मला स्पेस हवी पर्व १ भाग ४८
ऑफीसमध्ये नेहाने पाहुण्यांमुळे होणारी स्वतःची चिडचिड व्यक्त केली तेव्हा रंजनाने तिला काही उपाय सुचवले. नेहाच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार चालू होते.
संध्याकाळी नेहा घरी आली ती चिडलेलीच होती
रात्रीची जेवणं झाली. जेवतानाही आज नेहा काहीच बोलत नव्हती. शेवटी सुधीर म्हणाला,
“नेहा आज काय झालंय? अशी गप्प गप्प आहेस.”
“काही नाही झालं.”
“आई तुता ताय धाद?”
नेहाने ऋषीच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही.
“नेहा अगं ऋषी काहीतरी विचारतोय.”
सुधीर नेहाला म्हणाला. नेहाने सुधीरकडे रागाने एक कटाक्ष टाकला.
“नेहा आज काही झाल का ऑफीसमध्ये? आल्या पासून बघतेय तू रोज सारखी हसत घरी आली नाहीस.”
सुधीरच्या आईने विचारलं.
“काही नाही झालं आई.माझा आज मूड नाही.”
“डोकं वगैरे दुखतंय का तुझं?”
आईने काळजीने विचारलं.
“नाही.”
“मग काय होतंय सांग.अशी गप्प नको राहूस.”
सुधीर म्हणाला.
“सुधीर मला आज बोलायची सुद्धा इच्छा नाही. प्लिज मला काही विचारू नकोस.”
“नेहा बरेच दिवस झाले तू आईकडे गेली नाहीस. जाऊन ये जरा चार दिवस. बरं वाटेल तुला.”
खूप वेळाने सुधीरचे बाबा म्हणाले.
यावरही नेहा काही बोलली नाही. सगळेजण चुपचाप जेवत होते. जेवण झाल्यावर नेहा उठून गेली. ती गेल्यावर सुधीरचे बाबा सुधीरला म्हणाले,
“सुधीर आज नेहाचं काहीतरी बिनसलं आहे. तू बघ. आम्ही ऋषीला झोपवू.कळलं. “
“अरे रोजच्या सारखं मागचा ओटा वगैरे आवरायला पण नाही थांबली. बघ जरा.”
आई म्हणाली.
“हो बघतो.”
सुधीर आईला म्हणाला आणि ऊठला.
***
नेहा जेऊन खोलीत आली आणि पलंगावर उताणी झोपली होती. डोळ्यावर हात ठेवून झोपली होती. तिच्या मिटल्या डोळ्यातून पाणी गळत होतं. सुधीर खोलीत आला तेव्हा तो नेहाकडे बघून आश्चर्य चकित झाला. एवढं काय झालं असावं त्याला कळत नव्हतं.तो नेहाजवळ पलंगावर बसला. तिच्या डोळ्यातून वाहणारं पाणी अलगद पुसलं.त्याच्या स्पर्शाने नेहाने डोळ्यावरचा हात बाजूला केला. समोर सुधीर बसलेला दिसला.
“नेहा काय झालं ग एवढं रडायला? “
“मला आता सहन होत नाही.”
“काय सहन होत नाही? ऑफीसमध्ये तुला कोणी काही बोललं का?”
“नाही. सुधीर किती महिने झाले आपण एकमेकांना शांतपणे भेटलो नाही. हे असं जगायचं?”
सुधीरच्या लक्षात आलं की नेहा आणि तो खरच खूप दिवसात एकमेकांशी शांतपणे बोललेच नाही. त्याने हळूच नेहाचा हात हातात घेतला.
“नेहा तू जे म्हणालीस ते खरय. तुझ्यासारखीच माझी पण अवस्था झाली आहे. प्रियंकाचं आजारपण सुरू झालं तेव्हा पासून आपण एकमेकांसाठी वेळच देऊ शकलो नाही.”
“सुधीर प्रियंकाच्या आजारपणात आपण एकमेकांना वेळ देणं योग्य नव्हतं. तेव्हा प्रियंका महत्वाची होती. तिचं किती आयुष्य राह्यलं आहे आपल्याला माहीती झालं होतं. त्या वेळेत तिचा सहवास आपल्याला जितका जास्त मिळेल तेवढा घेण्याचा आपण प्रयत्न केला. त्यावेळेस आपण एकमेकांना वेळ देणं महत्त्वाचं नव्हतं.”
“मग अचानक आत्ता का तुला असा त्रास होतोय?”
“मला नं या येणाऱ्या पाहुण्यांचा कंटाळा आला आहे. प्रियंकाच्या आजारपणात जेवढा भावनिक आणि शारीरिक त्रास झाला नाही त्याहून दुप्पट त्रास हे पाहूणे आले की होतो.”
“अगं हे सगळे पाहुणे आईबाबांच्या प्रेमापोटी त्यांना मानसिक आधार देण्यासाठी येतात नं?”
“कसला मानसिक आधार? आल्या पासून परत जाईपर्यंत सतत प्रियंकाच्या विषय असतो. जर त्यांना आईबाबांना मानसिक आधार द्यायचा असतो तर प्रियंका हा विषय टाळून त्यांनी बोलायला हवं.”
“तू म्हणतेस ते बरोबर आहे. या लोकांना कळत नाही तर आपण काय करणार? सगळे आपल्या पेक्षा मोठे आहेत त्यांना कसं सांगणार?”
“ते पाहुणे असेपर्यंत आणि ते गेल्यावर कितीतरी दिवस आईबाबांचा मूड ठीक नसतो. त्यांना मूडमध्ये आणण्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करावे लागतात. “
“हं”
सुधीरने फक्त हुंकार दिला.
“सुधीर परवा ते अकोल्याचे पाहुणे येणार आहेत. आठवडाभर राहतील. जेवणखाण, झोप सगळं त्यांचं अगदी घरच्या सारखं चालू राहील चघळायला प्रियंकाचा विषय. हे पाहुणे असेपर्यंत ऑफिस मधून आल्यावर थकले आहे असं म्हणण्याची मला सोय नाही.”
“कल्पना आहे मला तू खूप थकतेस पण..”
“सुधीर मी घरातल्या कामाने थकत नाही मी आईबाबांच्या चेहे-याकडे बघून थकते. बिचारे काहीच बोलू शकत नाही. सगळे नातेवाईक जबरदस्तीने सांत्वन करण्यासाठी येतात. यथेच्छ पाहूणचार झोडतात आणि आईबाबांना दु:खाच्या दरीत पुन्हा ढकलतात. याचा मला राग येतो.”
“तुझ्या रागाचा होणारा उद्रेक मला कळतोय. पण त्यांना सांगणार कोण? तू जरा चार दिवस जातेस का आईकडे?”
सुधीरच्या आवाजात नेहाबद्दलचं प्रेम आणि काळजी नेहाला जाणवली.
“परवा ते अकोल्याचे पाहुणे येणार आहेत.”
“येऊ दे. सरस्वती बाई आहेत नं स्वयंपाकाला. तू नको काळजी करू.”
“सुधीर तू माझ्या काळजीपोटी म्हणतोस. पण तुला नातेवाईक केव्हा काय बोलतील याचा अंदाज नाही. मी माहेरी गेले तर सांत्वनासाठी आलेले हेच नातेवाईक मी कशी बेफिकीर आहे. आपल्या सासूला दु:खात सोडून स्वतः माहेरी गेली असं म्हणायलाही कमी करणार नाहीत.”
“नाही ग असं का म्हणतील ? तुला असं का वाटतं? “
“वाटतं नाही हे घडू शकतं. अगदी शंभर टक्के.ते सरळ आईबाबांना पण म्हणायला कमी करणार नाही. याच्या मागे आणखी एक कारण आहे सुधीर.”
“आणखी कोणतं कारण असेल?”
“मी नसले इथे की त्यांना स्वतःचे लाड कसे पुरवता येतील? चारदा चहा लागला की हक्काने सुनेला ऑर्डर सोडता येते. आईंना कसं म्हणणार? कारण येणार ती सगळी मंडळी माझ्या पेक्षा मोठी आहेत. काही आईंपेक्षा लहान आहेत पण माझ्या पेक्षा मोठे आहेत मला ऑर्डर सोडू शकतात. पण आईंना कसं म्हणणार?”
“हो ते तर आहेच.”
“हे त्या जबलपूरच्या वासंती काकू मला म्हणाल्या होत्या.”
“तुला काय म्हणाली वासंती काकू?”
“मला म्हणाल्या बरं झालं बाई तू आहेस. नाहीतर मला काही हवं असेल तर नंदावहिनींना कसं सांगीतलं असतं. मला चहाचं फार वेड आहे तेवढं पुरवं.”
“असं म्हणाली वासंती काकू? आश्चर्य आहे.”
“एवढंच नाही पुढे काय म्हणाल्या ते ऐक. मला म्हणाल्या तू माझी इच्छा पुर्ण कर मी इथे आहे तोपर्यंत मग मी तुझं खूप कौतुक करेन.”
“काय ? असं का म्हणाली”
“मला इतका राग आला नं मी म्हटलं काकू तुम्ही माझं कौतुक करावं म्हणून तुम्हाला चहा करून देणार नाही. माझा तो स्वभाव नाही. तुम्ही पाहुणे आहात म्हणून करून देईन.”
“अरे राम वासंती काकू काहीतरी काय बरळली.”
“सुधीर मला म्हणून या नातेवाईकांचा कंटाळा आला आहे. आता ते अकोल्याचे पाहुणे आले की काय फर्माईश करतात बघ. अरे तुम्ही सांत्वनासाठी आला आहे तर सांत्वन करा.फर्माईशी कसल्या करता.शी: वैताग आलाय नुसता.”
बोलताना सुद्धा नेहाचा आवाज रागाने कापत होता. सुधीरने तिला जवळ घेतले.
“शांत हो. आता मी बघतो या अकोलेकरांना”
“तू काय बघणार आहेस? भांडणार आहेस?”
“नाही ग.त्यांनी काही फर्माईशी केल्या तर बघतो.”
“आधी आईबाबांना यांची जाणीव करून दे. ते दोघं त्या नातेवाईकांच्या प्रेमात अगदी वाहून जातात. बसल्या जागी त्यांनी ऑर्डर सोडली की हे दोघंही मम म्हणतात. मग मी काय बोलणार? “
“आईबाबां पण त्यांच्यात सामील होतात?”
“सामील नाही होत रे. पण ते नातेवाईक कधी आईंच्या माहेरचे असतात तर कधी बाबांच्या माहेरचे असतात. त्या नातेवाईकांबद्दल आईबाबांना साॅफ्ट काॅर्नर असणं स्वाभाविक आहे. त्यांना दोष देता येणार नाही. ऊद्या माझा भाऊ आला तर हेच होऊ शकतं. पण आता हे अती झालं. आईबाबांना सांग कोणी फर्माईश केली तर त्यांना टोका नाही तर कोणी येतो म्हटलं तर येऊ नका म्हणा.”
नेहाच्या रागाचा आता चांगलाच स्फोट झाला होता.
“नेहा मी आत्ताच आईबाबांशी बोलतो. ही अकोलेकर मंडळी येऊन गेल्यावर कोणी येणार नाही “
“माझा नाही विश्वास तुझ्या बोलण्यावर.”
“का? “
“मला वाटतं अख्ख्या जगात यांचे नातेवाईक आहेत. सहा महिने झाले तरी नातेवाईक येणं काही थांबत नाही. सुधीर मी प्रचंड कंटाळले आहे.अकोलकर जर असेच वागले तर माझा प्रेमळ सुनेचा चेहरा मी काढून खाष्ट सून बनीन.मग मला कितीही नावं ठेऊ दे.”
“हे बघ. आता खूप राग राग करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी बोलतो आईबाबांशी आत्ताच बोलतो. ठीआहे. आता शांत रहा. “
“सुधीर तू हे आईबाबांपाशी बोलल्यावर त्यांचा माझ्या बाबतीत गैरसमज व्हायला नको.”
“नाही होणार.माझे आईबाबा खूप समजूतदार आहेत. हेतर तुलाही माहीत आहे.”
“ते समजूतदार आहेत हे मला माहीत आहे पण इथे प्रश्न त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा आहे आणि हे नातेवाईक आईबाबांना मुलीच्या जाण्याने जे दुःख निर्माण झालंय त्यात सहभागी व्हायला येतात आहे.खूप नाजूक विषय आहे सांभाळून बोल.”
“तू काळजी करू नकोस. आईबाबांनाही तुझा स्वभाव माहिती आहे. ते अजीबात गैरसमज करून घेणार नाहीत. मी त्यांचा गैरसमज होईल अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलणार नाही. ठिक आहे. तू शांत पडून रहा मी आलोच आईबाबांशी बोलून”
सुधीर खोलीबाहेर गेला.नेहाच्या चेहऱ्यावर मात्र ताण दिसत होता. ऊद्या आईबाबांचा चेहरा कसा दिसेल याचाच ती विचार करत होती.
****
आई हळूहळू स्वयंपाक घरातलं सगळं आवरत होती. बाबा ऋषीला गोष्ट सांगत होते. सुधीरने सगळा रागरंग बघीतला. स्वयंपाक घरातून आई बाहेर येईपर्यंत सुधीर मोबाईल वर काही तरी बघत बसला.
“सुधीर नेहा कशी आहे? डोकं दुखतंय का तिचं?”
आईच्या बोलण्याने सुधीरने मोबाईल बंद करून आईकडे बघीतलं.
“आई तुझ्याशी आणि बाबांशी मला थोडं बोलायचं आहे.”
“होका.बरं यांना हाक मारते.”
आई सुधीरच्या बाबांना बोलवायला गेली. ते येईपर्यंत सुधीर मनातल्या मनात विषयाला सुरुवात कशी करावी याचा विचार करत होता.
“सुधीर बोल काय बोलायचय?”
सुधीरचे बाबा समोर सोफ्यावर बसत म्हणाले. आईपण सोफ्यावर बसली.
“आई बाबा आपल्या प्रियंकाच्या बाबतीत जे काय घडलं ते वाईटच झालं. आपण सगळे त्याने दु:खी झालो. पण हे जे सहा महिन्यांपासून सतत नातेवाईक येतात आणि आठ आठ दिवस राहतात. राहिल्या बद्दल काही म्हणणं नाही. पणते जर आपल्या दुःखात सहभागी व्हायला आले आहे तर त्यांनी तसं सहभागी व्हावं. नेहा कडे खाण्याच्या फर्माईशी कसल्या करतात? “
“अरे थोडंफार काहीतरी कोणीतरी म्हटलं असेल”
आई म्हणाली
“आई ते एरवी आले असते आणि अश्या फर्माईशी केल्या असत्या तर काही वाटलं नसतं. पण कोणत्या कारणासाठी तुम्ही इथे आलाय याचं भान ठेवा. त्यातून वासंती काकू नेहाला म्हणाली माझी चहाची इच्छा पुर्ण कर मी तुझं खूप कौतुक करीन.”
“असं म्हणाली वासंती?”
बाबांच्या स्वरात आश्चर्य होतं.
“एवढंच नाही बाबा ती पुढे काय म्हणाली ते ऐका. नंदावहिनी मोठ्या आहेत त्यांना नाही नं चहा करा म्हणून म्हणू शकत. तू आहेस इथे म्हणून बरंय. बोला. आई नेहा तुझ्या वर काही भार पडू देत नाही. पण हे नातेवाईक यांची ऊस्तवारी करायची आणि हे तुम्हाला हसत खेळत ठेवण्याऐवजी प्रियंकाच्या आठवणीत सतत काढून तुम्हाला आणखी दुःखी करतात आणि स्वतः आपल्या गावी निघून जातात. त्यांनंतर तुमचा मूड ठीक होण्यात आठवडा जातो. बाबा हे नातेवाईक आता नको. आम्ही दोघंही कंटाळलो आहे. परवा अकोलेकर येणार आहेत त्याचं तिला फार टेन्शन आलंय. तुम्ही त्यांना नीट सांगा. तुम्ही दोघंही रागाऊ नका. प्लिज”
सुधीरचा आवाजात कातरपणा आला होता.
“नाही रागावलो आम्ही. बरं झालं सुधीर तू आज बोललास. हे आधी सांगायचं.”
“सुधीर सांग नेहाला टेन्शन घेऊ नकोस. अकोलेकर आल्यावर आम्ही दोघं बघून.”
आई म्हणाली.
“ठीक आहे.ऋषी चलतोस का झोपायला?”
“नाही.मी आबांजवद दोपनार.”
“अरे झोपू दे त्याला आमच्या जवळ. तू नेहाकढे बघ.”
आईने सुधीरला धीर देत म्हटलं.
“ठीक आहे.”
सुधीर उठून गेला. सुधीरच्या आईबाबांनी एकमेकांकडे बघितलं.
“तूपण विचार करू नकोस.ऊद्या बोलू.”
बाबा म्हणाले.
“हो.”
आईन शांतपणे ऊत्तरला.
“चला ऋषी आपण ताडोबाच्या जंगलातील वाघोबाची गोष्ट ऐकायची का?”
“हो “
ऋषी जोरात ओरडला.
बाबा आणि ऋषी खोलीत गेले.आईमात्र तिथेच आपल्याच विचारात गुंतल्या.
_________________________________
अकोलेकर आल्यावर आणि येऊन गेल्यावर काय होईल बघू.