मला स्पेस हवी पर्व १ भाग ४३
मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाची तब्येत खूप खालावली असते. आता तर खूपच खराब होते.त्यामुळे प्रियंकाच्या आईबाबांना निरंजनने आपल्या घरी बोलावून घेतलं होतं.ऋषी लहान असल्यामुळे नेहा आणि सुधीर आले नव्हते.
आता प्रियंका बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा सगळे प्रयत्न करत होते. प्रियंकाला वाचनाचं वेड होतं. तिला आता आजारपणामुळे वाचता येत नसल्याने तिची आई आणि बाबा आळीपाळीने तिला तिची आवडती पुस्तकं वाचून दाखवत. प्रियंका डोळे मिटून ऐकत असे.
पुस्तकं वाचनामुळे प्रियंकाला बघतातरी येतं तिच्या जवळ बराच वेळ बसता येतं हा उद्देश प्रियंकाच्या आईबाबांचा होता तर निरंजनची आई त्यांच्या महिला मंडळाच्या गमती जमती सांगायच्या. हे सगळं ऐकताना मधेच प्रियंकाच्या चेहे-यावर हास्य यायचं तेही काही सेकंद. तोच क्षण सगळे आपल्या मनात साठवून घ्यायचे.
दोन दिवसांपूर्वी प्रियंकाच्या नाकात नळ्या घातल्या होत्या. ते दोन दिवस प्रियंकाला दवाखान्यात ॲडमीट केलं होतं. डाॅक्टरांच्या देखरेखीखाली तिला ठेवलं होतं. केयरटेकर यांना नळीतून लिक्वीड कसं द्यायचं हे माहीत असल्याने डाॅक्टरांना ते सांगण्याची गरज पडली नाही.
आपल्याला नाकात नळ्या घालून त्यातून लिक्वीड पदार्थ देणार आहेत हे प्रियंकाच्या लक्षात आल्यावर तिने हाताने खूण करून निरंजनला सांगीतलं की ती आता लवकरच वर जाणार आहे.आकाशाकडे बोट दाखवत ती पुटपुटली. ती काय बोलली ते कळलं नसलं तरी तिच्या हातवा-यावरून तिला काय म्हणायचंय हे निरंजनला कळलं. तो मोठ्याने रडावसं वाटूनही रडू शकला नाही. कसाबसा आवंढा गिळून आवाज नीट ठेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत थोडंसं हसला. त्यावर प्रियंकाही हसली. पण त्या हसण्यामागचा अर्थही निरंजनला कळला.
निरंजन डोळ्यातील पाणी लपवत झटकन तिच्यापासून लांब जाऊन उभा राहिला.
त्याच्या जवळ जाऊन निरंजनच्या बाबांनी त्याच्या पाठीवर हलकेच थोपटलं तसा रोखलेलं रडणं त्याच्या तोंडून बाहेर पडलं.
“सांभाळ स्वतःला. “
“तोच प्रयत्न करतोय बाबा.पण किती वेळ असं स्वतःला रोखून धरू? नाही सहन होत आता हे सगळं.”
“कळतंय मला पण प्रियंकाकडे बघून मन घट्ट कर. तिचा जीव तुझ्याभवती घुटमळतोय म्हणून तिला त्रास होईल असं वागू नकोस.”
“हं. एवढ्या लवकर का तिच्यावर अशी वेळ आली. काही वर्ष तिला जगू द्यायचं होतं देवानं. ‘
“हे आपल्या हातात नसतं. आपल्या जन्माच्या वेळेलाच आपली मृत्यूची तारीख लिहीलेली असते. आपण ती कशी बदलू शकणार?”
“ बाबा आत्ता कुठे आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो होतो म्हणून बाळाचा विचार केला होता. त्यासाठी बाबा आम्ही फिरायला जायचं ठरवलं होतं. मी लगेच नैनीतालचं सगळं बुकिंग करून आलो होतो. किती आनंदात होतो आम्ही दोघं. या आनंदावर प्रियंकाचा कान दुखण्याने थोडं विरजण पडलं नंतर हे काहीतरी भयानक ऐकायला मिळालं. साधा कान दुखणं त्याचं एवढं मोठं दुखणं झालं.”
एवढं बोलून निरंजन रडू लागला. बाबा त्याच्या पाठीवर थोपटत राहिले. पुढे सांत्वन करण्यासाठी त्यांना शब्दच सापडत नव्हते. शब्द मुके झाले होते. त्यांचे डोळे मात्र बोलत होते. बाबा निरंजनकडे बघून आणि तो सहन करत असलेला भावनिक त्रास बघून हताश झाले होते. त्यांनी निरंजनला जवळ घेतलं आणि आपल्या मायेची ऊब दिली.
***
दोन दिवसांनी प्रियंकाला घरी पाठवलं आता सगळे तिच्या अवती भवतीच असतं. वेळच्या वेळी औषधं आणि लिक्वीड पदार्थ केयर टेकर देत असत.
निरंजनने ऑफीसमध्ये दहा दिवसांची सुट्टी घेतली. आता रोज सकाळी आणि ऑफिस मधून लाॅगाऊट केल्यावर निरंजन प्रियंकाजवळ बसे. तिला तोपर्यंत केयरटेकर नळीतून लिक्वीड पदार्थ देत असे. निरंजन तिला पुस्तक वाचून दाखवे तर कधी कधी नुसताच गप्पा मारत असे.
तो दिवस जरा मरगळलेला उगवला. नर्सला काही तरी संशय आला तिने डाॅक्टरांशी संवाद साधला. नर्सने जे सांगितलं त्यावरून डाॅक्टरांनी तिला निरंजनला फोन देण्यास सांगीतलं. नर्सने निरंजनला फोन दिला.
‘सर डाॅक्टर फोन वर आहेत.तुमच्याशी बोलायचय.”
निरंजन गडबडीने ऊठला आणि त्याने फोन घेतला.
“हॅलो.नमस्कार डाॅक्टर.”
“नमस्कार.मिस्टर साठे मला आत्ता नर्सने पेशंटच्या तब्येतीबद्दल सांगीतलं. तुम्ही पेशंटला लगेच ॲडमईट करा. त्यांना तपासल्यावर मग बोलतो. तुमच्याशी.”
हे ऐकल्यावर निरंजन गडबडला. फोन नर्सला परत देऊन त्याने घाबरून नर्सला विचारलं
“काय झालं?”
आणि नर्स काही बोलायच्या आत निरंजनने प्रियंकाकडे धाव घेतली.
रोजच्या सारखीच प्रियंका शांत होती.तिचे डोळे मिटलेले होते. नर्स म्हणाली,
“त्यांची तब्येत ठीक नाहीये हे मला कळलं तसं तुमच्या लक्षात येणार नाही. मी म्हणून डाॅक्टरांना फोन केला होता. तुम्ही दवाखान्यात फोन करून ॲम्ब्युलन्स मागवा आणि तुम्ही घरच्यांना सांगा.”
“हो “
म्हणत निरंजन आईबाबांना सांगायला गेला.
निरंजनचे बाबा त्यांच्या भावाशी फोन वर बोलत होते.
“बाबा फोन ठेवा प्रियंकाला ॲडमईट करायचंय.”
“काय? काय झालं?”
आईने विचारलंं.
‘डाॅक्टरांशी बोलणं झालं. तुला दवाखान्यात जाताना सांगतो. सुधीरला फोन करतो.”
घाईने निरंजन सुधीरला फोन करायला गेला तर त्यांच्या थरथरत्या हातातून फोन खाली पडला.
बाबांनी हळूच खाली वाकून फोन ऊचलला. निरंजन धपकन खूर्चीवर कोसळला त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होतं.
“आई मी काय करू?”
हा निरंजनचा आक्रोश आईबाबांना सहन झाला नाही.तेवढ्यात नर्स बाहेर आली
“ॲम्ब्युलन्स ला फोन केला का?”
“नाही .”
बाबा म्हणाले
“ मग करा लवकर.’
“मला सांगा नंबर हा फोन करू शकेल असं वाटत नाही.’
बाबा नर्सला म्हणाले.
नर्सने नंबर सांगितला . बाबांनी फोन लावून ॲम्ब्युलन्स बुक केली. फोन ठेवून निरंजनजवळ येऊन म्हणाले,
“निरंजन धीर धर मी ॲम्ब्युलन्स बुक केली आहे. पंधरा मिनिटांत येईल. चल लवकर तयार हो. “
बाबांनी त्याला हाताला धरून उठवलं. त्याचे डोळे पुसले.
“निरंजन आता रडू नकोस.धीट हो. “
“हं “
डोळे पुसत रडतच निरंजन म्हणाला. क्षणात निरंजन एकदम सावरला आणि खोलीत गेला. प्रियंकाची फाईल नर्सजवळ होती ती घेतली. एकदा प्रियंकाच्या डोक्यावरून हात फिरवून हळूच तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं.
“प्रियू तू काळजी करू नकोस. तू लवकर बरी होशील. रुटीन चेकअप साठी जायचयं आपल्याला दवाखान्यात. नको घाबरू. माझी राणी.”
असं म्हणत पुन्हा त्याने तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. निरंजनच्या भावना अनावर झाल्या पण कसंबसं स्वतःला सावरुन तो फाईल घेऊन दुस-या खोलीत गेला.
निरंजनचं वागणं बघून नर्सला पण स्वतःच्या भावना आवरल्या नाहीत. तिने हळूच डोळे पुसले.
पंधरा मिनिटांनंतर ॲम्ब्युलन्स आली. प्रियंकाला दोन्ही वाॅर्डबाॅयनी हळूच पलंगावरून उचलून स्ट्रेचरवर ठेवलं. त्यांच्या मागोमाग नर्स निघाली. प्रियंकाचं स्ट्रेचर ॲम्ब्युलन्स मध्ये ठेवून नर्स आणि पाठोपाठ निरंजन ॲम्ब्युलन्स मध्ये शिरला.
इकडे निरंजनच्या बाबांनी सुधीरच्या बाबांना फोन करून कळवलं. आईने देवासमोर उभं राहून प्रियंकासाठी मागणं मागितलं.आई नमस्कार करून वळल्या तसं बाबांनी विचारलं,
“प्रियंकाला उदंड आयुष्य दे असं म्हणून देवाला संकटात पाडलस का ?”
“नाही. चला “
आईचा चेहरा गंभीर आणि निर्विकार या दोन भावनांचं मिश्रण होता.
दोघांनी घराजवळच्या स्टॅंड वरून रिक्षा पकडली आणि दवाखान्याच्या दिशेने निघाले.
***
इकडे सुधीरने निरंजनचा फोन येताच नेहाला फोन केला. नेहा सुधीरचं बोलणं ऐकताच घाबरली. तिने कसाबसा धीर गोळा करून साहेबांना घरी जाऊ का विचारलंं. त्यांनी परवानगी देताच तिने आपलं टेबल आवरलं. पर्स घेऊन ती रंजनाच्या टेबलजवळ आली.
“रंजना प्रियंका सिरीयस झाली आहे. तिला आत्ताच दवाखान्यात नेतात आहे. मी चाललेय. ‘
“मला दवाखान्यात पोचलीस की कळव प्रियंकाच्या तब्येतीबद्दल”
“हो कळवते.”
नेहा घाईघाईने ऑफिस बाहेर पडली. नेहा इतकी गळपटली होती की तिला गाडीची किल्ली सापडेना.
“यार ही किल्ली कुठे गेली? घाईच्याच वेळी नेमकी सापडत नाही.”
नेहा स्वतःशीच चरफडली. थोड्यावेळाने तिला किल्ली सापडली. तिने किल्ली गाडीला लावली आणि आठवणीने पर्सची चेन लावली. गाडीला पर्स अडकवून गाडी स्टार्ट केली.
आज बहुदा नेहाची चीडचीडच होणार होती. गाडी आता स्टार्ट होईना. ऑटोस्टार्ट झाली नाही म्हणून तिने कीकने गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न केला.
“हुश्श्श. झाली एकदाची सुरु. ही गाडी पण घाईच्या वेळेसच नखरे करते.”
नेहा रागाने पुटपुटली. नेहाला दवाखान्यात पोचायला आता सहा सिग्नल्स लागणार होते. मधल्या दोन सिग्नलचा वेळ इतका कमी असतो की तिथे आपला खूप वेळ जाणार हे लक्षात येऊन नेहा आणखीन चिडली. तिला कधी एकदा दवाखान्यात पोचते आणि प्रियंकाला बघते असं झालं होतं.
इकडे सुधीरचीही अवस्था तशीच होती. सुधीर आणि नेहा दोघांचीही मन:स्थिती ठीक नसल्याने रोजचा ट्रॅफिक आज त्यांना जीवघेणा वाटत होता. सुधीरचे आईबाबा पण रिक्षाने दवाखान्यात यायला निघाले होते.
प्रियंकाच्या आठवणीने आईच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. बाबांनी तिला काहीही म्हटलं नाही.तिला रडू दिलं. पुष्कळदा आसवांमध्ये मनातील दुःख वाहून जातं. तसं ते गेलं तर तब्येतीसाठी छानच असतं.
प्रियंकाच्या आठवणीने बाबांच्या मनातही खूप काहूर माजलं होतं. ते कशाने निवळेल हे त्यांनाही कळत नव्हतं. प्रियंकाला कधी भेटतो असं त्यांना झालं होतं.
प्रियंकाशी जोडल्या गेलेली ही माणसं काही जन्माने जोडल्या गेली तर काही लग्नामुळे जोडल्या गेली. या सगळ्यांसाठी प्रियंका महत्वाची होती.
ॲम्ब्युलन्स दवाखान्यात येऊन पोचली. घाईने दरवाजे उघडून दोघंजण स्ट्रेचरवर असलेल्या प्रियंकाला घेऊन घाईने पेशंटसाठी असलेल्या लिफ्ट पाशी पोहोचले. लिफ्टमध्ये प्रियंका, दोघं वाॅर्डबाॅय, निरंजन आणि नर्स वरती आय.सी.यू. पाशी गेले.
लिफ्टमधून सरळ प्रियंका असलेलं स्ट्रेचर आय.सी.यु. मध्ये नेलं. निरंजनला बाहेर थांबावं लागलं.
घरातील सगळ्यांची वाट बघत निरंजन खाली मान घालून खुर्चीवर बसला आणि त्याने मुक्तपणे रडायला सुरुवात केली. मनावरचा ताण संपेपर्यंत तो रडत राहिला.
__________________________________