मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४२ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४२

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४२

मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकासाठी दिवसा आणि रात्री ट्रेण्ड नर्स ठेवल्या आहेत.

काही महिन्यांनंतर…

प्रियंकाची तब्येत आता खूपच खालावत चालली होती. तिच्या केमो चालू होत्या. पण आता सगळ्यांनाच तिच्या जगण्याला बरी कल्पना आली होती.

दोन्ही केयरटेकर खूप शांतपणे प्रियंकाचं करत होत्या प्रियंकाचे होणारे हाल आता कोणालाच बघवत नव्हते पण कोणीही काहीही करू शकत नव्हतं. प्रियंकाचा कॅंन्सर हा अगदी शेवटच्या स्टेजला लक्षात येऊनही ती चार महिने खूप चांगली होती नंतर मात्र झपाट्याने तिची तब्येत खालावत गेली.

जेव्हा ती चांगली होती तेव्हा काहीतरी चमत्कार होईल आणि प्रियंका खडखडीत बरी होईल अशी भाबडी आशा सगळ्यांच्या मनात होती पण तसं झालं नाही.

प्रियंकाचं कणकणाने झिजणं निरंजनला बघवत नव्हतं. आता तर तिच्या समोर जाणं पण निरंजनला नकोस वाटे कारण त्याला रडायला यायचं. ते रडू आवरून प्रियंकाशी नाॅर्मल गप्पा मारणं त्याला अशक्य होई.

केयरटेकर ठेऊन ही निरंजनची तब्येत पण खालावली होती. त्याच्या आईबाबांना प्रियंकाबरोबर निरंजनचीपण काळजी वाटत असे.

***
“निरंजन ए निरंजन”

प्रियंका कोणाला हाक मारतात हे बघण्यासाठी नर्स प्रियंका जवळ गेली.

“काय हवंय?”

“निरंजन’

प्रियंकाचं अस्पष्ट बोलणं आता दोन्ही नर्सना कळायला लागलं होतं.

“निरंजनला बोलावू?”

प्रियंकाने मानेनीच हो म्हटलं.
बोलावते

नर्स निरंजनला बोलवायला तो जिथे ऑफिसचं काम करत बसला होता त्या खोलीत आली.

“सर तुम्हाला प्रियंका मॅडम बोलावतात आहे.”

“होका ?आलो.”

मांडीवरचं लॅपटॉप पलंगावर ठेवून निरंजन पलंगावरून उठला.

प्रियंकाच्या पलंगाजवळच्या खुर्चीवर येऊन बसला.

“प्रियंका”

निरंजनने हाक मारली. प्रियंकाने हळूच डोळे उघडले. तिचे डोळे निस्तेज आणि भकास दिसत होते. रोज डोळ्यातील तेज झपाट्याने कमी होत होतं. चेहरा पण निस्तेज झालेला होता. निरंजन कडे बघून प्रियंका खूप कष्टाने हसली. तिला तेवढं हसायलापण खूप कष्ट पडत होते.

आवाजावर संयम ठेवून निरंजनने विचारलंं,

‘काय ग कशासाठी हाक मारली?”

“तू असा बसून रहा माझ्या जवळ मला बरं वाटतं.”

‘बसतो नं तुला झोप येतेय का? तुझं डोकं चेपून देऊ का?”

“हो. पण तू जवळ असला की चांगली झोप लागते.”

“बरं झोप तू.”

निरंजन तिच्या कपाळावर हळूहळू थोपटू लागला. प्रियंकाला झोप लागली तरी निरंजन हळूहळू थोपटत होता. त्याच्या मनात प्रियंकाचे विचार चालू होते.

एक वर्षापर्यंत निरंजन आणि प्रियंका एक सुखी जोडपं होतं. लग्नाला नुकतंच वर्ष झालं होतं दोघंही एकमेकांना छान ओळखू लागले होते. दोघंही मुळात शांत स्वभावाचे असल्याने एकमेकांना समजून घेण्याची सहजता आणि ताकद त्यांच्यात होती.

दुधात साखर विरघळावी तशी ती दोघं एकमेकांमध्ये एकरूप झाले होते. आता दोघांनाही आपल्या संसारवेलीवर फुलं ऊमलायला हवं असं वाटायला लागलं आणि त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले.पण नियती तेव्हा खदखदा हसली.

नियतीला त्यांच्या आयुष्यात चाललेलं हे गोड संगीत मानवलं नाही आणि तिने प्रियंकाच्या शरीरात कॅंन्सरची रूजवण केली. त्याचक्षणी निरंजन आणि प्रियंकाच्या सुखाला उतरती कळा लागली.

प्रियंकाच्या कपाळावर हळूहळू थोपटताना निरंजनला तो प्रसंग आठवला.

“निरंजन मला वाटतं की आता आपण बाळाचा विचार करायला हवा.’

“बरोबर बोललीस प्रियंका.परवा आईने विचारलंं मला.

“हो नं. मला पण माझी आई म्हणाली आता फार उशीर करू नका.”

“प्रियंका आपण आठ दिवस कुठेतरी फिरायला जाऊ. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने कदाचित आपल्याला लवकर छान बातमी कळेल असं मला वाटतं तुझं काय म्हणणं आहे?”

“अरे खूप छान कल्पना आहे. जाऊया आपण. कुठे जायचं?”

“विचार करतो.”

प्रियंका आनंदाने निरंजनला बिलगली.निरंजननेपण तिला आपल्या मिठीत घेतलं. दोघही आपली सुट्टी कुठे घालवायची या विचारात दंग झाली. दोघांचेही चेहरे हसरे होते याचं वेळी नियती मात्र यांच्यावर हसत होती कारण तिला यांची योजना यशस्वी होऊ द्यायची नव्हती.

नियतीची योजना कुठे या गोड आणि आनंदी युगुलाला माहिती होतं. ते त्यांच्या आनंदात मग्न झाले होते.

वर्षभरापूर्वी बाळाची स्वप्नं रंगवत ती पूर्ण करण्यासाठी फिरायला जाण्याची स्वप्न आपण बघत होतो आणि काय झालं हा विचाराने निरंजन खूप दुखावला.

त्याला प्रियंका इतकी आवडू लागली होती की तिचा विरह नेहमीसाठी सहन करावा लागणार आहे हे सत्य त्यांचं मन पचवायला तयार होत नव्हतं. त्या दिवशी डाॅक्टर स्पष्ट म्हणाले,

“मिस्टर साठे आता आमच्या हातात काही नाही. आत फक्त वाट बघायची.त्यांच्याजवळ जितके दिवस आहेत तेवढे दिवस शांतपणे जगू द्या.”

डाॅक्टरांचं बोलणं ऐकून निरंजनच्या तोंडून शब्दच बाहेर पडू शकला नाही. शब्द जणू गोठले होते.

ब-याच वेळाने निरंजन भानावर आला तेव्हा त्याला बेंबीच्या देठापासून किंचाळावसं वाटलं.

सतत त्याच्या मनात एकच प्रश्न फेर धरून थयथयाट करत होता की आमचं काय चुकलं की आम्हाला आमची संसारवेल फुलवण्याची संधीच दिली नाही. देवा का असं केलं?

दवाखान्यातूनच निरंजनने सुधीरला फोन लावला

“हॅलो”

“सुधीर”

“निरंजन काय झालं? कुठे आहेस तू?”

निरंजनचा रडवेला स्वर ऐकून घाबरून सुधीरने विचारलंं.

‘मी दवाखान्यात आहे.सुधीर मी काय करू?”

“निरंजन तू दवाखान्यातच थांब मी येतो.”

सुधीरने फोन ठेवला. घाईने तो निशांत जवळ गेला.

“निशांत मी दवाखान्यात जातोय.”

“अरे काय झालं?”

निशांतने काही न कळून विचारलं.

“निरंजनचा दवाखान्यातून फोन आला रडत होता. मी जातोय”

“काय झालं? प्रियंका कशी आहे?”

“काहीच माहिती नाही तिथे गेल्यावर कळेल.मग तुला सांगतो.’

“बरं ठीक आहे.जा. “

सुधीर घाईने मोटरसायकल वरून दवाखान्यात जायला निघाला.


सुधीर दवाखान्यात पोचला.त्याने कशीबशी गाडी पार्क केली आणि भराभर चालत लिफ्ट पाशी गेला. लिफ्ट मध्ये जाण्याआधी सुधीरने निरंजनला फोन केला.

‘हॅलो”

“निरंजन मी दवाखान्यात आलोय.तू कुठे आहेस?”

“मी ओपीडी पाशी.”

“ठीक आहे.थांब तिथेच.मी आलो.”

सुधीर ने लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्ट आली. सुधीर पहिल्या मजल्यावरील ओपीडी पाशी गेला. तिथे पोचल्यावर बघतोय तर काय निरंजन सुधीरसमोर खाली कोसळला. त्याला खाली कोसळताना बघून सुधीर धावला तसेच आजूबाजूचे दोघ चौघं धावले. एकाने निरंजनला कसंबसं खाली पडण्यापासून वाचवलं.

तिथल्या सिस्टरने लगेच त्याला इमर्जन्सी वाॅर्ड मध्ये ठेवलं आणि डाॅटरांना बोलावलं. डाॅक्टर आले त्यांनी तपासले.

“डाॅक्टर काय झालं असेल? का चक्कर आली असेल?’

“इथे कोणा पेशंटना भेटायला आले होते का?”

“डाॅक्टरांना भेटायला आले असतील. यांची बायको कॅंन्सर पेशंट आहे. तिच्या तब्येती संबंधात भेटायला आले असतील.”

“त्यामुळे कदाचित चक्कर आली असेल. थोड्यावेळाने येतील शुद्धीवर.”
एवढं बोलून डाॅक्टर निघून गेले.

निरंजन कडे बघून सुधीरला भडभडून आलं. निरंजनची तब्येत प्रियंकाच्या आजारपणामुळे किती खालावली आहे. कसं सहन करत असेल?

सुधीरच्या मनात आलं इतक्या छान सुखी जोडप्याची कहाणी किती दु:खद वळणावर येऊन पोहोचली आहे. देव सुद्धा कधी कधी किती निष्ठूर होतो ? का होतो ते कळत नाही.

कोणाच्याही नशीबात निखळ सुख कधीच पर्मेश्वर लिहीत नाही. असं का करत असेल?

कितीतरी वेळ सुधीर निरंजनकडे बघत होता. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं आणि इमर्जन्सी वाॅर्डच्या बाहेर येऊन सुधीरने निशांतला फोन लावला.

“हॅलो बोल सुधीर.”

‘निशांत मी इथे आलो तर माझ्या समोरच निरंजन चक्कर येऊन खाली कोसळला. “

“काय?”

“हो.आम्ही आजूबाजूला असलेले धावलो.एकाने त्याला कसंबसं पडण्यापासून वाचवलं.”

“एकदम चक्कर का आली?”

“डाॅक्टर म्हणाले खूप स्ट्रेस आलेला दिसतो आहे त्याने चक्कर आली असेल. त्यांनी औषध दिलीत.अजून शुद्धीवर आला नाही.”

“तू थांब तिथेच.मी सांगतो साहेबांना.”

“हो प्लीज सांग.”

“निशांत निरंजनची तब्येत पण खूप खालावली आहे. बघवत नाही त्यांच्याकडे.”

“ होरे. त्या दिवशी मला पण निरंजनला बघून धक्का बसला. डाॅक्टरांनी बोलावलं होतं का निरंजनला?”

“माहिती नाही.तो शुद्धीवर आला की कळेल.”

“सुधीर तू निरंजनजवळ थांब.”


सुधीर फोन ठेऊन आत वाॅर्ड मध्ये आला. निरंजनने काही वेळाने डोळे उघडले.

“निरंजन कसं वाटतंय?”

“मी ठीक आहे.”

“तुला चक्कर आली होती.किय झालं? डाॅक्टर काय म्हणाले ?”

“प्रियंका आता फार काळ जगणार नाही.डाॅक्टरांचे सगळे उपाय संपले. आता केव्हाही कांहींही बातमी कळेल.”
निरंजन रडायला लागला.

“निरंजन आपण सगळ्यांनी आता मनाची तयारी करायला हवी. तू फार विचार करू नकोस.”

निरंजन पलंगावरून हळूच उठला. सुधीर त्याला सावरतो बाहेर घेऊन आला.

प्रियंकाच्या. कपाळावर थोपटताना हे सगळं निरंजनला आत्ता आठवलं डाॅक्टरांनी स्पष्ट सांगितलं तेव्हा पासून निरंजन प्रियंकाच्या जवळ जास्तवेळ राहत असे.

आता कधीही काहीही होऊ शकतं हे निरंजनने आपल्या मनावर ंठसवलं. प्रियंकाच्या समोर रडायचं नाही.हेही ठरवलं.

प्रियंकाच्या कपाळावर थोपटता थोपटता निरंजनलाच झोप लागली. नर्सने बघीतलं निरंजन एक हात प्रियंकाच्या कपाळावर ठेवून आपल्याच हातावर डोकं ठेवून झोपला आहे. नर्सच्या मनातही कालवा कालव झाली.
___________________________________