मला स्पेस हवी पर्व १ - भाग २९ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २९

मला स्पेस हवी पर्व १ भाग २९

मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीरचा साखरपुडा आहे. आता साखरपुड्याचे गोड वातावरण बघू

सुधीर नेहाकडे बघतच राहिला. नेहाने पोपटी रंगाच्या साडीला हलकी सोनेरी जर असलेली आणि अंगभर बुट्टे असलेली साडी नेसली होती. तसाच ब्लाऊज होता. गळ्यात छान मोत्याचा नेकलेस होता आणि त्याला मॅचींग कानातले आणि बांगड्या होत्या.


नेहाने खूप काही मेकअप केलेला नव्हता पण मुळात तिचा चेहरा खूप आकर्षक होता. ती खूप गोरी नव्हती पण काळी पण नव्हती. तिच्या दोन्ही गालांना मस्त खळी पडते. सुधीरला वाटलं आपला जीव हिच्या खळीत तर नाही नाही नं अडकला. हा विचार मनात येताच तो स्वतःशीच हसला.

"नित्या सुधीर बघ स्वतःशीच हसतोय."

"हा गडी कामातून गेला."

दोघंही सुधीरची उत्तेजीत हालचाल बघून हसले.

नेहासाठी सुधीरकडून छान इव्हिनींग गाऊन घेतला होता. त्यावर तिच्याच आवडीने आर्टिफिशियल ज्वेलरी घेतली होती. आत्ता तेच तिच्या हातात सुधीरच्या आईने दिलं. ते घेऊन नेहा चौरंगावरून उठली आणि आत गेली.

" मुलाला बोलवा"

असं गुरूजींनी म्हणताच नितीन आणि निशांत आत आले.

" सुधीर चल गुरूजी बोलवतात आहे."

नितीन म्हणाला. सुधीर खोलीतून बाहेर आला. हाॅलमधील सगळे सुधीरकडे बघत होते. सुधीर गोरा, ऊंच आणि पिळदार शरीरयष्टी असलेला मुलगा शेरवानी मध्ये छान दिसत होता.

" जोडा एकदम शोभून दिसतोय."

मांडवातील सगळे म्हणाले. सुधीर गुरूजींसमोर चौरंगावर येऊन बसला.

****

नेहाने सुधीरकडून मिळालेला नेव्हीब्लू कलरचा इव्हिनींग गाऊन घातला होता. या इव्हिनींग गाऊनच्या गळ्याशी छोट्या मोत्यांची सुंदर एम्ब्राॅयडरी केली होती. पूर्ण बाह्यांच्या या गाऊनच्या हातावरपण मोत्यांची कलाकुसर केली होती. गाऊनच्या खाली मोत्यांचे काठ विणले होते. पूर्ण प्लेन नेव्ही ब्लू गाऊनला मोत्यांची ही कलाकुसर फार शोभून दिसत होती. या गाऊनला मॅचींग पांढ-या खड्ड्यांचे गळ्यातलं, कानात पांढ-या खड्यांचे टाॅप्स, हातात सुंदर पांढ-या खड्ड्यांचे कंगन अशी ज्वेलरी खूप शोभून दिसत होती.

" काय बघतेस प्रणाली?"

नेहा कडे एकटक बघणा-या प्रणालीला नेहाने विचारलंं.

" हं. खूप गोड दिसतेय. बघता बघता लग्नाची तारीख जवळ येईल कळणार नाही."

" प्रणाली तुला इतकी घाई झाली का मला सासरी पाठवण्याची?"

नेहा हिरमुसून म्हणाली.

" नाही ग. पण काही दिवसांनी तुलाच घाई होईल. कधी लग्नाची तारीख ऊजाडते याची तूच वाट बघशील."

" काहीतरी बोलतेय. तुला असं वाटलं होतं का तुझ्या लग्नाच्या वेळी?"

नेहाने हसून खोचकपणे प्रणालीला विचारलं.

" कळलं मला तू का विचारतेय. खरं सांगते मला वाटलं होतं असं. नेहा साखरपुड्यानंतर लग्नापर्यंत ही एक वेगळीच फेज असते. त्यात प्रत्येकाला वाटतं. अक्षयलापण वाटायचं."

सत्य कबूल करताना लग्नाला चार वर्ष होऊन सुद्धा प्रणालीच्या गालावर लालीमा पसरला. नेहा तिचं लाजरं रूप बघतच राहिली.

"ए झालं का नेहा?"

अक्षयचा बाहेरुन आवाज ऐकताच नेहा, प्रणाली आणि रंजना तिघीही हसायला लागल्या.

" नेहा तयार आहे.येते आहे."

" लवकर या. गप्पा झाडत बसू नका."

एवढा महत्त्वाचा इशारा देऊन अक्षय गेला.

" चल नेहा."

नेहाला घेऊन प्रणाली आणि रंजना खोलीबाहेर आल्या.


नेहा कडे सगळे बघतच राहिले. या इव्हिनींग गाऊन मध्ये नेहा खूपच गोड दिसत होती. नेहा चौरंगावर येऊन बसली. पुढे गुरूजींनी जसं सांगीतलं तसं करत गेली.


साखरपुड्याचे सगळे विधी झाल्यावर मग सुधीरच्या मित्रांनी आणि नेहाच्या मैत्रीणींनी त्या दोघांना घेरलं आणि मग सुरू झाला सुधीर आणि नेहाच्या मनात आनंदाचं आणि लाजेचं कारंजं उडवणारा चिडवाचिडवीचा मनमोहक कार्यक्रम.

दोघांच्या घरची मोठी मंडळी सगळ्या आमंत्रित लोकांना जेवणाच्या स्थळी चला म्हणून सांगू लागले. काही अतिजेष्ठ लोकांना ते त्या जागेपर्यंत नेण्यास मदत करू लागले.

जेवणाच्या स्थळी दोघांचे आईवडील सगळ्यांची विचार पूस करत होते.

नातेवाईकांची विचार पूस करतांना प्रणालीचं अधूनमधून नेहाकढे लक्षं जाई. नेहाच्या चेहे-यावरचा आनंद बघून प्रणालीचं मन समाधानाने भरून आलं.

" काय ग प्रणाली कुठे तंद्री लागली?"

अक्षयच्या आवाजाने प्रणाली भानावर आली.

" नेहाच्या चेहे-यावरचा आनंद बघतेय."

" खरच खूप खूश दिसतेय. प्रणाली घरी गेल्यावर नेहाची दृष्ट काढायची आईला आठवण करून देत."


" त्यांचं न विसरता नेहाची दृष्ट काढतील.मला आठवण करून द्यायची वेळच येणार नाही."

" ते मलाही माहीती आहे पण तुला सांगून ठेवतो."

" हं."

" प्रणाली तिच्या काॅलेजच्या मैत्रीणींच्या बरोबर ती हिरव्या साडीतली मुलगी कोण आहे? आधी कधी बघीतलं नाही."

" कोण? अच्छा ती का? अरे ती रंजना. नेहाच्या ऑफीसमध्ये आहे. नेहाचं आणि तिचं टेबल शेजारी शेजारीच आहे. त्यामुळे या दोघींची छान मैत्री आहे."

" बघता बघता नोकरीला लागून नेहाला वर्ष होईल. कसे पटापट दिवस पळतात."

" हो नं."

प्रणाली म्हणाली. तेवढ्यात नेहाच्या बाबांनी

" अक्षय जरा इकडे ये."

म्हटलं. तसा अक्षय तिकडे गेला. प्रणालीपण घाईने जेवणाच्या ठिकाणी गेली.


सगळे जेवणाची कौतुक करत होते. जेवणाच्या तिथली गर्दी कमी झालेली बघून प्रणालीला नेहाची आई म्हणाली,

" प्रणाली आता नेहा आणि सुधीर यांच्या मित्रमैत्रिणींना सांग जेवायला चला. आता रात्रीचे नऊ वाजत आले. नेहाच्या मैत्रीणींना घरी जायला उशीर नको व्हायला."

" हो आई. सांगते."

प्रणाली नेहाजवळ आली.

"नेहा तुझ्या मैत्रीणींना घेऊन चल जेवायला. नऊ वाजले. त्यांना घरी जायला ऊशीर होईल."

" हो वहिनी खरच आम्ही जेऊन घेतो."

माधुरी म्हणाली.

सगळ्या मैत्रिणींना घेऊन नेहा भोजनकक्षाच्या दिशेने गेली.

आज पूर्ण समारंभात नेहा आणि सुधीरला अजीबात बोलायला मिळालं नाही. त्यामुळे दोघांना फार वाईट वाटलं. आज दोघांच्याही मित्र मैत्रिणींनी त्यांना एकटं सोडलच नाही त्यामुळे दोघांना एकमेकांना भेटताच आलं नाही. एकमेकांचं कौतुकही करता आलं नाही.


मध्येच जरा पाच मिनिटे नेहाला एकटं बघून घाईने सुधीर नितीन आणि निशांतला बाजूला करून नेहाजवळ गेला.

" नेहा खूप छान दिसतेय.हा इव्हिनींग गाऊन ला तुझ्या मुळे शोभा आली."

बोलताना सुधीर भारावलेल्या डोळ्यांनी नेहाकडे बघत होता. नेहा लाजली.तिचे डोळे आपसुकच लाजेने खाली झुकले.

" सुधीर नकोरे असा बघू. मला लाजल्या सारखं होतंय."

" हं पण लाजल्यामुळे तू आणखी गोड दिसतेय."

" सुधीर आपल्या आजूबाजूला सगळे आहेत."

" असूदे. आज आपला साखरपुडा झालाय. मी तुझा प्रेमाने हात सुद्धा धरू शकतो."

" ए नाही हं. असं नको करूस.आपलं लग्नं नाही झालं अजून."

नेहाने घाबरून म्हटलं.

" नेहा मला वाटतंय आपलं लग्न ऊद्याच व्हायला हवं"
सुधीरने असं म्हणताच,
" का?"

नेहाने गोंधळून विचारलंं.

" मला आता राहवत नाही."

यावर नेहा हसली. हसून म्हणाली,

" होणारे प्राणनाथ लग्नानंतर आपल्याला बरोबरच राह्यचं आहे."

तिच्या कृत्रिम बोलण्याने हसू फुटले.

" प्रिय सखे तो दिवस कधी येईल?"
हे असं बोलत दोघंही हसत होते.दोघांनाही कल्पना नव्हती त्यांच्या भोवती त्यांच्या मित्र मैत्रिणींनी गओलकडं केलं होतं. सुधीर आणि नेहाला हळूहळू बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून त्यांची करमणूक होत होती.

दोघंही एकमेकांशी बोलण्यात रंगून गेले होते तेवढ्यात त्यांच्या कानावर टाळ्यांचा आवाज आला तसे दोघं भानावर आले. बघतात तो काय भवती या सगळ्यांनी चिडवत त्यांच्या भोवती गोल फिरायला सुरवात केली होती.


"गेला रे भावा गेला, आमचा दोस्त कामातून गेला."
नितीन निशांत म्हणाले.

"कोणामुळे हो गेला? असा हो कसा गेला?"
नेहाच्या मैत्रीणी म्हणाल्या.

"तुमचीच मैत्रीण आली, आमच्या दोस्ताला घेऊन गेली."
नितीन, निशांत म्हणाले.

" तुमच्या दोस्तांनी फशी पाडलं, नेहाला आमच्या पासून तोडले"
मैत्रीणी म्हणाल्या. असं कितीतरी वेळ चाललं.

आता मात्र नेहाला लाजेने कुठे पळून कुठे नाही असं झालं.

शेवटी सुधीरचे बाबा म्हणाले
" अक्षय यांना आता थांबव. नाहीतर नेहाच्या मैत्रीणींना ऊशीर होईल."

" हो." म्हणत अक्षयने त्यांचा गमतीशीर खेळ थांबवला.


सुधीरच्या आणि नेहाच्या आईबाबांना कार्यक्रम विनाअडथळा पार पडला म्हणून समाधान होतं. सगळ्या नातेवाईकांची गर्दी संपली म्हणून नेहाचे, सुधीरचे आईबाबा, सुधीरचे मामा मामी, मावश्या,काकू अक्षय, प्रणाली, प्रियंका नेहा सुधीर सगळे जेवायला बसले. नेहाचे बहुतेक नातेवाईक पुण्यातच राहता असल्याने ते कार्यक्रम संपल्यावर जेऊन घरी गेले.


जेवायला बसण्यापूर्वी सुधीरचे बाबा नेहाच्या बाबांना म्हणाले,

"तुम्ही वेगळे आम्ही वेगळे जेवायला बसण्यापेक्षा आपण सगळे एकत्र बसून जेऊ तेवढाच आपला संवाद होईल आणि छान वाटेल. मुलीकडचे तुम्ही मुलाकडचे आम्ही यातील अंतर अजून कमी होईल."

" एकदम बरोबर बोललात. मी सांगतो कॅटररला."

सगळे एकत्र जेवायला बसल्यावर एकत्र कुटुंबात सगळे जेवतात आहे असा सगळ्यांना फील आला. हास्यविनोदात नेहा आणि सुधीर टार्गेट होतेच पण सुधीरच्या मामांकडे विनोदी किस्स्यांची जंगी सफारी होती.

मामांची साभिनय विनोद सांगण्याची हातोटी सगळ्यांना पोट धरून हसायला लावत होती. यामुळे सुधीरचे बाबा म्हणाले तसंच झालं हे मुलाकडचे हे मुलीकडचे हे अंतर पार मिटलं.


सगळ्यांची हास्यमेजवानी बरोबर जीभेची रसना भागवण्याचीपण गडबड सुरू होती.

अशा रितीने नेहा आणि सुधीरचा साखरपुडा जंगी थाटात पार पडला.

__________________________________
साखरपुडा तर झाला.नेहा आणि सुधीरच्या आयुष्यात फुलपंखी दिवस आले. आता पुढे बघू काय होईल?