मला स्पेस हवी पर्व १ - भाग १५ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १५

मला स्पेस हवी भाग १५

मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचे आई बाबा सुधीरशी सविस्तर बोलणार होते.तसे ते बोलतील का? सुधीर त्यांना सगळं सांगेल का? बघू या भागात


" बराच वेळ झाला आज अजून सुधीर आला नाही."

" हो नं. रोज इतकं काम काय रहात असेल?"

सुधीरच्या आईने बाबांना प्रश्न केला.

" मलापण माहीत नाही. मला वाटतं की ऑफीसमध्ये काम असतं ही बहुदा थाप असावी. "

" थाप कशाला मारेल हो सुधीर."

" आपण त्याला जास्त काही प्रश्न विचारू नये म्हणून. त्या दिवशी त्याचं ते बोलणं ऐकलं तेव्हा मला वाटलं की ऑफीसमध्ये काम असतं म्हणून उशीर होतो हे खोटं असावं."

" हे जर खोटं असेल तर हा ऑफीस सुटल्यावर कुठे जात असेल?"

" तेच तर माहिती करून घ्यायचंय. हे सुधीरचं सांगू शकतो."

" याला दारूचं व्यसन नाही नं लागलं?"

सुधीरच्या आईच्या मनात भीती दाटली.

" अजून तरी तो दारूच्या आहारी गेलाय असं वाटत नाही."

" रोज आपण झोपायला गेल्यावर तो येतो. आपल्याला कसं कळणार. त्या दिवशी आपण त्याची वाट बघत होतो म्हणून त्यांची भेट झाली."

" अगं दारू पिऊन घरी येणा-या माणसाचं वर्तन कळतं. त्या दिवशी तो थकलेला दिसत होता. दारू प्यायलेला वाटत नव्हता. तू घाबरू नकोस. सुधीर दारूच्या आहारी जाईल असं वाटत नाही."

" कशावरून? अहो नेहा बंगलोरला गेली हे दु:ख पुरेसं आहे दारूला स्पर्श करण्यासाठी. आज तो घरी आला की बघा तो दारू प्यायला आहे का? आधी तर तो अजून दु:खात का आहे हे कळायला हवं."

" तुझं म्हणणं बरोबर आहे. आज विचारू सुधीरला. नेहाने बंगलोरला जाणं सुधीरला पसंत नव्हतं हे ठीक आहे पण इतके दिवस तो राग धरून असा उद्विग्न झाला आहे की त्यामागे काही वेगळं कारण आहे हे शोधायला हवं."


" नेहाने पण एकदम हा निर्णय का घेतला ते कळत नाही. तिची आपल्या घराबद्दल आपल्या बद्दल असलेली ओढ संपली का हा प्रश्न माझ्या मनात घोळतोय."

" हं. तसं असेल तर असं का झालं असावं हेही शोधलं पाहिजे."

" आता ते कसं शोधणार?"

" का?"

" अहो बेडरूममध्ये जर या वागण्यामागचं कारण दडलं असेल तर आपण कसं शोधणार?"

" विचारु आपण दोघांनाही."

" कोण खरं बोलतय हे कसं कळणार?"

" थोडं अवघड जाईल पण त्यांना विश्वासात घेऊन विचारलंं तर कदाचित सांगतील."

" आज आधी सुधीरलाच विचारू .मग नेहाच्या आईला तिला विचारायला सांगू."

" हं तसंच करायला हवं. हे सगळं विचारायला सुधीर यायला हवा नं!"

सुधीरचे आईबाबा बोलतच असतात की समोरचं दार उघडण्याचा आवाज येतो. दार उघडून सुधीर येतो.
सुधीर दार उघडून आत येतो. तो प्रचंड थकलेला आणि रडलेला दिसत होता. सुधीरच्या आईबाबांना कळेना सुधीरला काय झालं ते. सुधीरचे बाबा सोफ्यावरून उठले. तेव्हा सुधीरचं त्यांच्या कडे लक्ष गेलं. धडपडतच त्याने बाबांना मिठी मारली आणि धाय मोकलून रडायला लागला.

आईबाबा दोघांनाही कळेना काय झालं? आता त्यांना शंका यायला लागली की नेहा सुधीरला काही विचित्र बोलली का म्हणून हा असा रडवेला झाला आहे.

सुधीरच्या बाबांनी त्यांच्या पाठीवर थोपटत त्याला शांत करत हळूच सोफ्यावर बसवलं. अजूनही सुधीरचं रडणं थांबलं नव्हतं. सुधीरची आई हळूच त्याच्या बाबांजवळ जाऊन म्हणाली,

" काय हो काय झालं याला? नेहा काही बोलली असेल का?"

" मला तरी काय माहित. का रडतोय कळत नाही आणि तेही इतके हुंदके देऊन."

" माझा जीव आता था-यावर नाही. काय झालं ते माझ्या पेक्षा तुम्हीच विचारा."

सुधीरची आई म्हणाली.

" विचारतो पण त्याला जरा शांत होऊ दे. त्यांचे हुंदके थांबले की मग विचारीन."


बाबा सुधीरच्या पाठीवर अलगद थोपटत होते. खूप वेळाने त्यांचे हुंदके थांबले पण त्याची नजर कुठेतरी लागली होती. त्याच्या त्या नजरेत प्रचंड ऊदासीनता होती.

त्याला आपल्या बाजूला कोणी उभं आहे याचही त्याला भान नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरची ऊदासीनता बघून सुधीरच्या बाबांच्या मनात वेदनेने हुंकार दिला जो त्यांना ऐकवेना.

आईच्या डोळ्यात भीतीची छटा उमटली. दोघांनाही सुचेना काय करावं. शेवटी धीर करून बाबांनी सुधीरला विचारलं,

" सुधीर एवढं हमसून हमसून रडण्यासारखं काय झालं? सांगशील का '

हा प्रश्न ऐकताच सुधीरला पुन्हा हुंदका फुटला. आता मात्र आईबाबांना टेन्शन आलं. सुधीरचे बाबा त्याच्या जवळ बसले आणि त्यांनी विचारलं,

" सुधीर जरा रडणं थांबव आणि आम्हाला नेमकं काय झालं ते सांग. नेहाशी तुझं काही भांडण झालं का? "

" नाही हो बाबा नेहाशी तर मी पंधरा दिवस झाले बोललो नाही."

" का बोलला नाहीस? म्हणून तुला रडायला येतंय का?"

" नाही.बाबा तुम्हाला माझा मित्र नितीन माहिती आहे नं?"

" हो.मी चांगला ओळखतो त्याला. त्याचं काय?"

" बाबा त्याने आज सकाळी आत्महत्या केली."
एवढं बोलून सुधीर पुन्हा रडायला लागला.

" काय? अरेपण का केली आत्महत्या?"

" स्ट्रेस मुळे. चिठ्ठी लिहून ठेवली त्याने."

" कशाचा स्ट्रेस?"

" कामाचा आणि घरचा. मी आणि निशांत त्याला सारखं सांगायचो की स्ट्रेस नको घेऊ."

" कामाचा इतका का स्ट्रेस घेतला त्याने?"
बाबांनी विचारलं.

" नितीन सेल्स साईडला होता. आमचा मॅनेजर सतत त्याला बोलायचा."

" का बोलायचा?"

" सेल वाढवत नाही म्हणून. तरी नितीनचा सेल चांगला होता. आमच्या ब्रॅन्च मध्ये तो दुसऱ्या नंबरवर होता तरी मॅनेजर त्याला सतत बोलायचा."

" कमाल आहे. नितीनचा सेल जर चांगला होता तर मॅनेजर एवढं का बोलायचा?"

" काही नाही हो आमच्या मॅनेजरला सगळ्या ब्रॅंचमध्ये आमची ब्रॅन्च पहिल्या नंबरवर हवी असते. त्यासाठी तो सगळ्यांना ओरडत असतो. मी आणि निशांत ॲडमिनिस्ट्रेशन साइडला आहे त्यामुळे बरं आहे. पण नितीनचं वाईट झालं."

एवढं बोलून तो पुन्हा रडायला लागला. त्याला रडण्यापासून कसं थांबवावं तेच त्याच्या आईबाबांना कळेना.


सुधीर हताशपणे आपलं डोकं सोफ्याला मागच्या बाजूला टेकवून डोळे मिटून बसला. त्याच्या डोळ्यातून अविरत अश्रू धारा वहात होत्या.

सुधीरच्या आईने बाबांना जरा सुधीरपासून लांब नेत म्हटलं,

" आपण याला जे विचारणार होतो ते आता बाजूलाच राहिलं."

" हो नं. पण आपण आता काय करू शकतो? नितीन त्याचा जवळचा मित्र होता. "

" मला तर पहिले वाटलं की नेहाच याला काही तरी वेडंवाकडं बोलली. तो जेव्हा धाय मोकलून रडायला लागला तेव्हा माझा जीव टांगणीला लागला. कळेना याला कसं आवरायचं?"

" खरय ग. या आधी याला कधीच असं ओक्साबोक्शी रडताना बघीतलं नाही. आज तो नितीनने आत्महत्या केली म्हणून रडतोय पण मला शंभर टक्के खात्री आहे की नेहा आणि याच्यात नक्की काहीतरी झालं आहे. त्याशिवाय तो आपल्या मित्राला असं म्हणणार नाही."

" ते सगळं तुम्ही सांगीतलं मला. पण तुमची शंका खरी आहे की नाही हे कधी कळणार? त्यासाठी आपल्याला सुधीरलाच विचारायला हवं."

सुधीरची आई म्हणाली.

" मला सध्या तरी सुधीर आपल्याशी नेहाबद्दल काही बोलेल असं वाटत नाही. "

" हं"

एक नि: श्वास टाकून सुधीरची आई म्हणाली,

" जितक्या लवकर त्याच्याशी बोलता येईल तितक्या लवकर या प्रश्नचिन्हाचं ऊत्तर मिळेल."

" होनं. सगळं कसं विचित्र झालं आहे. मला वाटतं आपण एका चक्रव्यूहात फसलोय. जाण्याचा मार्ग दिसला. आपण त्यात आपल्याही नकळत ओढल्या गेलो."

" आता काय करायचं? याला आवरायचं कसं? त्या मित्राच्या जाण्याचा याने स्ट्रेस नको घ्यायला."

" मला पण हीच चिंता आहे. त्याचा रडण्याचा आवेग कमी होऊ दे. आधी त्याला नितीनबद्दलच सगळं विचारून त्याच्या मनातलं दुःख कमी करायला हवं त्याशिवाय तो नाॅर्मल होणार नाही. तो नाॅर्मल झाला की मग विचारू."

सुधीरच्या आईने देवाजवळ हात जोडून मनातील सगळ्या शंका खोट्या ठरू दे अशी प्रार्थना केली.

दोघेही सु़न्न बसलेल्या सुधीरकडे बघत बसले. सुधीरच्या या अवस्थेमुळे तेही सुन्न झाले. सुधीरचं मन कधी स्थीर होईल याची ते वाट बघायला लागले.

________________________________

सुधीर कधी नाॅर्मल होईल? नितीन बद्दल तो सगळं बोलेल? नेहाबद्दल पण बोलेल का? बघू पुढील भागात.