प्रायश्चित्त - 11 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

प्रायश्चित्त - 11

ती ही मग रूमकडे जायला निघाली. सॅम आला तर आपण तिथे असावं.

रुमवर आल्यावर श्रीशसाठी खाऊ आलाच होता. श्रीशने आवडीने खाल्ला तो.

तेवढ्यात सॅम आला. आल्या आल्या त्याने हात सॅनिटाईज केले. श्रीशच्या कानामागचा भाग चेक केला. “हं, गुड.”

“हं बोला मॅडम, काय प्रॉब्लेम?”

“सॅम आपण बोललो तेव्हा श्रीश च्या एकाच कानाचं ऑपरेशन ठरलं होतं, त्याप्रमाणे खर्चही काढला आपण, मग फॉर्मवर दोन्ही कानांचं कसं लिहीलय?”

“शाम, अगं आपलं एका कानाचं वगैरे कधीच काही बोलणं झालं नाही. हे बघ, दोन प्रकारे यावर उपाय करतात. एक म्हणजे एका कानात कोक्लियर इंम्प्लांट बसवतात आणि दोन्ही कानात हियरिंग एडस् बसवतात. म्हणजे आवाज ॲम्प्लीफाय पण करतात आणि मध्य कानाच्या नशीला इंम्प्लांट ने बायपास पण करतात. दुसरा मार्ग म्हणजे दोन्ही कानात इंम्पलांट करतात. श्रीशच्या बाबतीत हियरींग एडचा काही उपयोगच नाही. पण दोन्ही कानात इंम्प्लांट केले तर हियरींग बॅलन्स व्हायला मदत होईल आणि नीयर नॅचरल स्पीच पण येईल. सगळ्या तज्ञांनी मिळून हा कौल दिला.”

“आता उरला प्रश्न खर्चाचा. तर इंम्प्लांटस बनवणाऱ्या एका कंपनी च्या मदतीने आम्ही हा सर्वे करतोय एका कानात इंम्प्लांट वर्सस दोन्ही कानात, किती जास्त फायदा मिळतो. कारण शेवटी हा डेटा महत्वाचा असतोच. तर ती कंपनी दुसऱ्या कानाचा इंम्प्लांट फ्री देणार आहे. अर्थात श्रीशसाठी दोन्ही कानांचा इम्प्लांट उपयोगी ठरेल असं पटल्यावरच आम्ही हा निर्णय घेतला. श्रीशला ऐकू येणे सगळ्यात महत्वाचं आहे. तुझ्याशी बाकी सर्व गोष्टी डिस्कस केल्याच होत्या मी. माझ्या मनात पहिल्या दिवसांपासूनच दोन्ही कानांचाच विचार होता त्यामुळे वेगळं बोललो नसेन .काही शंका आहे का मनात? स्पष्ट बोल शाम.”

“न नाही. बरं मला सांग रुममधे कोणीही येऊ शकतं का बाहेरचं?”

“छे, काहीतरीच काय? कडक सेक्युरिटी आहे,असं का विचारतेस?”

“शंतनू आज सरळ इथे घुसला आज.”

सॅम च्या चेहऱ्यावरचे भाव भरभर बदलत गेले.

“कधी? काय म्हणाला आणि?”

“माझ्याशी बोलायचय म्हणाला.”

“मग?”

“मग काय,मी हाकलून दिला.”

“शाम,बस खाली. मी हे तुला आधीच सांगायला हवं होतं बहुतेक. शंतनू त्याच्या आणि माझ्या कॉमन मित्राचा रेफरन्स घेऊन माझ्याकडे श्रीशची केस घेऊन आला. म्हणजे फोनवर बोलला आणि रिपोर्टस पाठवले जन्माच्या वेळचे.”

शाल्मली डोळे विस्फारून ऐकत होती.

“आपण जेव्हा श्रीशच्या टेस्टस करत होतो तेव्हाची गोष्ट. मी रिपोर्टस पाहिल्यावर ओळखलं हे श्रीशचे रिपोर्टस. मी म्हटलं घेऊन या बाळाला. तर म्हणाला मी नाही आणू शकत पण प्रयत्न करेन की त्याची आई घेऊन येईल. मी सगळा खर्च देईन. फक्त तिला हे कळू देऊ नका.”

शाल्मली झटकन उठली. “आणि तू तयार झालास सॅम.”

“तू शांत हो. मी असं काही केलं नाही. मी म्हटलं तपासल्याशिवाय काहीच पुढचं सांगता नाही येणार.

आता तो इथे कसा पोहोचला हे खरंच नाही माहित मला. पण मी काढेन शोधून. आता तू रिलॅक्स हो. उद्या भरपूर दगदग होईल. जस्ट डोन्ट वरी!”

सॅम जायला निघाला.

शाल्मली अजूनही विचारातच दिसली त्याला. “शाम, अजून शंका आहेत का काही.” तिने मान हलवली.

“तुला शांत झोप लागेल अशी गोळी देऊ का?”

“नाही नाही नको.”

“ठीक आहे मग. मी निघतो. एव्हरीथींग विल बी फाईन. ओके?”, तो तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाला.

“ओके,” ती ही हसून म्हणाली मग.

श्रीश ने मंमं केलं. शाल्मलीनेही कॅंटीन मधून मागवून घेतलं थोडसं. फारशी भूक नव्हतीच तिला.

श्रीश त्या उशीशी खेळता खेळताच डोळे जडावले त्याचे. जरा थोपटल्याबरोबर झोपला. शाल्मलीच्या डोळ्याला मात्र डोळा लागेना. उद्या सगळं बदलणार होतं तिच्या आणि बाळाच्या आयुष्यात. ‘बदलेल ना?’ एक ना अनेक विचारांनी भंडावलं तिला. ‘ऑपरेशनचा किती त्रास होईल? जीवाला धोका नाही असं हजारदा वाचूनही मन धास्तावलय आपलं. माझं हसरं आनंदी बाळ, कधीच फारसं न रडणारं, ऐकायला येऊ लागल्यावर बदलेल का हे सगळं ? आवाजाचा त्रास होईल त्याला? ऐकू येईल ना नक्की?’

हा विचार फिरून फिरून पिंगा घालू लागला. कधीतरी डोळा लागला.

“सांभाळ नीट मुलाला, जन्म दिला आहेस ना, जीवनमरणाशी झुंजतोय बघ....” कर्कश आवाजात केतकीचा डॅड ओरडत होता.

“आजच्या आज उचला या पोराला आणि घेऊन जा .... हा बहिरा डाग नकोय मला माझ्या यशस्वी जीवनात.....” शंतनू थंडपणे बोलत होता. शाल्मली खाडकन उठून बसली. दरदरून घाम फुटला होता तिला. क्षणभर काही कळेचना. मिट्ट अंधार. ‘काय चाललय?’

मग पूर्ण जागी झाली. भला मोठा श्वास घेतला तिने. स्वप्न पडलं आपल्याला.

उठून थंड पाणी प्यायली. ‘काय म्हणून हे असं स्वप्न पडलं आपल्याला?’

नंतर बराच वेळ तळमळत राहिली. पहाटे केव्हातरी डोळा लागला.

“मॅम, मॅम”, हाका आणि दारावरच्या टकटकीने जाग आली. पटकन उठली ती. दार उघडलं.

“मॅम तैयार हो जाओ. आधे घंटेमे ओटी में ले जायेंगे बेबी को.”

शाल्मलीच्या पोटात मोठा गोळा आला.

‘देवा, माझं हे नाजूक बाळ, ती चिरफाड कसं सहन करणार? परमेश्वरा , मी का नाही घेऊ शकत त्याचं हे दुखणं?’ नकळत तिचे डोळे भरून यायला लागले. अंगाला बारीक कंप होताच. “बेबी को सिर्फ चाहे तो दो घुंट पानी, बाकी कुछ नही. बेबी को जगाने की जरुरत नही. मैं नॅपी बदल देती हुं , बस.”

तिने नुसती मान हलवली.

मग तिने भराभर स्नान वगैरे उरकलं. “आप चाहे तो यहीं बैठो रुम में मॅम, ऑपरेशन करीब ७ बजे शुरू होगा. मैं बुला दुंगी आपको.”

“नही नही, मैं वही बैठुंगी ओटी के पास.”

“अंदर की रुम में आप स्क्रीन पे देख सकोगी ऑपरेशन.”

मग श्रीश जागा झाला. त्याची तयारी करून मग बॉय आल्यावर सगळे निघाले. श्रीशला भूक लागली होती. त्याला बॉय आत नेऊ लागला तेव्हा त्याने एकदम गर्रकन वळून शाल्मलीच्या गळ्याला मिठी मारली. मग बॉयने त्याला एक सॅनिटाईज केलेले खेळणे दिले. कसाबसा त्याला रमवून तो आत घेऊन गेला. शाल्मलीला हुंदका दाटून आला.

दादा आणि मित्र मगाशीच ब्लड बॅंकेत पोहोचले होते. नंतर ते लगेच ऑफिस मधे जायचे होते. बाबांना अचानक बि पी चा त्रास होऊ लागल्याने ते किंवा इतर कोणी येणार नव्हते.

दादा हाफ डे घेऊन येईन म्हणाला. ती बरं म्हणाली. तसही तिला आत्ता एकटच रडावसं वाटत होतं.

किती तरी वेळ ती तशीच बसून होती. ‘काय चाललं असेल आत? बाळ माझं सगळ्या अनोळखी लोकांना पाहून घाबरलं असेल का? रडत असेल. पोटात काही नाही त्याच्या.’ सगळं अंग म्हणजे घुसमटलेल्या नसांचं भेंडोळं होऊन गेलं तिचं. डोकं दोन्ही हातात धरून बसून राहिली. इतकं असहाय्य शंतनू च्या घरून बाहेर पडतानाही नव्हतं वाटलं तिला.

‘सॅम, आहेस ना रे आत माझ्या बाळाबरोबर?’ नकळत परत परत भरून येणारे डोळे तिने कसेबसे पुसले. जवळच्या बाटलीतून पाणी प्याली. जरा सावरलं तिने स्वत:ला. तेवढ्यात नर्स बोलवायला आली.

ती गेली आत. सॅम, तीन असिस्टंट डॉक्टर्स, भूलतज्ञ, नर्सेस, ओटी बॉय असा बराच फौजफाटा काचेतून पलिकडे दिसत होता. तिची नजर श्रीश ला शोधत होती. पण तो दिसेना. तेवढ्यात सॅम बाहेर आला. त्याने सराईत नजरेने शाल्मलीची मन:स्थिती जोखली. मग म्हणाला “प्रोसीजर सुरू व्हायला जरा वेळ आहे. तू कॉफी वगैरे घेऊन ये. बाहेरच्या रुममधे स्क्रीनवर दिसेल तुला सगळं. एव्हरीथींग विल बी फाईन,जस्ट डोंट वरी.” एवढंच बोलून तो आत गेला. तिला अचानक आठवलं ती सही राहिली करायची. तेवढ्यात नर्सने तिला परत बाहेरच्या रुममधे सोडले. ती रिसेप्शन मधे जाणार तेवढ्यात तिच्या फोनवर फोन आला “मॅम सही करायला खाली या.” ती लगेच गेलीच. सह्या वगैरे झाल्या. मग रिसेप्शनिस्ट म्हणाली “बाळाचे डॅड होते आत्ता इथे, सही पण करतो म्हणाले. पण तुमच्या नावाने पेपर्स आहेत ना, म्हणून तुम्हाला बोलवायला लागलं.”

शाल्मली दचकून पाहू लागली आसपास. मग म्हणाली “कुठे आहेत बाळाचे डॅड?” रिसेप्शनिस्ट आश्चर्याने पाहू लागली. “मग म्हणाली आत्ता इथेच होते.”

शाल्मली ला काहीतरी शंका आली. ती म्हणाली “तुम्हाला कसं कळलं बाळाचे वडिल आहेत?”

“त्यांनीच सांगितलं. आय मीन, .......” ती ही विचारात पडली..... मग आठवलं तिला...... “त्यांनी रिपोर्टस दाखवले ना.... आधीचे.... पैसे पण भरणार होते पण डॉक्टर समीर यांची सक्त ताकिद होती की त्यांनी सांगितल्याशिवाय कोणाहीकडून या केसचे पैसे नाही घ्यायचे. म्हणून नाही घेतले.”

सकाळपासून प्रथमच शाल्मली रिलॅक्स झाली. कालपासून सॅमविषयी मनात आलेल्या शंकांचं मळभ दूर झालं.

“तुम्ही अटेंडन्ट पास दिलात का त्याना?”

“हो मॅम”

“आता परत बोलवून काढून घ्या तो. ही इज नॉट फादर ऑफ माय चाइल्ड. खोटं बोलतोय तो माणूस.”

“ओह माय गॉड”

“सेक्युरिटीला बोलवून घेऊ का मॅम?”

“नको, त्याची गरज नाही. बस तो पास काढून घ्या.”

“ओके मॅम.”

“वी आर एक्स्ट्रीमली सॉरी”

“इटस् ओके.”

शाल्मली परत वर निघाली. ओटी च्या बाहेर येऊन बसली. बरेच चिंताग्रस्त चेहरे दिसले तिला. मधे मोठी सर्क्युलर जागा आणि सर्व बाजूने निरनिराळे कॉरीडोर्स कडे निघणारे रस्ते. ओटी च्या बाजूलाच आयसीयु होतं. तिथले अधिकच काळजीयुक्त चेहरे.

ती एका खुर्चीत बसली. डोळे मिटून मान मागे टेकली. काळजीने जीव पाखरागत भिरभिरला.

तेवढ्यात नर्सने तिला जवळ येऊन हाक मारली. तिने डोळे उघडताच तिला स्क्रीनरुम मधे या ऑपरेशन पहायचं असलं तर असं सांगितलं. ती जरा घुटमळली. पण मग गेली आत.

स्क्रीन ऑन केला नर्सने. फक्त कानामागचा भाग, आणि दोन ग्लव्ड हात दिसत होते. आधी संपूर्ण भाग सॅनिटाईज केला परत एकदा. कसली तरी ट्रान्सपरंट टेप लावली होती बाकी चारी बाजूला. मग त्यातल्या एका हातात स्कालपेल ठेवला गेला, सराईतपणे एकदा फक्त हवेत कानामागे स्कालपेल फिरवून घेतला गेला आणि पुढच्या क्षणी तो कातडीवर फिरला, भळाभळा रक्त वाहू लागलं. दुसरीकडून चिमटा पुढे झाला कॉटन स्वॅबवाला आणि त्याने भराभर ते रक्त टिपून घेतले.

शाल्मली चा सगळा जीव घशात गोळा झाला. मग कातडी खालचा टिश्शू मास बाजूला सरकवला जाऊ लागला हळू हळू, मिडल इयर स्पष्ट दिसू लागला, त्यावरची पोकळीही मोकळी करण्यात आली.

सतत एका बारीकशा नळीने पाण्यासारखा द्राव सोडला जात होता तिथे, आणि टिपलाही जात होता. मग अत्यंत हळूवारपणे एक गोलाकार चकती त्या पोकळीत सरकवण्यात आली आणि त्याला जोडलेली बारीक नस सदृश्य नळी मिडल इयरच्या गोगलगायीसारख्या दिसणाऱ्या भागात कोक्लियात अलगद बसवली गेली. मग बाजूला केलेल्या टिश्शयुला परत वरून जागोजागी ठेवले गेले. अत्यंत कुशलतेने मग कातडी परत शिवायला सुरवात झाली .

इतका वेळ जणू धरून ठेवलेला श्वास सोडला शाल्मलीने. एका कानाचे ऑपरेशन तर झाले.

भडभडून आलं तिला. बसवेना एका जागी. पटकन बाहेर आली. बाहेर एका खुर्चीत बसली आणि सगळं साठवलेलं अवसान गळलं तिचं. ढसाढसा रडायला येऊ लागलं. दोन्ही हातांच्या ओंजळीत तोंड लपवून गदगदून रडत राहिली. काही वेळाने कोणीतरी हातावर हात ठेवल्याचं जाणवलं तिला. भरल्या डोळ्यांनी ओंजळीतून चेहरा वर करून पाहिलं तर केतकी बसली होती तिच्याजवळ. तिच्या हाताला धरून. काही कळण्याआधी तिने केतकीला मिठीत घेतले आणि तिने परत अश्रुंना वाट करून दिली. काही वेळाने, सावरली. बिचारी लहानगी केतकी पण तिलाही शाल्मलीची मन:स्थिती कळली असावी. ती तिचा हात घट्ट पकडून बसून राहिली.

केतकीचा बाबा लांबून हे सगळं पाहत होता. आपण काय करावं त्याला कळेना. मग आठवलं काहीतरी. कॉफी मशीनवरून कॉफी घेऊन आला. केतकी ला खूण केली. “आंटी, हे घे”

शाल्मलीने वर पाहिलं. केतकीचा बाबा कॉफीचा पेपरकप घेऊन उभा होता. तिने नकळत हात पुढे केला आणि कप घेतला. तो लगेच वळून निघून गेला.

कॉफी घेतल्यावर तिला जरा बरं वाटलं. हुशारी आली. वॉशरुममधे जाऊन ती चेहऱ्यावर पाणी मारून आली. केतकी तिथेच बसून होती. मग ती केतकी जवळ जाऊन बसली. तिचा हात तिने हातात घेतला. एक वेगळाच बंध निर्माण झाला होता काही क्षणांत त्या दोघींमधे.

तेवढ्यात नर्सने ऑपरेशन झालय, थोड्या वेळाने डॉक्टर बोलावतील तुम्हाला असं सांगितलं.

तिने मान हलवली.