प्रायश्चित्त - 4 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रायश्चित्त - 4

शाल्मली उठली पहाटेसच आज. आज श्रीश झाला वर्षापूर्वी. आज ती आई झाली होती वर्षभरापूर्वी. जीवनातला परमोच्च आनंद दिला होता श्रीश ने तिला.

तिने श्रीशला न्हाऊ माखू घातले. आईकडे गेल्यावर आजी, मामी ने त्याला ओवाळले. बच्चा पार्टीने केक आणूनच ठेवला होता, तो दादाच्या मदतीने श्रीश ने कापला. सगळ्यांनी ‘हैप्पी बर्थ डे टु श्रीश’ म्हटलं. दोन्ही मुलांनी कडेवर घेऊन त्याला नाचवला. श्रीश प्रचंड खूश होता. शाल्मली च्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्या तिने हळूच पुसून घेतल्या.

आज ऑफिसच्या पाळणाघरात वाटण्यासाठी शाल्मलीने कप केक्स, चॉकलेटस् घेतली होती. जवळच्या मूकबधीर मुलांच्या शाळेतही संध्याकाळी ती घेऊन जाणार होती श्रीश ला. आता सवय करायलाच हवी होती.

ऑफिसमधे आल्यावर पहाते तर पाळणाघरात बोर्डवर श्रीश चा शाल्मलीबरोबरचा फोटो, त्याभोवती डेकोरेशन वगैरे केलेलं, मोठ्या अक्षरात ‘हैपी बर्थ डे’ लिहीलेलं. खूप भरून आलं तिला. खरंतर सगळ्याच मुलांच्या वाढदिवसाला असं व्हायचंच की पाळणाघरात , पण आपल्या बाळासाठी कोणी केलं की आईला त्याचं अप्रुप असतं. सगळ्यांनी श्रीश ला विश केलं. श्रीश नेहमीच हसरं बाळ , त्यातून सध्या पाळणाघराचं शेंडेफळ , त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांबरोबरच इतर मुलांचाही फार फार लाडका. “नशीबवान माझं बाळ, किती लोकांचं प्रेम मिळतंय त्याला, फक्त एका माणसाचं सोडून....” खचकन पायात काटा रुतावा तसं झालं तिचं.

तिने श्रीश ला मुलांच्या गराड्यात सोडलं आणि ती आली आपल्या केबीन मधे. आज वेळेत आटपायला हवं काम. असं म्हणत तिने प्रथम मेल्स हातावेगळ्या करायला सुरवात केली. शाल्मली एकदा एका गोष्टीत शिरली की पूर्णपणे एकाग्र होणं हा स्थायीभाव. मग काम काहीही असो. आत्ताही तसंच झालं. लॅपटॉप च्या स्क्रीनवर डोळे , मेंदू, इतका एकाग्र की केबीन च्या दारावरची बारीक टकटक, मग प्रशांत दार उघडून आत आला तरी हिला पत्ता नाही. तो मात्र त्या एकाग्र, बुद्धीमान सौंदर्यवतीला एकटक न्याहाळत राहिला . ‘काय आहे हे रसायन? इतक्या ढगळ्या कपड्यांमधेही इतकी सुंदर कशी दिसू शकते कोणी? नुसतं सौंदर्यच नाही बुद्धीमत्ताही तितकीच प्रखर. कामातला तिचा आवाका प्रशांत सारख्या अफाट आवाक्याच्या माणसालाही चकित करत होता. मग का राहते ही अशी गबाळी? मुद्दाम?’

तोच दचकला त्याच्या या विचारांनी. खाजगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्याच्या खणांना त्याने कायम एकमेकांपासून दूर ठेवले होते. “नेव्हर टू बी मिक्स्ड” हा त्याचा फंडा. पण शाल्मली ला भेटल्यापासून काही वेगळंच घडत होतं. स्वत:ला सावरत घसा खाकरला त्याने. शाल्मली ने वर पाहिलं आणि पट्कन उठली. “सर, तुम्ही? मला बोलवून घ्यायचं ना? काही काम?”

“बसू?”

“हो हो,” शाल्मली गोंधळलीच.

प्रशांतला तिला असं गोंधळलेलं पाहून बरं वाटलं. “चला, अगदीच उदासीन नाही ही, आपला काहीतरी परिणाम होतोय तर.” मनातल्या मनात या विचारासाठी त्याने दोन रट्टेही दिले स्वत:ला, ‘यू रास्कल....’

क्षणभर आपण का आलो होतो हे विसरलाच तो, पण मग शाल्मलीच्या चेहऱ्यावरचं भलंमोठं प्रश्नचिह्न बघून त्याला आठवावंच लागलं.

मग बराच वेळ तो अनेक बारीक सारीक गोष्टी विचारत राहिला आणि शाल्मली ला चकित करत राहिला . ज्या गोष्टींचे बारीक तपशील तिने हातचे म्हणून राखून ठेवले होते काल, ती लूपहोल्स बरोब्बर शोधून काढली होती त्याने. नकळत दोघांची नजरानजर झाली आणि त्याचा अर्थ दोघांनाही बरोबर कळला.

“तू हे मुद्दाम राखून ठेवलं होतस हे माहितीय मला”

“हुशार आहे हा बाबा, मजा येणार काम करायला”

असं काहीसं होतं ते. दोघांच्याही ओठांवर सूचक पण सावध स्मितरेषा उमटली.

बोलत असतानाच तिचा फोन वाजला, ती बंदच करणार होती पण पाळणाघराचा नंबर म्हटल्यावर राहवेना तिला, “एक्सक्यूज मी सर, इफ यू डोन्ट माइंड....”

“या या गो अहेड प्लीज.....”

तिने फोन उचलला. “मॅम लवकर या , लग्गेच, “ ती खाडकन उठून उभी राहिली... “अगं काय झालं.... ?” “नाही तुम्ही याच.... “ “बाप रे!, आले आले काय झालंय पण?” पलिकडून फोन बंद झाला.

“इज एव्हरीथींग ऑलराईट शाल्मली?”

“अं? सॉरी सर, जायला हवं मला ....”

एवढं बोलून शाल्मली बाहेरही पडली.

प्रशांतही तिच्या मागोमाग गेला. त्यालाही तिच्या वेगाबरोबर चालायला जड गेलं. तिचं अर्थातच लक्ष नव्हतं.

पोहोचली तर पाळणाघराचं दार उघडं होतं आणि ती आत शिरणार तेवढ्यात श्रीश दुडकी पावलं टाकत बाहेर आला..... क्षणभर तिच्या लक्षातच आलं नाही, आणि आलं तेव्हा जे वाटलं ते शब्दात सांगणं कठीणच होतं.

श्रीश चं पहिलं बाळपाऊल, किती दिवस वाट पाहत होती ती. उठून धरून उभा रहायला लागून दोन महिन्यांच्या वर वेळ गेला होता पण चालत नव्हता. पाळणाघरातल्या बायकांना जवळ जवळ रोज विचारायची ती. विनाकारण श्रीश च्या शारिरीक वाढीबाबत काळजी असायची तिला. आज त्याचं हे प्रगतीचं पहिलं पाऊल तिला प्रत्यक्ष पाहायला मिळावं म्हणून त्या बायकांनी केलेली युक्ती चांगलीच फळाला आली. शाल्मली क्षणभर पाहत राहिली ओल्या डोळ्यांनी, आणि मग पट्कन उचलून घेऊन पटापट मुके घेत सुटली श्रीशचे. सगळे हे दृश्य ओल्या डोळ्यांनी पाहत होते.प्रशांत प्रचंड चकित होऊन हे पाहत होता.

-------------------------

शंतनू सकाळी उठला. त्याने आदल्याच दिवशी ऑफिसमधे दोन दिवस येणार नाही असं कळवलं होतं. त्याने हॉस्पिटल गाठलं. रिसेप्शन काउंटरवर त्याने नाव सांगितलं आणि डॉक्टरांची भेट मागितली. “चार दिवसांनंतरची अपॉइंटमेंट मिळेल, पेशंटचं नाव सांगा.” मग तो म्हणाला “मला एक रेकॉर्ड हवं होतं. मागच्या वर्षी याच महिन्यात साधारण याच कालावधीत एक डिलीव्हरी झाली होती.” “पेशंटचं नाव लिहून द्या आणि बसा, वेळ लागेल जुने रेकॉर्डस काढायला.”

तो बसून राहिला . साधारण अर्ध्या तासाने रिसेप्शनीस्टने नाव पुकारले.

“रेकॉर्ड आहेत, तुम्ही कोण पेशंटचे?

“मी... हजबंड आणि झालेल्या बाळाचा बाबा, ...”

“बर्थ सर्टिफिकेट आधीच इश्यू झालंय. तुम्हाला डुप्लिकेट कॉपी हवीय का?”

“हो, आणि संपूर्ण फाईलची कॉपी पण?”

“हरवलीत की काय?”

“अं हो,”

“बसा, प्रिंट व्हायला वेळ लागेल, बरेच रिपोर्टस् आहेत, ऑडिओमेट्री वगैरेचे. हो आणि काही पैसेही भरायला लागतील फोटोकॉपिंगचे, प्रिंट झाल्यावर कळेल किती”

“हो हो चालेल ,बसतो मी”

फाईल हातात आल्यावर शंतनू ने प्रथम तारीख पाहिली. आजचीच, वर्षभरापूर्वीची. आज वर्षापूर्वी बाप झालो आपण. नावाला!शाल्मली ने माझं नाव लावलं असेल त्याच्या रेकॉर्डस् वर?

“श्रीश” दोघांनाही फार आवडलेलं नाव, छोटं , सुटसुटीत, आणि दोघांच्याही नावातला “श” मिरवणारं.

ठेवलं नसेलच तिने. का ठेवावं? मी तर त्याला मुलगा मानायलाही तयार नव्हतो.

कणाकणानं मन गर्तेत जात होतं पश्चात्तापाच्या, वेदनेच्या, आणि हात देऊन वर काढायला कोणी नव्हतं.

नकळत पाय वाईनशॉपकडे वळले . ‘नेहमीचं’ विकत घेतलं. घरी आला. दार उघडून आत आला. ग्लास काढला. बाटली उघडली. ग्लास भरला. सोफ्यावर बसला. ग्लास ओठांकडे गेला.

अचानक लक्ष नुकतीच भिंतीवर लटकवलेल्या शाल्मली च्या फोटोफ्रेमकडे गेलं आणि शॉक बसावा तसा हात खाली आला. झटकन उठला. ग्लास आणि बाटली दोन्ही बेसिनमधे उलटे केले . हात थरथरत होते. घाम फुटला होता. तन मागत होतं. मन नाही म्हणत होतं.

त्याने हॉस्पिटल मधून आणलेली फाईल काढली. परत वाचली. ‘आज एक वर्षाचा झाला मुलगा आपला! आपला? काय केलं आपण त्याचं? जावं का भेटायला?’

त्याला शाल्मली आठवली, त्या दिवशीची, संतापाने थरथरणारी, कधी नव्हे ते प्रचंड ओरडून बोलणारी, ‘नजरेत पराकोटीचा तिरस्कार भरला होता तिच्या आपल्याविषयी... तिच्या त्या तिरस्कृत नजरेनेच सटपटून गेलो आपण. कोलमडून पडलो.’

नकळत प्रचंड प्रेमात पडत गेलो आपण शाल्मलीच्या. कळलंच नाही कधी येवढे गुंतलो. पण प्रेमाला बरंच काही द्यावं लागतं हे माहीतच नव्हतं आपल्याला.’

शाल्मलीची ती तिरस्काराने भरलेली नजर परत एकदा आठवली आणि आपण आयुष्याची लढाई संपूर्ण हरलोय या भावनेने त्याला पूर्णपणे घेरलं. मगाशी ओतून दिलेली दारू आत्ता अगदीच गरजेची झाली. ‘का ओतली मी?’ रागारागाने मूठ आपटली त्याने टीपॉयवर. ग्लास गडगडत गेला खाली, पडून चक्काचूर झाला. ‘माझ्या आयुष्याचाही असाच चक्काचूर झालाय.’ शंतनू ला वाटलं.

नजर नकळत शाल्मलीच्या फोटोकडे गेली. डोळे भरून वाहू लागले.

अचानक शाल्मली दार उघडून आत आली. एकटक त्याच्याकडे पाहत उभी राहिली. बराच वेळ. मग अलगद तिने त्याचा हात हाती घेतला, दुसऱ्या हाताने शंतनू च्या गालांवर ओघळलेले अश्रू पुसले. तिच्या त्या हळूवार स्पर्शाने शंतनूला भडभडून आलं. त्याने तिचा हात घट्ट पकडला. “आलीस शमा, माझी शाल्मली... का गेलीस मला सोडून... चुकलो गं मी... पण मला सुधारायला एक संधी दे... आता जाऊ नकोस कधीच मला सोडून.... प्लीज...”

शाल्मली काहीच बोलली नाही. तिने हळू हळू हात सोडवून घ्यायला सुरवात केली.

“शमा...शमा.... नको गं .... नको ना जाऊस... प्लीज.... प्ली....”

शंतनूला जाग आली. खडबडून जाग आली. तो शाल्मली ला शोधू लागला. मग त्याला जाणवलं , स्वप्न पडलं आपल्याला. पण शाल्मलीचा हात माझ्या हातात होता आत्ता, स्पर्श अजून जाणवतोय हाताला, गालाला.. ,तो हवालदील झाला. काही सूचेना. मग वाटलं, ‘हा संकेत असेल का काही? आज शाल्मली च्या नजरेत तिरस्कार नव्हता.’

सुचेना काहीच! वेडापिसा झाला. पटकन उठला. बाहेर पडला. कार काढली नी सुसाट निघाला. चार तासांचा तर रस्ता. पोहोचू लगेच. जसजसं शाल्मलीचं शहर जवळ येऊ लागलं, तसतसा धीर खचायला लागला. ‘काय होईल? हाकलून देईल? सर्वांसमक्ष अपमान करेल? तिच्या घरचे? मारायला उठेल तिचा भाऊ?’ अनंत विचारांनी काहूर माजलं त्याच्या मनात!

-----------------------

प्रशांत प्रचंड चकित होऊन समोर जे घडत होतं ते पाहत होता. हजार प्रश्न त्याला अचानक सतावायला लागले. ‘लग्न झालय हिचं? मंगळसूत्र? अलिकडे कोण घालतं म्हणा, मुलगापण आहे? वाटत नाही बघून. नवरा? ओह....’

प्रशांत सावकाश मागे वळला. पण मग अचानक बोर्डकडे लक्ष गेलं त्याचं. शाल्मली आणि त्या बाळाचा फोटो, बर्थ डे विशेज... ‘ओह....’

तो चटकन पुढे झाला. शाल्मलीच्या चेहऱ्यावर अजून ते ओलं हसू तसंच होतं. तशाच ओल्या हसऱ्या नजरेने तिने त्याच्याकडे पाहिलं. श्रावणातल्या पावसाळी उन्हातलं टवटवीत फूल च जणू. या हसऱ्या खळ्यांकडे पाहिल्यावर कोणाचा चेहरा हसरा व्हायचा राहिल ? परत वस्तुस्थितीची जाणीव होऊन तो ओशाळला. बाळाला घेण्यासाठी हात पुढे झाले. श्रीश सगळ्यांकडेच हसत हसत जाई तसाच प्रशांतकडेही गेला. “ओह, सो , यंग बॉय, इट्स युवर बर्थ डे टुडे? हॅपी बर्थ डे चॅंप!” श्रीश त्याच्या हलणाऱ्या ओठांकडे पाहत होता. “नाव काय तुझं?”

“श्रीश” शाल्मली म्हणाली पटकन. “हं, ‘श्रीश’ नाईस नेम! तुझं बाळ खूपच गोड आहे शाल्मली.” शाल्मली नुसतच थॅंक्स म्हणाली. पाळणाघरातली मुलगी श्रीश ला घ्यायला आली.

शाल्मली आणि प्रशांत ऑफिस ब्लॉक कडे परत निघाले. “तू सुट्टी घ्यायला हवी होतीस आज. मग बाबा बरोबर पार्टी संध्याकाळी का?”

शाल्मली ला काय बोलावं कळेना. मग म्हणाली “संध्याकाळी मूक बधीर मुलांच्या शाळेत नेणार आहे. मी तीनला निघेन , चालेल ना? सुरेश ला बाकी सगळं ब्रीफ केलय संध्याकाळपर्यंतच्या ॲक्टीव्हीटीज.”

“मूक बधीर... का? म्हणजे बराच लहान आहे ना तो, कळायला लागल्यावर चॅरिटी शिकव ना.”

“श्रीश ही जन्मत: बहिरा आहे आणि म्हणून मुकाही.”

“ओह, आय ॲम सो सो सॉरी शाल्मली. मला काहीच कल्पना....”

“इट्स ओ के सर.”

“श्रीश चा बाबा ? तो येणार आहे ना तुम्हाला न्यायला?”

“अं, नाही. मी च जाणाराय बाळाला घेऊन.”

“मग बाबा?डायरेक्ट तिथेच”

“वी आर सेपरेटेड”

“ओह.... आय ॲम एक्स्ट्रीमली सॉरी शाल्मली!”

या वेळेस ती काहीच बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावरील वेदना स्पष्ट दिसत होती. न पाहिलेल्या शाल्मली च्या नवऱ्याबद्दल प्रचंड रागाची भावना निर्माण झाली प्रशांतच्या मनात. “तीन वाजता जाण्याआधी भेटून जा मला.”

“येस सर!”

दोघही आपापल्या केबिन्सकडे वळले.

नंतरचा वेळ कामात पटकन गेला. तीनला पाच मिनीटं उरली तेव्हा प्रशांतने भेटून जा म्हटल्याचं आठवलं शाल्मलीला. “छे , आता अजून वेळ जाईल. ती शाळा पाच वाजता सुटते.चारपर्यंत तरी पोहोचायला हवं. “ मग घाईघाईने ती गेली केबीनमधे, नॉक करून आतच गेली.

“झाली वेळ? निघुया? “

“सर, कुठे? मी आज लवकर...”

“तिथेच. मी येतोय बघायला ही शाळा. आजपर्यंत कधी योगच नाही आला. तुझ्या बच्चूच्या निमित्ताने मलाही काही नवं शिकायला मिळेल. चल, उशीर नको व्हायला, ट्रॅफिक किती वाढलाय माहिताय ना?”

पुढे तिला काहीच बोलू न देता प्रशांत ढांगा टाकत बाहेरही पडला. नाईलाज झाल्यासारखी शाल्मली ही मागोमाग निघाली.

प्रशांतच्या कारमधून निघाले. श्रीश रस्त्यावरच्या गमती जमती बघण्यात जाम खूश होता. शाल्मली आणि प्रशांत गप्प होते.

‘आपण असं अगाऊपणे आलेलं आवडलं नाही हिला.’

‘का हा आलाय? मला यापुढे जपून राहायला हवय का? पण टॅक्सीने असं गावाबाहेर एकटीने येण्यात धोका होता. अगदीच गर्दी मागे पडली’

“हाय वे सुरू होतो तिथेच ना?मॅप तरी तसंच दाखवतोय”

“हो सर, आणि थॅंक्स!”

“शाल्मली , थॅंक्स मी म्हणायला हवं, ही संधी मला तुझ्यामुळे मिळतेय”

ती पुढे काहीच बोलली नाही.

शाळा आली, सगळे उतरले. शाल्मलीने मुलांना वाटायला आणलेला खाऊ घेतला. गाडी पार्क करून प्रशांत पुढे आला. त्याने हात पुढे करताच श्रीश त्याच्याकडे गेला. तिघे निघाले. शाळेत तिने आधी कल्पना दिलेलीच होती. मुख्याध्यापिका लगेच आल्याच पुढे. “बरं झालं आज बाबा ही आले बाळाचे तुमच्या बरोबर”

शाल्मली काही म्हणण्यापूर्वीच त्या पुढे निघाल्या. नकळत तिने प्रशांत कडे कटाक्ष टाकला. तो तिच्याकडे पाहत होता. त्याच्या नजरेतले भाव न ओळखण्यासारखे. तिने पटकन नजर वळवली.

बाई त्यांना एका वर्गात घेऊन गेल्या. साधारण सहा सात वर्षांची मुलं असावीत सगळी. नुकतीच साईन लॅंग्वेज शिकत असावित. त्यांच्या शिक्षिकेने त्यांना खाणाखुणांनी सांगितलं आज या बाळाचा वाढदिवस तुमच्याबरोबर साजरा करणार आहे तो. शाल्मली बऱ्यापैकी ओळखू शकली ते सगळं चला आपण बरोबर शिकतोय.

मग आणलेला केक कापला. खाऊ वाटला. श्रीश एवढ्या सगळ्या मुलांना पाहून हरखूनच गेला. मुळातला त्याचा हसरा चेहरा आनंदाने उजळून गेला होता. मुलंही छोट्या बाळाला पाहून भलती खूष होती.

नकळत तिचं लक्ष पलिकडे उभ्या प्रशांतकडे गेलं. अत्यंत प्रेमळ नजरेने तो श्रीश कडे पाहत होता. तिला आश्चर्य वाटलं. कुठेतरी मन भरून आलं. ‘कोण कुठला हा. पण किती प्रेमाने पाहतोय माझ्या बाळाकडे. ह्या नजरेत खोट नाही नक्कीच.’

तेवढ्यात प्रशांतची आणि तिची नजरानजर झाली. तिने झटक्यात नजर दुसरीकडे वळवली. पण तिचा गोरामोरा चेहरा त्याच्या नजरेतून सुटला नाही.

--------------------