स्नेहल ने बेल वाजवली. शंतनू नुकताच आंघोळ करून बाथरूम मधून रोब घालून बाहेर येत होता. कामवाल्या मावशी असणार असं वाटून त्याने दार उघडले तर दारात स्नेहल. तो जरा गोंधळलाच. बस आलोच असं म्हणत आत गेला. हवेत त्याच्या आफ्टर शेव्हचा, शॉवर जेलचा मंद सुगंध दरवळत राहिला . कपडे घालून तो बाहेर आला.
तुम्ही एकटेच धड जेवण नाही करणार म्हणून कंपनी द्यायला आले. शंतनू काहीच बोलला नाही. मग तीच उगाच विषय काढून बोलत राहिली. तेवढ्यात बाई आली. तिला शंतनूने फक्त साफसफाई करून जायला सांगितलं. ती गेल्यावर स्नेहल ने चट्कन जवळच्या हॉटेलमधून जेवण मागवलं. शंतनू म्हणाला “बाहेरच गेलो असतो.”
“सर किती ऊन आहे बाहेर. मी मागवलंय, येईल एवढ्यात.”
मग दोघं जेवले.स्नेहल ने सगळं आवरलं आणि किचन मधून दोघं बाहेर येता येता स्नेहल चा पाय लचकला आणि ती एकदमच शंतनू च्या अंगावर रेलली. शंतनू ने तिला सावरले. दोघे अगदीच जवळ जवळ उभी होती. नकळत स्नेहलचा हात शंतनूच्या गळ्यात गेला. शंतनूने अलगद तिला दूर केले आणि तो सोफ्यावर बसला. स्नेहल जरा चपापली. “सॉरी सर, तोल गेला,” असा पुटपूटत ती समोरच्या सोफ्यावर बसली.
----------------------
प्रशांत आपल्या केबीनमधे बसला होता. कामाचा ताण पूर्वीही कधी त्याने घेतला नाही आणि आता तर शाल्मली सारखी सहकारी असल्यावर प्रोजेक्टस वर नुसतं लक्ष ठेवण्याचं काम उरलं होतं. शाल्मली त्याच्याशी खेळीमेळीने वागत असली तरी सहकारी, वरिष्ठ म्हणूनच ती त्याच्याकडे पाहते हे त्याला जाणवत होते.एक दोन वेळा त्याने डिनर साठी बोलावूनही नम्रपणे तिने नकार दिला होता. मुख्य म्हणजे नकारासाठी तिने कोणतेही कारण दिले नव्हते जे त्याने लिलया खोडून काढले असते. एकीकडे ती भाव देत नाही हा विचार त्याला त्रास देत होता तर दुसरीकडे तिच्याविषयी आदरही दुणावत होता. प्रेमाच्या खेळात जसं सपशेल हरणं विफलग्रस्त करतं, तसंच सरळ साधी जीत ही त्यातली मजा घालवते असंच म्हणणं होतं त्याचं. आग कशी धुमसली पाहिजे, जरा घुसमट व्हावी, जरा धूर कोंडावा, आणि मग भडकावी ती आग, त्याची मजा आगळीच. एकमेकांचा अंदाज घेत एक एक खेळी खेळण्यात जी मजा आहे ती प्रत्यक्ष प्राप्तीत सुद्धा नाही.
“प्रशांत शेट, एक गोष्ट विसरताय राव, यात खेळ्या तुम्हीच खेळताय. तिच्या बाजूने साधी दखलही नाही घेतली गेलेली. तसं असतं तर एव्हाना काही तरी खूण मिळाली असती की नाही! जागे व्हा राव!”
त्याचंच मन त्याला खिजवू लागलं.
“शाल्मली काही मुळात गबाळी बाई नाही. मनात आणेल तर किंचितशा कपड्यातल्या बदलाने सुरवंटाचं फुलपाखरू होईल. तू इथे आल्यावर ते होईल ही तुझी अटकळ ही तिने खोटी ठरवली. किंबहुना आधीचे फ्रेश कलर्स जाऊन डल कलर्स वाढलेत तिच्या वॉर्डरोबमधे. कदाचित तू दाखवत असलेला पुढाकार तर याला कारणीभूत नाही?”
त्याला या विचारासरशी धक्काच बसला. नेहमीच्या सवयीने डोकं झटकलं त्याने. “काहीतरी करायलाच हवं.”
मग त्याने इंटरकॉम उचलून शाल्मली ला बोलावणं पाठवलं सुरेश कडून.
सुरेश तिच्या केबीनमधे आला आणि बघतंच राहिला. मॅडम आज काही वेगळ्याच दिसताहेत. त्याची प्रतिक्रिया पाहून तिच्या ओठांवर एक स्मितरेषा उमटली. “अं, मॅम, प्रशांत सरांनी बोलवलय तुम्हाला नव्या प्रोजेक्ट चे अपडेटस घेऊन”
“हं, येते एवढी मेल पाठवून.”
काल सगळे रिपोर्टस पाहून सॅम ने फोन केला, श्रीशला घेऊन ये, लवकरात लवकर म्हणाला. आवाजात उत्साह होता त्याच्या. फोनवर नाही सांगत काही, प्रत्यक्ष भेटल्यावर सविस्तर बोलू म्हणाला. आज संध्याकाळी नेणार होती ती श्रीशला सॅम च्या हॉस्पिटलमधे.
पण तेवढ्यानेच किती हुरूप आला तिला. नकळत उत्साही रंगाचा जरा मापाचा ड्रेस आणि लाईट मेक अप करावासा वाटला तिला.माणसाच्या मनाचं प्रतिबिंब त्याच्या प्रत्येक गोष्टीत दिसतं हेच खरं.
मेल पाठवून, लॅपटॉप उचलून ती तडक प्रशांतच्या केबीन मधे आली आणि तो क्षणभर श्वास घ्यायचा विसरला. आपण आत्ताच विचार करत होतो आणि सुरवंटाचं फुलपाखरू होऊन अवतरलं. शाल्मलीचं अर्थातच लक्ष नव्हतं.
तिने आल्या आल्या लॅपटॉप, ओएचपी ला कनेक्ट केला आणि प्रोजेक्ट ची प्रेझेंटेशन फाईल ओपन केली. मग तिने भराभर अपडेट्स द्यायला सुरवात केली. प्रशांत एकीकडे ऐकत होता आणि एकीकडे तिला निरखत होता. मनात द्वंद्व सुरूच राहिलं. शेवटी सगळं झाल्यावर शाल्मली थांबली आणि प्रथमच तिला प्रशांतच्या तिच्यावरील एकटक नजरेची जाणीव झाली. हा निर्णयाचा क्षण आहे हे तिच्या लक्षात आलं. तिने नजर न चुकवता अथवा झुकवता त्याच्या नजरेला सरळ नजर दिली. प्रशांत किंचित चपापला पण त्यानेही नजर हटवली नाही. मग म्हणाला “छान दिसतेस शाल्मली. हा रंग छान दिसतोय तुला.”
“थॅंक्स फॉर द कॉम्प्लिमेंटस सर.”
“किती वेळा सांगितलं, प्रशांत म्हणत जा.”
“नको, सरच ठीक आहे. प्रत्येक पदाचा एक आदर असतो तो राखावा.”
“आपण फक्त सहकारीच आहोत का?”
“हो सर. फक्त सहकारी, अत्यंत चांगले सहकारी, जे एकमेकांना कामात मदत करतात, पुढे जायला मदत करतात, अडीअडचणीत मार्गदर्शन करतात. पण तरीही फक्त सहकारीच. ना अधिक ना उणे.”
“मी जर अधिक काही होऊ पाहत असेन तर?”
“ती जागा नाही माझ्या आयुष्यात सर. सध्या माझं विश्व माझा श्रीश आणि ही नोकरी आहे. तिसऱ्या कोणत्याही गोष्टीला यात स्थान नाही. तुम्हाला हे स्पष्टच सांगावं असं वाटलं कारण तुम्हाला अंधारात ठेवणं मला फसगत केल्यासारखं वाटत होतं.”
“तुला तुझ्या आयुष्याचा विचार नाही?”
“सध्या ह्याच दोन गोष्टी माझं आयुष्य आहे सर.थॅंक्स फॉर एव्हरीथींग. पण हे प्रोजेक्ट संपल्यावर तुम्ही माझं डिपार्टमेंट बदलावं. आपल्या दोघांच्याही दृष्टीने ते सोपं होईल.”
प्रशांत काही काळ तिच्याकडे पाहत राहिला आणि मग सावकाश त्याने समजुतीची मान हलवली.
संध्याकाळी शाल्मली श्रीशला घेऊन सॅमच्या हॉस्पिटलमधे पोहोचली. ते एक मल्टीफॅसिलिटी हॉस्पिटल होतं. सॅम प्रशासकांपैकी एक होता आणि इ न टी विभागाच्या पेडिॲट्रीक युनिटचा प्रमुख शल्यविशारद होता. त्याने रिसेप्शनमधे आधीच सांगून ठेवल्याने तिथल्या मुलीने शाल्मलीला बसायला सांगून सॅमला ती आल्याचे कळवले. सॅमने तिला मोबाईल वर फोन केला आणि तिसऱ्या मजल्यावर त्याच्या कंन्सल्टींग रूम मधे येण्यास सांगितले. शाल्मली तिसऱ्या मजल्यावर पोहोचली. हॉस्पिटल बाहेरून तर नाहीच पण आतूनही हॉस्पिटल सारखं वाटत नव्हतं. कमालीची स्वच्छता, कलात्मक बांधणी, यामुळे ते एक हॉस्पिटल पेक्षा कॉर्पोरेट ऑफिस अधिक वाटत होतं.
शाल्मली सॅमच्या रुममधे शिरली तेव्हा तो उठून उभा राहिला. पुढे येऊन खुर्ची ओढून तिला बसायला लावले. श्रीशला त्याने बेबी चेअरमधे बसवलं आणि काही खेळणी दिली त्याला खेळायला. शाल्मली हे सर्व नवलाने बघत होती.
“अरे वा, आमचा दोस्त अजून सडाफटींग असला तरी लहान मुलांना छान हॅंडल करतो की.”
“शाम, तीन अख्खी वर्ष पेडिॲट्रीक मधे आणि त्यातलं एक निओनेटल मधे काम केलय मी. तुला काय वाटलं? उगाच एवढ्या डिग्र्या लावल्यात का पाटीवर?”
शाल्मली ओठ दुमडून हसली. “नाही, ते ठीकय, पण मला बारावीत असताना एका मांजरीची नवजात बाळं, ज्यांचे डोळेही उघडले नव्हते त्यांना हात लावायची एका मुलाला किती भीती वाटत होती, आणि मग त्यातलं एक मी तुझ्या ओंजळीत ठेवल्यावर कसे एका मुलाचे डोळे डबडबले होते ते आठवलं उगाच.”
सॅम तिच्याकडे पाहून हसला. मग म्हणाला “किती छान ओळखतेस मला. आय मिस्सड यू सो मच शाम. ग्लॅड वी आर बॅक.”
“खरय सॅम, जराही विचार न करता तुझ्याशी बोलू शकते मी. आणि हे किती महत्वाचं आहे हे विसरलेच होते रे. बरं, मला सांग अजून लग्न नाही केलस?”
तेवढ्यात इंटरकॉम वाजला, रिसीव्हर वर बोलता बोलता हात ठेऊन सॅम म्हणाला,
“काय घेशील कॉफी की कोल्ड काही?”
“छे रे, आत्ता काहीच नको.”
“दोन कॉफी आणि एक हॉट चॉकलेट पाठव.”
“मस्तय रे हॉस्पिटल तुझं. एकदम अत्याधुनिक.”
तो किंचित हसला. “शाम, खरं सांगू, इथे या वातावरणात मी एक मोठ्या डॉक्टरची भुमिका वठवतोय. मग तो मोठेपणाचा आव, बडेजाव सगळं आलंच! त्यातल्या त्यात जमेची बाजू ही की, मी माझ्या पेशंटस समोर आव आणत नाही. तिथे मी फक्त डॉक्टर होतो, लहान, मोठा असं नाही, फक्त खराखुरा डॉक्टर, ज्याचं उद्दीष्ट फक्त पेशंटला बरं करणं हे असतं. ज्या दिवशी या भुमिकेतून बाहेर पडेन त्या दिवशी प्रॅक्टीस सोडून देईन मी.”
शाल्मली हसली फक्त. “सॅम सो ग्लॅड टु मीट माय ओल्ड फ्रेंड! जसाच्या तसा सांभाळून आहेस स्वत:ला याचं कौतुक वाटलं.”
“तू मात्र पूर्णपणे बदललीस शाम! हरवून गेली आहे आमची जुनी शाम. ती धडाडीची, अन्याय किंचितही सहन न करणारी शाम आहे कुठे?”
शाल्मली काहीच नाही बोलली.
कॉफी आली. शाल्मली ने श्रीशला हॉट चॉकलेट ग्लासनेच पाजवले. मग त्याचे ओठ पुसून कॉफी घेतली.
सॅम म्हणाला, चल आता आधी काही माझ्या मनात आहेत त्या टेस्टस करू, मी एक फॉर्म देतो भरायला तो घरी भर आणि मला स्कॅन पाठव.
तिघे ऑडीओमेट्री लॅब मधे गेली. नेहमी सगळ्यांकडे हसत हसत जाणारा श्रीश आज मात्र बुजला. नर्सकडे जाईना. मग शाल्मली म्हणाली “मी जवळ थांबू का?”
“हो हो मॅम, तुम्ही घेऊन बसा त्याला.”
मग आधीच केलेल्या एबीआर आणि ओईआर या हियरींग स्क्रीनींगच्या टेस्टस रीपीट केल्या. साधारण १५ १५ मिनीटांच्या टेस्ट होत्या.
मग सॅम ने अधिक डिटेल्ड अशा डायग्नोस्टिक टेस्टस करायला सांगितल्या. रिझल्टस् स्क्रीनवर त्याला दिसतच होते. शाल्मली ने संपूर्ण वेळ श्रीश ला मांडीवरच बसवले होते. जेणेकरून तो शांत बसेल.
त्यानंतर सॅम म्हणाला की “काही वेळेस आम्ही हियरींग एड्स जे ॲम्प्लीफायरचे काम करतात, वापरायला देतो पण श्रीशच्या बाबतीत ते वेळ घालवण्यासारखे होईल.”
शाल्मलीचा चेहरा बावरल्या सारखा झाला. “डिटेल्ड रिपोर्ट आल्यावर आपण बोलूच पण श्रीश अजूनही शांत बसलाय तर काही गोष्टी मी तुला सांगाव्या असं मला वाटतं. मुळात ऐकण्याचं कार्य कसं होतं ते आपण ८ वी त शिकलो होतो आठवतंय ? कानाचे तीन मुख्य भाग, बाह्य कर्ण, मध्य कर्ण,”
“आणि आंतरकर्ण! “शाल्मली ने त्याचे वाक्य पूर्ण केले.
“शाब्बास!”
“सॅम, गेलं वर्षभर मी आंतरजाल पिंजून काढलय या विषयावर.”
“आंतरजाल?”
“सोप्या भाषेत इंटरनेट”
“ओह! छान!”
“तर बाहेरचा ध्वनी गोळा करून आत नेण्याच काम आऊटर इयरचं. खास नळीसदृश्य अवयवातून ध्वनी मध्य कानातल्या पडद्यावर आघात करतो . हवेच्या दाबातील फरकाने आतील पडदा ही कंप पावतो. आंतरकर्णातील गोगलगायीसारखा भाग ज्याला कोक्लिया किंवा कर्णावर्त म्हणतात ते ध्वनीमुळे निर्माण झालेल्या कंपनांना विद्युत लहरीत रुपांतरीत करते आणि खास श्रवण मज्जातंतूंद्वारे ते मेंदूपर्यंत पोहोचवले जाते. मेंदूकडे मग ध्वनीची नोंद होते म्हणजेच आपण ऐकतो. ही झाली थोडक्यात श्रवण कसे होते ही माहिती.
शाम, लहान मुलांमधे ऐकू न येण्याचे सर्वसाधारण पणे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार ज्यात काही कारणाने ध्वनी कानांपर्यंत पोहोचत नाही. मध्य कानातील विकृत रचनेमुळे, कानात जास्त द्रावाचे प्रमाण, रोगजंतूंची लागण अशी अनेक कारणे असू शकतात. ज्याला आपण कंडक्टीव्ह लॉस म्हणतो. म्हणजेच बाह्य कर्णातून मध्यकर्णापर्यंत ध्वनी न पोहोचणे.
दुसरा प्रकार ध्वनी लहरींमुळे पडद्याचं कंपन तर होतं पण निर्माण झालेल्या विद्युतलहरी मेंदूपर्यंत पोहोचवल्या जात नाहीत. जर नस किंवा या लहरी वाहून नेणारे हेअर सेल्स मधे बाधा असेल तर. अशा वेळेस हियरींग एडस् चा फारसा उपयोग नसतो. तेव्हा कोक्लीअर इम्प्लांट ही शस्त्रक्रियेद्वारे करण्यात येणारी उपचार पद्धती वापरतात.” “हो हे ही वाचलय मी.” “शाम, श्रीशच्या बाबतीत दुसऱ्या प्रकारातील बहिरेपण असावं असा माझा प्राथमिक अंदाज आणि ते संपूर्ण असावं. त्यामुळे कर्णावर्त किंवा कोक्लीअर इम्प्लांट हा एकच उपाय मला दिसतो. सर्वसाधारणपणे हे एक कमी जोखीम असलेलं ऑपरेशन मानलं जातं. यशाचं प्रमाणही बरंच आहे. खरंतर सहाव्या महिन्यातही हे करता आलं असतं. ज्याने श्रीश बोलायला व्यवस्थित लागला असता.”
शाल्मली प्रचंड अस्वस्थ झाली.
“अजूनही काही फार बिघडलेलं नाही शाम. पुढे स्पीच थेरपी आणि तुझ्या प्रयत्नांनी तो नॉर्मल मुलांसारखा ऐकू बोलू लागेल यात शंका नाही.मग त्याने तिला काही लिंक्स दिल्या. घरी जाऊन हे विडीओ पहा आणि माहिती वाच.यात अनुवंशिकतेचं कारण ही असू शकतं. असेल तर निर्णय घेणं सोपं असतं कारण मग बहिरेपणाचं कारण ठोसपणे माहित असतं. असो. आपण दोन दिवसांनी पुन्हा भेटूच. वाचताना, काहीही शंका आली तर मला कधीही फोन कर. दिलेला हिस्टरी फॉर्म नीट भरून पाठव.”
शाल्मली ने एक दीर्घ श्वास घेतला. ती निघायला उठली, परत बसली. मग म्हणाली “या सगळ्याचा साधारण खर्च किती होईल?” सॅम काही बोलणार तेवढ्यात, पुढे म्हणाली, “करायचाच आहे उपचार, वेळ नाही दवडायचाय मला, पण मला साधारण खर्च सांग.”
“शाम, मी असताना तुला खर्चाची काय काळजी? कोणी तुला नया पैसा नाही मागणार.”
“नाही सॅम. तू माझा बालमित्र आहेस आणि जे माझ्या बाळासाठी करशील ते सर्वोत्तम असेल याची खात्री मला आपली मैत्री देते. पण आर्थिक बाजू मीच सांभाळणं योग्य. मी ती सांभाळेनही पण जरा उशीर लागेल आणि आता मला थांबायचं नाही. मी कंपनी मधे लोनसाठी अप्लाय केलच आहे, शिवाय तू आहेस त्यामुळे पैशांची जुळवा जुळव होईपर्यंत उपचार नाही थांबवायचास आणि ती खूप मोठी मदत आहे माझ्यासाठी. पण तरी मला कल्पना हवी.”
तिच्या दृढ पण शांतपणे बोललेल्या वाक्यांनी सॅम गप्प झाला. विचारात पडला. मग हसला किंचित. ‘हं, आहे आत कुठेतरी आमची जुनी शाम!’ मनात म्हणाला.
“ठीक आहे, उद्याच कळवतो तुला फोन करून.”
मग शांत मनाने शाल्मली निघाली.सॅमला अजून बरेच पेशंटस पहायचे होते. त्याने एकदा श्रीशच्या डोक्यावरून हात फिरवला. शाल्मली बाहेर पडली.