शाल्मली ची धांदल उडाली होती आज. हात एकीकडे भराभर कामं उरकत होते तर दुसरीकडे डोक्यातले विचार वायुवेगाने भ्रमण करत होते. एरव्हीची शांत शाल्मली आज मात्र जरा धास्तावली होती. आज श्रीश ला तिने आईकडेच सोडायचं ठरवलं. संध्याकाळच्या आधीच्या बॉसचा निवृत्ती समारंभ आणि नव्या बॉसचा स्वागतसमारंभ, असं ऑफिस ने एकदमच करायचं ठरवलं होतं. थोडा उशीर होणार होता. शिवाय तिच्यावर कार्यक्रमासाठी काही जबाबदाऱ्या ही सोपवण्यात आल्या होत्या. आधीच्या बॉसनी वडिलकीच्या नात्याने कालच तिला बऱ्याच गोष्टी समजावल्या होत्या. पण ते जाऊन नव्या माणसाबरोबर काम करावं लागणार, याचं नाही म्हटलं तरी तिच्या मनावर दडपण आलंच होतं. सगळी तयारी करून शेवटी ती निघाली. श्रीश ला जवळ घेऊन कुरवाळून तिने आईकडे सोपवले. आई म्हणाली जा निवांतपणे. राहातो आमच्याकडे छान तो. ती ही हसली मग आणि निघाली.
शाल्मली पोहोचली आणि कामात गुरफटून गेली. आधीच्या बॉसच्या बऱ्याच कागदपत्रांवर सह्या घ्यायच्या होत्या. पुढचे काही प्लॅन्स ॲप्रुव्ह करून घ्यायचे होते. नव्या बॉसची फाईल एकदा चाळून पहायची होती. तिने मनातल्या मनात परत स्वत:ला आठवण करून दिली
पहाता पहाता दिवस वर चढला. मग टी ब्रेक नंतर सगळे कॉन्फरन्स हॉल मधे जमा होऊ लागले. शाल्मलीने सर्व व्यवस्थेवर परत एक नजर टाकली.
केटरर ला सर्व सूचना परत सांगून त्याच्याकडून वदवून घेतले. “तुमी काय बी चिंता करू नको मॅडम, सगलं चोक्कस होनार, मी हाय ना हितच काय बी लागलं तर.” त्याने हसून हामी भरली.
कार्यक्रम सुरू होण्याआधी बरोबर ५ मिनिटं नवे बॉस आधीच्या बॉसच्या केबिन मधे पोहोचल्याची वर्दी ऑफिस बॉय घेऊन आला. म्हणजे कार्यक्रम वेळेत सुरू होणार. तिने सर्वांना बसून घेण्याची विनंती केली.
काहीच मिनिटात दोघे आले. नवे बॉस पहाण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. प्रशांत ..वय३५ , पटकन नजरेत यावी अशी उंची, वर्ण सावळा, सौम्य पण आत्मविश्वास दर्शवणारे चेहऱ्यावर भाव, आणि अतिशय शांत डोळे. समोरच्याला पट्कन विश्वासात घेणारे.
जाणाऱ्या बॉसनी थोडक्यात प्रशांतची ओळख करून दिली. मग प्रशांत बोलला, त्यात प्रामुख्याने ‘सर्वजण आपापल्या परीने कंपनी साठी कसे महत्वाचे आहेत, निर्णय घ्या, मला फक्त निर्णयाची कल्पना द्या, अगदीच चुकत असेल काही तर मी सांगेनच, पण नवे प्रयोग करताना काही चुकलंच तर तुमच्या बरोबरीने माझी जबाबदारी राहिल ,’ असे लोकांना आश्वस्त करणारे मोजके बोलला.
सर्वच जण नव्या बॉस वर खूश झाले. मग चहापाण्याबरोबर सर्वांच्या ओळखी करून देण्याचे काम शाल्मलीवर आले , तिने ते चोख पार पाडले. प्रशांतला आधीच्या बॉस सोबत सोडून ती आपल्या सहकाऱ्यांकडे जाण्यासाठी वळली तेव्हा प्रशांत म्हणाला “ सर्वांची उत्तम ओळख करून दिली, पण एक महत्वाची ओळख राहिली,” शाल्मलीच्या चेहऱ्यावरचं मोठं प्रश्नचिह्न बघून मग तो खळखळून हसला. “मी प्रशांत, इथे नव्यानेच रुजू होतोय,” असं म्हणत त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला आणि थोडिशी चकित, थोडिशी खजिल, होत नकळत शाल्मलीनेही हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. “ओह, सो सॉरी, शाल्मली, या ऑफिसमधला तुमचा उजवा हात, डोळे, कान.” नकळत शाल्मलीच्या चेहऱ्यावर हसू पसरलं आणि तिच्या गोड खळ्या अधिकच खोल झाल्या. नंतर किती तरी वेळ प्रशांत च्या मनात त्या घर करून राहिल्या. जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याने चक्क मान हलवली जणू त्या प्रतिमा काढून टाकण्याचा एक केविलवाणा प्रयत्न होता तो.
----------------
अल्बम बराच वेळ पाहून काही वेळाने शंतनू उठला, त्याने तो शाल्मलीचा फोटो अल्बम मधून काढून खिशात ठेवला. बाईला सांगून बाहेर पडला. जवळच्या फोटोलॅब मधे आला. तिथे त्याने तो फोटो मोठा करण्यास दिला. “साहेब फ्रेम पण करायचा का?” “ हो, चालेल!”
“साहेब, दोन मिनीटात स्कॅन करून घेतो, म्हणजे ओरिजिनल राहिल तुमच्याचकडे.”
शंतनू ने फोटो खिशात ठेवला आणि तो परत निघाला. रस्त्यात वाईनशॉप लागलं नेहमीचं, सवयीने पावलं वळली... “काय देऊ साहेब ? नेहमीचं?” शंतनू अचानक जागा झाल्यासारखा भानावर आला‘नेहमीचं?’ या शब्दाने. ‘पक्का दारूडा झालो म्हणजे मी. पण दारू सुद्धा तुला विसरवू शकली नाहीच गं!’ पटकन हात खिशातल्या फोटोकडे गेला. “नाही, नकोय काही.”
शंतनू परत फिरला. दुकानदार पाहत राहिला . ‘किती दिवस टिकेल हे?’ असा विचार अनुभवाने त्याच्या मनात आलाच शंतनूला पाहून!
--------------------------
शाल्मली घरी परतली तेव्हा जातानाची घालमेल बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. एकतर कार्यक्रम व्यवस्थित पार पडला होता आणि नव्या माणसाबद्दल वाटणारी धास्ती प्रशांतला भेटल्यानंतर बरीच कमी झाली होती. तिने आईकडून श्रीश ला घेतले आणि घरी आली. रात्री दमणूकीने म्हणा किंवा मन काहीसं शांतावलं म्हणून असेल, झोपेने लगेच कुशीत घेतलं तिला श्रीश सकट.
दुसऱ्या दिवशी ती जरा लवकरच निघाली. ऑफिसमधे आल्यावर तिने सुरेश, जो प्रशांतचा सेक्रेटरी नियुक्त होता, त्याला गाठले. “हे बघ, बॉसची पर्सनल डिटेल्स ची फाईल, आधीच्या सेक्रेटरीकडून मागवली होती. वाचून घे, पण आधी स्ट्रॉंग ब्लॅक कॉफीची ऑर्डर देऊन ठेव. आता चहा नाही, ब्लॅक कॉफी रोज दहाला असं सांगूनच टाक कॅंटीन मधे. बाकी डिटेल्स बघून ठेव. “ थॅंक यू मॅडम! “ सुरेश ला या एका छोट्या डिटेल ने किती आणि कसा फरक पडणार हे चांगलंच माहित होतं. शाल्मली बरोबर काम करताना त्याला बऱ्याच गोष्टी समजत होत्या, शिकायला मिळत होत्या.
मग तिने त्याला दिवसभराच्या युनिट हेड्स बरोबरच्या मिटींग्जचं श्येड्यूल बनवायला सांगितलं, पण तत्पूर्वीचा एक तास तिच्यासाठी ठेवायला सांगितला. प्रशांतला ब्रीफ करण्यासाठी तेवढा वेळ लागणारच होता. शिवाय नंतर ती निश्चिंतपणे श्रीश ला भेटून येऊ शकणार होती. बॉसला दाखवून ओके करून घे आणि मग फायनल कर असंही बजावायला ती विसरली नाही.
प्रशांत केबिनमधे पोहोचण्यापूर्वी मात्र ती स्वत:च्या केबिन मधे निघून गेली. प्रशांत आला आणि त्याने एकवार नजर केबिनभर फिरवली. साईड टेबलवरचा निशिगंधाचा बुके त्याला प्रसन्न करून गेला. तो टेबलवर येऊन बसेपर्यंत सुरेश ने मागवून ठेवलेली ब्लॅक कॉफी आली. प्रशांत ला आश्चर्य वाटलं. त्याच्यातला मुरलेला मॅनेजर जागा झाला. सुरेश कौतुकाच्या अपेक्षेने पहातोय हे त्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटलं नव्हतंच. तो चट्कन म्हणाला, “ब्लॅक कॉफी?” हे म्हणताना त्याने जरूरीइतकी नाराजी, कपाळावर बारीक आठी, बरोब्बर जमवली. सुरेश गोंधळला, पट्कन बोलून गेला “शाल्मली मॅडम नी सांगितलं.....मी मागवतो परत ... काय मागवू? चहा? ग्रीन टी?”
प्रशांत म्हणाला नाही, “रोज हेच ब्लॅक कॉफी” आणि सुरेश कडे पाहून सूचक हसला. सुरेश ला आपण पकडले गेल्याची जाणीव जरा उशीराच झाली. पण प्रशांत च्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य बघून , फारसं बिघडलं नाहीय आणि या बॉस बरोबर खरेपणाच कामी येईल असंही लक्षात आलं. त्याने ताबडतोब श्येड्युल समोर ठेवलं आणि लगेच शाल्मली मॅडमनीच हे सगळं सांगितलंय असंही सांगून मोकळा झाला. “पण तुम्हाला योग्य वाटलं तर” असंही म्हणाला. ‘फास्ट लर्नर’ प्रशांत ने मनातल्या मनात सुरेश ला टॅग केलं.
ठीक आहे असंच करू असं सांगून शाल्मली ला बोलवायला सांगितलं!
सुरेश ने इंटरकॉमवरून तसे सांगताच शाल्मली आलीच. मग एक एक करत सर्व डिपार्टमेंटस्, एकमेकांवर अवलंबून असणारे मुद्दे, महत्वाचे क्लायंटस्, प्रत्येकाच्या निरनिराळ्या गरजा, निरनिराळ्या अपेक्षा, सध्या सुरू असणारी प्रोजेक्टस्, पाईपलाईन मधली प्रोजेक्टस्, सगळा गोषवारा अत्यंत मुद्देसूदपणे ती बोलत गेली आणि प्रशांत पूर्ण एकाग्रतेने ऐकत गेला, एकीकडे शाल्मली च्या बुद्धीमत्तेबद्दल त्याचा आदर दुणावत गेला.
सगळं बोलून शाल्मली थांबली तेव्हा प्रशांतची स्थिर नजर आपल्यावरच आहे हे लक्षात येऊन ती जरा संकोचली . प्रशांतही सावरला एकदम. मग घसा किंचित खाकरत म्हणाला. थॅंक्स! ब्रिफिंग साठी आणि ब्लॅक कॉफीसाठीही!
शाल्मली काही न बोलता उठली, आणि जाऊ लागली, तेव्हा बाकीच्या मिटींग्ज मधेही तिने थांबावं असं त्याने सुचवलं. शाल्मली एकदम अस्वस्थ झाली. मग म्हणाली , युनिट हेड्स वुड लाईक टू मीट यू वन ऑन वन, काही लागलंच तर सांगा मी आहेच नेक्स्ट केबिन मधे. ऑलराईट! प्रशांत म्हणाला. शाल्मली चं अस्वस्थ होणं आणि तिने नंतर सुटकेचा निश्वास सोडलेला त्याच्या नजरेतून सुटला नाही.
-----------------
शंतनू घरी आला. बाई गेली होती तोपर्यंत. नकळत त्याची पावलं गॅलरीकडे वळली. पण त्याने दार नाही उघडलं, कारण फ्रेंच विंडोच्या काचेतून त्याला दिसलं, चिमणा चिमणी त्या हॅंगर मधे चिवचिवाटासह घरटं बांधत होते. चोचीतून काड्या खाली पडत होत्या पण न दमता दर वेळी ती दोघं परत परत त्या उचलून घरट्यात खोचत होते. मधेच थांबून अंगाला अंग घासत माना वाकड्या करकरून घरट्याकडे पाहत होते. अनिमिष नेत्रांनी शंतनू पाहत राहिला. त्याला अचानक आठवलं, बोर्डिंग स्कूल मधे लहानपणी खोलीत अभ्यासाला बसला असताना खिडकीबाहेर दोन खारोट्या झाडांच्या खोडावरून पकडा पकडी खेळत होत्या. मधेच झाडावरची शेंग पोखरून एकमेकांना भरवत होत्या , परत चोर पोलीस सुरू. शंतनू भान हरपून या त्यांच्या खेळात इतका तल्लीन झाला की नकळत टाळ्या पिटून दोघींना चिअर करायला लागला. मागे रेक्टर कधी येऊन उभे राहिले कळलच नाही. त्यांनी कान खेचला जोरात, आणि मग हातांवर दहा झणझणीत पट्ट्या. मग त्याला विचारलं “कळलं का तुला का शिक्षा केली?” तो रडत रडत , चुरचुरणारे हात चोळत म्हणाला “खिडकीतून बाहेर पाहत होतो, अभ्यास करताना,” तेव्हा रेक्टर म्हणाले “नुसता बाहेर पाहत नव्हतास, स्वत:चं काम सोडून फालतू गोष्ट पाहून प्रचंड आनंदी होत होतास. असा काम सोडून आनंदी व्हायला लागलास तर भणंग फकीर होऊन हिंडशील दारोदारी. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर हे फालतू आनंद दूर ठेवायला शीक. तुझ्या आईबापांनी त्यासाठी पाठवलाय तुला इकडे. कायम लक्षात ठेव.”
संस्कारक्षम वयात रेक्टरचे ते शब्द कायमचे ठसले मनात. त्याने ती खिडकी कायमची बंद करून टाकली. खोलीची आणि मनाचीही.
मग जेव्हा जेव्हा असा कोणताही ‘फालतू ’ आनंद समोर दिसला तेव्हा तेव्हा त्याने खिडक्या बंद केल्या. मित्र जीवाभावाचे होऊच दिले नाहीत, निसर्ग चार हात दूरच ठेवला, मनाला हळवं होण्याची मुभा तर दिलीच नाही कधी.
‘यशस्वी होण्याच्या नादात आयुष्य जगण्याची कलाच शिकायला विसरलो आपण. आणि त्यात फरफट झाली माझ्या शाल्मलीची.’ टचकन पाणी आलं त्याच्या डोळ्यात. हा ही एक नवाच अनुभव होता त्याच्यासाठी.
तो हळूहळू मागे वळला . सोफ्यावर बसून राहिला. अचानक लक्ष कॅलेंडरकडे गेलं. वर्षभरापूर्वीचं याच महिन्याचं पान वर होतं. त्याने स्मृतीला ताण दिला बराच. “कोणता दिवस होता तो?”
--------------------