लैंगिकता एक संस्कार.... Khushi Dhoke..️️️ द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लैंगिकता एक संस्कार....


'संवेदना : मंच मनाचा' ही आमची पहिली संवेदना तुम्हा सर्वांसाठी..... सर्वांनी अवश्य वाचा व प्रतिक्रिया द्या.....🤗

नव्याने एकत्र येऊया....
Let's do it.....🤗🤗

नवीन ब्लॉगस्पॉट आहे..... नक्की भेट द्या... आणि मी लिहिलेला लेख इथे सामायिक करते नक्की वाचा...✍️🙏☝️

इतर ही नव - नवीन विषय त्यासाठी नक्की भेट द्या...🙏✍️


*लैंगिकता एक संस्कार....🤗*


काहीच दिवसांपूर्वी बंगळुरू बलात्काराची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याचं बघितलं तेव्हा, कुठेतरी मनात त्या पाशवी वृत्ती विषयी एक भीतीदायक भाव दाटून आला. का घडत असावेत हे प्रकरण वारंवार? का लोकं इतकी अमानवी कृत्य करण्यास घाबरत नाहीत? का, ही पाशवी वृत्ती इतकी वरचढ ठरते? या, आणि अशा प्रश्नांनी डोकं जेव्हा असह्य वेदनेने दुखायला लागलं तेव्हा "लैंगिकता शिक्षण" किती महत्वाचे आहे ही जाणीव मनाला झाली.

आता थोडक्यात "लैंगिकता शिक्षण" म्हणजे काय? तर, समाजात वावरताना आपण लैंगिक भाव - भावना कसे व्यक्त करतो किंवा आपली लैंगिक वर्तवणूक कशी असायला हवी आणि त्याचा इतरांना कुठलाही नुकसान पोहचू नये म्हणून, कोणती काळजी घेता येईल. अशा सर्व विचारपूर्वक बाबींचा समावेश "लैंगिकता शिक्षण" यात होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

निर्भया सामूहिक बलात्कार, खैरलांजी हत्याकांड, कोपर्डी हत्याकांड, कथुआ बलात्कार, हैदराबाद दिशा केस, हाथरस बलात्कार, उन्नाव बलात्कार यासारखे किती तरी अमानवी कृत्य देशातच नाही तर, राज्यात सुद्धा घडून आल्याचे पुरावे मिटलेले नाहीत! त्यावर हळहळ देखील व्यक्त केली गेली. परिणामी कायद्यात बदल करण्यासाठी संसदेत आवाज देखील उठवण्यात आल्याचे आपण बघितले. मात्र "इतकंच पुरेसं आहे का?" हा प्रश्न तसाच पडून राहिला!

"लैंगिकता शिक्षण" यात लिंगाविषयी भाव येतात म्हणून, लोकांचा विशेषतः आपल्या भारतात बहुसंख्यांचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा निराळा! कधी त्याकडे किळसवाण्या भावाने बघितलं जातं! तर कधी जो बोलणारा असेल त्याला अपराधिक नजरेने! का? तर, भारतीय संस्कृतीच्या नितीतत्वांना ते दूषित करणारं वाटतं! पण, लैंगिकता शिक्षण ही सुद्धा एक नैतिक जबाबदारी म्हणून, त्याकडे बघितलेच जात नसल्याने, अमानवी कृत्य बढावल्याचे दिसून येते.

"बलात्कार" किंवा "सामूहिक बलात्कार" यासारख्या घटना घडणे काही प्रमाणात थांबले म्हणजे, आपण "लैंगिकता शिक्षण" याचा अभ्यासक्रम पूर्ण केला! असं मुळीच नाही. तर, समाजात खुप असे काही अमानवी कृत्य घडतच असतात जे खरंच एका स्थिर बुध्दीला हेलावून टाकणारे असतात. जसे, लहान मुलांवरील शारीरिक अत्याचार त्याचप्रमाणे जनावरांसोबत घडणारे अनैसर्गिक कृत्य *(हो हे घडतं!)* ह्या सगळ्या घटनांवरून एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, फक्त स्त्री ही असुरक्षित नाही तर, या सृष्टीत प्रत्येकच जीव तितकाच असुरक्षित आहे!

मागे घडलेली एक घटना इथे सामायिक करावी वाटते. "बॉईज लॉकर रूम इन्सीडन्स" इंस्टाग्राम स्कँडल म्हणून उघडकीस आला होता. ज्यात मुलींच्या मॉर्फ केलेल्या फोटोज सामायिक करून, त्यावर अभद्र टिप्पण्या त्या गटातील सभासद(ग्रुप मेंबर्स) असणाऱ्या मंडळींकडून केल्या गेल्या होत्या. नंतर काही दिवसांनी असाच एक "गर्ल्स लॉकर रूम" ग्रुप असल्याचंही उघडकीस आलं मात्र त्यावर जास्त संशोधन करण्यात आलं नाही. एकूणच या परिस्थितीचा आढावा घेतल्यास समजते की, एखाद्याच्या शरीरावर टिप्पणी करणे किंबहुना ती खालच्या पातळीत करणे याचं भान "लैंगिकता शिक्षण" या अभ्यासक्रमातून देण्याची सुरूवात घरातूनच केली गेली तर, असे कृत्य घडण्याला वाव मिळणे कमी होईल! मात्र, अजून त्यावर प्रयत्न केल्यास आपण ही वागणूक संपवण्याच्या दिशेने वाटचाल करू.

वेळोवेळी अशा अमानवी घटना समोर येत असतात आणि कालांतराने त्या गडप होतात. याविरुद्ध आक्रोश जर मजबूत आणि कणखर असला तर, एक - दोन कायद्यात सुधारणा करून, तो आक्रोश दडपला जाण्याचे प्रयत्न केले जातात. पण, कायद्यात सुधारणा इतकंच पुरेसं आहे का? तर नक्किच नाही! आपल्याला ह्या कृत्यामागील मानसिकता समजून घ्यावी लागेल.

माणूस हा एक प्राणी आहे. बरोबर! पण, तो जरी एक प्राणी असला तरी एक "सामजिक प्राणी" असल्याचं भान विसरून, कधी तरी अशा समाजविघातक घटना घडून येण्यास कारणीभूत असतो. हे भान कधी अहंकार तर कधी एखाद्याविषयी असणारा मनातील द्वेष या दुर्भावनेने तो हरवून बसतो. एखाद्या मुलीने/मुलाने *(मुलाने सुद्धा! इथे जाणीवपूर्वक उल्लेख केला गेला आहे)* नकार दिल्यास त्यांना त्रास देण्याच्या हेतूने जे काही कृत्य घडते आणि त्यातून जे नुकसान होते! ते नंतर कुठलीही किंमत मोजून सुद्धा भरून येत नाही. म्हणून, "लैंगिकता शिक्षण" इथे गरजेचे ठरते. इथे हे सांगणे गरजेचे ठरते की, एखाद्याने आपल्याला नकार देणे हे पूर्णतः आपलं अस्तित्व हिरावून घेणं नसतं. तर, तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय स्वातंत्र्य असतो. ही शिकवण घरातून मिळणे अपेक्षित असते. मात्र, मुलांसोबतच्या संवादातील फटीमुळे या प्रश्नांचे निरसन होत नाही आणि मग दुसऱ्या मार्गाने त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या कुतूहलापोटी ते चुकीच्या माणसांकडून मदत घेऊन, स्वतःचे नुकसान करवून बसतात.

सध्या कोरोनाकाळात सगळं काही ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून सुरू असल्याने, "ऑनलाईन शिक्षण पद्धतीला" वाव मिळतो आहे. तंत्रज्ञान विकास झपाट्याने होतोय. हे कौतुकास्पद आहेच! मात्र, हे होताना आपली मुलं शिक्षणाव्यातिरिक्त अजुन कुठे गुंतत तर नाहीत ना! किंवा वाईट गोष्टी तर त्यांच्या हातून घडत नाहीत ना! यावर लक्ष ठेवणे खूप गरजेचे होऊन बसले आहे. कारण, एखादी गोष्ट न मिळणे आणि ती मिळवण्याची जिद्द असणे हा उत्साह त्यांना कुठवर घेऊन जाईल आणि यातून त्यांचं होणारं नुकसान किती मोठं असेल हे सांगता येणार नाही. परिणामी, कितीही किंमत मोजून ते भरून निघणारं नसेल! त्यासाठी आपण केवळ प्रतिबंध म्हणून काही सेटिंग्ज ह्या मुलांच्या ऑनलाईन लेक्चर्स वेळी करून ठेऊ शकतो जेणेकरून, ते अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गोष्टी नेटवर सर्च करणार नाहीत. पण जर, मुलांना ऑनलाईन लेक्चर्स सुरू असताना वेब सर्चींग करावी लागत असेल तर, मोठ्यांनी त्यांच्या सोबत असावं जेणेकरून, त्यांच्याकडून काही चुकीचं घडण्याची शक्यता कमी होण्यास मदत मिळेल. हा ज्याचा - त्याचा विषय आहे! मात्र, याकडे लक्ष असल्यास चुकीच्या गोष्टी घडणं आपण थांबवू शकतो.

"लैंगिकता शिक्षण" वर म्हटल्याप्रमाणे, समाजात आपले वर्तन कसे असावे यावरून आपण लैंगिकदृष्ट्या किती परिपक्व हे ठरतं. मग मुलींना, त्या काय परिधान करतात यावरून थेट त्यांचं चारित्र्य ठरत असेल तेव्हा प्रत्येकानेच आपण लैंगिकदृष्ट्या किती परिपक्व आहोत हा प्रश्न इथे आवर्जून विचारायला हवा!

लैंगिकदृष्ट्या परिपक्व असण्यात अजुन एका गोष्टीचा समावेश होईल तो म्हणजे, समलैंगिक संबंध. एखाद्याने, कोणाला त्यांच्या शारीरिक सुख - दुःखात सामावून घ्यावे! किंवा एखाद्याने, कोणासोबत शारीरिक संबंध ठेवावेत हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असला पाहिजे न की, त्यात इतर कुठल्याही पूर्वग्रहांचा अंतर्भाव असावा! त्याचप्रमाणे १८ वर्षांवरील प्रत्येकाला त्यांचे व्ययक्तिक निर्णय घेऊ देणे हे सुध्दा लैंगिकदृष्ट्या परिपक्व असण्यात मोडतं.

"लैंगिकता शिक्षणात" दुसऱ्यांच्या शरीरावर चुकीच्या टिप्पण्या करू नये वा त्यांच्यावर हसू नये याचा देखील समावेश होतो. मात्र आज सोशल मीडियाच्या युगात एखाद्यावर खालच्या पातळीत जाऊन टीका - टिप्पण्या करण्याचा ट्रेण्ड जोरात सुरु असल्याचे समजते. ही वागणूक नैतिकदृष्ट्या चुकीची आहे. कारण, "लैंगिकता शिक्षण" हा केवळ अभ्यास म्हणून रटण्याचा विषय नसून, ती आपली नैतिक जबाबदारी समजावी आणि हे करताना "लैंगिकता शिक्षण" एक संस्कार म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न केल्यास लैंगिकदृ्ट्या परिपक्व होण्यास मदत मिळेल.


✍️ खुशी ढोके. "@Khushinsta"