पुनर्भेट भाग १३ Vrishali Gotkhindikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुनर्भेट भाग १३

पुनर्भेट भाग १२

हळूहळू नव्या आयुष्याला रमा आणि मेघना दोघीही सरावत गेल्या .
इतके दिवस आयुष्याचे भयंकर रंग पाहिल्यानंतर आता मात्र सगळे काही खरेच बरे चालले होते .
पाच सहा महिन्यात रमा दुकानच्या कामात चांगली तयार झाली .
तिची हुशारी आणि कामाचा वेग पाहून मालक पण खुष झाले .
रमाने आता मेघनाला पहील्या वर्गात दाखल केले .
शाळा जवळच होती .
संध्याकाळी जरी रमाला दुकानाच्या कामामुळे उशीर झाला तरी
वाड्यातील सर्व जण मेघनाकडे लक्ष देत .
त्यामुळे रमाला घराची काळजी वाटत नसे .
मोहन अधून मधून चौकशी करीत असे ,येत जात असे .
दुकानात पगार बरा होता,दरवर्षी थोडा वाढवत असत .
घरभाडेही थोडकेच होते
त्यामुळे चार पैसे शिल्लक पडत .
अशीच दहा वर्षे गेली .
मेघना चांगली शिकत होती,प्रत्येक वर्षी नंबर काढत होती .
आता तर कॉलेज मध्ये ती आदर्श विद्यार्थिनी होती .
बारावी बोर्डात सुद्धा ती चांगली चमकणार याची कॉलेजला खात्री होती .
वर्षभरापूर्वी रमाने नोकरी सोडुन स्वतःचे दुकान काढायचे ठरवले .
अचानक तशी एक संधी तिच्याकडे चालून आली आणि मालकांनी पण मदत केली ..
हे दुकान एक फूड शोपी होते.
आणि आता या दुकानात तिचा चांगला जम बसला होता.
या भागात तिच्या दुकानाचे चांगले नाव झाले होते .
असा हा भूतकाळाचा इतका मोठा प्रवास रमा विचाराविचारात कधी करून आली
तिला समजलेच नाही ..
तो आठवडा पार पडला आता मेघनाचा वाढदिवस एक दिवसावर आला .
मेघनाची वाढदिवसाची तयारी जोरात चालू होती .
खरेदी तर झाली होती .
मैत्रीणीना आमंत्रणे गेली होती .
हॉटेल आणि मेन्यू बुक झाला होता .
आणि अखेर तो शनिवार उजाडला ..
मोहन सकाळीच हजार झाला होता .
मामाला पाहुन मेघना एकदम खुष झाली होती .
दुपारी जेवण झाल्यावर मामाने आणलेले आणि तिने मागितलेले गिफ्ट पण तिने
हस्तगत केले होते .
तो एक फोर जी एकदम लेटेस्ट मॉडेलचा मोबाईल होता .
मैत्रिणींची पार्टी हॉटेलमध्ये संध्याकाळी होती .
मेघनाची नुसती गडबड चालली होती.
ती मैत्रिणीला घेऊन हॉटेलवर व्यवस्था पाहायला गेली .
तेव्हा मोहन तिला म्हणाला
“वहिनी एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला ..
म्हणजे माझा पण खरेतर विश्वास बसत नाही
पण तुमच्या कानावर घालतो “
रमाने प्रश्नार्थक नजरेने पाहिले ..
“गावात सतीशला पाहिले असे काही लोक म्हणत आहेत
आता इतकी दहा अकरा वर्षे झाल्यावर तो तोच आहे का याबद्दल थोडी शंका आहे.
शिवाय गावात तो असा उजळ माथ्याने फिरू नाही शकणार
पण तीनचार दिवसापूर्वी असे ऐकण्यात आले .
मी तर त्याला पाहिला नाही अजुन पण पाहिला तर नक्की ओळखीन आणि त्याला
जाब पण विचारेन ..”
हे ऐकुन रमा कोड्यात पडली ..
खरेच असेल का तो सतीश ?
तो मृत झाला वगैरे अशी बातमी पण कधीच समजली नव्हती .
पण त्याचा शोध पण लागला नव्हता ..
काय करीत असेल तो इतकी वर्षे ..
रमाचा जीव कावराबावरा झाला ..
सतीशने आयुष्यात खुप वाईट दिवस दाखवले
पण त्याचा मृत्यू व्हावा किंवा झाला असावा अशी रमाची इच्छा अजिबात नव्हती .
म्हणून इतकी वर्षे विधवे सारखे आयुष्य काढत असुन सुद्धा तिने
आपल्या अंगावरचे कुंकू मंगळसूत्र कधीच उतरवले नव्हते .
खरेच तो सतीश असेल तर बर होईल ..पण परत आपल्यापुढे त्याच्या रुपात कोणते संकट येईल
कोण जाणे अशा विचाराने ती थोडी धास्तावली .
तिला विचारात पडलेली बघुन मोहन म्हणाला
“काळजी करू नका ..मी बघतो नक्की काय प्रकार आहे ते
आणि कळवतो तुम्हाला ..
पण त्यापूर्वी मेघनाला कसलीच कल्पना मात्र देऊ नका .
एकदम तिला धक्का बसायचा .”
“नाही हो मोहन मी कसे सांगेन तिला ?
मला तर नवल वाटते आहे की तिने इतक्या वर्षात कधीच आपल्या बाबाचे नाव नाही घेतले
कधीही मला ती त्याच्याविषयी कोणतेच प्रश्नही विचारत नाही “
रमाच्या या बोलण्यावर मोहन म्हणाला .
“कधी कधी लहानपणापासुन पाहिलेल्या चित्रविचित्र घटना बघुन
मुलांच्या मनावर परिणाम झालेला असु शकतो .
आणि मग त्याविषयी काहीही बोलणे त्यांना नकोसे वाटते .”
रमला पटले ते .. खरेच ..बाबाला ओळखू लागल्यापासून मेघनाने त्याला कायम
दारू पिऊन आलेले आणि आरडा ओरडा करतानाच पाहिले होते .
मेघनावर सतीश तसे प्रेम पण खुप करायचा
पण वाईट गोष्टीच बालमनावर जास्त परिणाम करीत असतात..
बाहेर गेलेली मेघना परत आली आणि हा विषय थांबला .
संध्याकाळी हॉटेलमध्ये पार्टी एकदम जोरदार झाली .
एकदम चवदार मेन्यू ,मोठा केक ,भरपूर मैत्रिणी ..
कधी हॉटेलला न येणारी आई सोबत होती ,
शिवाय लाडक्या मोहनमामाची उपस्थिती ..!!
मेघनाचा चेहेरा आनंदाने चमकत होता .
आनंदी आणि देखण्या मेघनाला बघुन रमाच्या डोळ्याचे पारणे फिटत होते .
राहून राहून सतीशची आठवण होत होती ..
रूप तर मेघनाचे सतीश सारखे होतेच
त्यात आता रमाला सतीशविषयी ही एक नवी बातमी समजली होती .
डोळ्यांच्या कडापाशी येणारे पाणी ती हलकेच रुमालाने टिपत होती.
शकयतो मनातली घालमेल बाहेर दिसू नये याचा प्रयत्न करीत होती .
कार्यक्रम उशिरा संपला ..
त्याआधी थोडा वेळ मोहन दोघींचा निरोप घेऊन बाहेर पडला .
त्याला लगेचच गावी परतायचे होते .
जाताना पुन्हा एकदा तो रमाला सतीश विषयी काहीही समजले तर कळवेन असे सांगुन गेला .
मेघनाच्या सगळ्या मैत्रिणीनी रमाला पार्टी खुप छान झाली असे सांगितले .
रमाला पण अगदी समाधान वाटले ..
लेकीने आयुष्यात प्रथमच काहीतरी मागितले होते आणि ते पूर्ण करता आले .
सगळ्यांना निरोप घेऊन दोघी घरी परत आल्या .
कपडे बदलुन झोपताना मेघनाने आईच्या हाताची पापी घेतली .
“आई फार छान वाटले ग मला ..
मला आणि माझ्या मैत्रीणीना तु खुष करून टाकलेस ..”
मांडीवर झोपलेल्या मेघनाच्या केसात हात फिरवत रमा म्हणाली
“मेघु तु खुष आहेस न मग मला दुसरे काहीच नको ग ...
खुशीने अर्धमिटल्या डोळ्यांनी झोपलेल्या मेघनाकडे पाहताना
रमाच्या डोक्यात विचार चालू झाले ..
खरेच लाभेल का पोरीला परत बापाचे प्रेम ?
काय होईल खरेच तो माणूस सतीश असेल तर ..?
करेल का मेघना नव्याने त्याचा स्वीकार बाबा म्हणून ..?
मधल्या बऱ्याच वर्षात बाबाचे नाव जरी तिने काढले नसले तरी
तिच्या मनात बाबाविषयी एखादा हळवा कोपरा असेल न शिल्लक ..?
का आता सगळे ठीक चालू आहे त्याला काही खीळ बसेल ..?
फार मुश्किलीने,मेहेनतीने आणि मोहनच्या मदतीने आयुष्याची घडी बसवली आहे
त्यात काही विपरीत नको घडायला ..
एक न दोन ...शंभर गोष्टीनी डोक्यात थैमान घातले होते .
शांत समाधाने झोपलेल्या मेघनाकडे बघताना
आता पोरीचे आयुष्य तरी सुखासमाधानात जाऊ दे ..
आपण तर खुप भोगले ..
तिच्या आयुष्यातील सुखाला दृष्ट नको लागू दे
अशी मनोमन परमेश्वराकडे प्रार्थना करीत राहिली ..
खिडकीतुन आलेल्या मंद प्रकाशात मेघनाच्या गालावरचा तीळ चमकत होता.
तिच्या मैत्रिणी त्याला “ब्युटीस्पॉट” म्हणायच्या ..
तो तीळ परत परत सतीशची आठवण करून देत होता ..
रात्र अशीच पार पडली ..
झोप येणे तर अशक्यच होते ..
उद्यापासुन परत सतीशविषयी काय बातमी कळते यासाठी
मोहनच्या फोनची वाट पाहायला लागणार होती .
काय लिहून ठेवलेय कोण जाणे भविष्यात..
सगळेच अंधारात होते ..
भूतकाळातल्या चांगल्या वाईट घटनांनी तिच्याभोवती फेर धरला होता .
समाधानाने झोपलेल्या मेघनाकडे पहात रात्र पार पडली .
सकाळ उगवली आणि नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे मेघनाला जाग आली .
शेजारी बसून राहिलेल्या आईकडे पहात ती डोळे चोळत उठली .
आई अग तु झोपली नाहीस की काय ,..?
अशी काय बसली आहे अवघडल्यासारखी ....?मेघनाच्या या बोलण्यावर
“अग कालच्या आनंदाने मला झोपच लागली नाही बघ ..
चल आता उठून कामाला लागले पाहिजे मला
असे म्हणत तिच्याकडे बघण्याचे टाळत..रमा आत गेली.

क्रमशः