शाल्मली साईन लॅंग्वेज क्लासमधून बाहेर पडली. तेवढा वेळ श्रीश आईकडे राहायचा. त्याला खूप आवडायचं तिथे राहायला. मामा, मामी, मोठी भावंडं, आजी आजोबा, सगळे भरपूर लाड करत. या सर्वांचा शाल्मली ला खूप आधार वाटायचा. पुढच्या रविवारी सगळ्यांना जेवायला बोलवायचं तिने ठरवून टाकलं. तेवढीच वहिनीला एक दिवस स्वैपाकातून सुट्टी!
आता तिला श्रीश च्या ट्रीटमेंटचं पहायचं होतं. काही पैसे तिने बाजूला काढून ठेवले होतेच. आज रात्री ऑनलाइन सर्च ती करणारच होती. शिवाय मेडिकल फिल्ड मधल्या काही मित्र मैत्रिणींचा सल्लाही घेणार होती.
घरी येऊन तिने श्रीशचे मंमं,तिचे जेवण उरकले. श्रीश टेडीला घेऊन बेडवर चढला. मग तिने जरासे थोपटताच झोपीही गेला.
शाल्मलीने लॅपटॉप उघडला. कधी नव्हे ते पर्सनल मेलवर बरेच मेल्स दिसले. ती बरेच दिवसात उघडलीच नव्हती तिने.
पहाते तर ज्युनिअर कॉलेज मधील बऱ्याच मित्र मैत्रिणींचे मेल्स होते. शाल्मली बाकी कुठल्याच सोशल नेटवर्क वर नसल्याने तिला सगळ्यांनी भरपूर शिव्या घातल्या होत्या.
येत्या महिन्यात एका रविवारी बॅचचं स्नेहसंमेलन आहे आणि सगळ्यांनी यायचच आहे असे अनेक मेसेजेस होते.
मग आणखी एका मेसेजवर तिचं लक्ष गेलं. समीर साने, तिचा बालवाडीपासूनचा सच्चा दोस्त!
“मी भारतात परत आलोय, आणि सर्वांना, प्रामुख्याने तुला भेटण्याची खूप इच्छा आहे, तर तू येते आहेस ना, GTला” असं विचारलं होतं.
समीर, अत्यंत हुशार मुलगा. मेडिकल ला सरकारी कॉलेज मधे ॲडमिशन मिळवली त्याने. शाल्मली ने १२वी नंतर सरळ मॅनेजमेंट कोर्स जॉईन केला आणि मग वाटा वेगळ्या होत गेल्या. पण १२वी पर्यंत जोडगोळी होती त्यांची. नेहमी स्पष्ट आणि खरं बोलणारा समीर आणि शाल्मली खास दोस्त. त्याचं मेडिकल ला ॲडमिशन मिळवण्याचं स्वप्न पूर्ण झालं तेव्हा त्याच्या इतकाच आनंद शाल्मलीलाही झालेला. मग एम. बी. बी. एस. होईपर्यंत मेल वरून संपर्क राहिला . पण मग तो परदेशी गेला पुढच्या शिक्षणासाठी आणि शाल्मलीचं लग्न झालं. मग संपलाच संपर्क.
त्याचा शेवटचा मेल अजूनही तसाच होता. लग्नात मुलाने नोकरी न करण्याची अट घातलेली बघून प्रचंड चिडला होता. तू अशा मुलाशी लग्न करूच कशी शकतेस असा सवाल त्याने विचारला होता त्या मेल मधे. त्यानंतर आलेली ही पहिलीच मेल समीरची.
तिचा जाण्याचा निर्णय पक्का झाला. तिने तसे कळवूनही टाकले सगळ्यांना. नवा फोन नंबर दिला. काही क्षणात फोन वाजला. समीर होता पलिकडे. अगदीच अनपेक्षित होतं तिला. काय बोलावं कळेचना तिला. “अगं महिना लागतो का तुला मेल बॉक्स उघडून पाहायला? रोज वाट पाहायचो मी मेलला रिप्लाय येईल म्हणून! कुठे आहेस? कशी आहेस? लवकर बोल.” शाल्मली ला मधली सगळी वर्ष गळून पडल्यासारखं वाटलं. तोच आवाज. तेच स्पष्ट बोलणं. नकळत नजर ओली झाली. “शाम, (हे खास समीरने तिचं ठेवलेलं नाव ) आहेस ना? अगं बोल की काहीतरी.”ती किंचित हसली. “सॅम, अजूनही तसाच आहेस रे अगदी.” “शाम???? यु ओके? आवाज असा का येतोय तुझा? मी निदान शंभर एक शिव्यांची भूक ठेऊन बसलोय गं!”आता मात्र तिला खळखळून हसू आलं. सॅम, शाम ची जोडी फेमस होती कॉलेजमधे! “प्रत्यक्ष भेटतोस कधी सांग. मी पूर्ण तयारी करून येते. असं बेसावध गाठलस आणि मी अवाक होऊन बोलती बंद झाली ना माझी.” मग तोही हसला मनापासून. मधली वर्ष नाहीशीच झाली जणू. मग ती विचारत राहिली, तो स्वत:बद्दल सांगत राहिला. त्याने तिला विचारलेल्या प्रश्नांना ती त्रोटक उत्तरे देतेय हे लक्षात आलं त्याच्या. मग त्यानेही ताणलं नाहीच. ती नोकरी करतेय हे ऐकून बरं वाटलं त्याला. तो शेजारच्याच शहरात होता आणि येणाऱ्या रविवारी संध्याकाळी तो येणार होता तिला भेटायला. GT पर्यंत थांबायची गरजच नाही असं सरळच सांगून टाकलं त्याने. तिलाही या आपल्या बालवाडीपासून च्या मित्राला भेटायची आतुरता होतीच. नकळत हलकं हलकं वाटायला लागलं. “एक दो तिन चार सॅम शाम चा जयजयकार!जितेगी भाई जितेगी सॅम शाम की दोस्ती जितेगी!” असल्या काही भयंकर अफाट घोषणा देत चौथी पाचवीत गल्लीत उड्या मारत फेऱ्या घातलेल्या तिला आठवल्या. कित्येक दिवसांनी खुद्कन हसू उमटलं तिच्या ओठांवर.
------------------------
शंतनूने परत आपल्या डॉक्टर मित्राला फोन लावला. तो म्हणाला पाठवलेत मी रिपोर्टस. कळेल या आठवड्यात.शंतनूचा कामाचा उरका वाढला, जीम मधे रोज जाऊन तब्येत सुधारू लागली. आपल्या मुलासाठी आपण काहीतरी करतोय हे समाधानही होतंच गाठीला. शंतनू परत पूर्ववत व्हायला लागला.
स्नेहल बरोबर अधून मधून डिनर व्हायला लागलं. तिला अधून मधून गिफ्टस् मिळू लागली. त्याला रोज तिने आणलेल्या सुग्रास टिफिन ची परतफेड करण्याची गरज वाटत होती.
------------------
प्रशांत , शाल्मली ही एक उत्तम टीम बनली होतीच. त्यांच्या यशस्वी प्रोजेक्टस चा बोलबाला कॉरपोरेट ऑफिस पर्यंत पोहोचला होता. तिच्या प्रमोशनचे प्रपोजल प्रशांतने वर पाठवून दिलेच होते. शाल्मली जरी योग्य अंतर राखून वागत होती तरी प्रशांत बरोबरचं तिचं वागणं बरंच खेळीमेळीचं झालं होतं. प्रशांत काही कच्चा, पहिल्या हळव्या प्रेमाचा प्रेमवीर नव्हताच. त्याला वाट पाहणं मंजूर होतं. बऱ्यापैकी कामानिमित्ताने का होईना शाल्मलीचा सहवास घडत असल्याने आता मुद्दाम काही कारणं काढून तिच्या जवळ जाण्याची गरज त्याला जाणवत नव्हती.
शाल्मलीने रविवारी दुपारी माहेरच्या सर्वांना जेवायला बोलावले होते. जेवणं खेळीमेळीत पार पडली. “आई, सॅम परत भारतात आलाय. आज जाणार आहे त्याला भेटायला.” “कोण सान्यांचा समीर? अरे वा! मोठा हुशार मुलगा. इथेच असतो का? मी बोलावलय म्हणून सांग गं!” “हो सांगते.” “आत्या, श्रीश ला नेऊ नकोस हां, आमचा बागेत जायचा प्लॅन ठरलाय” भाच्याने लग्गेच सांगितलं. “हो का? कुणाचा प्लॅन ठरलाय? तुझा आणि श्रीश चा का?” वयवर्षे ७ च्या अमेय ला तिने विचारले, हसत हसत. “अशी काय गं आत्या, बाबा आई नेणारेत आम्हाला, कालच ठरलय. हो की नाही गं आई?” “होहो, शाल्मली, खरच ठरलय गं आमचं. आणि बागेत श्रीश पण खूश असतो. तू जाऊन ये तुझ्या मित्राला भेटून. श्रीश ला राहू दे, आमच्याकडे.” वहिनी म्हणाली.
संध्याकाळी शाल्मली तयार व्हायला उठली. आपल्या ढगळ्या कपड्यांवर सॅम ची खास ठेवणीतली काय प्रतिक्रिया असेल हा विचार मनात येऊन जाम हसायला आलं तिला. मग नकळत हात आधीच्या कपड्यांकडे वळला. पण परत तिने सध्याचाच दोन साईज मोठा ड्रेस काढला कपाटातून.
सॅम समोर आपण कसे दिसतो याला नगण्य महत्व होतं. तिलाही आणि त्यालाही. हे पक्कं ठाऊक होतं तिला. पोहोचायला तासभर तरी लागला असता तिला. निघाली मग. दोन बस बदलून पुढे ऑटो असं ठरवलं तिने. सगळा प्रवास करून पोहोचली तेव्हा १० मिनिटं उशीर झालाच होता. सॅम नक्की येऊन बसला असेल. ती रेस्टॉरंट मधे शिरली. सगळीकडे नजर टाकली कुठेच नव्हता सॅम. कमाल आहे. मग बसली एक रिकामं टेबल पाहून. तेवढ्यात वेटर येऊन म्हणाला “मॅम, तुमच्यासाठी निरोप आहे, टेरेस लॉन वर बोलावलय तुम्हाला सरांनी.” “टेरेस लॉन?” “चला मी दाखवतो.” ती निघाली त्याच्या पाठोपाठ, तो लिफ्टपर्यंत घेऊन गेला , मग म्हणाला ११ वा मजल्याचं बटन दाबा डायरेक्ट टेरेसलॉनवरच जाते लिफ्ट!
लिफ्ट वर वर जात शेवटी थांबली, दार उघडलं तर समोर सॅम उभा, रिसिव्ह करायला.
तेव्हाचा सुकडा, दाढीचे खूंट वाढवून फिरणारा सॅम आणि अंगाने भरलेला, अद्ययावत कपड्यातला रुबाबदार सॅम .... जमीन अस्मानाचा फरक होता. ती पाहत राहिली. तिच्या त्या निरखून पाहण्याने एकाच वेळी तो किंचित हसला, लाजलाही. त्याला तसं अस्वस्थ झालेलं पाहून जाम हसायला आलं तिला. तिने नजरेनेच काय असं विचारलं आणि तो ही हसायला लागला. “हेच हेच, हे असं क्ष किरण परिक्षण आणि पाठोपाठ त्याचं पोस्टमार्टेम होणार हे माहित होतं म्हणूनच आधीच भेटूया म्हटलं मी!”
“छान दिसतोस सॅम! एकदम हॅंडसम!”
“शाम, तू का पण अशी कोमेजलेली दिसतेस? कुठे हरवली ती चमकत्या डोळ्यांची, सगळं मनातलं बोलून टाकणारी, सॅम ला झापणारी शाम?”
“बसूया?”
“चल!”
कोपऱ्यातलं टेबल बूक केलेलंच होतं त्याने. बसले दोघे!
“शूट!” सॅम म्हणाला.
शाल्मली हसली जराशी.
मग धबधब्यासारखी बोलत सुटली. लग्न झाल्यापासून आजपर्यंत! ऐकताना सॅम चा चेहरा तिच्या बोलण्याबरोबर क्षणाक्षणात बदलत होता. संताप, चीड, वेदना ,सगळं काही उमटत गेलं त्याच्या चेहऱ्यावर. आजपर्यंत मनात रुतून बसलेल्या पण कधीच कोणासमोर न बोलल्या गेलेल्या घटना, पायात रुतलेले काटे उपसून काढावे, काढताना टचकन डोळ्यात पाणी यावं पण मग ठसठस कमी व्हावी तसं झालं तिचं. समीर फक्त ऐकत होता. सगळं बोलून झाल्यावर त्याने एकच प्रश्न विचारला, “श्रीश ची ट्रीटमेंट कोणाकडे सुरू आहे?” बस, शाल्मलीच्या डोळ्यांना पूर आला जणू! “ए, अगं, शाम, काय झालं?” “वर्षभर विस्कटलेल्या आयुष्याची घडी बसवण्यात गेलं सॅम! सुरवातीला दोन तीन वेळा नेलं डॉक्टरकडे, पण श्रीश इतका लहान होता की ऑडिओमेट्री पण धड होत नव्हती रे. पैशापरी पैसा जात होता. मग मी ठरवलं वर्षभर पैसे साठवून मग सलग उपचार करावेत.,खूप उशीर केला का रे मी?”
“नाही.आणि आता चिंता नकोय, मी आलोय ना, तुझा डॉक्टर मित्र?” सॅम ने तिच्या हातांवर थोपटत म्हटलं. ती फिकट हसली.
“मला उद्या जे काही त्याच्या जन्मापासूनचे रिपोर्टस् असतील ते मेल कर! माझं स्पेशलायझेशन याच विषयात आहे.” शाल्मलीने चमकून पाहिलं, “काय सांगतोस सॅम? खरच?” देवदूत भेटल्याचे भाव होते तिच्या चेहऱ्यावर! “शाम, अशी नको बघूस माझ्याकडे. हे बघ जोपर्यंत मी स्वत: श्रीशला तपासत नाही, टेस्टच होत नाहीत, तोपर्यंत मी काहीच सांगू शकणार नाही. पण एक नक्की की आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.बरं मला एक सांग त्या नीच माणसाचा आणि तुझा डायव्होर्स झाला ना? झाला असेलच म्हणा, तू काही भिजत घोंगडं ठेवणारी मुलगी नाहीस.” शाल्मली ने मान खाली घातली. “सॅम,तेवढं नाही करवलं मला.” “अगं वेडी आहेस का तू? का अडकून पडली आहेस? असं काय आहे म्हणून निर्णय नाही झालाय तुझा?” “ सॅम , अरे....काही झालं तरी श्रीश चा बाप आहे तो?”
“हे मात्र तुझं मुळीच पटलेलं नाही मला. बाप स्वत:ला बाप म्हणवून घेतोय का? परवा दुकानदाराकरवी खेळणं पाठवलं? कुठला बाप असा राहू शकतो गं आपल्या मुलाला भेटल्या शिवाय?” हे बघ, तू लगेच दुसरं लग्न करावस, आधार शोधावास असलं बु*** मी तुझ्याबद्दल नाहीच बोलणाराय. तू स्वयंसिद्धा होतीस आणि आहेस. तान्ह्या मुलाला घेऊन असं बाहेर पडणं, कोलमडून न जाता ठामपणे परिस्थितीचा सामना करत श्रीशसाठी नवं विश्व निर्माण करणं हे येरागबाळ्याचं काम नाहीच. पण मला एकच कळतं, तुटलेली नाती वेळीच पूर्णपणे तोडून नाही टाकली तर कुजतात आणि गँगरीन सारखी खातात तुम्हाला.”
“सॅम!”
“हो असंच होतं शाम, तेव्हा लगेच निर्णय घे. तुझ्या नवऱ्याने जे केलं तो अपराध होता. आणि अपराधाला शिक्षाच हवी. चुकीला माफी, प्रायश्चित्त असं काही होऊ शकतं. अपराधाला नाही.”
शाल्मली पाहत राहिली आपल्या या सडेतोड मित्राकडे. नेहमीप्रमाणे एकमेकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम तो विसरला नव्हता.
“शाम तुला आठवतं? मोनिकामधे मी ऐन १२वी च्या वर्षात अडकत असताना तू कसं मला अलगद बाहेर काढलं होतंस? डायरेक्ट मोनिकाशी बोलून? तेव्हा तू ते केलं नसतस तर आज हा समीर कुठेतरी खर्डेघाशी करताना दिसला असता. काहीच दिवसात मोनिकाने रमण बरोबर दोस्ती केली आणि मला माझी चूक उमगली. पण दोन महिने प्रथमच आयुष्यात अबोला धरला होता मी तुझ्याशी, तू मात्र शांतपणे वाट पाहिलीस या मित्राची! आज माझी पाळी तुला चार शहाणपणाचे शब्द सांगण्याची. खरंतर या लग्नाला तयार कशी झालीस याचच मला आश्चर्य वाटत होतं. झालं ते झालं, आता मोकळी हो, कळतंय का?” शाल्मली समोरची कॉफी नुसती ढवळत राहिली. सॅम ने तो विषय तिथेच थांबवायचा ठरवलं. “बरं बरं, एवढं नकोय अगदी तोंड बारीक करायला. विचार कर यावर एवढंच म्हणायचय मला. आता हसा बरं जरा, त्या गोड खळ्या दिसू देत की आम्हालाही जरा.”
“सॅम!”
तो खळखळून हसला. “काय फिदा असायची पोरं या खळ्यांवर, आठवतंय ? निम्मे फिशपॉन्डस या खळ्यांमधेच अडकलेले असत. तू मात्र कधी कोणाला दाद दिली नाहीस. तुझ्याशी मैत्री करून द्यावी म्हणून कित्येक पोरं मला कधीही ट्रीट द्यायला अर्ध्या पायावर तयार असायची.”
“सॅम....,काय सांगतोस? आणि तू त्या ट्रीटस् घ्यायचास?”
“नेहमी नाही, पण आपली कडकी असेल आणि समोरून कोणी ट्रीट देत असेल तर नाही पण नव्हतो म्हणत.”
“आणि मग?”
“मग काय? केव्हातरी ग्रुप मधे उगाच आपली द्यायची ओळख करून, तुझ्या एका जरबी नजरेने गप्प व्हायचे ते रोमिओ.”
मग दोघेही हसत हसत जुन्या आठवणीत रमले. तेव्हाचे टीचर्स, त्यांच्या लकबी, ठेवलेली टोपण नावं, लावलेल्या प्रॉक्झी, ट्रेक्स, गॅदरींग, नाटकं, मग काढलेल्या नोटस्, रात्रीचे जागून केलेले अभ्यास, कडक चहा, उद्याच्या पेपर मधे नेमके कुठले प्रश्न येणार यावर लावलेल्या पैजा, १२ वी चा रिझल्ट, तिने अचानक डेंटिस्ट्रीला मिळत असलेली ॲडमिशन सोडून मॅनेजमेंट कोर्स कडे वळवलेला मोर्चा, फक्त सॅम ने त्यासाठी दिलेला पाठींबा .... हजार विषय ... जणू ते दिवस जगून आली दोघे परत.
कित्येक दिवसांनी शाल्मली आज खळखळून हसली होती. तसं तिने सांगताच समीरला दिवस कारणी लागल्यासारखे वाटले. जवळपास तीन तासांनी दोघं उठली. समीर म्हणाला चल तुलाही घरी सोडतो आणि काका काकुंनाही भेटतो. मला आज जे काही रिपोर्टस् असतील ते मेल कर.
-----------------