प्रायश्चित्त - 1 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रायश्चित्त - 1

हिरव्या रंगाची छोटीशी टुमदार कौलारू बंगली. अंगणात हिरवळ. कम्पाऊंड ला रंगीत फुलांच्या गुच्छांनी लगडलेल्या वेली. चारी दिशांना नजर जाईल तिथपर्यंत उंचच उंच वृक्षांची रांग. मधूनच जाणारी छोटीशी पायवाट. अगदी निसर्गचित्रात दाखवतात तसंच होतं सगळं. सुंदर, देखणं. तिथे राहणारे दोघेही तसेच. शंतनू, उंचापुरा, धारदार नाकाचा , पाणीदार डोळ्यांचा, आणि शाल्मली, गुलाबी गोरी, बदामाकृती चेहऱ्याची, अपऱ्या नाकाची. नाजूक जिवणीची. हसली की गालांवर इतक्या गोड खळ्या पडत की पहाणाऱ्याला विसरच पडावा सगळ्याचा.

दृष्ट लागावी असंच सगळं. शंतनू उच्चशिक्षित, बड्या कंपनीत मोठ्या हुद्दयाची नोकरी. शाल्मली ही उच्चशिक्षित पण नोकरी न करणारी. लग्न करताना त्याने तसं आधीच सांगितलं होतं. तिलाही त्यात काही वावगं वाटलं नव्हतं. शिवाय त्याच्या हुद्द्याला साजेशा पार्ट्या ऑरगनाईज करणे, उत्तम पद्धतीने पाहुण्याना एंटरटेन करणे, घरादाराची नीट काळजी घेणे, ही वरवर साधी वाटणारी पण त्याच्या स्वत:च्या आणि नोकरीच्या दृष्टीने लांबवर परिणाम करणारी कामे ती लिलया पार पाडत होती. त्याला तिचा , तिच्या सौंदर्याचा सार्थ अभिमान होता. कोणत्याही पार्टीत हे दोघे आले की सर्वांच्याच नजरा यांच्याकडे वळत आणि त्याची आधिचीच रूंद छाती अधिकच रुंदावे. सहकाऱ्यांच्या डोळ्यातील हेवा त्याला सुखावून जाई.

ही बंगली थंड हवेच्या ठिकाणी खास विकत घेतलेली, सुटीचे दिवस निवांतपणे घालवण्यासाठी. शहरात मात्र पेंटहाऊस होते. सर्व सुविधांनी सुसज्ज. सध्या दोघे आठवडाभरासाठी आले होते इथे. लग्नानंतर ही हनीमून ला इथेच आलेले. शंतनू म्हणालेला “तुला अख्खं जग फिरवेन. पण आत्ताचे हे सोनेरी दिवस उगाच प्रवासात आणि फिरण्यात कशाला वाया घालवायचे?” शाल्मलीनेही लाजून होकार भरला होता. तेव्हाच्या सोनेरी सुगंधी आठवणी अजूनही दोघांच्या मनात ताज्या होत्या. ते दिवस पुन्हा नव्याने जगण्याची ओढ दोघांनाही होती.

दुपारचा चहा घेत दोघे बसले असता, शंतनू अचानक म्हणाला, "मुलगाच हवा. एकच मूल हवय मला. अतिशय पद्धतशीरपणे वाढवायचं त्याला. त्याच्याकडे पाहूनच लोकांनी माझ्या भाग्याचा हेवा करायला हवा." शाल्मली क्षणभर पाहतच राहिली. मग म्हणाली “दोन हवीत मग, कारण मला मुलगी हवीय." "वेडी आहेस का? एक मूल झाल्यावर बाई परत लगेच स्वत:ला पूर्ववत शेपमधे आणू शकते. दोन पोरं झाल्यावर मात्र संपलंच तारूण्य तुझं, लक्षात ठेव, मला बेढब बायको मुळीच नकोय हं." असं म्हणून तो नेहमीप्रमाणे गडगडाटी हसला. पण नेहमीप्रमाणे आज मात्र ती सहभागी नाही होऊ शकली त्याच्या हसण्यात. अज्ञात शंकेची पाल चुकचुकली तिच्या मनात.

त्यानंतर परत तो विषय निघालाच नाही. राहिलेले दिवस मस्त एन्जॉय करून दोघे शहरी परतले.

शंतनू , एकुलता एक, लाडाकोडात पण शिस्तीत वाढलेला. मनात येईल ते मिळत असतानाच यश मिळालंच पाहिजे हे मनावर बिंबवलं गेलेलं. त्यानेही जिद्दीने ते मिळवलेलं. स्वत:च्या कतृत्वावर प्रचंड विश्वास. ‘लाथ मारेन तिथे पाणी काढेन’ हा आत्मविश्वास आणि त्याला अफाट महत्वाकांक्षेची जोड.

शाल्मली शांत, काहीशी अबोल. निसर्ग, प्राणी, पक्षी, यांत रमणारी. भावंडात मधली आणि कदाचित म्हणूनच समजूतदार.

आई म्हणे, “ही माझी पोर पाण्यासारखी आहे ज्यात मिसळेल तो रंग, गंध, चढेल तिच्यावर.” तसंच झालं. एकदा मनाने आपलं म्हणल्यावर तिने त्याची सगळी स्वप्नं आपली मानली. त्याच्या प्रगतीला पोषक, जे जे गरजेचे होते ते ते करत राहिली. स्वत:ची आवड निवड संपूर्ण बाजूला ठेवून त्याच्या स्वप्नात रममाण झाली. हे करत असताना मनात कोणतीही असमाधानाची भावना नव्हती, कारण तिने स्वेच्छेने हे करायचं ठरवलं होतं. शिवाय तो ही सर्वतोपरी जपतच होता तिला.

शहरातल्या घरच्या गच्चीत तिने छोटीशी बाग केली होती. तिने विषय काढल्याबरोबर शंतनूने तिला ऑनलाईन, झाडं, खतं, अवजारं खरेदीच्या साईट्स, वगैरे सगळं दाखवलं, तसंच लगेच माळ्याची अॅड देऊया म्हणाला. ती म्हणाली "बघते रे मी. तू नको टेंशन घेऊस." मग एक दिवस ती मोहिमेवर निघाली. सोसायटीच्या माळ्याला हाताशी धरून काही फांद्या, रोपं, बिया घेऊन आली. शेजारच्या नर्सरीतून मातीच्या कुंड्या आणल्या. आणि पद्धतशीरपणे मांडी घालून कुंड्या भरण्याच्या कामात गढून गेली. हा आला तेव्हा त्याला ती अशी दिसली , जमिनीवर बसलेली , हात चिखलात, आसपास फांद्या, रोपं, पसरलेली.

"अगं काय हे दरिद्री शौक तुझे? माळ्याला बोलवून करून घे ही घाणेरडी कामं. कसला भयंकर वास आहे त्या मातीचा? छ्या! उठ, उठ, हात धुऊन घे."

शाल्मली प्रथम दचकलीच. 'केवढ्यांदा ओरडला हा.' मग तिने शांतपणे सगळा पसारा आवरला. हातपाय स्वच्छ केले आणि चहा करायला गेली. मनात म्हणाली 'मातीत हात कोपरापर्यंत बुडवून काम करण्याची मजा तुला नाहीच कळायची!'

मग हळू हळू तिला शंतनूच्या स्वभावातले असे अनेक कंगोरे दिसू लागले जे आधी कधीच जाणवले नव्हते.

सुट्टीवरून परत आले दोघे. बाथरूम च्या खिडकीत बाहेरच्या बाजूला कबुतराने घरटं करून पिल्लं नुकतीच अंड्यातून बाहेर पडून चिवचिवत होती. शाल्मली बाहेर येऊन म्हणाली "अरे बघ तरी केवढीशी आहेत ती कबुतराची पिल्लं"

"कबुतर? कुठाय? काय वैताग आहे?" असं म्हणत त्याने एका झटक्यात काचेची खिडकी बाहेर ढकलली. "अरे अरे पिल्लं, पडलं ना घरटं खाली, अरे मेली ना रे, एवढेसे जीव ते," तिच्या आवाजात राग, संताप, दु:ख, अगतिकता, सगळंच दाटून आलं. चेहरा आक्रसून गेला. "का केलंस असं? "

"इमोशनल फूल, अगं कसली घाण करतात ही कबुतरं! "

"अरे , कबुतरांना हुसकावून लावणं निराळं आणि त्यांच्या पिल्लांना मारून टाकायचं म्हणजे? "

"ए, अगं, चल, सुट्टीचा शेवटचा दिवस, चल तुला मस्त बाहेर जेवायला घेऊन जातो, मॅडम चा मूड एकदम बदलेल."

तिने नुसतं त्याच्याकडे पाहिलं. कुठेतरी काहीतरी चुकतच होतं.

आत आत कुठेतरी काहीतरी तुटत तुटत गेलं तिच्या. कसं समजवायचं? इतकी कशी संवेदनशीलता कमी? एक ना अनेक प्रश्नांनी काहूर माजवलं तिच्या मनात.

"घरीच करते काहीतरी. आता बाहेर नको." ती एवढंच बोलून किचन कडे वळली.

त्याच्या दृष्टीने विषय संपला होता. शीळ घालत तो बाहेर आला.

कबुतरीण खिडकीजवळ येऊन जोरजोरात पंख फडफडवू लागली!

फेकले गेलेले कोवळे जीव, पिलांसाठी तडफडणारी कबुतरांची जोडी, आणि त्याची क्रूरतेकडे झुकणारी असंवेदनशीलता....... सगळंच जसं दाटून आलं तिच्या मनात.

दुसरे दिवशी नेहमीचं रुटीन सुरू झालं पण हिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. असं कसं चालणार, हा प्रश्न भेडसावत होता. ‘कसं समजंवावं? काय सांगावं?’

असेच काही दिवस गेले. कामात पूर्णपणे बुडालेल्या शंतनूला हिच्यातला बदल कळत नकळत जाणवला पण कामाच्या रेट्यात तो विसरूनही गेला.

अचानक एक दिवस तो ऑफिसला गेल्यावर हिला अस्वस्थ वाटू लागलं, काही सुचेना. फोन करावा का ? पण नकोच. कामात असेल. ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि डॉक्टरकडे गेली.

डॉक्टरांनी काही टेस्टस् सांगितल्या करायला. नर्सने सॅम्पल्स घेतली. बाकी तपासणी झाली. संध्याकाळी फोन केलात तरी चालेल , फोनवरच बोलू म्हणाले.

ही घरी आली. अशक्तपणा वाटतच होता. झोपून गेली.

जाग आली तेव्हा जोरजोरात बेल वाजत होती. उठून दार उघडेपर्यंत तो स्वत:कडच्या किल्लीने लॅच उघडून आत आला.

आल्या आल्या चक्क त्याने तिला उचलून घेतले आणि गरगर फिरवले. मग अलगद खाली ठेवून म्हणाला "डॉक्टरांचा फोन आला आणि निघालोच. मला का नाही फोन केलास? मला तुझ्या तोंडून ऐकायला आवडलं असतं ना. आणि एकटी का गेलीस? मी नसतं का नेलं? "

हिला प्रथम काही कळेचना. मग म्हणाला "मुलगाच ना? " आणि हिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. "अरे कसं शक्य आहे? परवा परवा तर...... " मग लक्षात आलं महिना केव्हाच उलटून गेला. आपलं लक्षच कुठे होतं."काय म्हणाले डॉक्टर? "

"हेच की मि. राजाध्यक्ष अभिनंदन! तुम्ही बाप होणार आहात."

त्याचं हास्य रुंदावलं. हिलाही काय बोलावं कळेना. मनात हरखूनच गेली. त्याने जवळ घेतली, म्हणाला "आता अजिबात हालचाल करायची नाही. सगळ्या कामाना बाई लाव. मी आठवड्यातून तीन दिवस घरून काम करेन. मला डे वन पासून माझ्या मुलाबरोबर राहायचय. ही शुड नो ही ईज माय सन! "

इतक्या दिवसाचं मळभ काही प्रमाणात का होईना मनावरून दूर झालं.

"उद्याची अपॉईंटमेंट दिलीय डॉक्टरांनी. आपण जाऊ. मी रजाच टाकलीय दोन दिवस."

लहान मुलासारखा तो तिच्या अवती भवती करत होता. "आज तुझं काही ऐकणार नाही मी. मस्त बाहेर पडू. तुझ्यासाठी शॉपिंग करू. मग मस्त कुठेतरी डिनर !"

शाल्मली नुसती पाहत राहिली. सुखावत राहिली. शंका कुशंका निवल्या. परत सगळं जग सुंदर भासू लागलं.

दुसरे दिवशी डॉक्टरांनी नीट समजावून दिलं सगळं. काय काळज्या घ्यायच्या, खाणं, पिणं, औषध पाणी, डूज आणि डोन्टस्.

हा सगळं टॅबवर नोट डाऊन करत होता. हिला हसूच येत होतं, जसं काही हे एक प्रोजेक्टच होतं त्याच्यासाठी. पण सगळ्यात महत्वाचं प्रोजेक्ट.

रात्री सगळ्यांना फोन केले यानेच उत्साहाने. आपल्या आईवडिलांना, तिच्या आईवडिलांना! सगळीकडे आनंदी आनंद होणं स्वाभाविकच होतं.

लगेच सगळे येऊन भेटून गेले. आई म्हणाली "थोडे दिवस नेते हिला घरी."तर म्हणाला, "तुम्हीच रहा इथे. मलाही माझ्या मुलाबरोबर राहायचय." सगळ्यांना जावयांचं कोण कौतुक वाटलं. आई राहिली काही दिवस. जावयाचं मुलीवरचं प्रेम पाहून भरून पावली. माझ्या गुणी मुलीला अगदी योग्य साथीदार मिळाला असं जाऊन सगळ्यांना सांगू लागली.

दिवस कसे पंख फुटल्यासारखे भराभर ऊडून गेले. बघता बघता सातवा महिना लागला. “आतातरी नेते” म्हणाली आई. त्यावर "तुम्ही इकडे येऊन रहा. इथे उत्तम सोय आहे " असं म्हणाला. लाडक्या जावयाचं मन मोडणं शक्यच नव्हतं. आई येऊन राहिली.

आता बाळाच्या लाथांनी ही हैराण होत होती. डॉक्टरांनी सोनोग्राफी करताना याला आत बोलावून बाळ दाखवलं तेव्हा लहान मुलासारखा हरखून गेला. मग डॉक्टर बाहेर गेल्यावर त्याने नर्सबरोबर काही बातचित केली आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.

गाडीत बसल्या बसल्याच म्हणाला हळूच कानात "मुलगाच आहे." ही आश्चर्याने पाहू लागली. "तुला कसं कळलं? "

" मला मागच्या वेळेसच कळलेलं. तुला आज सांगतोय. नर्सला पैसे देऊन ठेवलेले मी हे सांगण्यासाठी. " " आणि मुलगी असती तर काय फरक होता? बाळ सुखरुप असणं महत्वाचं."शाल्मली म्हणाली

"मुलगाच होणार माहित होतं मला." शंतनू हसत हसत म्हणाला.

तिने पुढे विषय वाढवला नाही.

दिवस भरत आले. आता जरा ती जडावली. कधी मोकळी होतेय असं झालं तिला. हा जीवापाड जपू लागला.

दिवस भरण्यापूर्वी च काही दिवस पोटात दुखायला लागलं म्हणून हॉस्पिटलमधे गेले तर डॉक्टर म्हणाले काही तासात होईल मोकळी. मग जरा गडबड झाली. पण सुखरुप सुटका झाली. गोजिरवाणं बाळ नर्सने हातात दिलं तेव्हा काय वाटलं ते सांगणं तिला कधीच जमलं नसतं बहुतेक. हा लहान मुलासारखा हरखला. सगळ्यांना फोन करून झाले. मित्रांनी ओढून सोबत नेले.

आई हिच्या सोबत होतीच.

सर्व डॉक्टर्स नी हिला आणि बाळाला तपासलं. ऑल वेल म्हणाले.

बाळाच्या जावळावर हात फिरवताना तिचा उर भरून आला. जगातल्या अत्युच्च आनंदाची ती धनीण होती आज.

रात्री दोघही छान झोपली. पहाटे अचानक कसला तरी जोरात आवाज आला आणि ही दचकून उठली. बाळ मात्र शांत झोपलं होतं. हिला हायसं वाटलं.

मित्रांच्या तावडीतून सुटका करून घेत हा रात्री हॉस्पिटल मधे आला पण आईने त्याला घरी जाऊन विश्रांती घेण्यास सांगितले.

दुसरे दिवशी परत डॉक्टरांची टीम राऊंड ला आली. बाळ झोपलेलं. एका नर्स ने चुकून पाळण्याशेजारी पाण्याचा ग्लास पाडला. जोरात आवाज झाला. बाळ दचकेल असं वाटून आई पट्कन पाळण्याजवळ गेली पण बाळ शांत झोपलेलं. मुख्य डॉक्टरांची नेत्रपल्लवी झाली. पण ऑल इज वेल असं म्हणत ते बाहेर पडले.

डॉक्टर बाहेर पडल्या पडल्या आईने आणखी मोठा आवाज पाळण्याजवळ स्टूल आपटून केला. परत परत केला. बाळ जराही चाळवलं नाही. शांत झोपलेलं होतं. आईने त्याच्या कानाशी टाळ्या वाजवल्या, जोरजोरात डब्यावर चमचा आपटून पाहिला. एव्हाना हिला साधारण कल्पना आली. आई नक्की काय तपासत होती ते. जीवच धास्तावला तिचा.

तिने डॉक्टरांना ताबडतोब बोलावून घेण्यास नर्सला सांगितले. डॉक्टर आल्यावर तिने सरळच विचारले, तेव्हा डॉक्टर घसा खाकरत म्हणाले हो तशी थोडी शंका वाटतेय पण एकदम निष्कर्ष नाही काढता येणार. मी तज्ञाना बोलावलय. दुपारपर्यंत येतील ते. पण बाळाला ऐकू येत नाही हे ती कळून चुकली. तिची बाळावरची माया अधिकच दाट झाली.

तज्ञ आले, त्यांनी तपासले, “प्राथमिक तपासणीत काहीतरी श्रवणात बिघाड आहे पण आत्ताच काही नक्की निष्कर्ष नाही काढता येणार. इट्स टू अरली” म्हणाले. ‘शिवाय काही समस्या असेलच तर हल्ली अनेक उपाय आहेत’ हे ही सांगून गेले.

हिचा जीव अधिकच धास्तावला. तिने पाळण्यातून बाळाला आपल्या कुशीत घेतले. आता ती त्याला क्षणभरही दूर ठेवण्यास तयार होईना.

विचार करता करता तिचा डोळा लागला. जाग आली ती कोणाच्या तरी जोरजोरात ओरडण्याने. मग लक्षात आलं हा तर शंतनू चाच आवाज. हडबडून उठली. तेवढ्यात तावातावाने ओरडत हा पुढे आणि डॉक्टर्स मागे असे खोलीत शिरले.

“काय करता काय तुम्ही डॉक्टर्स? असं होऊच कसं शकतं? तुम्हीच हलगर्जीपणा केलाय काहीतरी. सोडणार नाही मी तुम्हाला. खडी फोडायला पाठवेन!”

“अरे शांत हो. शांत हो. काय करतो आहेस?”

“अगं काय सांगताहेत बघ, माझ्या मुलाला हियरींग इमपेअरमेंट असू शकते म्हणे! कशी असेल? यांनीच काहीतरी गडबड केली असणार डिलीव्हरीच्या वेळेस. सोडणार नाही मी यांना. चल निघुया आपण.”

“अरे थांब. असा आततायीपणा करू नकोस. आई त्याला घरी ने.”

शेवटी कसाबसा आईने त्याला घरी नेले. इकडे डॉक्टरांनी तिला बऱ्याच गोष्टी समजावल्या. टेस्टस् बद्दल माहिती दिली. कधी करायच्या वगैरे समजावून सांगितलं.

शेवटी बऱ्याच टेस्टस नंतर डिस्चार्ज मिळाला. आई न्यायला आली. गप्प गप्पच होती. दोघी ड्रायव्हर बरोबर घरी आल्या.

इकडे सासुसासरे, वडिलही पोहोचले होते. सगळ्यांचे चेहरे उतरले होते. शंतनू कुठे दिसत नव्हता. ‘ऑफिसमधे जावं लागलं’ असं मोघम म्हणाल्या सासूबाई. शाल्मली पण दमली होती. जाऊन झोपली . बाळ ही झोपलं होत रस्त्यातच.

जाग आली तेव्हा तिला आईच्या मुसमुसण्याचा आवाज आला. सावकाश उठून बाहेर येत होती तेवढ्यात आईचे शब्द कानी आले, "माझी पोर जीवंतपणे मरण भोगेल हो अशाने. "

क्षणभर हिला काहीच अर्थबोध होईना. तेवढ्यात त्याचा आवाज आला, "दुसरं मूल झालं की सावरेल ती. मी हे असं बधीर मूल मुळीच इथे ठेवून घेणार नाही. सगळे कीव करतील माझी. आजपर्यंत लोकांनी फक्त हेवा करावा असाच जगलोय मी. आता हे गालबोट नकोय मला. बाळंतपणात बाळ गेलं असं सांगेन मी. तुम्ही त्या पोराला न्या तुमच्या बरोबर. जितकं लवकर न्याल तेवढी लवकर विसरेल ती त्याला. त्याची सगळी आर्थिक जबाबदारी माझी. पण बाकी कोणताही संपर्क नकोय त्याचा."

ही दारातच थिजली.

कबुतराची निष्पाप पिल्लं आठवली तिला. केवळ घाण होते म्हणून ढकलून दिलेली याने खाली. तेव्हाच कळायला हवं होतं आपल्याला.

शांतपणे बाहेर आली. हा झट्कन पुढे झाला. "अगं तू का उठून आलीस? मला हाक मारायचीस ना? उगाच दगदग करू नकोस."

तिने एकदा नजर फिरवली सगळ्यांवरून. तिच्या नजरेतला अर्थ समजून सर्वांनीच माना खाली घातल्या.

मग त्याच्याकडे वळून म्हणाली, "मी आईबाबांबरोबर जातेय, कायमची, बाळाला घेऊन. तुझ्यासारख्या माणसाची सावलीही नकोय पडायला मला माझ्या बाळावर. त्याचं दुर्दैव की तो तुझे जीन्स घेऊन जन्मला. पण यापुढे नकोय तुझा सहवास त्याला मिळायला."

“अगं काहीही काय बोलतेस? तू मला सोडून जाणार? लोक काय म्हणतील? आपण त्याला उत्तम शाळेत घालू. तुझे आईवडील असतीलच. बस फक्त इथे आपल्या बरोबर नको म्हणतोय मी.”

ती अचानक खदखदून हसली. सगळेच दचकले.

"घाबरू नका. डोक्यावर परिणाम नाही झाला माझ्या. आज खरी बरी झाले मी याच्यावरच्या प्रेमाच्या आजारातून. अरे तुला कळतंय का? समस्या माझ्या बाळात नाही. समस्या तुझ्या मानसिक जडण घडणीत आहे. तुझा बुध्यांक फक्त वाढीव आहे. तुझी भावनिक वाढ झालीच नाही कधी. बाग सुंदर हवी, पण हात नाही घाण करायचे.बायको सुंदर राहावी म्हणून एकच मुल हवं. लोकांनी हेवा करावा म्हणून मुलगाच हवा , तो ही हुशार, देखणा, सर्वगुणसंपन्न. जरा घाण करतात म्हणून तू कोवळ्या पिलांना मारून टाकायला मागे पुढे नाही पहाणार. मुलगा, जो येणार म्हणून नाचत होतास कालपर्यंत तो केवळ कर्णबधीर असण्याची शक्यता निर्माण झाली तर कायमचा तोडायला तयार त्याच्याशी नातं?”

“सोनोग्राफीत मुलगी आहे असं कळलं असतं तर तो जीव जगात येण्यापूर्वीच मारून टाकला असतास कदाचित.

खरं सांगू तुझा राग नाही येत मला. कीव वाटतेय. जी कीव लोकांनी करू नये म्हणून आटापिटा चाललाय ना ती कीव आज तुझ्या बायकोलाच तुझ्याबद्दल वाटतेय. तुला मानसोपचाराची गरज आहे. तो उपचार तू घ्यावास. आज तुझे सगळे विचार 'मी', "माझे," "मला," या तीनच गोष्टींभोवती फिरताहेत. घाण्याच्या बैलासारखा फिरतो आहेस गरगर गरगर यांच्याभोवती. या तीन गोष्टीतून बाहेर पड आणि बघ कितिक खऱ्या सुंदर गोष्टी दिसतात ते.”

“बाबा गाडी बोलवा भाड्याची. लगेच निघू. काळजी करू नका. मी खंबीर आहे माझ्या बाळाला उत्तम आयुष्य मिळवून द्यायला.”

सासू सासऱ्यांकडे वळून म्हणाली “बघा सांभाळता आलं याला तर.”

तिने झिडकारल्याचा अपमान, ती सोडून जाण्याने होणारी मानहानी, दुखावलेला इगो, आणि हिच्याशिवाय राहण्याच्या कल्पनेने आलेली अगतिकता , सरसर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले.

आपण केलेल्या चुका, हो आज प्रथमच त्याला त्या चुका वाटल्या, त्यांची जाणीव , मन जाळत गेली. आता ती निर्णय बदलणार नाही हे ही लक्षात आलं त्याच्या. क्षणात आपण सगळंच गमावलंय ही समज आली. पण आता खूप उशीर झाला होता. शिवाय अजूनही मूकबधीर मुलाला 'आपला' म्हणून वाढवण्याची तयारी नव्हतीच मनाची .