पुनर्भेट भाग १५
रात्रभर मेघनाच्या शेजारी रमा झोपली होती .
पण नुसते डोळे मिटून पडले तर झोप थोडीच येणार ?
विचारांचा भुंगा नुसते डोके खात होता ..
झोप न लागलेल्या अशा कैक रात्री रमाच्या आयुष्यात आजपर्यंत आल्या होत्या .
पण ही आजची रात्र मात्र सगळ्याचा कळस होता .
रात्रभर नुसते विचार विचार आणि विचार ..
भविष्यात काय घडणार आहे याचे फक्त तर्क वितर्क ..!
कशी असेल आपल्या तिघांची ही पुनर्भेट ..?
त्या लांबलचक रात्रीनंतर सकाळ उजाडली इतकेच घडले .
उजाडताच रमा उठली आणि कामाला लागली .
कामाच्या नादात थोडेसे विचार तरी मागे पडतील असे तिला वाटले .
नेहेमीची कामे होता होताच मेघना पण उठली .
“का ग इतक्या लवकर का ग उठलीस “
असे विचारताच मेघना म्हणाली .
“आई ग काल तुला सांगायचेच राहिले ..
आज सर जरा जादा वेळ क्लास घेत आहेत त्यामुळे लवकर बोलावले आहे .
मी आवरून आता निघतेच आहे .
तु पटकन मला खायला काहीतरी दे “
असे म्हणून ती चटकन कपडे घेऊन बाथरूममध्ये शिरली .
रमाने चटकन तिच्यासाठी पोहे टाकले आणि दुसरीकडे चहाचे आधण ठेवले .
मेघना आवरून आली आणि टेबलवर बसली .
तिच्या आणि आपल्या पोह्यावर रमाने खोबरे, कोथिंबीर टाकली .
आणि मेघनाची प्लेट तिच्यापुढे सरकवली .
तयार झालेला चहा पण दोघींच्या कपात ओतला .
“किती वेळ आहे ग हा जादा तास ?
“दोन तास घेणार म्हणले आहेत ,नऊ ते अकरा ..
मी येतेच साडेअकरा पर्यंत ..”
मेघना खात असताना चोरट्या नजरेने रमा पण तिच्याकडे पहात बसली होती
मेघनाचे मात्र तिच्याकडे लक्षच नव्हते
पटापटा खाऊन मेघनाने तिची वह्या पुस्तके गोळा केली
आणि आई जाते ग ..असे सांगुन चप्पल घालून बाहेर पडली .
रमाच्या मनात आले बरे झाले ही क्लासला गेली .
सतीश आला तर थोडेसे बोलायला तरी वेळ मिळेल .
आणि त्याच्या आणि मेघनाच्या भेटीची वेळ पुढे जाईल ...
काय आणि कसे हे विचार करीत ती तशीच बसून राहिली .
पोह्याचा घास पण घशाखाली उतरत नव्हता .
पोहे चहा थंडगार झाले तरी तिचे लक्षच नव्हते.
तसेच पोहे चिवडत ती बसली होती .
अचानक ती भानावर आली आणि तिने उठून गार चहा आणि पोहे तसेच कट्ट्यावर ठेवून दिले .
बाहेर येऊन ती बेडवर बसून राहिली .
घड्याळ बघितले तर दहा वाजायला आले होते .
अजूनही सतीशचा पत्ता नव्हता ..
फोन करावा का त्याला ...
पण नको इतकी उत्सुकता दाखवायला ..
खरेतर आत्ता मोहनशी बोलून तिला कदाचित बरे वाटले असते .
पण त्यानेच तर सांगितले होते ..
आज त्याची महत्वाची मिटिंग आहे असे
मग त्याला फोन करून डीस्टर्ब कशला करा ..
शिवाय तो मिटिंग मध्ये फोन नाही उचलत ..
विचारांच्या नादात घड्याळाचा काटा सरकत होता ..
अचानक तिचा फोन वाजला
फोन आत जेवणाच्या टेबलवर होता .
ती उठली आणि फोन घेऊन बाहेर आली
नंबर कोणतातरी अनोळखी वाटत होते पण तिने फोन उचलला
हेलो ..
तिकडून आवाज आला
हेलो आपण कोण बोलताय ?
आवाजात थोडी जरब वाटत होती
“मी रमा समर्थ बोलतेय ..
हे ऐकल्यावर पलीकडून आवाज आला
मादाम मी पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर जगताप बोलतोय.
पोलीस स्टेशनचे नाव ऐकल्यावर रमाच्या पोटात गोळा आला
आता हे काय नवीन ?
का बरे आला असेल आपल्याला पोलीस स्टेशनमधून फोन ?
सतीशने परत काही घोळ घातलाय की आणखीन काही वेगळे ..
तशीच चाचरत ती म्हणाली ..
“बोला साहेब ..
हे बघा आम्हाला एक फोन सापडला आहे त्यावरून शेवटचे दोन कॉल
आपल्या नंबर वर केलेले दिसत आहेत .
शिवाय फोनच्या मेसेजमध्ये आपल्या नावाच्या पत्त्याचा एक मेसेज पण आहे .
आपण जरा स्टेशनजवळील पोलीस स्टेशनवर येऊ शकाल का ?
हे ऐकल्यावर रमा बिचकली ..
खरेतर काल फोन सतीशचा आला होता .
पण यासाठी पोलीस स्टेशनवर बोलवायचे काय काम ?
पण आता पोलिसांशी कोण हुज्जत घालणार ?
शिवाय ही गोष्ट कुठे बाहेर सांगण्यात पण अर्थ नव्हता .
आयुष्यात एक दोनदा ती पोलीस स्टेशनला गेली होती
पण त्यावेळेस सोबत मोहन होता .
आता एकटेच पोलीस स्टेशनला जायचे या विचाराने तिचे पाय लटलट कापायला लागले .
पण काहीही इलाज नव्हता .
चटकन आवरून घराला कुलूप घालून ती बाहेर पडली .
आणि रिक्षात बसून पोलीस स्टेशनला आली .
तिने आपली ओळख पटवताच इन्स्पेक्टर म्हणाले
मादाम आता तुम्हाला सांगायला हरकत नाही आम्हाला पुणे स्टेशनवर एक मृतदेह
सापडला आहे .
बहुधा रस्ता ओलांडताना गाडीखाली ही व्यक्ती आली असावी .
भरपूर दारू प्यायलेली ही व्यक्ती
दारूच्या नशेतच रस्ता ओलांडत असावी ..
या व्यक्तीच्या सोबत कोणतेच सामान नव्हते
या व्यक्तीची ओळख पटावी असा काही पुरावा आम्हाला नाही सापडला .
पण त्याच्याजवळ जो फोन सापडला आहे त्यावर आम्हाला हे शेवटचे दोन कॉल दिसले.
आणि तुमचा पत्ता मिळाला .
यासंदर्भात आम्हाला बरीच माहिती विचारायची आहे
शिवाय मृतदेह तुमच्या ओळखीचा आहे का हेही पहावे लागेल .
तो सतीश होता की काय ?
पण त्याच्या सोबत कोणतेच सामान कसे काय नव्हते ..?
हे तिला काहीच समजत नव्हते
मृतदेह बघायचा आणि त्याची ओळख लागते का सांगायचे
हे ऐकुन तिच्या घशाला कोरड पडली .
इन्स्पेक्टरनी तिची अवस्था ओळखली आणि समोरच्या लेडी ऑफिसरला खुण केली .
तिने पाण्याचा ग्लास तिच्यापुढे सरकवला आणि म्हणाली.
“घाबरू नका मादाम...
कोणालातरी तुमच्या सोबत का नाही घेऊन आला तुम्ही .”
कोणाला आणणार होती ती ..
काही न बोलता तिने गटगट पाणी प्यायले ..
पाच मिनिटे उसंत दिल्यावर इन्स्पेक्टर म्हणाले
चला मादाम आत ..बघा डेड बॉडी ..
ती लेडी ऑफिसर सोबत आत गेली .
त्या खोलीत जाताच एक विशिष्ट घाण वास जाणवला
रमाने तोंडाला रुमाल लावला .
आतल्या मोठ्या कपाटाचा एक लांबलचक ड्रोवेर त्यांनी उघडला .
आत पांढऱ्या कापडात झाकलेला एक मृतदेह होता .
तिचे हृदय धडधड करायला लागले होते.
मनातल्या मनात ती देवाचा धावा करू लागली .
देवा हा मृतदेह सतीशचा नसू देत ....
पण तसे होणार नव्हते ..
मृतदेहाच्या तोंडावरचे कापड बाजूला केल्यावर रमाला दिसले
तो मृतदेह सतीशचाच होता .
तेच देखणे रूप ...
पूर्वीचा गोरापाण असलेला पण आता रापलेला चेहेरा .
खोल गेलेले आणि मिटलेले डोळे ..
कधीतरी भरदार असलेली अंगयष्टी आता कृश झाली होती .
आणि त्याची ओळख पक्की करणारा तोच तो उजव्या गालावरचा ठळक तीळ..
रमाला चक्कर आल्यासारखे झाले .
तिचा तोल गेला ..शेजारच्या लेडी ऑफिसरने तिला सावरले
आणि बाहेर आणले
खुर्चीवर बसवून परत पाणी पाजले .
सतीशला प्रत्यक्ष भेटायच्या तयारीत असलेल्या तिला त्याचा मृतदेह पाहायला लागला होता .
ती हुंदके देवून देवून रडु लागली ..
थोडी शांत झाल्यावर तिने इन्स्पेक्टरला सांगितले .
“साहेब हे माझे पती सतीश समर्थ आहेत
आज सकाळी ते आम्हाला भेटायला येणार होते “
आता ते कुठून येणार होते ?कुठे राहत होते ?असे असंख्य प्रश्न विचारले जाणार होते
पुढील पोलीसचौकशी सुरु होणार होती .
सतीशला प्रथम भेटल्यापासूनच्या आयुष्याच्या प्रवासाचा आज असा शेवट झाला होता .
त्याच्यामुळे शेवटपर्यंत तिला संकटांचा सामना करायला लागला होता .
पण त्याचा शेवट असा होईल असे तिला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.
तिला फोनवरचे त्याचे शेवटचे शब्द आठवले ..
“ मला माझ्या प्रिन्सेसला भेटायचे आहे ..
रमा होईल न ग तुम्हा दोघींची आणि माझी “पुनर्भेट” ?
तिच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहू लागले .
सतीशच्या मनात असलेली ती “पुनर्भेट” आता कधीच होऊ शकणार नव्हती .
समाप्त