संतश्रेष्ठ महिला भाग १० Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संतश्रेष्ठ महिला भाग १०

संतश्रेष्ठ महिला भाग १०

यावेळी बहिणाबाईंचे वय १८ वर्षांचे होते.
तुकोबाराय स्वप्नात आलेला अनुभव त्या अनेकदा सांगत.

प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांनी बहिणाबाईंच्या अभंगांचे सखोल अध्ययन करून त्यांना उपनिषदांचे सार उत्कटपणे मांडणारे अभंग म्हटले आहे.

शांकरभाष्याप्रमाणे शास्त्रीय आणि वामन पंडिताइतकी त्यांची भाषा शुद्ध आहे, असेही गुलाबराव महाराज म्हणतात.

काव्यदृष्ट्यादेखील बहिणाबाईंचे अभंग सरस आहेत. अनुप्रास, यमक, उपमा, रूपक, दृष्टांत, अनन्वय, विरोधाभास अशा अनेक अलंकारांनी ते नटले आहेत.

करूणरस, वत्सलरस, हास्यरस, भयानकरस, अद्भुतरस, वीररस, भक्तीरसाने ओतप्रेत भरले आहेत.
शांतरसाचा आविष्कार काव्यात सर्वत्र दिसतो

तुकाराम महाराजांनी स्वप्नात बहिणाबाईंना “अनुग्रह” देऊन कवित्वाची आज्ञा दिली होती .

योगायोग म्हणजे तुकाराम महाराज यांनाही नामदेव महाराजांनी स्वप्नामध्येच जाऊन कवित्वाची स्फूर्ती दिली होती.

हे तुकारामांनीच एका ठिकाणी नमूद केलेले आहे. ते म्हणतात-

नामदेवे केले स्वप्ना माजी जागे।सवे पांडुरंग येऊ निया॥

सांगितले काम करावे कवित्व।वावूगे उत्तर बोलो नये।।

हीच परंपरा पुढे चालवत तुकाराम महाराजांनी बहिणाबाईंना “कवित्व” करण्याची आज्ञा केली होती.
स्फूर्ती दिली होती .
या अनुग्रहामुळेच त्यांना जणु एका तेजाची अनुभूती झाली होती .

आणि त्या घटनेनंतर बहिणाबाईंचे आयुष्य पुरते बदलुन गेले.

प्राप्त झालेल्या गुरूबोधामुळे त्यांची जीवनाकडे पहायची दृष्टी बदलली .

आपल्या अभंगांमधुन बहिणाबाईंनी स्वतःच्या गुरूपरंपरेबद्दल व संत तुकाराम महाराजांबद्दल वर्णन केलं आहे.

तुकोबारायांची प्रत्यक्ष माहिती असलेल्या बहिणाबाईंनी हे अभंग रचलेले असल्यामुळे या अभंगांना फार आगळंवेगळं महत्व आहे.

गजानन विजय ग्रंथांची निर्मीती करणारे गेल्या शतकातील संत कवी दासगणु महाराज बहिणाबाईंबद्दल लिहीतांना म्हणतात…

पहा केवढा अधिकार…ऋणी तिचा परमेश्वर…!!

अर्थात ब्राह्मण कुळात जन्मलेल्या पतीला त्यांची कुणबी तुकारामांवर असणारी

निष्ठा सहज पचनी पडण्यासारखी नव्हती.

तेव्हा तू तुकोबांच्या भेटीचा नाद सोड, नाही तर मी तुला सोडतो, अशी धमकी दिली होती .

बहिणाबाईंनी पतीचीही आज्ञा मोडली नाही आणि तुकारामांवरील श्रद्धाही कमी होऊ दिली नाही.

मात्र पतीला झुगारून न देता, त्याचे कौशल्याने मन वळवण्याचे काम मात्र बहिणाबाईंनी केले.

पतीलाच परमेश्वराचा दर्जा देऊन त्यांनी त्याच्यावर असणारी आपली निष्ठा प्रकट केली होती .
त्या म्हणतात-

भ्रताराची सेवा तोचि आम्हा देव।भ्रतार स्वयमेव परब्रह्म॥

त्या काळी एका ब्राह्मण स्त्रीने कुणब्याचा अनुग्रह घ्यावा, हे खचितच समाजमनाला मानवणारे नव्हते.

तुकाराम महाराजांच्या विचारांचा आणि शब्दकळेचा प्रभाव बहिणाबाईंच्याही अभंगांत दिसून येतो.

त्यांनी एकाच अभंगातून वारकरी संप्रदायाचा इतिहास मांडला आहे.

ज्ञानदेवे रचिला पाया।उभारीले देवालया।। १॥

नामा तयाचा किंकर।तेणे केला हा विस्तार॥ २॥

जनार्दन एकनाथ।खांब दिला भागवत॥ ३॥

तुका झालेसे कळस।भजन करा सावकास॥ ४॥

बहिणी म्हणे फडकती ध्वजा।निरुपण केले ओजा॥ ५॥

आपल्या भक्तीच्या वाटेवर चालण्यास भाग पाडणारी त्यांची “परिपक्वता” ख-या अर्थाने अधिक ठळकपणे प्रतिबिंबित होते.

असे सांगतात की बहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या बारा जन्मांचे स्मरण होते.
तेरावा जन्म स्त्रीचा म्हणजे बहिणाबाईंचा होय.
संत बहिणाबाईनी आपल्या बारा जन्माचे पस्तीस अभंग आपल्या मुलाला सांगितले होते .

बहिणाबाई कायम विठुरायाच्या भेटीकरता वारीत जात असत.

एकदा वारीतुन पंढरीला जात असतांना त्यांना थंडी वाजुन ताप भरला.

वारकरी म्हणू लागले तुम्हाला पुढचा प्रवास झेपणार नाही

तुम्ही येथेच विश्रांती घ्यावी .

बहिणाबाईंना मात्र पांडुरंग भेटीची तळमळ लागली होती .

आता मध्यात थांबणे त्यांच्यासाठी अशक्य होते .

पंढरीला जायची ओढ आणि तळमळ इतकी होती की

अंगावर घेतलेल्या फाटक्या घोंगडीला त्यांनी विनंती केली

’’बाई ग मी वारीत जाऊन येईपर्यंत माझी ही हुडहुडी तु तुझ्याजवळ ठेव,

माझ्यावर एवढे उपकार कर .

वारीतुन परत आल्यानंतर मी माझ्या नशीबाचा “भोग” भोगेन

अंगावरची ती घोंगडी काढुन त्यांनी जवळच्या एका झाडावर टांगून ठेवली

आणि त्या तशाच वारीला वारीला गेल्या.

असे म्हणतात की त्यांची विठ्ठल दर्शनाची ओढ इतकी तीव्र होती की खरेच

त्यांची हुडहुडी झाडाने आपल्याकडे घेतली ..

आणि त्या वारी करून सुखरूप परत येईपर्यंत ते झाड थंडी ने कुडकुडत थरथर हलत होते

…. केवढी ती श्रध्दा आणि केवढा तो बहिणाबाईंचा भक्तिभाव….!!!

अपार भक्ती हाच खरा वारकरी विचारांचा “गाभा” आहे.

समाजातल्या अनेक भक्कम व्यवस्थेला मोडून काढत असताना त्यांनी कुठेही विद्रोहाची भाषा न करता समन्वयाचा मार्ग स्वीकारल्याचे दिसते.

समतेचा जागर मांडत असताना कुठे तरी आम्ही फार मोठे परिवर्तन घडवायला निघालो आहोत

आणि अगोदरचे सर्वच उलथवून टाकणार आहोत

अशी आक्रस्ताळी भूमिका न घेता त्यांनी थेट कृतीतून आपला विचार पुढे नेला.

नामदेव महाराजांनी चोखोबांना पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलने केली नाहीत.

की मोर्चे काढले नाहीत.

जर मला भक्ताला देवाकडे नेता येत नसेल तर मग देवालाच भक्ताकडे घेऊन जाईन, अशी भूमिका घेतली. म्हणून नामदेवाने आपले पहिले कीर्तन पांडुरंगाच्या मंदिरात केले नाही, तर ते पंढरपूरच्या वाळवंटात केले.

कारण त्या काळी समाजातल्या सर्वानाच मंदिरामध्ये प्रवेश नव्हता.

वाळवंटातील कीर्तनात मात्र सर्व जण सहभागी होऊ शकले.

ज्यात दलित समाजातील चोखोबांपासून ते उच्च समजल्या जाणा-या ब्राह्मण कुळातील परिसा भागवत यांचा समावेश होता.

त्या बदलाचीच प्रक्रिया पुढे संक्रमित होऊन वर्णव्यवस्थेच्या गाठी काही प्रमाणात सैल झाल्याचे दिसते. बहिणाबाईंनीही त्यांच्या तुकारामभक्तीला विरोध होत असताना कुठेही विद्रोहाची भाषा केली नाही.

मात्र आपल्या पतीसह सर्व नातेवाइकांचे मन वळवून त्यांनाही तुकारामभक्तीत सामील करून घेतले.

भारतीय समाजमनावर वर्णव्यवस्थेची आणि स्त्री-पुरुष भेदभावाची मगरमिठी घट्ट होती, अशा कालखंडात संत बहिणाबाई पाठक यांनी केलेले धाडस ख-या अर्थाने क्रांतिकारी म्हणायला पाहिजे.

खरे तर तमाम स्त्रियांच्या मनात खदखदणा-या आक्रंदनाला त्यांनी आपल्या कृतीतून वाट करून दिली.

ब्राह्मण कुळात जन्मलेल्या बहिणाबाईंनी त्या काळी क्षुद्र समजल्या जाणा-या कुणबी तुकारामांचा अनुग्रह स्वीकारावा हे केवढे धाडस!!

वर्णव्यवस्थेच्या घट्ट मगरमिठीत अडकलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी संत नामदेव आणि ज्ञानदेवांच्या पुढाकाराने वारकरी संप्रदायाची वाट अधिक विस्तीर्ण झाली.

स्त्री-क्षुद्रांना वेदाने नाकारलेला अधिकार मिळवून देण्याचे धाडसी पाऊल वारकरी संप्रदायाने उचलले.

अर्थात, ही वाटचाल करणा-यांमध्ये वर्णव्यवस्थेचे चटके बसलेल्यांचा अधिक भरणा असला

तरी समाजाच्या सर्व घटकांचा त्यात समावेश होता.

म्हणजे चोखोबांसारखा गावकुसाबाहेर वाढलेला संतकवी जितक्या अधिकाराने वारकरी संप्रदायात वावरत होता, तितक्याच अधिकाराने देवळाच्या गाभा-यात पूजापाठ करणारे ब्राह्मण कुळातील परिसा भागवत वारकरी संप्रदायाशी एकरूप झाले होते.

कदाचित हाच भेदाभेद भ्रम गाढून टाकणारा विचार संत बहिणाबाईंना भावला असावा म्हणूनच
त्यांनी त्या काळाची समाज व्यवस्थेची कुंपणं तोडून समतेचा जागर घालणा-या वारकरी संप्रदायात सहभागी होण्याचा निर्धार केला असावा.

वेदांनी स्त्री-क्षुद्रादिकांना वेद अध्ययनाचा अधिकार नाकारला होता.

मात्र क्षुद्र म्हणून गणल्या गेलेल्या तुकारामांना बोचणारी ही जाणीव त्यांनी आपल्या अनेक अभंगांतून मांडली. इतकेच नव्हे तर जे वेद अध्ययनाचा अधिकार सांगतात त्यांना खडसावताना सांगितले, तुम्ही वेदांचे पूजन केले असेल, पाठांतर केले असेल, मात्र त्याचा खरा अर्थ जर कुणाला कळला असेल तर तो फक्त आम्हीच जाणलेला आहे-

वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा।येरानी वाहवा भार माथा॥

कदाचित ही सल बहिणाबाईंच्याही मनात असावी.

इतरांना जर वेदाचा अधिकार आहे, तर आपल्याला का नसावा.

क्षुद्र असलेल्या तुकोबांनी तो अधिकार मिळवला असेल तर तेच स्त्रियांनाही तो अधिकार मिळवून देतील

या भावनेतून बहिणाबाई तुकाराम महाराजांच्या विचाराकडे आकर्षित झाल्या असाव्यात

त्यांचा मृत्यु १७०० साली झाला

तुकाराम महाराजांच्या विचारांशी असणारा एकनिष्ठ भाव लक्षात घेऊनच देहू गावात बहिणाबाईंच्याही मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

शिऊर गावातही त्यांचे भव्य मंदिर आहे.

हे मंदिरच स्त्रियांना ख-या भक्तीची वाट दाखवत राहील.

क्रमशः

.