प्रायश्चित्त - 2 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

प्रायश्चित्त - 2

शाल्मली भराभर आवरत होती. एकीकडे दिवसभर ऑफिसमधे होणाऱ्या मिटींग्ज, त्यासाठीची तिची झालेली, राहीलेली तयारी, यांची मनातल्या मनात उजळणी सुरू होती, तर दुसरीकडे हात स्वैपाकघरात अत्यंत सराईतपणे चालत होते.

दोन दिवसांच्या श्रीश ला घेऊन, वर्षभरापूर्वी शंतनू ला कायमचं सोडून जेव्हा ती आईबाबांबरोबर निघाली तेव्हा मनात प्रचंड काहूर होतं. भविष्यात काय लिहून ठेवलंय याचा अंदाज नव्हता. पदरी श्रुती नसलेलं दोन दिवसाचं बाळ, ना नोकरी ना पैसा. आईवडिलांचा आधार काही काळापुरताच घ्यायचा हे मात्र तिने तेव्हाही ठामपणे ठरवलं होतं. नाही म्हणायला शिक्षण मात्र होतं , उत्तम मार्कांची डिग्री होती. पण नोकरी मिळेल? राहायचं कुठे? आईवडिल ,भाऊवहिनी ,त्याची दोन मुलं यांना त्यांची जागा पुरत होती. पण आणखी दोन माणसं कायमची राहायची तर जरा अडचण होणार हे नक्की होतं. पण सध्या काही महिने इलाज नव्हता.

श्रीश महिन्याचा होईपर्यंत तिने संपूर्ण विश्रांती घेतली. भाऊ वहिनींनी मनापासून तिला हे घर तुझंच आहे असं सांगितलं आणि तसे वागलेही. श्रीश तर घरात सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत बनला. महिना पूर्ण झाल्याबरोबर मात्र तिने भराभर फोन फिरवायला सुरवात केली. कॉलेजमधल्या मित्र मैत्रिणी, टीचर्स, आधी जिथे कोर्स करताना ट्रेनी म्हणून तीन महिने काम केलं होतं त्या कंपनीत, सगळीकडे फोन केले.

पुढचा एक महिना अर्ज पाठवणे, जाऊन भेटणे वगैरेत पार पडला. आणि जिथे ट्रेनी म्हणून काम केलं होतं, तिथेच नोकरीचंही पक्कं झालं. बाकी दोन ठिकाणी देखील नोकरी मिळत होती, पण या कंपनीत कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठीचं पाळणाघर होतं. अर्थातच शाल्मलीने याच नोकरीची निवड केली. आता निदान दिवसातून तीन चार वेळा ती श्रीश ला पाहून येऊ शकणार होती. त्याच्या दुधाच्या वेळाही जमवू शकणार होती.

पुढच्या एक तारखेला ती नोकरीत रुजू झाली.

सुरवातीचे काही दिवस जुळवा जुळवीत गेले. आणि मग हळूहळू घडी बसत गेली. काहीच महिन्यांपूर्वी शेजारच्या काकूंचा मुलगा अमेरिकेहून आला आणि त्याने मोठी जागा घेऊन काकूंना आपल्या बरोबर नेले. तेव्हा शाल्मलीने जागा भाड्याने मागितली आणि त्यानेही ओळखीत जागा भाड्याने जातेय म्हटल्यावर आनंदाने दिली.

शाल्मलीचा नवा संसार सुरू झाला. ती आणि श्रीश असा. स्वभावाप्रमाणे संपूर्ण जीव ओतून तीने ही नवी घडी बसवली. आज सहा सात महिन्यात ती बॉसचा उजवा हात, सहकाऱ्यात प्रिय , कामचुकार सहकाऱ्यांसाठी डोकेदुखी आणि असूयेचा विषय बनली होती.

तिने आपल्या सद्यस्थितीचे कधी भांडवलही केले नाही पण ती लपवूनही ठेवली नाही. अर्जातच तिने पतीपासून विभक्त झाल्याचे तिथल्या रकान्यात भरले होते.

लग्न मोडले नव्हते कारण दोन्ही बाजूंनी कोणीच हालचाल केली नव्हती.

नुकताच संध्याकाळचा मूकबधीर मुलांशी कसे संभाषण करावे हे शिकवणारा वर्ग तिने लावला होता. श्रीश अजून जेमतेम वर्षाचा होत होता. पण तिला पूर्वतयारी करणे नेहमीच आवडे त्याचाच हा भाग होता. आंतरजालावर तर हा विषय तिने पिंजून काढला होता. इतर सर्व बाबतीत श्रीश नॉर्मल प्रगती दाखवत होता आणि त्याचा भरपूर आनंद शाल्मली ला देत होता. तिचं आणि त्याचं आता एक वेगळंच विश्व बनलं होतं.

---------------

दार उघडून शंतनू आत आला. पाय लडखडत होते. पोटात सकाळपासून अन्नाचा कणही नव्हता. फ्रीजमधून पाण्याची बाटली काढली ती रिकामी होती. दारूचा अम्मल होता पण पोटातल्या भुकेने , तहानेने जीव कासावीस झालेला. आज वर्ष झालं हे असंच सुरू होतं.

शाल्मली आणि तिचे आई बाबा बाळाला घेऊन निघून गेले. आयुष्यात पहिल्यांदाच शंतनू हतबुद्ध होऊन किती तरी वेळ बसून राहिला. आज नेहमीसारखा त्याच्याकडे प्लॅन बी नव्हता. शंतनू चे आई वडील ही काहीच न सुचून बसून राहिले. बऱ्याच वेळाने तो उठला आणि बाहेर पडला. काल परवा मुलगा झाला म्हणून ज्या मित्रांनी ओढून पार्टी ला नेलं त्या मित्रांकडे जाणं शक्य नव्हतं. शाल्मली सोडून गेली आणि सगळीच दारं जणू बंद झाली.

वर्ष उलटलं पण शंतनू काही सावरला नाही.

शाल्मली..... माझी लाडकी शाल्मली .... माझा गुरूर.... माझा शब्द न् शब्द झेलणारी , माझी प्रत्येक गरज न सांगताच कळणारी, सरळ मला सोडून गेली ???? कोणासाठी? त्या काल जन्माला आलेल्या अधू मुलासाठी? एक दिवसाच्या नात्यासाठी इतक्या वर्षांचं नातं क्षणात तोडून गेली?

अचानक शंतनू सगळी शक्ती गेल्यासारखा मट्कन खाली बसला, हमसून हमसून रडायला लागला लहान मुलासारखा. रडता रडता जमिनीवर आडवा झाला आणि नशेने आणि निद्रेने त्याला आपल्या कवेत घेतले.

वर्षभरात सैरभैर झालेला शंतनू कामाच्या ठिकाणी ही हा धक्का लपवू शकला नव्हता. जी कीव लोकांनी करू नये म्हणून आटापीटा केला ती कीव याची ही अवस्था बघून जो तो करू लागला. केवळ आधीचा त्याचा परफॉर्मन्स लक्षात घेऊन नोकरीवरून कमी केले नव्हते एवढंच.

पण शंतनू ला त्याची काही फिकीरच उरली नव्हती. तो सतत दारूच्या नशेत राहणे पसंत करत होता. सुरवातीचे काही दिवस आई वडीलांनी समजावण्याचा , सावरण्याचा प्रयत्न केला पण नंतर ते ही हताश झाले. आपल्या गावी निघून गेले.

वर्षभरापूर्वी चा हाच तो रुबाबदार, देखणा, कर्तृत्ववान शंतनू हे सांगूनही कोणाला खरं वाटलं नसतं.

----------------

शाल्मलीने श्रीश च्या अंगावरचं दुपटं सारखं केलं आणि ती बेडवर त्याच्या शेजारी आडवी झाली. दिवस कसा पंख लावल्यागत निघून जाई पण रात्र मात्र पायतुटक्या कुत्र्यागत सरपटत राही. नकळत शंतनूच्या बलदंड बाहूंची तिला आठवण होई. क्षणात मन खाडकन तिला चपराक देई, ‘लाज नाही वाटत त्या नीच माणसाची आठवण काढायला? इतकी शरीराची भूक त्रास देतेय? ज्या माणसाने तुझ्या मुलाचं अस्तित्व नाकारलं त्याची आठवण काढतेस?’ दुसरं मन म्हणे, ‘तो कसाही असला तरी मी तर खरंच प्रेम केलं ना त्याच्यावर. माझ्या प्रेमात काय खोट होती म्हणून हे असं व्हावं? ‘ उलट सुलट विचार, कोलाहल उठवित मनात. ऑफिस मधे ही एकटी आहे कळल्यानंतरही निरनिराळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागे. कोणी सहानुभुतीतून सलगी करू पाही, नकळत झाल्यासारखे स्पर्श पण सहेतुक असत, कोणी ‘असेलच काहीतरी भानगड’ असे पाहत. अशा वेळेस सौंदर्य हा गूण न बनता शाप बनतो हे ही तिच्या लवकरच लक्षात आलं. तिने मग तिच्या राहणीमानात बदल केले . सलवार कुडते दोन साईज मोठे खरेदी करू लागली. केस चापून चोपून घट्ट मागे बांधून टाकू लागली. माफक मेकअपला कायमचा फाटा दिला.

सुदैवाने ज्यांच्या हाताखाली ट्रेनी म्हणून हिने काम केले तेच सध्या तिचे वरीष्ठ होते आणि प्रथमपासूनच त्यांच्या मुलीच्या वयाच्या शाल्मलीच्या गुणांना ते ओळखून असल्याने ते तिला बरंच सांभाळून घेत होते आणि मदतही करत होते. पण लवकरच ते निवृत्त होणार होते आणि नवीन माणूस त्यांच्या जागी रुजू व्हायचा होता.

-----------------------

शंतनूला सकाळी जाग आली तिच मुळी पोटात होणाऱ्या प्रचंड मळमळीने. उठला आणि धडपडत कसाबसा बाथरूमपर्यंत गेला. भडाभडा पित्त उलटून पडलं. सगळी दुर्गंधी सुटली घरभर. मोठ्या निकराने तोंड धुवून बाहेर आला.

येऊन सोफ्यावर आडवा तिडवा पसरला. पुन्हा जाग आली तेव्हा दुपारचे १२ वाजून गेलेले. या आठवड्यात तिसऱ्यांदा न सांगता दांडी झाली त्याची.

शंतनूने खोलीत नजर फिरवली. ठिकठिकाणी कपड्यांचे बोळे, काढून फेकलेले बूट मोजे, बाहेरून मागवलेल्या अन्नाचे अर्धवट खाऊन टाकलेले बॉक्सेस, दारूच्या बाटल्या, ग्लासेस, कोपऱ्यात जाळ्या जळमटं, सगळीकडे इंचभर धूळ, उकिरडा झाला होता घराचा. पैशांच्या आशेने कामवाली बाई सहा सात महिने येत होती पण एकदा याला घरी तर्र होऊन बसलेला पाहून घाबरली आणि तिनेही येणे सोडले. तेव्हापासून घरावर कसलाच स्वच्छतेचा संस्कार झाला नव्हता.

“काय करून घेतलंस हे शंतनू? “ त्याच्या कानात शाल्मली चा आवाज घुमला. दचकून पाहिलं त्याने इकडे तिकडे. ती गेलीय कायमची हे अजूनही वळत नव्हतं. पण आज पहिल्यांदाच निदान त्याचं लक्ष त्याच्या स्वत:कडे गेलं होतं.

उठून त्याने फ्रिज शोधला. केव्हातरी आणून ठेवलेली दुधाची पिशवी दिसली. तसंच थंड पिणार होता पण मग आठवलं , शाल्मली कध्धी पिऊ द्यायची नाही कच्चं दूध. मग काढून कपात ओतलं. मायक्रोवेव्ह मधे गरम करायला ठेवलं. दात घासून आला . केव्हातरी आणून ठेवलेला बिस्कीटाचा पुडा सापडला. मग दुध बिस्किटं खाल्ली. जरा जीवात जीव आला त्याचा. उठून गॅलरीत आला. शाल्मलीची बाग वाळून गेली होती. कुंड्या तेवढ्या उरल्या होत्या. काय वाटलं कोणास ठाऊक, आतून एक बादलीभर पाणी आणून सगळ्या कुंड्यांना घातलं. तापलेल्या मातीवर पाणी पडताक्षणी मृदगंध दरवळला. खोल भरून घेतला त्याने तो उरात.

‘एके काळी किती ओरडायचो आपण तिच्यावर... मातीत हात घालून बसते म्हणून, त्याला आठवलं. आपण एवढे हिशेबी, भावनांना सतत चार हात लांब ठेवून जगत आलो. लग्नही केलं ते सर्व आपल्या पुढच्या आयुष्याला पूरक असं पाहून . पण ही इतकी कशी भिनली आपल्या रक्तात? कसं जमवलं तिने? मनाची बंद करून घेतलेली कवाडं सताड उघडून आत ठाण मांडून अशी बसली की प्रत्यक्षात आयुष्यातून निघून गेली तरी मनातून काढणं जमत नाही आपल्याला. असं काय होतं तिच्यात? खरंच काय होतं?’

सगळंच दाटून आलं शंतनूच्या मनात. एवढ्यात एक चिमणी गवताची काडी घेऊन गच्चीत आली पण याला बघून उडून गेली. लांबूनच मग चिमणा चिमणी चिवचिवत उडत राहिले. याने पाहिलं, वरच्या हॅंगिंग पॉटमधे काही काड्या, अर्धवट बनवलेलं घरटं दिसत होतं. शंतनू झट्कन सवयीने ते काढून टाकायला पुढे झाला आणि तिथेच थबकला. शाल्मलीने कधीच ते घरटं काढलं नसतं. उलट....तो आत आला. त्याने एका पसरट भांड्यात पाणी आणि एका छोट्या थाळीत मगाशी सापडलेली बिस्किटस् ठेवली आणि घेऊन बाहेर आला, गॅलरीत ठेऊन दार लावून आत आला.

मग बराच वेळ तसाच बसून राहिला. बाहेर चिमणा चिमणीची चिव चिव सुरू होती. शंतनूला ती सोबत फार फार हवीशी वाटली त्या क्षणी.

मग सावकाश उठून त्याने घराची स्वच्छता करायला सुरवात केली. तेवढ्यात बेल वाजली. दारात कामवाली बाई उभी. “सायेब पैशे ऱ्हायले माझे द्यायचे, तुमी भेटलाच न्हाईत...” तिची सराईत नजर खोलीत फिरली... “अगं बया.. काय दशा जाली हो... सरा, आजचा दिस देते सोच्छता करून .. मंग द्या माये पैशे” असं म्हणत तिने पदर बांधून कामाला सुरवात केली. शंतनू आपल्या खोलीत गेला. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून आला. बाईने तोपर्यंत खोलीचा नूर पार पालटला होता. ती आता आतल्या खोल्यांकडे वळली. पहाता पहाता घर परत जरा घरासारखं दिसू लागलं.

मग ती जायला निघाली. शंतनू ने बरेच पैसे तिच्या हातावर ठेवले. ती म्हणाली “एवढे न्हाईत सायेब. वहिनींबरोबर दोन हजाराची बोली झाली हुती.” तो म्हणाला “राहू देत. उद्यापासून परत ये कामाला आणि मला पोळी भाजी पण दे करून. काय उरतात त्यातून सामान आण त्यासाठीचं.” ती ‘बरं’ म्हणाली. नकळत तिचे डोळे पाणावले. “सायेब वहिनी कवा यायच्या?”

शंतनू ने नुसती मान हलवली. “कुनाची नदर लागली म्हनावी सोन्यासारक्या संसाराला “असं म्हणत बाई निघाली. “येते सामान घिऊन आन करते चपाती भाजी” म्हणाली.

शंतनू ला कित्येक दिवसांनी आज माणसात आल्यासारखं वाटलं. चिमण्यांची चिवचिव सोबत घेऊन तो अल्बम मधले शाल्मलीचे फोटो पाहत बसला. सावकाश तर्जनीने तिच्या क्लोजअप चेहेऱ्याची आऊटलाईन रेखत बसला.