२९ जून २०६१ - काळरात्र - 4 Shubham Patil द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

२९ जून २०६१ - काळरात्र - 4

“तुला ही माहिती कुठून मिळाली?” हंसीकाने अनिला विचारलं.

“माझ्या भावाने सांगितलं. तो केंब्रिज मधल्या ‘एमआयटी’ मध्ये क्वांटम फिजिक्सचा प्रोफेसर आहे.” अनिने सांगितलं. आता सर्वांच्या नजरा अनिनकडे वळल्या होत्या. टेबलवर ठेवलेला वाईनचा ग्लास हातात घेत अनि म्हणाला, “काहीही अकल्पित किंवा विचित्र घडल्यास त्याने मला कॉन्टॅक्ट करायला लावला आहे आणि सर्वांसाठी एक महत्वाची बातमी त्याने सांगितलं आहे, जी हंसीकाने आपल्याला सांगितली नाही, की या वेळी जो धूमकेतू पृथ्वीवरून पास होणार आहे, त्याचा केंद्रबिंदू हा पुणे आणि आजूबाजूचा परिसर आहे. एम आय राइट हंसीका?”

“येस, ऑफकोर्स. मला तुमचा मूड खराब नव्हता करायचा. म्हणून मी काही बोलले नाही.” हंसीका मान डोलवत बोलली.

“सो, चीयर्स ऑन हॅलेज कोमेट.” असं म्हणत सक्षमने हातातला वाईनचा ग्लास उंचावला सर्वांनी त्याला दुजोरा दिला. रेड वाईनने भरलेले ग्लास एकमेकांना खणखणू लागले आणि मंडळी चीयर्स करू लागली. तणावपूर्ण वातावरणात आता थोडी मजा सुरू झाली होती. गप्प परत दुसर्‍या विषयकडे वळू लागल्या. थोड्याच वेळात वातावरण आधीसारखे नॉर्मल झाले. स्टार्टर संपवून मंडळी आता मेन कोर्स वर आली होती. एकमेकांना आग्रह होत होता. जुन्या आठवणी ताज्या होत होत्या.

इतक्यात वीज गेली. अचानक अंधार पडला. गडद काळोख. सर्वांची गडबड सुरू झाली. आर्या आणि सक्षमने सर्वांना आहे त्याच जागेवर बसायला सांगितलं आणि ते कॅन्डल्स घ्यायला घरात गेले. अचानक झालेल्या अंधारमुळे सर्वजण एका क्षणासाठी घाबरून गेले होते. पण काहीतरी प्रॉब्लेम असेल आता हे काही धुमकेतूमुळे झालं नसेल असं सांगून शौनकने सर्वांना शांत बसवलं. मग परत काहीतरी बोलायचं म्हणून सारंग म्हणाला, “अरे या सक्षमने बिल भरलं नसेल. बिल भरलं असतं तर अशी अचानक पॉवर ऑफ झाली नसती.”

“बिल भरलं आहे सारंग्या. थांब तुला रिसीप्ट दाखवतो आणि इन्व्हर्टरपण आहे आमच्याकडे. सुरू करावं लागेल फक्त.” सक्षम रूममधूनच ओरडला. नाही म्हटलं तरी हा घाव त्याच्या वर्मी बसला होता कारण त्याच्या आवाजात राग होता. अनिने सारंगला शांत बसायला लावलं आणि तो अंधारातच वाईनची बॉटल शोधू लागला.

सुमारे दहा मिनिटांनंतर आर्या आणि सक्षम कॅन्डल्स घेऊन आले. सक्षमच्या हातात कॅन्डल्स होत्या आणि आर्याच्या हातात तीन बॉक्स होते. त्यात ग्लोस्टिक्स होत्या.

“अच्छा, म्हणजे कॅन्डल लाईट डिनर वीथ ग्लोस्टिक्स असा प्लॅन होता तर.” रचना म्हणाली.

“अगं बाई, प्लॅन वगैरे काही नाही. कॅन्डल्सच्या बाजूला हे ग्लोस्टिक्सचे बॉक्स पडले होते ते आणले. खरं म्हणजे ते मागच्या वर्षीच्या पार्टीसाठी आणले होते. पण नेमका ऐनवेळी पाऊस पडल्यामुळे आपलं लोणावळा जाणं कॅन्सल झालं ना. मग तसेच पडून होते.” आर्याने संदर्भासाहित स्पष्टीकरण दिलं. सर्वांना एक एक कॅन्डल दिली गेली. सारंगने खिशतून सिगरेट लायटर काढले आणि मग एकेक कॅन्डल पेटवत ते लायटर प्रत्येकाच्या हातातून फिरू लागले. आर्याने आणलेल्या तीन बॉक्स मधून सर्वांत वर असलेला निळ्या ग्लोस्टिक्सचा बॉक्स ओपन केला आणि प्रत्येकाला एकेक ग्लोस्टिक देण्यात आली.

“सो, लेट्स स्टार्ट द सेकंड पार्ट ऑफ अवर डिनर,” आर्या असं म्हणते न म्हणते तोच वीज आली आणि सर्वांना हायसं वाटलं.

सर्वांनी कॅन्डल्स फुंकल्या आणि सुरुवात करणार तोच परत एकदा वीज गेली. परत काहीसा मूड ऑफ झाला. मग पुन्हा एकदा पाच मिंनिटांपूर्वी केलेल्या कार्यक्रमाची उजळणी केली आणि जेवणाला सुरुवात करण्याआधी सक्षम म्हणाला, “मी इन्व्हर्टर सुरू करून येतो. तुम्ही बसा.” त्याला मानेनेच होकार देत सर्वांनी जेवण सुरू केले. पाच मिनिटांनी सक्षम आला तेव्हा त्याने सांगितलं की, “इन्व्हर्टर सुरू होत नाहीये.”

“ठीक आहे, असंही सर्वांच जेवण जवळपास झालंय. त्यामुळे आपण वाट बघूयात.” नीलिमा म्हणाली. तिला सर्वांनी होकार दिला आणि परत एकमेकांची मजा घेणं सुरू झालं. अनि जास्त बोलत नव्हता. काहीतरी गहन विचारात हरवून गेल्यासारखा बसला होता.

“जर कुणाला प्रॉब्लेम नसेल तर आपण दोन मिनिटांसाठी बाहेर जाऊयात का? धूमकेतू दिसेल आपल्याला.” हंसीकाने विचारलं.

“ओह, दॅट्स ग्रेट. लेट्स गो.” असं म्हणत सक्षम खुर्चीवरून उठलासुद्धा. सर्वांनी आपआपल्या ग्लोस्टिक्स हातात घेतल्या आणि बाहेर आले. सर्वदूर काळोख होता. शिवाय एका घरच्या. सक्षमचं घर सोडून दोन घर अंतरावर जे घर होतं तिथे मात्र प्रकाश होता. त्या घराची वीज गेली नव्हती. इतक्यात हंसीकाने तिची ग्लोस्टिक वर करून सर्वांचे लक्ष वर वेधले.

आकाशातून हॅलेचा धूमकेतू जात होता. पण येत्या काही तासांतच हाच धूमकेतू यांचं “विश्व”च बदलून टाकणार होता याची त्यांना तसूभरही कल्पना नव्हती. सर्वजण एकाग्र होऊन एकटकपणे ते दृश्य पाहू लागले. धूमकेतू हळूहळू मार्गक्रमण करत होता. सर्वजण पहिल्यांदाच असं दृश्य बघत असल्याने कमालीचे रोमांचित झाले होते. टॉर्चसारखा प्रकाश फेकत धूमकेतू पुढे जात होता. तो परावर्तीत करत असलेली किरणे फार प्रखर होती. धूमकेतू बघून सर्वजण घरात आले तेव्हा समोरच्या दृश्याने आश्चर्यचकित झाले, टेबलवर ठेवलेले वाइनचे सर्व ग्लास विचित्र पद्धतीने फुटले होते. ते सुरीने कापल्यासारखे वाटत होते. ते दृश्य पाहून सर्वजण गोंधळात पडले. कुणीही काहीच बोलत नव्हतं. तेव्हढ्यात शौनक म्हणाला, “मी इन्व्हर्टर सुरू करून येतो.”

“सांभाळून जा.” हंसीका म्हणली.

तो निघणार इतक्यात आर्या म्हणाली, “तू किचनच्या दराने जा. तिथून सोईचं पडेल.”

आर्याला “थॅंक्स” म्हणून शौनक निघाला.

सर्वजण त्या विचित्र पद्धतीने फुटलेल्या ग्लासेस कडे बघत होते. इतक्यात नीलिमा म्हणाली, “इफ यू डोन्ट माइंड, कॅन आय टेक अ पॉवर नॅप?”

“आर यू ओके? काय होतंय नीलिमा तुला?” अनिने काळजीपोटी विचारलं.

“नथिंग, जस्ट थकलीये.” नीलिमा जांभई देत म्हणाली आणि सर्वांनी होकरच्या माना डोलवल्यावर आर्याच्या बेडरूममध्ये निघून गेली.

“आय थिंक मला त्या घरी जावं लागेल.” अनिने फुटलेल्या ग्लासवरील नजर न हटवत गंभीरपणे शब्द फेकले.

“कोणत्या घरी? आणि कुठे?” हंसीकाने विचारलं.

“त्याच, ज्या घरात लाइट होती. ज्या पद्धतीने आपले दोघांचे फोन डॅमेज झाले आणि आता हे ग्लास विचित्र पद्धतीने फुटले, मला हे माझ्या भावाला सांगावं लागेल. आता कुणाचाच फोन काम करत नाहीये आणि इंटरनेटसुद्धा बंद आहे. सो मला तिकडे जावं लागेल. मी आलोच एक फोन करून पाच मिनिटांत.” अनिच्या बोलण्यात गंभीरपणा होता.

“ठीक आहे. पण कुणाला तरी सोबत घेऊन जा. प्लीज.” आर्या म्हणाली.

“मी येतो तुझ्यासोबत,” असं म्हणत सक्षम उभा राहिला.

सक्षम आणि अनि घराबाहेर निघाले. सर्वांच्या चेहर्‍यावर थोडी काळजी दिसत होती. इतक्यात लाइट आली आणि मंडळीच्या जीवात जीव आला. वास्तविक बघता वीज आली नव्हती. शौनक इन्व्हर्टर सुरू करून आला होता. त्याने सक्षम आणि अनिची चौकशी केली आणि हंसीका जवळ बसला. पंधरा मिनिटं झाली तरी अजून दोघांचा पत्ता नव्हता. हळूहळू सर्वांची चिंता वाढत होती. धूमकेतू बद्दल सांगितलेल्या गोष्टींमुळे नाही म्हटलं तरी सर्वांच्या मनात थोडी धाकधूक होतीच. वीस मिनिटं झाली तरी सक्षम आणि अनि आले नव्हते. सर्वजण एकमेकांचे काळजीयुक्त चेहरे बघत होते. इतक्यात आर्या उठली आणि दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागली. तिला हंसीकाने जरा चढया आवाजात दरडावलं, “आर्या जागेवर बस. तू कुठेही जात नाहीयेस. त्यांना काहीही होणार नाही. कदाचित त्यांचा अनिच्या भावाशी कॉन्टॅक्ट झाला असेल. तो काहीतरी संगत असेल त्यमुळे उशीर होत असेल.”

हंसीकाचं बोलणं ऐकून सर्वांना थोडा धीर आला. काही क्षण असेच स्मशान शांततेत गेले आणि दरवाज्यावर मोठा आवाज झाला. सर्वजण घाबरून गेले. शौनक खुर्चीवरून उठला आणि दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागला. तोच सारंगने त्याला हॉकी स्टिक दिली. त्याने डोळ्यानेच थॅंक्स म्हटलं आणि दरवाजा जवळ केला. दरवाज्याच्या काचेतून बघितलं तर बाहेर सक्षम आणि अनि उभे होते. शौनकने दरवाजा उघडून त्यांना आत घेतलं. ते घरात येताच आर्या सक्षमला बिलगली. तेव्हा तिच्या केसांवरून हात फिरवत सक्षम म्हणाला, “डोन्ट वरी आर्या, आय एम फाइन.”