मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३० Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३०

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३०

नेहा आणि सुधीरचं लग्न होऊन दोन वर्ष होत आली. या काळात नेहाची नोकरी व्यवस्थित सुरू आहे. प्रियंका तिची नणंद. तिच्याशी नेहाचं मस्त बाॅंडींग तयार झालंय. सुधीरचे आईबाबा नेहावर खूश आहेत तर नेहाचे आईबाबा सुधीरवर खूश आहेत. एकूण काय सगळं व्यवस्थित चालू आहे. आता प्रियंकासाठी स्थळ बघणं सुरू झालंय आता बघू काय होईल?


"अगं ऐकलस का?"

"बोला"
सुधीरची आई सुधीरच्या बाबांसमोर येऊन म्हणाली.

"मी काय म्हणतो आमचा मित्र आहेनं रमेश. तो म्हणत होता की प्रियंकाचं नाव एखाद्या वधूवरसूचक मंडळामध्ये नोंदवा. ऑनलाईन असतं ते."

"प्रियंकाला आधी विचारून आधी."

"प्रियंकाला काय विचारायचं ?"

"म्हणजे काय? लग्न तिचं करायचंय.'

"आता पंचवीस वर्ष संपत आली प्रियंकाला. आणखी किती थांबणार?"

"आपल्या घरी नं सगळं उलटच आहे. मुलीच्या लग्नासाठी आई धडपडत असते.म्हणजे मी असं सगळीकडे बघीतलय. आपल्याकडे बाबा सारखं म्हणतात."

डायनिंग टेबलच्या खुर्चीवर येऊन बसत प्रियंका म्हणाली.

"प्रियंका आता पंचवीस संपून सव्वीसावं लागेल तुला. "

"बाबा चिल."


"ऐ चिल काय आणखी किती शांत बसणार"

"बाबा मला आत्ता कुठे एक वर्ष झालं नोकरीला लागून."

"झालं न एक वर्ष मग कुठे मांजर आडवं येतंय?"

"बाबा प्लीज एक वर्ष मला एन्जॉय करू द्यानं!"

"मैत्रीणींबरोबर एन्जॉय करणं थांबवा आणि लग्न करून सासरी एन्जॉय करा."

"काय हो बाबा तुम्ही."

"अगं तू आई आहेस नं हिची? सांग काही तरी हिला.

"प्रियंका "

"आई तूपण नको आता "
आईचं वाक्य मध्येच तोडत प्रियंका म्हणाली.

"प्रियंका आज तुझं नाव वधूवरसूचक मंडळामध्ये नोंदवलं की लगेच ऊद्या तुझं लग्न ठरणार नाही. वेळ लागतो सगळ्या गोष्टींना."

"ठीक आहे. नोंदवा माझं नाव"

"तुझे‌ लेटेस्ट फोटो दे."

"पाठवते तुम्हाला व्हाॅट्स ॲप वर. बाबा"

"अं बोल?"

"मला मुलाची माहिती आणि फोटो दाखविल्याशिवाय पुढे जायचं नाही."

"नाही ग. तुला दाखविल्याशिवाय आम्ही कसं पुढे जाणार आहे?"

इथे लग्नाळू मुलीशी तिच्या आईबाबांचा सुखसंवाद संपला. यथावकाश प्रियंकाचं ऑनलाईन वधूवरसूचक मंडळामध्ये नाव नोंदवल्या गेलं.

***
संध्याकाळी नेहा ऑफीसमधून घरी आली आणि फ्रेश होऊन खोलीतच पलंगावर झोपली. आज तिला खूप थकल्या सारखं वाटत होतं. तिला डोळे मिटताच झोप लागली. रोज ऑफीसमधून आल्यावर फ्रेश होऊन नेहा चहा घ्यायला स्वयंपाक घरात येत असे तेव्हाच सुधीरचे बाबा चहा घेत असत. चहा झाल्यावर ते फिरायला जात. चहा घेता घेता ते नेहाशी अवांतर बोलत असत.


आज सुधीरचे बाबा चहा घेत असताना रोजच्या सारखी नेहा न आल्याने त्यांना चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं.

"काय ग आज नेहा आली नाही का?"

"आली नं मघाशी."

"मग आज माझ्या बरोबर चहा घ्यायला नाही आली?"

"हो नं!"

"जाऊन बघ जरा तिला बरं नाही का?"

"हो आत्ता मी तोच विचार करत होते."

सुधीरच्या आईला नेहाला झोपलेलं बघीतल्यावर आश्चर्य वाटलं. अशी यावेळी नेहा कधी झोपत नसे. त्यांनी अंगाला हात लावून ताप वगैरे नाही नं हे बघीतलं.

नेहाला जाग आली. ती धडपडून ऊठली

"काय झालं आई?"

"अगं झोप. तुला बरं वाटतं नाही का? रोज तू यावेळी चहा घ्यायला बाहेर येतेस. आज आली नाहीस म्हणून बघायला आले."

"खूपच थकवा आला आहे."

"होका! बरं झोप जेवायला बोलवेन"

"हो "

म्हणून नेहाने डोळे मिटून घेतले.नेहाचा चेहरा सुकलेला वाटला.

***

नेहाला थकवा का येतोय या मागचं कारण कळल्यावर सुधीर आणि नेहा दोघांच्या घरी आनंद झाला. तीन महिने पूर्ण होईपर्यंत फार दगदग करू नको असं डाॅक्टरांनी सांगितल्यामुळे सुधीरने लगेच तिला दोन दिवस सुट्टी घ्यायला लावलं.


तीन महिने पूर्ण होईस्तोवर नेहा छान काळजी घेत होती. आता नेहाला गाडी चालवायला सुधीरने नाही सांगीतलं. रोज तो आधी नेहाला ऑफीसमध्ये सोडायचा मग आपल्या ऑफीसमध्ये जायचा.

रंजनाला सुधीरचं कौतुक वाटायचं

"नेहा तुझा हबी खरच खूप समजूतदार आहेग. नाही तर उलटं येऊन तुला ऑफीसमध्ये सोडून मग तो ऑफीसमध्ये जातो."

"हं. मी सुधीरला ऊलटंपालटं पडेल म्हणून नको म्हटलं होतं. पण स्वारी ऐकायलाच तयार नाही.मग आईपण म्हणाल्या असू दे गं सध्या तुझ्या या अवस्थेत रिक्षातून नको जायला. मग मीपण फार विरोध केला नाही."

"बरं केलंस तुझा हबी तुझी एवढी काळजी घेतो बाकी नवरे आपली बायको प्रेग्नंट आहे त्याच्याशी आपलं काही देणंघेणं नाही अशा आविर्भावात वावरतात."

"होग. आपल्या ऑफीसमधली ती रागीनवार नाही का किती थकून गेली शेवटी."

"होनं. आधीच तोळामासा तब्येत आणि त्यात जुळं झालं तिला."

"हो ग मला जेव्हा गुड न्यूज कळली तेव्हा मी जरा घाबरले कारण खूप थकवा यायचा."

"नेहा आता डिलीव्हरी होईपर्यंत हे असले विचार करू नकोस. तुझी डाॅक्टर खूप हुशार आहे. तूही स्ट्राॅंग आहेस उगीच काहीतरी विचार करून स्वतःला घाबरट बनवू नकोस."

"नाही असं काही होणार नाही."

"आटोपलं का तुझं काम ? आता लंच टाईम झाला की लगेच जेवायचं. काम होत राहिल.कळलं?"

"हो " नेहा मजेशीर मान हलवून रंजनाकडे बघत म्हणाली.

नेहाचे दिवस मस्त चालले होते. सुधीर, त्याच्या घरचे नेहाच्या घरचे नेहाने तोंडातून शब्द काढायचा अवकाश लगेच तिची इच्छा पूर्ण केल्या जायची.

सुधीर रात्री हळूच नेहाजवळ येऊन झोपला

"नेहा बरी आहेस नं?"

"अरे तुम्ही एवढी काळजी घेता माझी की मला बरं नसायला काय झालं? मला तर वाटतं की मी एखाद्या राज्याची महाराणी आहे."

"आहेसच तू महाराणी. माझ्या घरची माझ्या आयुष्याची. हा राजा तुझा प्रामाणिक आणि निष्ठावान नोकर आहे."

सुधीरच्या नाटकीपणाचं नेहाला हसू आलं.

"सुधीर तुला काय हवं मुलगा की मुलगी?"

"काहीही झालं तरी चालेल. येणारा जीव सुखरूपपणे आणि अव्यंग जन्माला येवो हीच इच्छा आहे. मुलगा हो की मुलगी आपण दोघांनाही उत्तम पद्धतीने वाढवू."

"मी स्वतःला खूप नशीबवान समजते. इतकं छान सासर मिळालंय. नवरा इतका समजूतदार मिळालाय. आणखी काय हवं? हेच तर सूख आहे. आधी मी लग्नाबद्दल खूप गोंधळलेले होते. त्यादिवशी जर तू माझ्याशी बोलला नसतास तर मी तुला नकार दिला असता. "

"का ?"

"माझ्या मनात सासरबद्दल भिती होती. ब-याच बायकांकडून ऐकलं होतं की लग्नानंतर बायकांना आपल्या आयुष्यात खूपच तडजोड करावी लागते. त्यांचं स्वतःचं आयुष्य स्वतःचं राहतच नाही."

"अगं मला सुद्धा असे ब-याच पुरूषांचे किस्से माहिती आहे. मी सुद्धा विचार करायचो असं जर असेल तर मग लग्न कशाला करायचं लिव्ह इन रिलेशनशिप बरंय. एक दिवस बाबांना माझी मन:स्थिती कळली."

"हो !आईंनी सांगीतलं का बाबांना?"

"नाही. बाबांना खूप पटकन अशा गोष्टी लक्षात येतात.ते एक दिवस मा़झ्याशी या विषयावर बोलले. म्हणाले हे बघ सुधीर लग्न हा जुगार असतो. यात दोन्ही बाजू एकमेकांना पूरक मिळाल्या तर तुमचं भाग्य. पण हे नेहमी घडत नाही. दोन्ही बाजूंनी जर एकमेकांना समजून घेऊन संसार करायचा ठरवलं तर तो शंभर टक्के यशस्वी होतो. आधी मुलीची प्रोफाईल बघ. नंतर मुलीचा फोटो आवडला तर पुढे जाऊ. मग तुम्ही एकमेकांशी बोला विचारांची देवाणघेवाण करा त्यातून तुम्हाला कळेल की आपण या नात्यामध्ये खूश राहू की नाही."

"बापरे! बाबा एवढं बोलले?"

"हो. तुझ्या चेहे-यावरचा गोंधळ बाबांच्या लक्षात आला म्हणून त्यांनी हा प्रस्ताव तुझ्या बाबांसमोर ठेवला. तो ठेवल्यामुळे आपण दोघं बोललो त्यामुळे दोघांनाही या नात्यांकडे बघण्याचा वेगळी आणि परिपक्व दृष्टी मिळाली."

"खरच.खूप थॅंक्यू बाबांना ."

"खरच थॅंक्यू. नेहा रोज झोपताना आपण रामरक्षा म्हणत जाऊ. तुला शांत झोप लागेल. आपलं बाळपण ऐकेल."

"हो खरंच म्हणूया."

नेहाने आणि सुधीरने त्या दिवशी पासून रोज झोपण्यापूर्वी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. रोज दिवेलागणीला हे दोघं घरी यायचे नाही मग यावर सुधीरच्या आईने तोडगा काढला. त्या म्हणाल्या,

"सुधीर देवाजवळ दिवा लावला की रामरक्षा म्हणण्याची पद्धत आहे. पण तुम्ही दोघंही आठ वाजेपर्यंत येता. दिवेलागणीची वेळ तुम्हाला साधता येत नाही पण रामरक्षा तर म्हणायची आहे मग झोपण्यापूर्वी दोघं रामरक्षा म्हणून झोपत जा. नेहाच्या पोटातलं बाळ ऐकेल तर ते हुशार,बुद्धीमान होईल."

हे सुधीर आणि नेहा दोघांनाही पटलं.

नेहा आणि सुधीर दोघंही आपल्या होणा-या बाळाला उत्तम पद्धतीने जन्माला घालण्यासाठी प्रयत्न करताहेत.आपण त्यांना शुभेच्छा देऊया.
__________________________________
नेहाचं बाळ कसं होईल बघू.प्रियंकाचं लग्न ठरेल का हेपण बघू.