पेरजागढ- एक रहस्य.... - २७ कार्तिक हजारे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पेरजागढ- एक रहस्य.... - २७

२७.आयुष्यात पुन्हा एकदा मैत्रीचे आगमन...

जवळपास दोन ते तीन तासांचा प्रवास केल्यावर घरी पोहोचलो.मी आल्याची वार्ता रितुला कळताच ती गंधाळत आली.मी तेव्हाही ती तिला कधीच समजू शकलो नाही.आपला प्रिय व्यक्ती जेव्हा कालावधीने डोळ्यांच्या समोर येतो.आणि त्याला बघताच सुखावलेल्या डोळ्यांवर पाऊस पडायचा सुरू होतो.स्पंदन सेकंदाला वाजू लागतात.आणि हृदय जोरजोराने धकधक करू लागतं.हे तिच्या बाजूने अक्षरशः वाटायचे.तिच्या भाषेत सांगायचंच राहिलं तर दर वेळेस मी तिच्या समोर जीवन मृत्यूचा संघर्ष करून येत होतो. तिचं हे माझ्यासाठी तडफडणें अगदी सराहनिय होते.कारण ती तसं वेडे प्रेम करत होती माझ्यावर.पण तिचे असे तडफडणे मला तिच्यासमोर यायला बऱ्याचदा घाबरं करून जायचा.समोर माझं मृत्यू आहे की नाही हे मला माहीत नाही, पण माझ्यासाठी मात्र तिचा जिवंत मृत्यू सारखा दिसत होता.

हे सगळं अव्हेरण्याचा देखील मी खूप प्रयत्न केला.तिला नाकारलं,कित्येकदा उलट सुलट बोललो असेल.कदाचित तिच्यापासून दुरावून ती मला विसरेल असेही मला वाटत होतं.पण मी जितकं तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होतो. तितकं ती माझ्या जवळ येत होती. तितकंच तिचं ऋणानुबंध मजबूत होत होतं.ज्या वेळेस पेरजागडावर तिने माझा हात खेचत नेले होते, त्याच वेळेस मला कळून आलं होतं, की एखादी मुलगी मनापासून ज्याला वरते, ती त्यासाठी अलगद काहीही करण्याची तयारी ठेवते.आणि हे सगळे मी रितूच्या रुपात स्वतः अनुभवत होतो.

रितू आली, आणि बाजूलाच बसली.तिचा आनंद बोलण्यापेक्षा मला बघण्यात जास्त आहे हे मी जाणून घेत होतो.त्यामुळे जरासा फ्रेश होऊन मी पुन्हा मोबाईल हाताळत बसलो. रितूचा माझ्याकडे बघण्याचा क्रम मात्र चुकत नव्हता.तिच्या नजरेत मला सारखा नावीन्य दिसायचा.नेहमीसारखी काही वेळ शांततेच्या अधीन झाल्यावर तिने मला विचारलं...

"काय झालं पवन? काल रात्री पण तू परतला नाहीस?"

"काही नाही जरा प्रवासाने दमलोय..."

पण इतक्यात घडलेल्या त्या काही गोष्टींमुळे रितू माझ्यावर बारकाईने नजर ठेवू लागली होती, हे मला कुठे माहीत होतं.शिवाय बालपणापासून ती माझ्या प्रत्येक गोष्टींशी जागरूक होती.त्यामुळे मी तिच्यापासून काही लपवावे म्हटले तरी काहीच लपवू शकत नव्हतो.त्यामुळे नागभिडला जे काही घडले ते निवांतपणे सांगू लागलो.पण यावेळेस रितू घाबरली नाही.उलट खंबीरपणे आधार देत मला म्हणाली....

"पवन तू घाबरु नकोस.एक वाट चुकीची असेल म्हणून निराश होऊ नकोस.होऊ शकते त्याचा मार्ग कुठून दुसरीकडून असेल.घाई करू नकोस.जरा धीराने घे.पुन्हा नव्याने सुरुवात कर."

रितू गेल्यानंतरही विचारांच्या तंद्रीत मी कितीवेळ होतो, देव जाणे! फक्त रितू जाण्यापूर्वी तिचा काळजी घे हा आवाज तितका पुसटसा लक्षात होता.आणि केव्हा झोपेच्या स्वाधीन झालो ते सुद्धा नाही उमगले.जेव्हा झोपेतून जाग आली तेव्हा दुपारचे साडेतीन वाजून गेले होते.मोबाईलवर आकाशचे बरेचसे मिसकॉल दिसले.कदाचित काही अर्जंट असेल म्हणून मी परत आकाशला फोन लावला.

"हा...बोल ना आकाश.."

"अरे वेड्या...तुला आज नकोच जायला होतं.मी कितीदा म्हटलं,पण तू ऐकलं नाहीस."

"अरे पण झालं काय?"
"अरे तुझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे.आपल्याला एके ठिकाणी जायचे आहे.ते असं फोनवर सांगता येणार नाही.फार पारंपरिक आणि जुन्या चालीरीती आहेत.तू सायंकाळच्या ट्रॅव्हल्सने नागभिडपर्यंत ये.मी तुला न्यायला येतोय."

"ठीक आहे निघतो मी, तसं कॉल करेन..."

इतक्या घाईने बोलावण्याचा कारण, मला पण न कळल्यामुळे फोन ठेवताच मी पण तयारी केली.अगदी सांगितल्याप्रमाणे सायंकाळी आकाश मला न्यायला आलाच होता. फारशा गप्पा न करता आम्ही गावाकडे निघालो.

आज गावामध्ये बऱ्याच प्रमाणात चंगळ मंगळ वाटली.दोन्ही वेळेस जेव्हा मी गावात आलो होतो तेव्हा गाव मला बराच शांत वाटला होता.पण आज गावकरी घोळक्याने बसून होते.स्त्रिया सजून थाटून आरतीची थाळी घेऊन. मातामायच्या देवळात जाऊन पूजाअर्चना करत होत्या. मातामायचं मंदिर आकाशच्या घरासमोरच होतं, त्यामुळे स्त्रियांची ती प्रचंड गर्दी अगदी घरूनच दिसत होती. आतमधून कुरोड्या, पापडांचा तेलात तळण्याचा आवाज येत होता.त्यामुळे काही सण असल्यासारखे मला वाटत होते.मी आकाशला विचारले..काही उत्सव आहे का गावात?
"अरे हा काही साधासुधा उत्सव नाही.प्रथेनुसार केलेला उत्सव आहे.आज पड्या आहे."

"पड्या म्हणजे...?"

"सर्व शेतीकामाला सुट्टी..."
" मला पटेल असं सांग..."

हे बघ पूर्वी वरूनदेवाच्या आगमनासाठी यज्ञ,पूजा अर्चना केली जायची.पण एखादे वर्षी पाऊस जास्त पडला की माणूस विसरून पण जायचा.मग गावात असणारी मातामाय,शिवेवर असणारी एकोरी माय यांना सांगड घातल्याशिवाय जमायचे नाही.दुष्काळाने जेव्हा बऱ्याच लोकांचे हाल हाल होऊ लागले तेव्हा काही जुनाट बुजुर्ग मंडळीनी मातामायला सांगड घातली.ऐपतीप्रमाणे आखत घेऊन जवराबोडी इथल्या मुख्ख्य दैवत्वाला वाहिली.आणि तिथली रक्षासामग्री घेऊन ते तिर्थानुरूप गावात वाटले.काहींनी पिकांवर फवारणी केली."पाणी येऊ दे वं माय"...अशा गर्जंत करत डोक्यावर कडुलिंब घातलेली घागर घेऊन ग्रामीण देवतांना पूजतात.आज तीच पूजा चाललीय.

सगळा गाव हा दिवस पाळतो.कुणीही शेतावर जात नाही.आता जी आखत जमा होईल ती सगळी मुख्य दैवत्वाजवळ नेली जाईल.त्या निमित्ताने का होईना आपण उद्या आंबाई निंबाईला जाऊयात.

" मला एक सांग आकाश? ह्या पूजा अर्चना ठीक आहेत.मग त्यात बळी का देतात? त्याचं तर काही महत्त्व नाही ना!!!"

पवन..अरे कुठल्या जगात वावरतो आहेस.मास तर माणसाचा पूर्वीपासूनचा आहार आहे.फक्त प्रश्न येतो तो कुणाच्या श्रद्धेने वाहण्याचा.पूर्वी कसं मोजकी लोक असायची.आपुलकीची,प्रेम आणि जिव्हाळ्याची असायची.एखाद्या श्रद्धिकला जेव्हा मास खायची इच्छा व्हायची तेव्हा ग्रामीण देवतेला तेही तो वाहायचा.आणि वाहणाऱ्याची वस्तू नाही तर श्रद्धा बघितली जाते.मग जे कापले आहे कोंबडा किंवा बकरा तेव्हा त्याचे समान वाटप व्हायचे.आणि हो तो इच्छेनुसार दिला जातो.मग माणसात भेदभाव आले.की कुणाला श्रद्धा दिसते तर कुणाला अंधश्रद्धा दिसते. बरं चल आई जेवायला बोलवत आहे.गप्पा पुन्हा कधी नंतर करता येईल.

दुसऱ्या दिवशी आम्ही आंबाई निंबाईकडे जाण्यास निघालो. घोळपाकच्या कोपऱ्यापासून सरळ आलेली डोंगररांग कानपाकडे येते.हे स्थळ कोपऱ्यात असल्या कारणाने कानपावरून फेरा मारून जावावे लागते.शेवटी दहेगाव पार केल्यावर डोंगराची ती विहंगम प्रतिमा हळू हळू डोळ्यात साकारू लागली.

डोंगररांगेच्या मध्यस्थी भागात दगडांचा एक उंचच उंच मनोरा दिसू लागला.आणि बाजूलाच एक तलाव पसरलेला होता.प्रकृतीच्या पायथ्याशी हे स्थान म्हणजे अगदीच सराहणीय आणि प्रेक्षणीय होते.मात्र या गडाची सुधारणा फार चांगल्या पद्धतीने होती.कदाचित इथल्या ट्रस्टचा भरी भक्कम प्रतिसाद असावा.अगदी पायथ्यापर्यंत डोंगराचा रस्ता आणि पायथ्याशी निवाऱ्याची बरीच सोय होती.आकाश सांगू लागला की दत्त जयंतीला इथे फार मोठ्या प्रमाणात यात्रा भरते.तुडूंब गर्दी दाटलेली असते.शिवाय इथल्या काही स्वयंभू गुंफा आहेत ज्यात हे दैवत बसले आहे. आधी सापांचा पण भारी प्रमाणात शिरकाव असायचा. असं त्याच्या ओठात आलं आणि मी त्यांना विचारलं....

"सापांचं शिरकाव म्हणजे इथे कसं रे?"

अरे मीच काय? पूर्वीपासूनचा इतिहास इथे सापांवरच खिळतोय.पूर्वीचे लोक गावांचं नाव एक विशिष्ठ पद्धतीने ठेवायचे.आता नागभिडचंच घेऊया. नागभिड - नाग- बिळ- भीड (गर्दी) अशा अर्थी असू शकतो.या डोंगररांगेला फार प्रमाणात गुंफा आहेत.आणि बऱ्याच प्रमाणात सगळ्यांचं म्हणणं आहे की इथे आधी खूप मोठे भुजंग असायचे.ज्याबद्दल एक स्थळ दाखवेन तुला.पण आता चल...परत पण जायचं आहे सायंकाळ व्हायच्या अगोदर.

" अरे हो चल ना....!"

गेटपाशी एक नंदीची मूर्ती होती.मी आकाशकडे बघत होतो.नंदीच्या पाया पडत गेटवरील घंटी त्याने वाजवली.आणि प्रथम पायरीला मस्तक टेकवत चालू लागला. खरंतर माझी भक्ती हात जोडण्याईतपतच सीमित होती.पाया पडण्याचा कधी प्रश्नच आला नाही.पण आकाशची कॉपीराइट करत मीही पाया पडत चालू लागलो.दगडांना धरून काही वीस ते पंचवीस पायऱ्या बांधलेल्या होत्या.पण त्यानंतर वरचढ रस्ता होता. पेरजागडासारखी लांब उंची नव्हती पण पायथ्यापर्यंत जाईपर्यंत चेहरा पाणी शिंपडण्या इतपत घामाने भिजलेला होता.दोन्ही हाताच्या दंडाने घाम पुसत मी बाजूच्याच झाडाच्या सावलीत जाऊन बसलो.उतरणीच्या रस्त्याकडे बघत आपण किती वर चढलोय? याची अनुभूती घेत होतो. पेरजागडासारखी उंच चढाई नसली तरी पायथ्यापर्यंत येणारा उंचवठा छातीत दम भरून घेत होता.

थोडं विसावा घेतल्यावर पुढे त्या दगडांच्या भिंतीतून आत जाण्यासाठी एक द्वार दिसले.जिथपर्यंत चढण्यासाठी तीन ते पाच अजून दगडाच्या शिढ्या होत्या.ज्या निरूंद होत्या.

बाहेरून बघायला गेलं तर ती फार मोठी गुंफा असल्यासारखी वाटत होती.दगडांमध्ये भयाण दिसत होती.गडावर बऱ्याचदा एकांत ती गुंफा जंगली जनावरांचे वावर घेत असे.मला ती दुरूनच इतकी भयाण वाटत होती की आतमध्ये जायला थोडी भितीच वाटत होती.दगडांच्या त्या कोपऱ्यावर उंच शिळेच्या आतून एक स्रोत होता. त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते अगदीच थेंब थेंब असा पडायचा.बुजुर्ग मंडळींची काही विधाने माझ्या मनात आली आणि म्हणालो....

"अरे आकाश या गडाविषयी तुझ्या माहितीत काही दंतकथा नाहीत का?"

"आहेत ना! हे बघ आंबाई निंबाई या दोन बहिणींचं हे श्रद्धास्थान आहे.इथली एक म्हण आहे.एक ओवी असल्यासारखी.तिचा उल्लेख केल्यावर या कोरड्या पाषाणातूनही एकतरी पाण्याचा थेंब हातावर पडतो.तुला बघायचं आहे का?"

"अर्थातच.तेच तर बघण्यासाठी आलो आहे ना इथे मी..."

"तर त्या दगडांशी ओंजळ कर आणि माझ्या मागोमाग मी म्हणेन तसं म्हण..."

"मी हाताची ओंजळ करत दगडांच्या पायथ्याशी टेकवले.आणि आकाशने सांगितल्यानुसार मी म्हणू लागलो."

"आंबाई निंबाई गोवरदेव
वरच्या शेंडीवर महादेव!!"

ओवीचा उल्लेख होताच तो कोरडा पाषाण पान्हाळला.आणि नकळत त्यातून दोन ते तीन थेंब ओंजळीत सामावली.ओंजळीत पडलेल्या त्या थेंबांना बघून मी आश्चर्यचकित झालो.म्हटलं चमत्कारच आहे यार...!!!

हे आजतागायत असलेलं सत्व आहे बरं पवन? यात ऋतुमानाचा वगैरे काहीएक अंतर नाही.तू जरी का भर उन्हाळ्यात येशील, तरी हे थेंब नक्कीच तुझ्या ओंजळीत पडतील. बरं चल आत गुंफेत जाऊया.