मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४५ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४५

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४५

मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाने या जगाचा निरोप घेतला. या गोष्टीला आता महिना उलटला आहे. आता दोन्ही कुटुंबांमध्ये कशी परीस्थिती आहे ते बघू.

निरंजन बाल्कनीत बसला होता. एकटाच कुठेतरी शुन्यात दृष्टी लावून बसला होता. खोलीच्या दाराशी निरंजनचे बाबा उभे होते. मुलाची अशी अवस्था बघून बापाचं हृदय कळवळलं. त्यांना निरंजनचं सांत्वन करण्यासाठी शब्दच सापडत नव्हते.

त्याची आयुष्याची जोडीदार असलेली प्रियंका अकाली त्याचा हात सोडून निघून गेली होती. निरंजनने जिच्या बरोबर सप्तपदी चालली, जिचा हात धरुन त्याने ‘नातीचरामी’ म्हटलं तीच अचानक निरंजनला असं सोडून निघून गेली. प्रियंका अशा वाटेने गेली आहे की ती पुन्हा परतच येऊ शकणार नाही हा खूप मोठा धक्का निरंजनला बसला आहे मग त्याच्या मनाला शांत कोणत्या शब्दात करायचं हा प्रश्न निरंजनच्या बाबांना पडला.

बराच वेळ ते दारातच ऊभे होते पण निरंजनला त्यांची चाहूल लागली नाही इतका तो त्याच्याच विचारात बुडला होता. डोळ्यात साठलेलं पाणी निरंजनच्या बाबांनी पुसलं आणि खूप व्यथित अंतःकरणाने ते समोरच्या खोलीत आले.

हताशपणे ते सोफ्यावर बसले. निरंजनच्या आईने त्यांना असं हताश बसलेलं बघून विचारलंं,

‘काय झालं? तुमचा चेहरा असा का दिसतोय?”

बराच वेळ ते काहीच बोलले नाही.

“अहो तुम्हाला विचारते आहे? काहीतरी बोला?”

निरंजनची आई बाबांना म्हणाली.

“काय बोलू. पोरगं फारच उदास झालाय. कुठेतरी शुन्यात नजर लावून बसलाय.”

बाबांना हे बोलतानाही रडू येत होतं

“हो नं. निरंजनला कसं या दु:खातून बाहेर काढावं ते कळत नाही. सुधीर किती प्रयत्न करतोय.”

“अगं महिना झाला प्रियंकाला जाऊन.अजून कामावर जात नाही. अशाने नोकरी जायची पोराची.”

“मी काय म्हणते तुम्ही सुधीरला ही गोष्ट सांगा तो त्याला बरोबर समजावले. “

“खरय तू म्हणतेस ते.जितक्या लवकर तो या दु:खातून बाहेर पडेल तेवढं चांगलं.”

“फार जीव होता हो निरंजनचा प्रियंकावर. आपल्यालाच तिने इतका जीव लावला. निरंजनची तर बायको होती. दुधात साखर विरघळावी तसे हे दोघं एकमेकांमध्ये मिसळून गेले होते.”

“निरंजनमध्येच प्रियंका गुंतली होती असं नाही. ती आपल्याकडे सुद्धा किती लक्ष द्यायची. कोणती मुलगी एवढी सास-याची काळजी घेईल? खरच आपण खूप नशीबवान होतो म्हणून अशी सून आपल्याला मिळाली.”

“पण देवाने हे सूख फार काळ आपल्या पदरात ठेवलं नाही. असं का करावं त्याने? “
डोळ्याला पदर लावत निरंजनची आई म्हणाली.

“म्हणतात नं चांगली माणसं देवाला सुद्धा आवडतात म्हणून तो त्यांना आपल्याकडे बोलावून घेतो. फार काळ त्यांना पृथ्वीवर रमू देत नाही.”

बाबा म्हणाले


“हं”

निरंजनच्या आईने बाबांचं हे बोलणं ऐकून एक नि:श्वास सोडला. त्या नि:श्वासा मधील दडलेले अनेक उदास भावतरंग निरंजनच्या बाबांना निरंजनच्या आईने न बोलताही कळले.
अचानक निरंजनचे बाबा म्हणाले,

“तुला आठवतं निरंजनचं नुकतंच लग्न झालं होतं तेव्हाची गोष्ट आहे.”

“कोणत्या गोष्टींबद्दल बोलताय?”

“अगं माझी साठीशांती नाही का केली?”

“हो. प्रियंकामुळेच झाला हा साठी शांतीचा सोहळा. प्रियंका खूप ऊत्साही होती.”

“तेच नं. तिच्यामुळेच आपल्या घरात आनंद सतत दरवळत असायचा. आपल्या कडच्या गौरी गणपती किती दणक्यात व्हायला सुरुवात झाली आणि दोनच वर्ष गौरी गणपती आपल्या घरी वाजत गाजत आल्या.”

“नंतर सगळंच ऊदासपणाच्या भोव-यात अडकून संपलं. मागील वर्षी गौरी गणपती आले पण कसे ? त्यांना आनंदाच्या पायघड्या घालायला पण जमलं नाही. “
आई.म्हणाली.

“कसं जमणार? जी आनंदाच्या पायघड्या अंथरायची तीच गंभीर आजाराने अंथरुणाला खिळली होती.”
बाबांच्या स्वरात दु:ख दाटलं होतं.

“या वर्षी गौरी आणताना माझं मन कासाविस होत होतं. मागील वर्षी सुशोभित केलेल्या मखरात गौरी बसवल्या होत्या प्रियंकाने.”

“खूप सुंदर मखर बनवलं होतं ग प्रियंकाने.”

‘अहो प्रियंकाच्या आईने सांगितलं की प्रियंकाला हे सगळं खूप आवडतं. त्यांच्याकडे सुद्धा प्रियंकामुळेच गौरी गणपती धडाक्यात वाजता गाजत येतात.”

“आपला निरंजन सावरेल ना ग यातून?”
बाबांनी विचारलं.

“सावरेल हो. त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल. भविष्याची स्वप्नं त्याने प्रियंकाबरोबर बघीतली होती. ती अशी विखुरली. सहजपणे तो यातून बाहेर पडू शकणार नाही. “

“ते तर खरय. काही वेळ जाऊ द्यावा लागेल.”

“निरंजन नोकरीवर मात्र आता जायला हवं. म्हणून म्हणतेय की सुधीरला लवकर सांगा. सुधीरने एकदा सांगून होणार नाही.”

“बरोबर बोलतेस. निरंजन प्रियंकाच्या दु:खात इतका बुडाला आहे की एकदा सांगून त्याच्या लक्षात येणार नाही.”

“त्याचं आजकाल जेवणात सुद्धा लक्ष नसतं. त्याच्या तब्येतीवर अशाने परीणाम व्हायचा.”

“मी सुधीरला तेही निरंजनला सांगायला सांगतो.”

“आता जेवायची वेळ झाली आहे.निरंजनला बोलावता का?”

“तूच बोलावं. मला त्याचा चेहरा बघवत नाही. माझ्या तोंडून शब्दच निघणार नाही.”

“बरं मी बोलावून आणते.”

निरंजनची आई त्याला जेवायला बोलावण्यासाठी गेली. ती आत गेली तर निरंजन खुर्चीवर मागे डोके टेकवून डोळे मिटून बसला होता.

“निरंजन बेटा जेवायला चलतेस नं ?”

निरंजनच्या लक्षातही आलं नाही की आपली आई इथे येऊन आपल्याला काही तरी विचारते आहे.

“निरंजन”

शेवटी आईने निरंजनला गदगद हरवलं तेव्हा तो भानावर आला.

आईकडे निरंजनने बघीतलं.

“काय ग ?”

‘अरे जेवायला चलतोस नं ?”

“आत्ता?”

“अरे दुपारचा एक वाजत आला. नऊ वाजता तू नाश्ता केला आहेस? तुला भूक नाही लागली.”

“नाही.माझी भूकच मेली आहे.”

“तुझी भूक मरायला काय झालं?”

“जेव्हा प्रियंका गेली तेव्हापासून माझी भूकच मेली आहे. भूक काय मला जगायचा पण कंटाळा आला आहे.”
“निरंजन !”

निरंजनच्या तोंडून हे वाक्य ऐकताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. हे बोलतानाही निरंजनचा चेहरा निर्विकार होता.

“निरंजन असं काहीतरी वेडंवाकडं बोलू नकोस.”

“आई मला सांग नं तू मी काय करू? किती स्वप्न रंगवली होती आम्ही दोघांनी. तुला आणि बाबांना लवकर आजी आजोबा करायचं ठरवलं होतं. ती आई व्हायच्या आधीच आमचं स्वप्न भंगलं. आत्ता कुठे आम्ही एकमेकांना समजून काही करण्याचं वचन देण्याइतके जवळ आलो होतो. एकमेकांना समर्पित होण्याची भावना आमच्या मनात फुलू लागली होती. ही भावना फुलण्याआधीच कोमेजली.”

असं बोलून निरंजन रडायला लागला. आईलाही कळेना काय बोलावं? बोललं तरी ते शब्द त्याच्या मनाला उभारी देण्यासाठी पुरेसे आहेत का ? पाठीवर थोपटलं तरी तो स्पर्श त्याला पाठींबा देण्याइतका खंबीर आहे का? या विचारांनी आईला भांबावल्या सारखं झालं.

“बेटा तुझ्या मनावर जो ताण आला आहे तो कमी व्हायला थोडा वेळ लागेल. तू असा हताश झालेला बघायला प्रियंकाला आवडलं असतं का? ती खूप धीट होती. तू पण तिला आवडेल असंच वाग. मनातल्या दु:खाच्या खाली अन्नपूर्णेचं अमृत दाबून टाकू नकोस. ऊठ जरा चार घास खाऊन घे.”

आईने निरंजनच्या पाठीवर हळूहळू हात फिरवत म्हटलं. मनात देवाचा धावा चालू होता की निरंजनला जेवायला येण्याची बुद्धी दे.

आईचा धावा अन्नपूर्णेने ऐकला.निरंजन शांतपणे उठला. त्याच्या चालण्यात अगतिकता दिसत होती.माउलीला हे बघवेना. पण त्यांचा नाईलाज होता.

निरंजन जेवायला स्वयंपाकघरात आला.त्याला आलेले बघताच त्यांचे बाबा आनंदाने म्हणाले

“या राजे जेवायला.आम्हाला तुमच्या पंक्तिचा लाभ घेऊ द्या.”

आणि हसले. निरंजन त्यांच्याकडे बघून जरासं हसला. निरंजन महिन्याभरात थोडं का होईना हसला हेच त्यांना खूप वाटलं.

“निरंजन तुला काय हवं ते घे.”

“हं’

“अगं तुला माझा मित्र माहिती आहे नं ?”

‘कोण मित्र?”

“अरूण जगदाळे.”

“त्याचं काय?”

“तो दोनदा आपल्या कडे आला होता तेव्हा त्याच्या नातीला घेऊन आला होता. तेव्हा निरंजनने तिला वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढून दाखवले होते. ते ती हुबेहूब काढायचा प्रयत्न करते आणि कोणी जर विचारलंं नं की तुला हे कोणी शिकवलं तर सांगते माझा निरंजन दादाने सांगितले.”

‘अगोबाई ती एवढीशी चिमुरडी प्राजक्ता. ती म्हणते असं?”

“हो. मागेच अरूण सांगत होता. निरंजनला सांगीन म्हणून ठरवतो आणि विसरतो प्रत्येक वेळी.”

‘धन्य तुमची झाले आता तुम्ही म्हातारे.”

“झालोच नं मी म्हातारा. माझी साठी शांती झाली.”

‘बरं ते राहू द्या. निरंजन तुला आमटी नकोय भातावर.”

“आई मला खरंच काहीच नको. ‘

“अरे एवढा भात आमटी खा. “

आईने निरंजनच्या पानात भात आणि वाटीत आमटी वाढली.

जेवताना गंभीर वातावरण नको म्हणून आईबाबा दोघंही हलक्या फुलक्या विषयावर बोलत होते. जेवताना दोघांचंही निरंजनच्या पानाकडे लक्ष होतं. तो व्यवस्थित जेवेल याकडे आई लक्ष देत होती. महिन्याभरानंतर आज निरंजन बरा जेवला म्हणून आईबाबांना आनंद झाला.

हात धुवून निरंजन आपल्या खोलीत निघून गेला.

“रोज आपण जेवताना असेच काहीतरी हलके फुलके विषय काढून गप्पा मारायला हव्यात.”
आई म्हणाली.

“हो. रोज तो गप्प असतो म्हणून आपणही गप्प असतो. मला वाटतं आपण गप्पा मारल्या तर कधी ना कधी तो काहीतरी बोलेल आणि त्याचं जेवण पण सुधारेल. जसं आज तो रोजच्या पेक्षा चांगलं जेवला.”

“हो आज तो व्यवस्थित जेवल्यामुळे मला बरं वाटतंय.”
आई म्हणाली.

“मला सुद्धा. “
बाबा म्हणाले.

“एकदा सुधीर आणि नेहा ला बोलावू ऋषीला घेऊन यायला सांगू. ऋषीमुळे निरंजन थोडासा सावरेल असं वाटतं.”

“होऊ शकतं तसं. तसंही ऋषीला निरंजन काका आवडतोच. मी आज संध्याकाळी सुधीरला फोन करतो. का ग या दोघांना बोलावतोय तर प्रियंकाच्या आईबाबांनापण बोलावू.”

“नको.कारण ते आले तर कदाचित निरंजन पुन्हा प्रियंकाच्या आठवणीत गुंतेल. आपल्याला त्याला प्रियंकाच्या आठवणीतून त्याला बाहेर काढायचं आहे. ऋषीबरोबर खेळून तो मोकळा होईल. “

“बरं ठीक आहे तसं करू.”

“प्रियंकाच्या बाबांना फोन करून सांगा की सुधीर आणि नेहालाच का बोलावतोय. नाहीतर त्यांचा गैरसमज व्हायचा.”

“सांगतो मी त्यांना.तसे प्रियंकाचे बाबा समजूतदार आहेत. तू नको काळजी करूस.”

दोघांचही जेवण आटोपलं. हात धुवून येताच निरंजनचे बाबा म्हणाले,

“मी जरा चौकापर्यंत जाऊन येतो.”

“आत्ता एवढ्या उन्हात?”

“खूप दिवसांनी आज निरंजन छान जेवला आहे.बरं वाटतंय. याच आनंदात जरा चौकात जाऊन पान खाऊन येतो.”

“तुमचं नं काही खरं नाही. पान खायला जायचयं तर सरळ सांगा.निरंजन छान जेवला हे कारण कशाला हवं? ताकाला जाऊन भांडं लपवू नाही.”

“खरच छान वाटतंय आज.जाऊ का?”

“बापरे! एवढे आज्ञाधारक कधीपासून झालात?”

“विचारायला लागतं बाबा तू गृहमंत्री आहेस.”

“ हं. गृहमंत्री मी आहे की नाही मला माहीत नाही. तुम्ही विचारायचं म्हणून विचारता.”
हे
बोलून निरंजनची आई हसायला लागली. हसल्यावर तिला जाणवलं खरच आपणही खूप दिवसांनी हसलो. निरंजन छान जेवला म्हणून आपण आनंदाने हसलो का? असंच असेल. हा विचार मनात येताच ती बोलून गेली,

“अहो माझ्यासाठी पण पान आणा. मलापण आज खूप आनंद झाला आहे.”

“अच्छा ! आता कोण ताकाला जाऊन भांडं लपवतय.?”

“ बरं बरं हो कळलं. “

बायकोचं लटक्या रागातील बोलणं ऐकून निरंजनचे बाबा हसतच पायात चपला अडकवून पान आणायला घराबाहेर पडले.

मागचं सगळं आवरताना निरंजनच्या आईच्या मनात विचार आला तो हा की कोणत्याही आईवडिलांचा आनंद आपल्या बाळावर अवलंबून असतो. आज निरंजन जेवण आवडलं म्हणून आणखी मागून जेवला नाही पण पानात वाढलेलं सगळं संपवलं आणि त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी सुखाची सावली दिसत होती. हेच बघून तर आपलं पोट भरलं. आता यानंतर हळूहळू निरंजन नक्की पुर्वीसारखा होईल.

हा विचार मनात येताच तिचे हात मागचं आवरण्यासाठी पटपट चालू लागले.

__________________________________

पुढे बघू काय होईल?