वय, साधारण परिस्थिती समजण्या योग्य झाले आणि मनात अस्तित्वाच्या आगीचा भडका उडाला... काय बरे करावे की, हा समाज आपल्याला इतरांप्रमाणे मान्यता देईल..?? या आणि अशाच कित्येक प्रश्नांनी डोकं भारावून जायचं... कालांतराने समजू लागले की, आता इथून पुढे अशाच प्रश्नांच्या सोबतीने, संघर्ष करत जीवनाचा हा प्रवास हसत - खेळत जगूया... कुठेही तक्रार न करता, आपल्या परीने प्रयत्न करत, जे मिळेल त्यात समाधान मानायचे... म्हणून, सुरुवात झाली संघर्षमय जगण्याला...
घरची मंडळी समाजाच्या विचारांनी चालणारी त्यामुळे वेगळे विचार ठेऊन, मला त्रास होणार हे नक्की! पण, तरीही मी माझे विचार जपणार या आत्मविश्वासाने सुरुवात केली... सुरुवात करता क्षणीच मला समाज विघातक विचारांना बळी पडावे लागेल वाटले नव्हते... प्रश्न होता माझ्या पुढील शिक्षणाचा! एका सामान्य, गरीब म्हणण्यापेक्षा, कमकुवत विचारांच्या समाजात मुलींनी शिक्षण घेणं हे कुठल्याही आव्हानापेक्षा कमी नसतं! मग काय प्रत्येक तासाला माझा विरोध करणारे समाजाच्या दबावाखाली माझेच कुटुंबीय होते... समाज बोलतो म्हणून त्यांनी माझं मनोबल हलवण्याचा पूर्ण प्रयत्न केला... मी सुद्धा माझ्या विचार तसेच निर्णयांवर ठाम रहायचे ठरवून, पुढचे शिक्षण घेण्यासाठी जिद्दीने, सगळ्यांचा विरोध केला आणि प्रवेश मिळवलाच...
प्रवेश घेऊन जेव्हा महाविद्यालयात गेले तेव्हा तेथील मन मोहून टाकणारं दृश्य स्वतः कडे खेचत होतं... पण, त्याच्या आकर्षणापुढं माझी स्वप्न प्रबळ आणि तितकीच खरी असल्याने, मी त्यांच्यावरच पूर्ण लक्ष देण्यास सक्षम होते... बघता - बघता पदवीचं शिक्षण समाजाच्या दबावाखाली पूर्ण केलं... समोर अजुन पदव्युत्तर शिक्षण घ्यायची इच्छा घरच्यांपुढं बोलून दाखवली... विरोध होणार हे माहीत असून हिम्मत केली आणि निर्णय सांगून मोकळे झाले... या निर्णयासाठी काहीही सहन करण्याची ताकद माझ्यात मागील काही वर्षांपासून हळूहळू का होईना पण, रुजत होती आणि आज त्याच्याच बळावर स्वतः मी एकटी समाजाच्या कुचकामी विचारांना तोंड द्यायला तयार होते...
पदव्युत्तर शिक्षण हा एकमेव प्रश्न माझ्या पुढे एखाद्या अभेद्य डोंगरासारखा उभा होता... घरच्यांसमोर मात्र "माझं लग्न" हा एकमेव प्रश्न त्यामुळे त्यांनी त्यांची पूर्ण ताकद पणाला लावून मुलं बघायला सुरुवात केली... आता इथे एक समस्या म्हणा किंवा पूर्वग्रहदूषित मानसिकता ती म्हणजे, "तुम्ही खालच्या जातीचे असणे" मग तुम्ही उच्चशिक्षित असून देखील तुम्ही व्ययक्तिक रित्या त्याच जातीतील सामान्य व्यक्ती असता जिला, त्या जातपंचायतीने ठरवून दिलेल्या स्व: निर्मित नियमांमध्ये राहायचे असते... तुम्ही जर त्या नियमांचे उल्लंघन केले तर मग तुम्हाला तो समाज कधी वाळीत टाकतो तुमचं तुम्हालाच समजत नाही...
अशाच परिस्थितीत मी स्वतःला सावरत, जीवन जगत असताच, एक असं स्थळ मला सांगून आलं... ज्याची आधीच दोन लग्न झालेली... काळजात धस्स झालं... प्रश्न पडला की, आपण जो संविधान वाचला त्यात आपण कुठल्या तरतुदीत बसतो...?? कारण, संविधानाने नेमून दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्यात मी कुठेच बसत नव्हते... एकीकडे मनात असंख्य प्रश्न असतानाच, दुसरीकडे माझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या माणसासोबत माझं लग्न जोडलं गेलं... घरच्यांना स्वेच्छा सांगून ते ऐकणार नाहीत म्हणून, मी लग्नाच्या दिवशी सकाळी पळून जाण्याचा निर्णय घेतला... पळून जाण्यात यशस्वीही झाले... आपलं गाव सोडून दूर एका शहराच्या मध्यभागी येऊन पोहचले... इथे सगळेच अनोळखी... मी मला वाटेल तसं जगू शकणार होते... इथून एक नवीन सुरुवात माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरणार होती...
काहीच दिवसात हाताला काम शोधले... जिथं काम करायचे तिथंच जेवणाची व्यवस्था मालकाने केली होती... महिने गेले आणि मी हळुहळू स्थायिक झाले... पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठीची व्यवस्था केली आणि ठरवलं प्रवेश घेऊन, शिक्षण पूर्ण करूया... दोन वर्षात शिक्षण पूर्ण केलं सुद्धा... नंतर चांगली नोकरी मिळवली... सगळं सुरळीत असताच, कंपनीत घोटाळा प्रकरण उघडकीस आलं त्यात मला दोषी ठरवलं गेलं... निराश झाले... स्वतःवरील आरोप मिटवण्यासाठी खूप प्रयत्न केले... तब्बल तीन वर्षांनी न्याय मिळाला... त्या न्यायाच्या लढ्यात जी व्यक्ती नेहमी माझ्या सोबत खंबीर उभी होती... त्याच व्यक्तीशी लग्नगाठ बांधली...
वर्ष गेले दोन मुलं झाली... संसार सुखाचा असताच, विपरीत घडले आणि नवरा अपघातात गेला... खचले... प्रश्न परत उद्भवले ते म्हणजे अस्तित्वाचे...
मोठा श्वास घेतला आणि आजवर जे संघर्ष केले ते परत आठवले... मी कधीच हार मानली नव्हती... हलाखीच्या परिस्थितीत अस्तित्वाची झुंज सुरूच होती... मग आज एखाद्याच्या जाण्याने ती थांबावी, इतकी कमकुवत मी कधीच नव्हते...
परत, नव्या उमेदीने एक नवीन सुरुवात केली... आणि आजही अस्तित्वाची झुंज सुरूच आहे... पुढेही ती अशीच सुरू राहील जोपर्यंत या शरीरात प्राण असतील...🙂
काहींचं जीवन सोपं नसतं हे आज या जीवन प्रवासाने समजले... मन हेलावून टाकणारा हा जीवन प्रवास आपल्या भेटीला...
निरोप...🙏