प्रायश्चित्त - 10 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रायश्चित्त - 10

शाल्मली ने एक भला मोठा निश्वास सोडला. तेवढ्यात रिसेप्शनिस्टने तिला बोलावले. आता मात्र शाल्मलीने त्याला कडेवर घट्ट पकडून ठेवले. रुम अलॉट झालीच होती.

“तुम्ही रुम मधे बसा. टेस्टस साठी बॉय घ्यायला येईल तेव्हा जा त्याच्याबरोबर. पैसे डिसचार्ज च्या वेळी घ्यायला सांगितलेत डॉक्टरनी.”

शाल्मली काही न बोलता वॉर्ड बॉय बरोबर गेली रुममधे. इथे मात्र सर्व शांत होतं. पंचतारांकित हॉटेलची रुम वाटत होती ती हॉस्पिटल रुम पेक्षा.

भिंतींवर मस्त निळ्या लाटा, त्यात रंगीत मासे असं सुंदर चित्र रंगवलं होतं. खिडक्यांचे पडदेही कार्टूनच्या चित्रांचे फार भडक नव्हेत पण प्रसन्न रंगांचे. दोन नवी कोरी टॉईज कॉटवर मांडलेली. बेडशीट वरही भावल्यांची चित्र. उशीला आकार टेडीचा.

श्रीश हरखूनच गेला सगळं पाहून. मग त्याच्यासाठी मेन्यू ठरवायला डाएटिशियन आली. तिने पंचतारांकित मेन्यू त्याच्या आवडी निवडी विचारून ठरवला.

“मॅम, डेझर्टला हाफकुक्ड ॲपल विथ सिनॅमन स्प्रिंकल पाठवते. श्रीश वुड लव्ह इट.”

शाल्मली मनातल्या मनात हसली.

श्रीश जेवून झोपून गेला. मग शाल्मलीने तिचा घरून आणलेला डबा खाल्ला.

ती ही मग जरा शेजारच्या बेडवर आडवी झाली.

तेवढ्यात दारावर टकटक झाल्यासारखं वाटलं. बॉय आला की काय टेस्ट ला घेऊन जायला? झोपमोड झाली तर कुरकुरत राहिल दिवसभर. सांगावंच त्याला जरा नंतर ये म्हणून.

उठून तिने दार उघडले तर दारात शंतनू उभा!

शाल्मलीच्या पायातलं अवसानच गेलं. खरंतर तिला दरवाजा लावून घ्यायचा होता त्याच्या तोंडावर पण ती इतकी अवाक झाली होती की काही करण्यापूर्वी तो आतही आला होता.

शंतनू आत आला आणि श्रीशला निरखत बराच वेळ उभा राहिला . स्वत:ला कसंबसं सावरत ती आत आली.

“तू का आला आहेस इथे?” प्रचंड तिरस्काराने शाल्मलीने विचारले.

“अं, हं, हो, बोलायचं होतं तुझ्याशी.”

“तू आधी बाहेर हो खोलीच्या!” शाल्मली कडाडली. “माझ्या मुलाच्या जवळपासही फिरकू नकोस तू. समजलं. गरज पडली तर पोलीस बोलावेन मी, लक्षात ठेव.” संतापाने थरथरत होती ती.

“शाल्मली , माझं एकदा....”

“माझं नावही काढायचं नाही तोंडातून... आऊट...जस्ट गेट आऊट”

तिचा तो अवतार बघून शंतनू हबकलाच. काही न बोलता बाहेर पडला. शाल्मली ने दार घट्ट लावलं श्रीशजवळ येऊन ती त्याला कुशीत घेऊन रडत राहिली कितीतरी वेळ.

संताप, आश्चर्य, भीती, तिरस्कार पराकोटीची विषण्णता, अनेक भावना गर्दी करून आल्या मनात.

बराच वेळाने दार वाजलं. परत भीतीचं सावट मनावर आलं. प्रथम तिने दार किलकिलं करून पाहिलं. मगाचाच बॉय होता. ‘अर्ध्या तासाने नंबर लागेल बोलवायला येतो’ असं सांगून गेला. मग तिने त्या वॉर्ड मधल्या मुख्य नर्सची आणि हाऊसमन डॉक्टरची भेट घेतली. कोणीही परमिशन शिवाय आत येऊच कसं शकतं असं विचारलं. ‘खरंतर नाहीच येऊ शकत अटेंडन्ट पास शिवाय,’ ते दोघही म्हणाले. “किंवा विजीटर्स पास शिवाय. पण ते फक्त विजीटींग अवर्स मधे. बघुया नक्की काय झालय.” तो तरूण डॉक्टर म्हणाला. नर्स तिच्याबरोबर रुममधे आली . म्हणाली “मॅम, कुछ भी प्रॉब्लेम हुआ ना तो ये बेल का बटन दबानेका. तुरंत कोई तो आयेगा. डरना नही. हम यहीं है सब. मै सेक्युरिटीसे बात करूंगी ना. उनके पास कितने पास दिया उसका रेकार्ड रहता.”

शाल्मली ला ती केरळी नर्स आपल्या खास हिंदीत आश्वस्त करत राहिली.

काही वेळाने श्रीश जागा झाला. त्याच्यासाठी डाएटिशियनने हॉट चॉकलेटचा ग्लास पाठवला. तो पिऊन तो खुशीत आला.

तेवढ्यात वॉर्डबॉय आला. त्या दोघांना घेऊन तो पहिल्या मजल्यावरच्या एका रुममधे गेला. तिथे एका नर्सने मोठ्या खुर्चीत फिट होणारी बेबी चेअर ठेवून, त्यावर श्रीश ला बसवले. मग ती म्हणाली, “मॅम मी आता बेबीचे केस कापणार आहे. तुम्हाला आधी कल्पना देते. कानाच्या मागून साधारण चार इंच दोन्ही बाजूने पूर्ण शेव्ह करणार. मग वरचे ही बरेचसे केस कमी करूया म्हणजे इक्विपमेंट मधे केस अडकणार नाहीत. फक्त क्राऊनवर ठेवते दाट केस. मस्त स्टाईल होईल.”

शाल्मलीने श्रीशच्या वाढलेल्या जावळातून ममतेने हात फिरवला. आई ९व्या १० व्या महिन्यापासूनच मागे लागली होती जावळ करुया बाळाचं. पण बाकीच्या गडबडीत राहूनच गेलं होतं.

“डोन्ट वरी मॅम. इट विल बी ऑल राईट. अवर हॅंडसम बॉय विल लुक वेरी हॅंडसम आफ्टर हेअर कट.” ती श्रीशकडे समोरच्या आरशात पाहून हसली. श्रीशनेही तिला त्याचे किलर स्माईल दिले.

“ओह, सो स्वीट! आय हॅव ऑलरेडी लॉस्ट माय हार्ट टू दॅट किलर स्माईल.”

शाल्मली ला तिच्या या बोलण्यावर मात्र हसायला आलं.

मग सराईतपणे तिने कात्री चालवायला सुरवात केली. कुरळ्या मऊशार जावळाच्या बटा ... शाल्मलीने काही हातात धरल्या. हळू हळू श्रीशचा चेहरा वेगळा दिसायला लागला. मग तिने सावकाश नाजूकपणे इलेक्ट्रिकल ट्रीमर ने कानांच्या मागच्या बाजूने सगळे केस बारीक कापून घेतले, आणि शेवटी शेव्हरने सावकाश तेवढ्या भागांचा गुळगुळीत गोटा केला. आजकाल कॉलेजची मुलं फॅशन म्हणून करतात तसाच तो कट दिसत होता. श्रीश ने खूपच चांगले सहकार्य केले असं ती नर्स म्हणाली.

मग तिने कसली कसली लोशन्स लावली श्रीशच्या कानामागे.

किती वेगळं दिसायला लागलं पिल्लू!

तिथून बॉय तिला दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेला. तिथल्या लॅब टेक्निशियन्स नी काही मेजरमेंटस घेतली. श्रीश कडे पाहून कोणीही हसलं, नाही हसलं, तरी तो गोड हसायचा आणि समोरच्याला पटकन आपलसं करायचा.

“काय चॅम्प? मज्जा आहे तुझी. कसला भारी हेअरकट हं?” टेकनिशियन ने मापं घेताना श्रीशकडे पाहत म्हटलं आणि छान ची खूण केली. श्रीश ने सगळं कळल्यासारखं गोड हसून प्रतिसाद दिला.

आणखीही दोन ठिकाणी असंच काही ना काही करण्यासाठी बॉय त्या दोघांना घेऊन गेला. मग सगळं झाल्यावर ती म्हणाली मला डॉक्टर समीरना भेटायचय. त्याने तिथूनच समीरच्या सेक्रेटरी ला फोन लावला. समीरने फोन शाल्मलीला द्यायला सांगितला.

“सॉरी शाम, आधीच येऊन भेटणार होतो पण ओटी त अडकलो जास्तच. आताही एक इमर्जन्सी कॉल आहे. तू रुमवर थांब मी येतो सगळं झालं की. बाकी काही प्रॉब्लेम नाही ना?”

“अं, तू ये मग बोलू.”

“ठीक आहे. एनिथींग अर्जंट?”

“नाही. ये तू आवरून सगळं.”

“ओके, बाय.”

“बाय.”

मग वॉर्ड बॉय त्यांना वॉर्डमधल्या रुम मधे सोडून गेला. अजून अख्खी संध्याकाळ बाकी होती. मग तिने नर्स ला विचारले “अजून काही टेस्टस करायच्या आहेत का?”

नर्स म्हणाली “नाही. अभी रिलॅक्स करो मॅम. कल सुबह जल्दी उठकर बेबी को तैयार करने के लिये ओटी में लेके जाएंगे.”

मग ती म्हणाली “मी याला जरा फिरवून आणते खाली. डॉक्टर आले की फोन कर मी लगेच येते.”

मग तिने बूट घातले श्रीश च्या पायात. दोघं निघाली. चालता यायला लागल्यापासून श्रीशला कडेवर बसायला अजिबात आवडायचं नाही. सारखं पळत सुटायचा. त्याला आवरताना शाल्मलीची दमछाक व्हायची. आत्ताही लिफ्टजवळ आल्यावर तिने उचलून घेतलेलं त्याला आवडलंच नव्हतं. पण लिफ्ट सुरू झाल्यावर गप्प राहिला कडेवर.

लिफ्टमधून बाहेर पडल्यावर मात्र उसळी मारू लागला. तिने घट्ट पकडूनच ठेवलं त्याला.आवारात एक मंदिर होतं तिथे गेली दोघं. तिथे मात्र खाली सोडलं तिने त्याला. तेवढ्यात केतकी आली पळत पळत. श्रीशला बघून खूश झाली. “आंटी हेअरकट मस्तय श्रीशचा.” शाल्मली ला हसू आलं. श्रीश पण खूश झाला तिला बघून. पळापळी करू लागली दोघं. शाल्मली जवळच थांबली दोघांच्या. केतकी श्रीशच्या केसांवरून हात फिरवायची आणि तो खिदळायचा. एवढाच खेळ सुरू राहिला मग किती वेळ. लहान मुलांना आनंदी राहायला किती थोडसं कारण पुरतं. शाल्मलीला वाटलं.

तेवढ्यात केतकीच्या बाबाची हाक ऐकू आली आणि पाठोपाठ तो ही आलाच तिथे. “चल तुला घरी सोडून येतो.”

“थांब ना डॅड आत्ता आलाय श्रीश. त्याचा हेअरकट बघ कसला कूल आहे ना?”

तो हसला श्रीशकडे पाहून. श्रीश ला खूप मान वर करून पहावं लागत होतं त्याच्याकडे. त्याने श्रीशला उचलून घेतला. “ममा कुठय याची?” “ती काय बसलीय. डॅड ओरडू नको हां तू. जवळच आहे ती.”

मग तिघही आली तिच्याकडे. श्रीश परत कडेवरून खाली उतरला नी केतकीची आणि त्याची पळापळी सुरू झाली तिथल्या तिथेच.

शाल्मली आणि केतकीच्या डॅडला काय बोलावं कळेना. मग शाल्मलीने जरा घाबरतच विचारलं “कशी आहे मुलगी तुमची आता?”

“आऊट ऑफ डेंजर म्हणाले डॉक्टर.”

“कोण आहे तिच्याजवळ?”

“माझी लांबची बहिण आहे ती आलीय तेवढ्यात हिला घरी सोडून येतो”

शाल्मलीने मान हलवली. त्याला अजून काही बोलायचे होते पण गप्प राहिला .

“तुमच्या मुलाचं कानाचं ऑपरेशन आहे म्हणाली केतकी.”

“हो तो जन्मत:च बहिरा आहे आणि म्हणून मुका पण.”

“ओह, कधी आहे ऑपरेशन?”

“उद्या सकाळी.”

“हं! चल केतकी, आत्या बसलीय तोपर्यंत परत यायला हवय मला.”

“हो डॅड.” केतकी लगेच निघाली.

“बाय श्रीश, टाटा.”

तिच्या हलत्या हाताकडे पाहत श्रीशनेही हात हलवला पण मग हाताने तिला परतही बोलवू लागला.

शाल्मली ने त्याला उचलून घेतले.