संतश्रेष्ठ महिला भाग ८ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संतश्रेष्ठ महिला भाग ८

संतश्रेष्ठ महिला भाग ८

चंद्रभागा नदी पाहिल्यावर वारकरी म्हणाले किती जन्माचे पुण्य म्हणून तुझे पंढरपुरास पाय लागले आहेत .

ही समोर दिसते ती “पापनाशक” चंद्रभागा नदी आणि हे समोरचे मंदिर विठ्ठलाचे आहे .

असे म्हणताच तिने त्यांना साष्टांग नमस्कार केला

आणि चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेतले ,

नामदेव पायरीचे दर्शन घेऊन धावतच विठ्ठ्ल मंदिरात शिरली.

मंदिरातील सोळा खांबाजवळ उभे राहून तिने देवाचे डोळे भरून रूप पाहिले .

आणि त्याला लोटांगण घातले .

आपल्या जीवनाचे सार्थक झाले म्हणून भजन गाऊन नाचू लागली .

यानंतर ती पंढरपुरात राहिली आणि विठ्ठल भक्तीमध्ये रमून गेली .

इकडे काही दिवसांनी ठाणेदाराचे पत्र बादशाहाला मिळाले .

पत्रात केलेले कान्होपात्रेच्या सौंदर्याचे वर्णन वाचून बादशहा पागल झाला .

ताबडतोब तो पंढरपूरला जाण्यासाठी निघाला कारण पत्रात उल्लेख होता की कान्होपात्रा

सध्या पंढरपुरात आहे ...असा .

रात्रीच तो सैनिक घेऊन बिदरहुन प्रवासास निघाला .

त्याला कान्होपात्रेस पाहण्याची एवढी उत्सुकता होती की तो रस्त्यात कोठेही थांबला नाही .

पाच दिवस सततचा प्रवास करून तो सकाळी सकाळी पंढरपुरात दाखल झाला .

त्याची पालखी नदी पासून निघाली असताना कान्होपात्रा चंद्रभागेत स्नान करून बाहेर पडत होती .

तिला पाहताच बादशाहने ओळखले की हीच ती सौंदर्यवती .!!!.

तिला पाहताच तो हर्षाने ओरडू लागला, “मेरी कान्हो मुझे मिल गयी.”.

सैनिकांनी तत्काळ तिला पकडून राजा समोर आणली ..

कान्होपात्रा राजाची करुणा भाकू लागली .

हे राजा मला सोड ..मी तुझीच प्रजा आहे .

राजाने प्रजेचे रक्षण करायला हवे ...

अन्यायाची दाद प्रजेने कोणाकडे मागायची ..

या पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी तु अशी “विषयवासना” ठेवू नकोस ..

राजा म्हणाला मला ते काही माहित नाही .

मला तु आवडली आहेस व मी तुला सोबत नेणारच

कान्होपात्रेला समजून चुकले की बादशहा आपल्याला घेऊन जाणारच ..

देवाची इच्छा काय आहे कोण जाणे ..

मग ती राजाला म्हणाली ठीक आहे पण माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा .

मला एकवार फक्त माझ्या पांडुरंगाचे दर्शन घेऊ दे

नंतर तुम्ही मला न्यायचे तिथे घेऊन जा .

बादशहा म्हणाला,बस इतनी सी बात ..
ठीक है ,जाकर आओ लेकीन जल्दी आना

कान्होपात्रा विठ्ठल मंदिराकडे पळत सुटली

देवळात जाऊन तिने विठ्ठलाचे पाय पकडले

आणि रडत रडत म्हणाली ,हे देवा तु माझी किती परीक्षा पाहणार आहेस ?

हीन कुळात जन्म झाला ही माझी चुक आहे का ?

माझे मन पवित्र आहे व मी तुझी निस्सीम भक्त आहे .

कितीही पापी व्यक्तीला तो जर तुझ्याकडे भक्तीभावाने आला तर तु आपल्या जवळ करतोस .

चोखोबांना पण तु आपले दर्शन दिले आहेस .

मला दुसरे तिसरे काही नको फक्त मला तुझ्या सगुण रूपाचे “विराट” दर्शन दे

नाहीतर मी इथेच तुझ्या पायावर माझे डोके आपटून जीव देईन .

असे म्हणून तिने देवाच्या पायावर डोके आपटायला सुरवात केली .

बाहेर बादशहाचे सैनिक घिरट्या घालत होते .

त्यांनी मंदिर पुजार्यांना कान्होपात्रेला त्यांच्या हवाली करायला सांगितले .

आणि बजावले की असे केले नाही ते मंदिर उध्वस्त करतील .

कान्होपात्रेला अशी मंदिराची “विटंबना” नको होती शिवाय

तिला माहित होते की इथुन बाहेर पडले की बिदरचा बादशहा आपल्याला सोडणार नाही .

त्यापेक्षा इथेच आपला जीव गेला तरी चालेल .

डोके आपटून आपटून रक्त बंबाळ झाले

अखेर तिचे प्राण जायची वेळ आली ...

रडत रडत ती म्हणू लागली ..नको देवराया अंत आता पाहु प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ..

तेव्हा पांडुरंगाला तिची दया आली .

तिचे “करुणामय” बोल ऐकुन भगवंताला राहवले नाही .

त्यांनी सगुण रुपात प्रकट होऊन कान्होपात्रेला दर्शन दिले .

कान्होपात्रा धन्य झाली म्हणाली ,”देवा खरेच मला दर्शन दिलेस .

आता फक्त मला तुझ्यात सामावून घे मी कृतार्थ होईन ..”

पांडुरंगाने तिला उचलुन घेतले व आपल्या हृदयाशी धरले .

कान्होपात्रा पांडुरंग रुपात विलीन होऊन गेली आणि अदृश्य झाली ..!

जिथे ती अदृश्य झाली तिथे एक झाड आहे .

असे म्हणतात की तेथे अबीर बुक्का गुलाल आणि तुळशी मंजिरीचा हार एकादशी दिवशी आपोआप येतो ...

मंदिराच्या दक्षिण दरवाज्याजवळ जिथून ती अदृश्य झाली त्या ठिकाणी एक तरटी वृक्ष उगवला.

तो वृक्ष आजही “अक्षय” हिरवा असुन संत कान्होपात्रेच्या भक्तिची ग्वाही देत उभा आहे…

रूपसुंदर कान्होपात्रा तिला विठ्ठलाची ओढ लागेपर्यंत अगदी सर्वसामान्य मुलीसारखीच होती .

तिला गणिकेचा धर्म पाळायचा नव्हता .

. अत्यंत देखणी अशी कान्होपात्रा...

स्वत:विषयी, आईविषयी, समाजाविषयी अनेक प्रश्न मनात घेऊन लहानाची मोठी झाली.

संवेदनशील कान्होपात्रेने जेव्हा ऐन तारुण्यात भक्तिरसात बुडून पांडुरंगचरणी सर्वस्व अर्पण केले व आईच्या पारंपरिक देहविक्रयाच्या व्यवसायाला नकार दिला, तेव्हा जणू एक प्रकारे तिची लालसा धरून असलेल्या अनेक लब्धप्रतिष्ठित म्हणवल्या जाणा-या च्या विरोधात तीने “विद्रोह” मांडला .

हीन कुळात जन्माला आल्यामुळे व शिवाय सुंदर असल्यामुळे
पवित्र राहण्याचा कितीही प्रामाणिक प्रयत्न केला तरी समाजाने तिचे सन्मानाचे जिणे नाकारल्याची सुईबोचरी वेदना तिला नेहमीच व्याकूळ करत राहिली.
या दु:खार्त भावनेचा उत्कट आविष्कार तिच्या अभंगरचनेतून पदोपदी जाणवत राहतो.
कवितेला अनुभवाचाच शब्द लागतो आणि तो तिच्याकडे होता.
नामदेवाची उत्कट अभंगवाणी आपल्या गोड गळ्यातून गाताना ती “देहभान” हरपून जात असे.

त्यामुळे कारुण्याने ओतप्रोत भरलेल्या तिच्या अभंगांतून अस्वस्थ आणि उद्विग्न मनाचे दर्शन घडते.

हळव्या वयाच्या तारुण्यसुलभ भावनेतून

पांडुरंगाबद्दल वाटणा-या प्रेम, जिव्हाळा आणि असीम भक्ती यातून तोच तिचा सखा सर्वेश्वर होऊन बसतो.

दीन-दलितांचा कैवारी, अनाथांचा नाथ अशी त्याची ख्याती असल्यामुळे या हीनत्वाच्या दलदलीतून तोच आपली सुटका करील, असा तिचा विश्वास वाटू लागतो.

‘आधी भक्त मग देव’ या तत्त्वप्रणालीप्रमाणे भक्ती ही कान्होपात्राची जीवननिष्ठा बनली होती.

कान्होपात्रेच्या अभंगातून तिच्या दु:खभोगाचे प्रतिबिंब उमटताना दिसते.

कान्होपात्रेच्या अभंगाचा उगमच मुळात

द्विविध स्वरूपाचा असून जितका उत्कट तितकाच सहजभाव दाखवणारा आहे.

नको देवराया अंत आता पाहूं, प्राण हा सर्वथा फुटो पाहे।।

हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेलें, मजलागी जाहले तैसे देवा।।

या अभंगात कान्होपात्रेची “अगतिकता” शब्द-शब्दातून पाझरते व तिची करुण मूर्ती डोळ्यापुढे उभी राहते.

एखाद्या सामर्थ्यशाली शक्तीने दुबळ्या जीवावर प्राणघातक हल्ला करावा.

‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ या जाणिवेतून होणारी प्राणांतिक तडफड कासावीस करणारी असते.

अगदी त्याचप्रमाणे ‘प्राण हा सर्वथा फुटो पाहे’ ही तडफड, ही हतबलता इथे व्यक्त होते.

काही केल्या पांडुरंग आपल्या मदतीला धावून येत नाही हे जाणवल्याने

एक प्रकारची उदासी तिच्या मनाला येते
आणि मग शरीराची विटंबना होऊन मरण्यापेक्षा आधीच आत्मत्याग केलेला काय वाईट, असं म्हणत

‘तू आता मला तुझ्यातच सामावून घे’ ही आत्मसमर्पणाची समंजस भूमिका ती घेते.

तीच पुढे कान्होपात्रेला अध्यात्मातील सर्वश्रेष्ठ उंची मिळवून देते.
महाराष्ट्राच्या भूमीला प्रतिभावंत संतांची समृद्ध परंपरा लाभल्यामुळेच इथल्या लोकसंस्कृतीला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक विचारांचा वसा-वारसा मिळाला.

पुढच्या पिढ्यांच्या जडणघडणीवर त्याचा परिणाम होताना दिसतो.

ज्या संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई, मुक्ताई आदी संतकवींनी भागवत संप्रदायाच्या तत्त्वप्रणालीची रुजवणूक करताना आपले आयुष्य पणाला लावले.

त्याच परंपरेची एक महत्त्वाची कवयित्री होती संत कान्होपात्रा.

आपल्या जगण्याला नितळ-निर्मळ ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारी कान्होपात्रा तिच्या जीवनचरित्रातून आणि निवडक 23 अभंगांतून समाजापुढे संवेदनशील प्रश्न उपस्थित करत राहते.

आणि कान्होपात्राची कथा काळजात घर करते !!

क्रमशः