प्रायश्चित्त - 8 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रायश्चित्त - 8

घरी आल्यावर शाल्मलीने श्रीशला वरण भात भरवला. स्वत:ही चार घास पोटात ढकलले. श्रीशला लगेच झोप लागली. ‘दमलं बाळ माझं’ असं म्हणत तिने डोक्यावरून हात फिरवत ओठ कपाळावर टेकले. श्रीशने झोपेत हात गळ्यात टाकला तिच्या. दोघांचाच असा कोश तयार झाला. शाल्मलीला तो नाजूक हात दूर करवेना. तशीच पडून राहिली ती किती वेळ आपल्या सुकुमार बाळाजवळ.

पण असं झोपून जाऊन चालणार नव्हतं. मग नाईलाजाने उठली. तो फॉर्म काढला. बऱीच माहिती विचारली होती. त्यात आधी कुटुंबात कोणाला काही अशी समस्या होती का हा प्रश्न निरनिराळ्या संदर्भात परत परत विचारलेला दिसत होता.

क्षणभर शाल्मली थांबली. मग तिने फोन उचलला. साडेनऊ वाजत होते. शंतनूचा नंबर लावला. नो रिप्लाय आला. चार पाच वेळा लावूनही उचललाच नाही.

सहाव्या कॉलला उचलला. पलीकडून एका तरुणीचा आवाज आला. शाल्मली दचकली. नंबर बरोबर लागलाय याची तिने खात्री करून घेतली.

“हॅलो?”

“हॅलो? कोण बोलताय?”

“स्नेहल हियर.”

“स्नेहल? यावेळी?” शानूची ही नखरेल सेक्रेटरी शाल्मलीला आठवली.

“शंतनू?”

“ओह्ह, मॅम, अं, सर झोपलेत. उठवू का?”

शाल्मलीचा पारा पाहता पाहता चढला. तिने, फोन बंद केला.

तिने वैतागून फोन गादीवर फेकला. डोकं धरून ती किती तरी वेळाने बसून राहिली. पलीकडून शंतनूचा चिरपरिचित 'हॅलो' ऐकू आला. शाल्मलीला फोन बंद करावासा वाटत होता. पण मग श्रीशचा विचार येऊन तिने दगडी स्वरात विचारले, “तुमच्या कुटुंबात कोणाला जन्मत: किंवा नंतर निर्माण झालेलं बहिरेपण होतं का ?”

“व्हॉट?”

तिने प्रश्न परत एकदा शांतपणे सावकाश विचारला.

“अं ,नाही, का?”

“हवी होती जरा माहिती. श्रीश ची एक सर्जरी ठरतेय त्यासाठी ही माहिती महत्वाची आहे.”

“ओके, बाय”

“हॅलो, अगं, ऐक ना”

पलिकडून फोन केव्हाच बंद झाला होता.

शंतनूने परत लावला, पण फोन बिझी लागला.

“श्रीश”! ठेवलं आपण ठरवलेलं नाव त्या मुलाचं. सर्जरी ठरतेय?” त्याने परत परत फोन लावून पाहिला, दर वेळी बिझी टोन.

शाल्मली ने शंतनू चा फोन बंद करून शंतनूच्या आईचा नंबर फिरवला. दुसऱ्या रिंगला फोन उचलला त्यांनी. “हॅलो, आ.. शंतनूच्या आई, मी शाल्मली.”

“हं. बोल. कशासाठी फोन आता?”

क्षणभर पलिकडे शांतता. मग शाल्मली म्हणाली, “श्रीश, माझा मुलगा, त्याच्या कानाची सर्जरी करायची आहे.”

“तुला जे करायचं ते तुझं तू कर. पैशासाठी फोन केला असशील तर एक दमडीही मिळणार नाही, समजलं?”

“पैसे नको आहेत. पण माहिती हवीय.” शांतपणे शाल्मली म्हणाली.

“कसली माहिती?”

“आपल्या, म्हणजे तुमच्या कुटुंबात, तुमच्या माहेरी अथवा सासरी जन्मत: किंवा पुढे बहिरेपणाची समस्या होती का? अगदी मागच्या पिढ्यांमधे?”

“छे, छे, भलतच काय? मुळीच नाही.”

“अगं कोणाचा फोन एवढ्या उशीरा? कोणावर ओरडते आहेस? आण बघू, मला दे फोन.” शंतनूचे वडिल आतून आले आणि त्यांनी फोन घेतला.

“हॅलो,”

“हॅलो,मी शाल्मली. मला जरा माहिती हवी होती.”

“कशी आहेस शाल्मली? मी खूप समजावलं गं शंतनूला, पण ऐकतंय कोण?”

“बाबा, आपल्या कुटुंबात म्हणजे तुमच्या किंवा आईंच्या, अगदी आधीच्या पिढ्यांमधे जन्मत: बहिरेपण होतं का कुणाला?”

“अं,” तिथून शंतनू ची आई, खुणेने सांगू नका असं बजावू लागली पण अचानक त्या खाणाखुणा पाहूनच बाबांना ते दूरचे चुलत काका आठवले शंतनूच्या आईचे.

“अं, अगं हो हो, हिच्या माहेरी तिचे दूरचे म्हणजे चुलत काका होते मूक बधीर. सगळं खुणांनी चालायच.”

“ओह, थॅंक यू बाबा, मोलाची माहिती दिलीत. ठेवते फोन.”

“अक्कल काय गहाण ठेवता का हो? कशाला नको ते सांगायला गेलात?”

“अगं, नव्हतंच लक्षात माझ्या. तू त्या खाणाखुणांनी आठवण करून दिलीस म्हणून बरं झालं.”

शंतनूच्या आईने कपाळावर हात मारून घेतला.

शाल्मली ने फोन बंद केला. शंतनू चे बरेच मिस्डकॉल्स दिसले तिला. क्षणात तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि फोन बाजूला फेकला तिने. तर तो वाजायलाच लागला. उचलून तिने रागारागाने बोलायला सुरवात केली,

“निलाजऱ्या माणसा लाज नाही वाटत तुला जराही? तुझ्याच कडून मिळालाय हा आजार माझ्या बाळाला, तो उपचारा अभावी ना ऐकू शकतोय ना बोलू,”

“शाम, हॅलो, शाम, अगं काय झालं , शांत हो, काय झालं?”

“ओहहहहहह, सॅम....,

दोन क्षण ती गप्पच बसली. मग म्हणाली “सॅम, माफ कर , मला वाटलं....”

“शंतनू चा फोन आहे”

“हो”

शाल्मली हुंदके दे देऊन रडू लागली. तिचं संपूर्ण शरीर गदगदत होतं. काही केल्या तिला रडू आवरेना.

रडत रडतच “सॅम ....मी ....नंतर ...कॉल करते” असं म्हणाली.

“ठीक आहे, पोटभर रडून घे एकदाच शाम, परत नाही कधीच रडायचय लक्षात ठेव.”

मी थोड्या वेळाने करतो परत फोन.

शाल्मली शांत झाली थोड्या वेळाने. तिने सॅमला मेसेज पाठवला. ‘मी ठीक आहे आता. तू दिलेल्या लिंक्स आणि विडीओ पहाते. फॉर्मही पूर्ण करते. शंतनू च्या आईच्या कुटुंबात जन्मजात बहिरेपणाची हिस्टरी आहे. उद्या सविस्तर बोलू’

मग तिने सगळी माहिती, विडीओ, काळजीपूर्वक पाहिला. एका विडीओ मधे संपूर्ण कोक्लियर इंम्प्लांट सर्जरी दाखवली होती. ती पाहताना शाल्मली एकीकडे जरा घाबरलीच तर दुसऱ्या बाजूला वैद्यकिय विज्ञानाविषयी तिच्या मनात आदर दाटला. जेव्हा त्या विडीओ मधे कोक्लिया मधे नस सदृश्य वायर घातली गेली तेव्हा तर तिचा श्वासही क्षणभर थांबला. सगळं पाहिल्यानंतर मात्र तिचा विश्वास दुणावला.

एका डॉक्टरने संपूर्ण माहितीही दिली होती. त्यात त्याने कोक्लिअर इम्प्लांट कोणासाठी योग्य, कोणासाठी अयोग्य सर्व माहिती मुद्देसूद सांगितली. यश मिळण्याचे सर्वसाधारण प्रमाण किती हेही सांगितले. सगळं काही स्पष्टपणे सांगितलं, की रोग्याला, नातेवाईकांना निर्णय घेणं किती सोपं जातं असंच वाटलं तिला. मग तिनेही तिच्या पद्धतीने आंतरजालावर छानबिन केली. शस्त्रक्रिया झाल्यावर काय काळज्या घ्यायला लागतात, ही आत बसवलेली उपकरणे किती काळ चांगली टिकतात? खर्चाबद्दलही माहिती मिळते का शोधले तेव्हा शस्त्रक्रियेचाच खर्च साधारण ७ते १० लाख होणार होता. हे फक्त एका कानासाठी. शिवाय नंतर स्पीच थेरपी वगैरे साठी वेगळा खर्च येणारच.

तिचं एकदम अवसान गळाल्यासारखं वाटलं. कंपनीकडून लोन मिळालंही असतं पण दर महिन्याला जो जबरदस्त हप्ता भरावा लागला असता, त्यातून उरलेल्या पैशात पुढची ट्रीटमेंट होणं, श्रीशची शाळा सुरू झाली असती वर्ष दोन वर्षात, त्याची फी, सगळंच एकदम अंगावर आल्यासारखं झालं तिला.

“सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचं सोंग नाही आणता येत” अचानक तिला बाबांचे बोल आठवले.

तिने एक दीर्घ सुस्कारा सोडला. १२ वाजून गेले होते. पलंगावर आडवी झाली, झोप येणं शक्यच नव्हतं.

पहाटे पहाटे केव्हातरी डोळा लागला असावा. गजर वाजला तेव्हा डोळे उघडेनात. पण उठणं भाग होतं, तशीच जबरदस्तीने उठली आणि यंत्रवत कामं उरकू लागली.

--------------

शंतनूने बरेच कॉल केले तरी शाल्मलीचा फोन बिझीच लागला.

त्याला खरंतर मित्राला फोन करायचा होता. पण बरीच रात्र झाल्याने त्याने तो विचार बाजूला ठेवला.

तेवढ्यात त्याचा फोन वाजला. आईचा होता फोन. तिने सगळे सांगितले. कसा शाल्मलीचा फोन आला, कसं तिने उडवून लावलं, कसं त्याच्या बाबांनी नको ती माहिती शाल्मली ला पुरवली वगैरे वगैरे.

शंतनूचा चेहरा पाहता पाहता बदलत गेला. जे व्हायला नको होतं ते सगळं झालं होतं. आणि आज तरी तो काहीच करू शकत नव्हता.

परत फोन करावा का शाल्मलीला? आणि काय सांगणार? बराच वेळ विचार करत तो तसाच बसला., आईचा फोन, म्हणजे कदाचित मी ही असाच बहिरा..... दचकलाच तो या विचारासरशी..... मग अजून एक विचार ... कोण जाणे मला होणारं प्रत्येक मूलच बहिरं..... तो झटकन जागेवरून उठला. हा विचार प्रचंड अस्वस्थ करून गेला त्याला. रात्रभर तळमळत राहिला.

———

सकाळी शाल्मली थकवा घेऊनच ऑफिसमधे पोहोचली. डोकं जड, डोळे चुरचुरत होते. मन काळजीच्या ओझ्याने दबलेले. श्रीश ला पाळणाघरात सोडून ती तडक केबीनमधे गेली. मेल्स चेक करून प्रशांतला इंटरकॉमवरून फोन केला. “सर, महत्वाचं बोलायचय.”

“अगं, ये ना मग,” प्रशांत सहजतेने म्हणाला.

ती लोनचा अर्ज घेऊन निघाली. आल्या आल्याच तिने बोलायला सुरवात केली. “श्रीशच्या आजारा बद्दल तुम्हाला माहितच आहे. त्याची एक सर्जरी केली तर तो ऐकू शकेल. आणि मग बोलूही लागेल. साधारण खर्च सध्या तरी १० लाखाच्या आसपास आहे. मी लोन साठी अप्लाय केलय पण आज त्यांचा रिप्लाय आलाय की ऑफिस हेड चा रेफरन्स लागेल कारण अमाऊंट जास्त आहे.”

“बघू ॲप्लिकेशन”

त्याने नीट वाचलं. मग म्हणाला “तू रीपेमेंट साठी जास्त वेळ मागून घ्यावास. दोन ऐवजी तीन वर्ष माग. बॉण्ड द्यावा लागेल पण मला वाटतं ते ठीक आहे. मी अप्रूव्ह करतो माझ्याकडून. गरज वाटली तर हॉस्पिटलचं लेटर मागतील, ते घेऊनच ठेव.”

त्याने पटापट सह्या केल्या आणि सोबत स्वत:चे शिफारसपत्र जोडले, आणि फास्ट मेल मधून पाठवण्याच्या गठ्ठ्यात ठेवले.

“थॅंक यू सो मच सर”

“माय प्लेजर”

मग ती जाण्यासाठी उठू लागली तेव्हा त्याने बसण्याची खूण केली. ती बसली परत.

“शाल्मली, माझ्या वागण्यातून तुला तुझ्याविषयी मला वाटणारं आकर्षण, आपुलकी, जाणवलं असेलच, जरी मी स्पष्ट तुला कधी काही बोललो नाही. तुझ्या सध्याच्या परिस्थितीत तुला बाकी काही नकोच सध्या, असं वाटणं स्वाभाविकच आहे. तसं तू परवा बोलूनही दाखवलंस. पण आपली एक उत्कृष्ट टीम बनली आहे आणि ती उत्तम परफॉर्मन्स देत आहे. अशात स्टार परफॉर्मरला दुसऱ्या विभागात टाकणं कोणाच्याच हिताचं नाही. तेव्हा आपण पर्सनल गोष्टी बाजूला सारून परत जोमाने कामाला लागावं असं मला वाटतं. शिवाय तुझ्या मुलाच्या शस्त्रक्रियेदरम्यान तुला बऱ्याच रजा, घरून कामाची सवलत वगैरे लागेल. अशा वेळेस माहितीतली टीम मदत करेल. नव्या टीमला तसे करता येईलच असे नाही. तू नीट विचार करून मला सांग. माझ्याकडून यापुढे पुन्हा बाकी कोणत्याच गोष्टीची वाच्यता होणार नाही कामाचे विषय सोडून.”

शाल्मली पाहतच राहिली. मग म्हणाली, “सर परवा मी खूप रूडली वागले बोलले तुमच्याशी. आय ॲम एक्स्ट्रीमली सॉरी. तुमचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, पण या मार्गावर पुढे जाणे शक्य नसताना तसे न सांगणे फसगत केल्यासारखं होईल असं वाटलं म्हणून जरा स्पष्ट बोलले एवढच. मलाही याच टीम मधे काम करायला आवडेल कारण तुमच्याकडून अजून खूप काही शिकण्यासारखं आहे. अगदी आत्ताही तुम्ही ज्या समतोल दृष्टिकोनातून या सगळ्याकडे पाहताय त्यातूनही बरंच काही शिकले मी. थॅंक यू व्हेरी मच सर!”

प्रशांत ने पसंतीची मान डोलावली. “ऑल द बेस्ट शाल्मली. कधीही कोणतीही मदत लागली तर संकोच न करता सांग. हा तुझा सहकारी नक्की मदतीला तयार असेल!”

शाल्मली ने मान हलवली.

काल रात्रीपासून चढलेलं मनावरचं मळभ किंचित कमी झाल्यासारखं वाटलं तिला.

परत केबीन मधे येत तिने प्रोजेक्टवर सुरू असलेलं काम करायला सुरवात केली. जितक्या वेगाने ती हे काम संपवेल तेवढा पुढे तिला सर्जरी दरम्यान वेळ मिळणार होता.

————