पेरजागढ- एक रहस्य.... - १८ कार्तिक हजारे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

पेरजागढ- एक रहस्य.... - १८

२)आयुष्यातला दुसरा वाघ आणि भ्रमंती...

सकाळी थोडं लांब जायचं आहे म्हणून मी थोडं लवकरच झोपून गेलो होतो.पण अंथरुणावर पडल्या फक्त डोळे मिटून होतो.कारण कानात गुंजणारे ते छम छम शेवटी काय होतं? हेच मला कळत नव्हते.कुणाला विचारावं म्हटलं तर काही वाईट समजतील या विचाराने मी कुणाला काही सांगितलं पण नव्हतं.आणि उद्या ज्या भागावर जाणार होतो.तो भाग नकाशात एक गुणाकार(खतरा) म्हणून दाखवला होता.लाल रंगाने रंगवलेला तो लखोटा म्हणजे नक्की काय होतं?उद्या मी तेच बघण्यासाठी चाललो होतो.जिथून माझी शुरुवात होती.

पण एक होतं.गडाच्या बाबतीत प्रत्येकजण वेगळाच बोलायचा.त्यामुळे खरं काय ते मला समजण्यासाठी थोडं अवघड वाटायचं.पण प्रयत्न करत होतो उद्या काहीतरी करायचं म्हणून.

सकाळी काकाने मला त्या इसमाशी ओळख करून दिली.ज्याला ते जंगल कानाकोपरा माहीत होतं.मधुकर त्याचे नाव...

काकाने सांगितल्याप्रमाणेच माझ्या आयुष्यात असणारा तो दुसरा वाघ होता.आणि त्याची ही उपमा, त्यासाठी एकदम बरोबरच होती.गावातून किंवा इतर बाजूंच्या गावातूनसुद्धा त्याच्या पराक्रमाबद्दल अगदी कुणीही सांगेल.अशी त्याची ख्याती होती. काळया सावळ्या रंगाचा,डोक्यावर काही विरळ केस,पायात चप्पल वापरणार नाही.असा थोड्या बऱ्याच वेगळ्या पद्धतीचा माणूस होता.जवळपास बारा ते तेरा किलोमीटरचा अतील प्रवास झाल्यानंतरही त्याला दम असा लागलेला नव्हता.

त्याला बघितलं की असं वाटायचं की तो माणूस कमी आणि पशू जास्त आहे. वाघाबरोबर बरेच युद्ध मी त्याचे ऐकले होते.आणि जंगलात त्याला वघाबरोबर जरी चालायला सांगितले तरी तो चालणार.जंगलातून चालताना प्रत्येक निशाण,प्रत्येक पाऊलाची ओळख तो इतक्या बारकाईने बघायचा, आणि नेमका सांगायचा.कि कोणता प्राणी आहे? आणि कोणत्या दिशेने गेलाय म्हणून?

जंगलातील प्रत्येक वनौषधींची त्याला माहिती होती.त्यामुळे स्वतःला आयुर्वेदाने त्याने अशा प्रमाणात सज्ज केले होते, की पन्नास पंचावन्न वयाचा असताना देखील वीस तीस वयाच्या तरुण इसमासारख बळ होतं त्याच्यात.कोणत्या जागेत काय दडलंय?बऱ्याच प्रमाणात त्याची बुद्धी त्या जंगलाच्या बाबतीत तल्लख होती.कुठे थांबायचं नाहीच पण प्रत्येक निशाण अगदी निरखून बघायचा.आणि त्याच्या हातात असलेली कुऱ्हाड तो कधीच सोडायचा नाही.अगदी त्याच शस्त्र होतं ते जंगलात जाण्यासाठी.

गावात एक अलगद नातं होतं.आई वडील अगदी ठरवून सांगायचे. हा मामा होतो,तो काका होतो.तशाच प्रकारे जेव्हा त्या इसमाची भेट काकाने ठरवून दिली, तेव्हाच सांगितले की हा तुझा मामा होतो.त्यामुळे मधुमामा अशी माझी संगत छान प्रकारात रंगत होती.तरी त्यांची इच्छा मला जंगल दाखवण्यात नव्हती.आणि नुसतं फिरण्यासाठी तर अजिबात नाही.सगळ्यांसमोर त्याने मला म्हटलं की जंगलात फिरणे हे काही हायवेवरच्या रस्त्यावर फिरणे नव्हे.कुठे काय मिळेल?आणि कुठे काय होईल?याची जराशी सुद्धा जाणीव नसते.एक छोटीशी चूक सुद्धा माणसाचं जीव घेऊ शकते.

फॉरेस्ट ऑफिसर रोज विचारतात.जंगलात फिरायला मनाई केली आहे.जागोजागी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.जर तुला फिरायचच असेल, तर निदान गावच्या सरपंचाशी तरी भेट घडव.जेणेकरून कुणाला काही त्रास नको.

एकंदरीत त्याचंही बोलणं मला फार प्रमाणात बरंच वाटलं, म्हणून त्यांना घेऊनच मी सरपंचाकडे भेट घ्यायला गेलो.

कोण? कुठून आला?कशाचे काम आहे? हे सगळे प्रश्न अपेक्षित होते.त्यामुळे त्या सगळ्याचा काहीच अर्थ नव्हता.आणि ज्या कारणासाठी मी इथे आलो होतो.ते कारण सांगणे मला गरजेचे वाटले नाही.त्यामुळे मी त्यांना जरा वेगळ्या पद्धतीने समजावले.जे समजायला त्यांना अवघड गेले नाही.

साहेब मी निसर्गाचा वेडा आहे.मला फिरायला फार आवडतं.अशा कित्येक जागी मी फिरून आलोय ज्याची तुम्हीसुद्धा पूर्तता केली नसेल.पण शेवटी विचार आला की आपण आपल्याच भागात शोध करूया. सातपुड्यावर जशी देवस्थाने बसली आहेत त्यासारखीच आपल्या पेरजागडावर पण आहेत.पण कित्येकांना त्याची जाण नाही.कित्येकांना त्याची कल्पना सुद्धा नाही.कारण आजपर्यंत त्याची खरी माहिती कुणी कुणाला दिलीच नाही.

शिवाय निसर्गाने वेढलेले हे सुंदर गड कित्येक पर्यटकांच्या डोळ्यांना लुभावतात.आणि वर हे गड फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये विलीन होत आहे.ज्या गडाला तुम्ही वाचवू शकत नाहीत.पुढे तुमचं गाव तिथे गेल्यास ते वाचवू शकणार काय?कारण तुमचं गावपण गेलंय जंगलाच्या सरहद्दीत.

असं बऱ्याच पद्धतीने मी त्यांना पटवून सांगितले.सोबतीला कोण आहे? वगैरे त्यांनी विचारले आणि म्हणाले...फिरून या तुम्ही..कारण तुमचं म्हणणं पण रास्त आहे.ज्यामुळे आम्ही बऱ्याच प्रमाणात डांबत चाललोय.तुम्हाला जी काही मदत लागली ती कळवा आम्हाला...आम्ही नक्कीच ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.त्यांच्या अशा बोलण्याने मधुमामाला पण शंकांचं निरसन झाल्यासारखं वाटलं.

त्यामुळे तिथून निघाल्यावर, त्यांनी फक्त केव्हा निघायचं? म्हणून विचारलं.आणि सोबतीला कुणीतरी माणूस पाहिजे म्हणून त्याच्या शोधार्थ निघून गेले.

तिथून तयारीला मी निघालो.मनामध्ये एक विचार घोळत होता, की आज आपण ज्या दिशेला जात होतो. त्या दिशेला शंखाची कलाकृती त्या नक्षावर दाखवली होती.आणि ते सगळं नजरेत असावं म्हणून मी मोबाईलचं मॅप ओपन करून चालत होतो.

मी,मधुकर मामाजी आणि आदल्या दिवशी पेरजागडावर भेटलेला एक धनगर, ज्याला पैसे देऊन मी सोबतीसाठी आणले होते.असे तिघेजण मजल दरमजल करीत निघालो. सोनापुर पासून जवळपास तीन किलोमीटर अशा अंतरावर एक सारंगड नावाचे छोटेसे गाव आहे.आमच्या प्रवासाचा हा पहिला टप्पा.जंगलात जाण्यासाठी आम्ही सोनापुरवरूनसुद्धा निघू शकत होतो.पण सारंगड पासून काही मजेशीर बघायला मिळणार आहे, असे मधुमामाजी म्हटल्यामुळे आम्हाला पायी पायी सारंगडला जावे लागले.तिथून पुन्हा अर्ध्या एक किलोमीटरच्या अंतरावरून, जंगलाची सरहद्द तयार होते.त्यावर आम्ही येऊन थांबलो.

सहज मधुकर मामाजीने सचेत करण्यासाठी मला जवळ बोलावलं आणि म्हणाले...

बघ पवन...तुला सांगतो ते नीट ऐक..इतर जंगल तू केव्हाही भटकंती केला असणार, यात काही शंका नाही..पण हे जंगल त्यापेक्षा वेगळं आहे.त्यामुळे मनात असलेली भिती आधी तू काढून टाक.कारण इथे ती चालत नाही.आणि पुन्हा एक महत्त्वाचं...इथे चालताना अंतर पाडू नकोस.नेहमी बरोबरच रहा...कारण वावटळ कधीही जो अंतरावर असते ना, त्यालाच आधी घेरते.आणि जमेल तितक्या शांतपणे आणि इशाऱ्याने चालायचं.जणू आपण जंगलातलेच पशू आहोत या पद्धतीने...

मी होकार दिला आणि सहज लक्ष पेरजागडाकडे टाकली. कारण आज आम्ही त्या पेरजागडाच्या उलट बाजूला होतो.मला वाटले इथून पेरजागडची ती निद्रेत असलेली छवी दिसणार नाही.पण जशी ती सोनापुरवरून दिसत होती.तसेच या जंगलातून पण ती दिसत होती.आणि जी भावाची डोंगर दरी बऱ्याच प्रमाणात विखुरलेली होती.तिचा तो काही खचलेला भाग ह्या बाजूने पण दिसत होता.अशा पद्धतीने तो भाग खचला होता की तिथे जणू एक भिंत तयार झाली होती.ज्याला गावकरी "पांढरी भिंत" असे म्हणतात.खास करून तिथे जंगली कबुतरांचे फार प्रमाणात वास्तव्य असते.

शेतात जाणारे कच्चे रस्ते सोडून आम्ही काही वेळानंतर जंगलातील आड मार्गाला लागलो.आमचे मार्गदर्शक सतत नवीन रस्ता दाखवत होते.कधी पायवाट, तर कधी पाणी वाहणारा कोरडा पाट.अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या मागोमाग चालू लागलो होतो.काही वेळातच आजूबाजूला दिसणारी दूरवरची घरे, आणि शेतीवगैरे डोळ्यांसमोरून नामशेष झाली.ज्यामुळे आपण आता घनदाट अरण्यात आलो आहे याची जाणीव झाली.

जास्त प्रमाणात तिथे कुणी जात नसल्यामुळे बऱ्याच छोट्या छोट्या काटेरी वनस्पतींचे तिथे उत्पादन होते.आणि त्यामधून आम्हाला रस्ता काढत जावे लागत होते.जवळपास अर्ध्या एक तासानंतर दगडांची ती उतराई दिसू लागली.म्हणजे आता आपण डोंगर चढायला लागलो अशी त्यांची इशाऱ्याने माखलेली नजर दिसली. मध्यंतरीच ते थांबून वाघाची ताजी संडास,तर मोराच्या पायाचे ठसे,असे प्रत्येक निशाण समजावून सांगायचे.आणि तो पशू कोणता आहे? आणि कोणत्या दिशेने गेला?वर कोणत्या वेळेला तो इथे आला असेल याची हुबेहूब तो माहिती आम्हांस देत होते.

चालताना वाट नसलेली ती खडकाळ वाट आणि वर त्या काटेरी वनस्पतींचा त्रास. टी शर्टच्या छातीच्या भागापर्यंत ती कपड्याला चिकटत होती.त्यामुळे प्रत्येक वेळा कपडे ओरबाळत राहावं लागायचं. आणि कुणी सहसा तिथे येत नसल्यामुळे वातावरण एकदम भयानक वाटत होतं.चालता चालता कितीतरी वेळा पायाखालची दगडे घरंगळत जायची.त्यामुळे सतत आपण पडतो की काय असा भास व्हायचा.आणि चालताना वाटपण नव्हती चालायला.त्यामुळे कित्येक वेळा उभे राहून कुठून जायचे हा विचार करत असायचो.

पण एक होतं.आम्ही चालत होतो, ते मधू मामजीच्या मार्गदर्शनाखाली.ते चालत असलेल्या वाटेवर.आणि ते सरळ चालत नव्हते.चालताना ते आडीमोडीचा वापर करत. खरंतर त्याचं कारण मी आधीच समजलो होतो, पण त्यांच्याकडून काही नवीन उत्तर मिळण्याच्या आशेने मी त्यांना विचारलं, की तुम्ही असे आडीमोडी का चालता? सरळ का नाही...?

त्यावर ते म्हणाले...याला म्हणतात श्रम वाचवणे.कारण डोंगराचा चढ भाग आपण जेव्हा सरळ चढतो तेव्हा आपल्या अंगातील सगळं श्रम संपून गेल्यागत होते.आणि जेव्हा आडीमोडी चालतो तेव्हा पायांना समान जमीन लागते.चढ असा वाटत नाही.ज्यामुळे आपल्याला फार प्रमाणात श्रम होत नाही.आणि निरंतर चालण्याची शक्ती संचारत असते.

इतक्या महत्त्वाची गोष्ट ही त्यांनाही माहीत असेल असं मी गृहीत धरलं नव्हतं.कारण आपल्या पायांची पण एक फिलासापी असते.सपाट रस्त्याने चालताना संपूर्ण पाय हा जमिनीवर पडतो.त्यामुळे संपूर्ण शरीराचं ओझं अगदी सहजगत्या दोन्ही पायांवर पेलून असतं.पण दगडांची पायवाट किंवा चढ चढताना संपूर्ण भार आपल्या पायाच्या बोटाकडील भागाकडे जाते.ज्यामुळे पायाचा मागील भाग पोकळ होतो चालताना.ज्यामुळे आपले पाय बऱ्याच प्रमाणात वाकून येतात गुडघ्यातून.आणि दुखून येतात.जितक्या कमी वेळेचा प्रवास असतो तितकाच तो ठीक असतो, पण जास्त प्रवास हा अशा पद्धतीने केला तर बरं राहतो...

थोड्याच वेळात खालून बघावं तर डोंगराचा शिखर जरा जवळच आला होता.तिथे असलेल्या दऱ्याखोऱ्या अगदी काही अंतरावरच दिसत होत्या.पण वातावरणात कसलीतरी भयानक दुर्गंध येत होती.त्यामुळे जवळपास काय आहे?हे मी फार चांगल्या पद्धतीने जाणून घेतलं होतं.पण शेवटी विसरलोच होतो की आपणही एक वाघ आपल्या सोबत आणला होता.जो त्यांच्यासारखाच अर्धाअधिक वेळ जंगलात घालवणाऱ्यापैकी होता.त्यामुळे काही अंतरावरच थांबून मी मधुमामाजीकडे बघत राहिलो.

जवळच एका सागवानाचे झाड उभे होते.ज्याच्या खाली त्याचीच एक वाळलेली फांदी पडलेली होती.मधूमामाने त्यापाशी येऊन त्याच्यावर कुऱ्हाडीच्या मागच्या बाजूने वार केले.ज्याचा ध्वनी जिथे तिथे कंपन पावत होता.जवळपास दोन ते तीन मिनिट तसे केल्यावर, अचानकच वातावरणात असलेली दुर्गंधी थोड्याफार प्रमाणात कमी झाली.समजून गेलो होतो की आता जायला मार्ग मोकळा आहे.

त्यानंतर मधूमामाने समोर चालण्यास शुरुवात केली. त्यांच्या मागोमाग मीसुद्धा चालण्यास शुरुवात केली.आणि सगळ्यात शेवटी होता तो धनगर.मग काही वेळातच आम्ही त्या शिखरावर पोचलो, तर नजरेच्या समोर एक प्रसन्न करणारे स्थळ होतं.

समोर दगडांत वसलेली एक प्रचंड गुंफा होती.जी दोन्ही बाजूंनी पोखरलेली होती.अगदी दोन दरवाजे असल्यासारखी.आणि आतमधून निरुंद होत, छोटी छोटी होत गेली होती.त्या गुन्फेच्या मध्यंतर एक शिडी ठेवलेली होती.ज्यावर मधूमामाने मला चढण्यास सांगितले.आणि स्वतः सिगरेट पित त्या गुहेच्या तोंडाशी बसले.ते तिथून सांगत असले तरी पण वर चढायला मला भिती वाटत होती.पण शेवटी एक एक पायरी वर करत वर चढलो तर त्यावर आणखी एक गुंफा होती.मी जसा त्या गुंफेच्या जवळ आलो, तसेच वटवाघळांचा एक झोत अंगावर उडून आला.आणि परत मी घाबरलो.

मामाजीने सांगितल्यावर मग पुन्हा त्या गुंफेत आलो.वर त्या गुंफेत चढल्यावर समोरच एक मूर्ती होती.ज्याला मी नमस्कार केला आणि परत चालायला लागलो.पण एक नवल तिथेही वाटलाच, कारण या गडाच्या शिखरावरही पाणी होतंच.त्या मूर्तीच्या समोर पण ती गुंफा कमी होत गेली ज्यात वटवाघळे होती.आणि तिथून आपल्याला दगडांवर निस्तारत असलेले पाणी येताना दिसते.जे त्या मूर्तीवर अभिषेक केल्यागत टिपकताना दिसते.पण ज्या वेळेस मी तिथे गेलो त्यावेळेस पाणी थोडं कमी प्रमाणात होतं.

खाली उतरल्यावर मामाजीनेच सांगितलं की वरच्या गुंफेचं पाणी जेव्हा कमी होते, तेव्हा पाणी या डोंगराच्या आत जात असते.खाली जी गुंफा होती.ती गुंफा त्या डोंगराच्या फार आत जात होती.रस्त्यावरून आतला काळोख दिसून पडत होता.त्या गुंफेत काही अंतर आत गेल्यावर पाण्याचं जलाशय आपल्याला दिसून येते.जे आपल्याला मोठ्या टॉर्च शिवाय बघायला मिळत नाही.त्या दगडांवर असलेली ती पाण्याची रचना अगदी अद्वितीय होती.खरतर मलाच माझ्या डोळ्यांवर विश्वास नसल्यासारखं होतं.

तिथून परतल्यावर मधूमामाने सांगितलं.की इथे नेहमी पट्टेदार वाघाचे वास्तव्य असते.हे बघ तो नुकताच गेलाय..(वाघाच्या काही निशाणाकडे बोट दाखवत मधूमामाजी म्हणाले.) तसं इथे दुर्गंधी फारच प्रमाणात होती.कारण जिकडे तिकडे जनावरांचे हाडे पसरली होती,वर त्या दगडांना बऱ्याच प्रकारचे भुयार होते ज्यात साळई असायची. साळई जंगलातील एक जीव आहे जी तिच्या अणकुचीदार काट्यांसाठी ओळखली जाते.ज्यामुळे सहसा तिची शिकार कुणी करीत नाही.पण त्या गुंफेत तिचे काटे मात्र खूप प्रमाणात होते.ज्यातून काही निवडक मी माझ्या संग्रही पकडले होते.

पण इतक्यात ते गड काही संपले नव्हते.परत त्याच गुन्फेच्या वर अजून एक गुंफा होती.ज्यावर त्या गडाचा मुख्य "महादेव" बसला होता.बाजूच्याच दगडांवरून चढून वरच्या गुन्फेवर जावे लागते.ज्यामुळे बॅग वगैरे खालीच ठेवून मी त्यांच्या मागोमाग निघालो.त्या वरच्या गुंफेत एक दगड पुरलेला होता. गुन्फेच्या मधोमध.त्या संबंधी मी मामाजीला विचारलं तर ते सांगू लागले...

"ही मूर्ती म्हणजे त्या काळातील जुनाट महादेव आहे.ज्याची आजही बरेच लोक पूजा करतात."तो बघ त्रिशूळ आणि नारळाचे तुकडे...पलीकडे इशारा करत मधूमामाजी म्हणाले...

"मग ह्याला काही नाव असेल ना? आणि ह्या डोंगराला पण...?"

"या डोंगरांगेला "घोडपाक" असे नाव आहे.आणि या महादेवाला "बोंडा महादेव" असे म्हणतात.इथे सदोदित त्याचे वास्तव्य असते.त्या वास्तव्याला जपण्यासाठी नेहमी तो वाघ इथेच असतो.आपल्याला इथे यायचं असलं की सगळ्यात आधी त्याला सूचित करावं लागतं.अन्यथा त्याची भयावह डरकाळी स्वतःला भीतीनेच मारून टाकते.आणि जांगलाविषयी तर तुला माहीतच आहे."

त्या गुहेच्या बाहेरून मी सभोवतालचा परिसर बघितला तर पेरजागड इथून फार लांब दिसत होता.दाराशी झाडे असल्यामुळे बऱ्यापैकी आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते.आता फक्त सहवास होता जंगलाचा.त्यातील वन्य हिंस्त्र प्राण्याचा आणि माझ्या अनुत्तरित प्रश्नांचा.कारण मला जाणून घ्यायचं होतं, की काय दडलंय इथे.आत्ताशी हे एक कारण होतं.ज्याच्याशी माझा मला काहीच संबंध वाटला नाही.उलट माझ्यासाठी ते स्थळ प्रेक्षणीय झालं होतं...