्या कवितेचे वैशिष्ट्य.
त्याऐवजी ज्या वेळी पुरुष संतांचे वर्चस्व होते, त्या वेळी जनाबाईंना त्यांच्या स्त्रीत्वाचा अभिमान वाटतो

या स्त्रीत्वातूनच तिने वात्सल्यासारख्या अनेक संवेदनांना जीवदान दिले.

'न्यामाची जणी' अर्थात 'नामदेवची दासी जनाबाई' म्हणून संबोधले.

त्यांच्या आत्मचरित्रातही त्यांनी नामदेवबद्दलचा आदर व्यक्त केला आहे

आणि आजन्म नामदेवची दासी राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

त्या एक स्त्री, दासी, अनाथ आणि जातीने शुद्र होत्या.

या पार्श्वभूमीवर समाजाने त्यांच्याकडे किती दुर्लक्ष केले असेल याचा अंदाज येतो.

खरेतर संत नामदेवांच्या घरात वावरतांना जनाबाईंचे विश्व तरी केवढे असणार?

अंगण, तुळशीवृंदावन ,शेण ,गोवर्या वेचायाची जागा, कोठार, माजघर इतकेच .

या शब्दांचा उल्लेख जनाबाईंच्या ओव्यांमधुन आपल्याला होतांना दिसतो.

या रोजच्याच गोष्टींमधे त्यांना परमेश्वर दिसतो, भेटतो यातच त्या भगवंताला शोधतात .

प्रत्येक गोष्टीत भगवंत दिसावा एवढे त्यांच्या मनाचे “चःक्षु” विशाल झालेले दिसतात .

हा निर्विकार भाव जनाबाईंचे व्यक्तिमत्व कितीतरी उंचीवर नेऊन ठेवतो.

विठ्ठल भक्तीत त्या ईतक्या तल्लीन होउन जात असत
की प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना कामात सहाय्य करत असे अशी त्यांची धारणा होती .

“झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी।।

पाटी घेऊनियां शिरी। नेऊनियां टाकी दुरी।।

ऐसा भक्तिसी भुलला। नीच कामें करूं लागला।।

जनी म्हणे विठोबाला। काय उतराई होंऊ तुला।।”

जनाबाई म्हणतात मी झाडलोट केली तर माझा श्रीहरी केर ऊचलतो.
दुरू जाऊन फेकुन देतो.
माझ्या भक्तिला माझा विठ्ठल असा भुलला की माझी सगळी कार्ये तो करू लागला.

याची परतफेड मी कशी आणि कोणत्या प्रकारे करणार आहे?

विठ्ठला मी तुला कशी उतराई होऊ?
नामदेवांच्या घरच्या कामाचा पसारा खुप मोठा होता .
दिवसभर काम करून जनाबाई शिणून जात असत .
एकदा घरच्या मालकिणीने त्यांना दळण दळायला सांगितले होते .
पण कामाच्या व्यापात दमल्यामुळे त्या तशाच झोपून गेल्या.
तेव्हा विठ्ठलाने येऊन त्यांना उठवले आणि आठवण केली की दळण दळायचे राहिले आहे .
मग विठ्ठल स्वतः त्यांना जात्याच्या दांडीला धरून मदत करू लागला .
आणि हे दळणाचे काम पूर्ण झाले .
असा विठ्ठल कायम त्यांच्या मदतीला येत असे.

एकदा जनाबाईचे आणि तिच्या शेजारच्या बाईचे शेणाच्या गोवर्‍यांवरून कडाक्याचे भांडण झाले.

कारण दोघींनी जवळजवळच गोवर्‍या उन्हात सुकण्यासाठी घातल्या होत्या

त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी त्याच गावातील पंच तेथे आले.

त्यांनी ‘तुमच्या गोवर्‍या कशा ओळखायच्या ?’,

असे त्या दोघींना विचारले. तेव्हा जनाबाईने सांगितले,

‘‘ज्या गोवरीतून ‘विठ्ठल’ नामध्वनी ऐकू येईल, ती माझी !’’

त्याप्रमाणे पंचांनी कानाला गोवर्‍या लावल्या
तेव्हा खरच संत जनाबाईंच्या गोवर्‍यांतून ‘विठ्ठल’ नामध्वनी ऐकू आला.

त्यांचा नामजप कुठच्या प्रतीचा असला पाहिजे, याची कल्पना या उदाहरणावरून लक्षात येईल.

‘पूर्वकर्मे भोगूनच संपवावी लागतात’, यासंदर्भात संत जनाबाईंच्या जीवनातील प्रसंग !

‘संत जनाबाई एकदा आपल्या पतीस जेवण वाढत होत्या.

पहिला घास घेताच पतीने तावातावाने जनीला मारावयास आरंभ केला.

भाजीत मीठ का नाही ?

तिला हुंदका फुटला, ती विठ्ठलासमोर उभी राहिली

आणि म्हणाली, ‘‘विठ्ठला, तू येथे असतांनाही तुझ्या भक्ताला अशा परिस्थितीतून जावं लागतंय. का ?’’

विठ्ठलाने जनीच्या डोक्यावर हात ठेवला.
जनीला तिच्या पूर्वजन्माचे स्मरण झाले आणि तो क्षण तिच्या डोळ्यांसमोर आला. तो असा –

‘पूर्वजन्मातील जनी एक राजकन्या होती.

गायीसमोर तिने घास ठेवला होता. गाय ते खाण्यास नकार देत होती.

जनीने छडी उचलली.
तिने गायीवर वळ उठवले; परंतु गायीने ते खाण्यास नकारच दिला…’

विठ्ठलाने जनीच्या डोक्यावरून हात उचलला.

जनी भानावर आली.भगवंत म्हणाले,

‘‘जनी, पूर्वसंचित आणि कर्म फळ कोणाला चुकलेले नाही.

हे सर्व भोगूनच या भवसागरातून तरून जावे लागते.

तुझी भक्ती या जन्मातील आहे.

तेव्हा तुझे सर्व पूर्वसंचित या जन्मी फेडून माझ्या चरणी चिरंतन समाधीत विलीन होशील !’

तात्पर्य : चांगले कर्म करूनही फळ मिळत नसले,
तर जनीच्या या कथेने समर्पक उत्तर आपणास मिळेल;
पण चांगले कर्म करणे सोडू नका, हेच तुमच्या जीवनाचे ध्येय असावे… !

क्रमशः

इतर रसदार पर्याय