मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५६ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५६

मला स्पेस हवी पर्व १ भाग 56
 
मागील भागात आपण बघितलं की नेहा जाहिरातीचं शूटिंग बघायला जाते पण तिथे कंटाळते म्हणूनच नेहा आणि अपर्णा निघून येतात. रमणशहाचा त्यादिवशी असलेला प्लॅन पूर्ण फिसकटतो.आता काय होईल पुढे ते बघू.
 
कॅब मध्ये बसली असताना बऱ्याच वेळ नेहा आपल्याच विचारात असते. तिला बघून अपर्णाला सारखं मनातून वाटत असतं की आपण रमण शहाबद्दल नेहाला सांगूया. पण कसं सांगायचं? हा तिच्यापुढे प्रश्न असतो. कारण आजही रमण शहा च्या पद्धतीने नेहाशी बोलत होता ते बघून अपर्णाच्या लक्षात आलं की तो नेहाला आपल्या बाजूला करू बघतो आहे. जर का त्याची जादू चालली तर नेहा मॅडम रमणशहाला आत्ता जेवढं टाळतात आहे तेवढ्या त्या त्याच्या कह्यात जातील. याची भीती अपर्णाला वाटत होती.
 
 
अपर्णाही याच आपल्या विचारात गुंग होती तेवढ्यात तिला नेहाचा प्रश्न ऐकायला आला.
 
‘अपर्णा मला आज खूप कंटाळवाणं झालं तिथे. तुला पण झालं का?”
 
 
“ हो मॅडम मला पण खूप कंटाळा आला कारण माझ्या डोळ्यासमोर आपल्या ऑफिसचं काम दिसत होतं.”
 
“बरोबर जाहिरातीचं शूटिंग करणं हा काय आपल्या कामाचा भाग नाही. आपल्या डोळ्यासमोर उरलेल्या तीन-चार टूर्सच्या जाहिराती डिझाईन करणं हे महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी असलेला वेळ वाया जातो आहे हे सतत माझ्या मनात येत असल्याने मला तिथे कंटाळा आला. तुला का ग कंटाळा आला आणि तू रमण शहा या व्यक्तीला किती वर्षापासून ओळखते?”
 
 
यावर अपर्णा म्हणाली,
 
“ मॅडम मी सहा सात वर्ष या कंपनीत आहे तेव्हापासून रमण शहांच्या सत्यम ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सीला स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा कॉन्ट्रॅक्ट आहे. तुमच्या आधी जे साहेब होते ते फार कंटाळायचे रमण साहेबांना भेटायला.”
 
“ का?”
 
नेहाने आश्चर्याने विचारलं.
 
“ माहिती नाही मला. त्यामुळे प्रत्येक वेळेला ते मलाच पाठवायचे त्यांच्याशी मीटिंग करायला. “
 
“अग मोठे साहेब म्हणून ते कधी रमण शहांना भेटलेच नाही !”
 
नेहाने आश्चर्याने विचारलं.
 
“ नाही ना मॅडम. सुरुवातीलाच कधीतरी भेटले असतील तर मला माहित नाही कारण माझ्या आधी माझ्या जागेवर क्रिएटिव्ह राईटर फॉर एडवर्टाइजमेंट डिपार्टमेंटमध्ये असं कोणीच नव्हतं. ते साहेबच बहुदा सगळं बघत होते आणि त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी एकाच वेळी करण्याचा कंटाळा आला असावा.असा माझा तर्क आहे.”
 
“ अगं ते सगळं खरं पण डिपार्टमेंटचे हेड म्हणून त्यांची काही जबाबदारी असते. त्याला हे कारण देणं योग्य नाही.”
 
 
 
“हो मॅडम तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तुम्ही आल्यापासून किती ॲक्टिव्ह रहाता सगळीकडे. तुमच्या अशा वागण्यामुळे मला राजेश सरांना दोघांनाही कामाचा ऊत्साह येतो.”
 
“ अपर्णा हे माझं कामच आहे आणि त्यासाठी स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स मला पगार देते. कचकचीत पगार हातात घ्यायला छान वाटतं नं ! मग त्याच्या बरोबर येणा-या जबाबदा-या तुम्ही घेतल्याचं पाहिजेत. हे तुम्हाला कोणी सांगण्याची गरज नाही.”
 
नेहाच्या आवाजात ठामपणा होता. जो अपर्णाला जाणवला. तिला नेहा अधिकच आवडू लागली. अपर्णा पुढे म्हणाली.
 
 
 
“ मॅडम मी जॉईन झाले तेव्हापासून मलाच या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आहे.”
 
नेहा पुढे म्हणाली,
 
“ अपर्णा जाहिरात डिपार्टमेंटचा मुख्य म्हटल्यावर त्याला जाहिरात कशी असावी? कशी केल्या जावी? त्याचा इफेक्ट कशाप्रकारे लोकांवर हवा? या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या गोष्टींवर काम करायला हवं असं मला वाटतं. माझ्या दृष्टीने माझं मत शंभर टक्के बरोबर आहे.”
 
 
“नेहा मॅडम तुम्ही अगदी बरोबर बोलता आहात. असंच असायला पाहिजे. मला सुद्धा असं काहीतरी वाटायचं पण माझ्या हातात ॲथोरिटी नसल्याने मी फक्त सरांना सुचवायचे. त्याच्यात त्यांना जे योग्य वाटेल ते ठेवायचे बाकीकडे लक्ष देऊ नको असं सरळ म्हणायचे. त्यामुळे आत्तापर्यंतच्या जाहिरातींचा स्क्रिप्ट रायटिंग सुद्धा तुम्ही जितकं लक्ष घालून करत आहात तेवढे केल्या गेलं नाही. त्यामुळे शब्द असे फारसे ताकदीचे वापरले गेले नाही. स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स जुनी ट्रॅव्हल कंपनीत असल्याने तिला बुकिंग मिळत गेलं. पण आता हे बुकींग वाढेल. कारण आता जाहीरातींमध्ये क्रिएटिव्हीटी आली आहे.”
 
हे बोलताना अपर्णाचा चेह-यावर आनंद दिसत होता. अपर्णाचं ऐकून नेहाला आणखीनच आश्चर्य वाटलं .ती म्हणाली,
 
 
“अपर्णा मला जे वाटतं की जाहिरातींमध्ये माॅडेल म्हणून प्रवाशांनी काम करावं ही कल्पना तुला खरंच पटली आहे का? कारण तू मी तुझी बाॅस आहे म्हणून हो म्हणू नको. खरं सांग. मला खरं आणि प्रांजळ मत ऐकायला नेहमीच आवडतं.”
 
यावर अपर्णा म्हणाली,
 
“मॅडम मला आणि राजेश सरांना दोघांनाही तुमची कल्पना खरंच आवडली आहे.”
 
हे ऐकल्यावर वर नेहाला बरं वाटलं. नेहा आणि अपर्णा आणखीही वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतानाच त्यांचं ऑफिस आलं आणि नेहा आणि अपर्णा कॅब मधून उतरून ऑफिसला गेल्या
 
****
 
रमण शहा नेहा आणि अपर्णा निघाल्यावर काही वेळानंतर निघाला. गाडीत बसल्यावर त्याला काही सुचेना. कारण नेहाच्या आधी अशी कुठली स्त्री त्याच्या कह्यात यायला इतका वेळ लागला नाही. त्यामुळे नेहावर इम्प्रेशन कसं पाडावं ?याचा तो विचार करत होता. त्याला आधी इतर स्त्रियांप्रमाणे नेहावर फक्त इंप्रेशन पाडायचं होतं पण इंप्रेशन पाडण्याच्या नादात त्याला नेहा आवडायलाच लागली.
 
 
हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याला स्वतःलाच धक्का बसला. अरे आत्तापर्यंत आपण कॅज्युअली बायकांशी गप्पा मारायचो. त्यांना फ्रेंडली रिलेशन दाखवायचो पण त्यांच्यामध्ये इतकं इन्व्हाॅल्वह कधी झालो नाही. आजच असं काय झालं हा प्रश्न रमण शहाने कितीदातरी स्वतःलाच विचारला असेल.
 
 
नेहामध्ये असं काय आहे की ज्यामुळे आपण तिच्याकडे इतके ओढल्या जातो आहे? याचा तो विचार करू लागला. त्याला असं वाटलं कदाचित नेहाची विचार करण्याची पद्धत, क्रिएटिव्हिटी असलेला तिचा मेंदू आणि त्यानुसार ती करत असलेली कामं. या सगळ्या गोष्टी नॉर्मल बायकांच्यात आपल्याला कधी दिसल्या नाही.
 
बायका फार इमोशनल असतात हे त्याला आत्तापर्यंत माहिती झालं होतं. त्याचाच फायदा घेऊन तो बायकांना ट्रॅप करायचा. त्याने आतापर्यंत कोणत्याही बाईला स्वतःहून कसलीही डिमांड केली नव्हती. एका मर्यादेनंतर बायका स्वतःहून त्याच्या स्वाधीन व्हायच्या. याचमुळे रमण शहा नेहमीच सेफ राहिला.
 
 
नेहा मात्र या बायकांपेक्षा वेगळी आहे हे त्याच्या लक्षात आलं. नेहा त्याला खूप इमोशनल वाटली नाही. त्याला माहिती नव्हतं नेहाचा नेमका स्वभाव कसा आहे? त्यामुळे हे त्याचे सगळे तर्क होते. पण सत्य परिस्थिती वेगळी होती.
 
नेहा अतिशय तणावग्रस्त परिस्थितीतून घराबाहेर पडली होती. त्यामुळे तिला कुठल्याच गोष्टीचं सध्या आकर्षण वाटत नव्हतं. तिला फक्त स्वतःचं काम आणि स्वतःपुरताचा वेळ एवढंच हवं होतं. त्या सगळ्यात ओयसिस म्हणून ऋषी तिला हवा होता.
 
रमण शहा हा विवाहित माणूस होता. त्याला दोन मुलं होती जी आता कॉलेजमध्ये होती. त्याची बायको हाउसवाइफ असली तरी मधल्या वेळात ती तिचा आवडीचा छंद जोपासायची. त्याच्यामुळे त्याचा संसार एकंदरीत छान चालू होता तरी त्याला दुसऱ्या बायकांमध्ये फार इंटरेस्ट असायचा.
 
त्याच्या बायकोला हे माहिती होतं पण जोपर्यंत आपला नवरा बायकांशी फक्त बोलतो इतर बायकांशी त्याची लफडी नाहीत तोपर्यंत घाबरायचं कारण नाही हे तिचं मत होतं. पण रमणचे इतर बायकांशी असलेले शारीरिक संबंध तिला माहित नव्हते. रमण शहा हुशार होता. लफडी करण्यापर्यंत रमणशहा पोहोचायचा नाही यासाठी की तो आपली मर्यादा जाणून होता.
 
 
विवाहित स्त्रियांना किंवा अविवाहित स्त्रियांना एका मर्यादेच्या पलीकडे त्यांच्यात गुंतायचं नाही हे त्याचे तत्व होतं त्याप्रमाणे तो वागायचा त्याला छान छान मैत्रिणी मिळायच्या .पण सगळ्या व्यवस्थित रिलेशनशिप मेंटेन करून रमण शहा त्या बायकांना त्यांच्याही नकळत रमण शहाशी शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करायचा. रमण शहाला त्या कधी आपलं सर्वस्व समर्पण करायच्या हे त्या बायकांच्याही लक्षात यायचं नाही.हे कौशल्य रमण शहाने स्वतःमध्ये छान विकसित केलेलं होतं.
 
 
त्यामुळे रमणशहा बिनधास्त असायचा. त्याचं व्यक्तिमत्त्व असं लफडेबाज म्हणून प्रसिद्ध झालं नव्हतं त्यामुळे तो त्याच्या बायकोसमोर सुरक्षित असायचा. पण इथे मात्र वेगळच घडत होतं. रमण शहाच नेहाच्या पुढे पुढे करत होता. इतर बायका रमण शहाचं आपल्याकडे लक्ष जावं म्हणून धडपडायच्या.
 
 
इथे प्रयत्न करून रमण शहाच्या हाती नेहा येत नव्हती. माणसाला एखादी गोष्ट प्राप्त होत नाही असं लक्षात आल्यावर त्याच्या मनात त्या गोष्टीबद्दलची असोशी दुप्पट होते. तो जिद्दीने ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी धडपडतो. आत्ता रमण शहाचं असंच झालं होतं. तो स्वतःच आता गोंधळलेला होता पण नेहाला प्राप्त करायचं या मतावर ठाम होता. गोंधळलेला असल्याने आता कोणतं पाऊल उचलावे त्याला कळेना.
 
रमण शहा इतका विचारात बुडला होता की त्याला हिरवा सिग्नल लागल्याचही कळलं नाही. तो जागीच उभा होता. काही सेकंदानंतर त्याला मागून सतत गाड्यांचे हाॅर्न वाजताना ऐकू आले तेव्हा तो भानावर आला. समोर हिरवा सिग्नल बघून तो गाडी सुरू करणार तेवढ्यात त्याच्या गाडीच्या काचेवर धपाधप कोणीतरी मारलं. याचं त्या माणसाकडे लक्ष गेल्यावर त्याने गाडीची काच उघडली. तेव्हा बाहेरचा माणूस ओरडून म्हणाला,
 
“ अबे पगला गया क्यां? गाडी चलाते चलाते सो गया क्या?”
 
त्या बरोबर पाठीमागे एवढे हाॅर्न वाजायला लागले की रमणने लगेच गाडी सुरू केली. बाहेरचा माणूस आपल्याला मारेल या भीतीने घाई घाईने रमणने गाडीची काच लावली. रमण पुढे जात असतानाच त्याला त्याच्या दिशेने ट्रॅफिक पोलिस धावत येताना दिसला. त्याला बघताच रमणने जिवाच्या आकांताने गाडी स्पीडने तिथून पळवली. त्या ट्रॅफिक पोलिसचं नशीब रमणची वेगाने निघालेल्या गाडीने त्याला धडक दिली नाही.
 
बरंच दूर गेल्यावर रमणने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि दीर्घ श्वास घेतला. तो प्रचंड घाबरला होताच पण एवढ्या वेगाने गाडी चालवून दमला पण होता. आजपर्यंत एवढ्या वेगाने रमण शहाने कधीच गाडी चालवली नव्हती. त्याच्या स्वभावातच नव्हतं. कोणतही काम असो ते करताना रमणला कधीच घाई करून ते काम करायला आवडायचं नाही. आताच्या प्रसंगाचं खापर त्याने नेहाच्या डोक्यावर फोडलं.
 
“ नेहाच्या मुळे आज माझ्यावर मार खाण्याचा प्रसंग आला. का ही मला इतकी छळते? का माझ्या कह्यात येत नाही? नेहा आता तुला माझ्या प्रेमात नाही अडकवलं तर बघ. जेव्हा तू कळकळीने मला भेटायला येण्याचा प्रयत्न करशील तेव्हा मी तुला कसा त्रास देईन बघ.”
 
रमणने निश्चय केला की नेहा मिशन यशस्वी करायचच. त्याने रूमालाने चेहरा पुसला,केस नीट केले, दीर्घ श्वास घेतला आणि निघाला. रमणने गाडी त्याच्या ऑफीसच्या दिशेने वळवली.
 
****
 
रमण वर आलेल्या प्रसंगाबद्दल नेहा पूर्ण पणे अनभिज्ञ होती कारण ती तिच्या ऑफीसमधे होती. रमणने केलेली प्रतिज्ञा नेहाला माहिती असण्याची कारण नाही पण म्हणतात नं की कोणीतरी खूप तीव्रतेने तुमची आठवण काढत असेल किंवा तुमच्या विषयी वाईट बोलत असेल तर ती कंपनं तुम्हाला लागतात. काहीतरी अगम्य अशी हालचाल तुमच्या मनाला आणि शरीराला टोचते.
 
नेहाला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं. याचं कारण तिला कळत नव्हतं. तिने समोरची फाईल बंद केली आणि खुर्चीवर मागे डोके ठेवून डोळे मिटून बसली. तेव्हाच अपर्णा तिच्या केबिनमध्ये आली. नेहाला असं बघून अपर्णाला काळजी वाटली. कारण नेहा नुसतीच खुर्चीवर डोकं मागे टेकवून झोपली नव्हती तर तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.
 
अपर्णाला रहावलं नाही. तिने काळजीपोटी नेहाला विचारलं,
 
“ मॅडम बरं वाटत नाही का?”
 
“अं”
 
नेहाने हळूच डोळे उघडले.समोर अपर्णाला बघून ती केविलवाण्या आवाजात म्हणाली,
 
“ माहिती नाही काय झालं? एकदम अस्वस्थ वाटायला लागलं.”
 
“ मॅडम मला वाटतं तुम्हाला ऊन लागलं असावं. आपण आत्ता उन्हातून आलो.”
 
“ अपर्णा आपण एसी गाडीतून गेलो आणि आलो. मग कसं ऊन लागेल?”
 
“ मॅडम आपण गाडीतून उतरल्यावर ऊन लागतं. तेच बाधलं असेल.”
 
“ काय माहिती. अपर्णा मला चहा आणि बिस्किटं सांगतेस का? “
 
“ हो सांगते.”
 
“ मी चहा, बिस्कीटं घेऊन इथेच जरा वेळ आराम करते. दारावर डोन्ट डिस्टर्ब चा बोर्ड लाव.”
 
“ हो.”
 
एवढं बोलून अपर्णाने नेहाच्या केबीबाहेर पडल्यावर चपराशी पांडूरंगला हाक मारली.
 
“ काय मॅडम? मला हाक मारली?”
 
 
“ हो तू कॅंटीनमधून एक कप चहा आणि बिस्किटं नेहा मॅडमच्या केबिनमध्ये नेऊन दे. मॅडमना बरं वाटतं नाही. चहा नुसता ठेवून येऊ नको. मॅडमना चहा आणला म्हणून सांग. चहा थर्मास मध्ये घेऊन ये. चहा दिल्यावर मॅडमच्या केबीनबाहेर डोन्ट डिस्टर्बचा बोर्ड लाव. कळलं?”
 
“ हो मॅडम. नेहा मॅडमना बरं नाही तर त्यांनी आज रजा घ्यायची होती.”
 
नेहाच्या काळजी पोटी पांडूरंग बोलला.
 
“ मॅडमना आत्ताच बरं वाटेनासं झालं. तू चहा दे फार प्रश्न विचारू नको मॅडमना.”
 
अपर्णाने पांडूरंगला बजावलं.
 
“ मॅडम मला काळजी वाटते म्हणून विचारतो.”
 
पांडूरंग नाराज स्वरात म्हणाला.
 
“ पांडूरंग मला तुझा स्वभाव माहिती आहे. तू काळजी पोटीच विचारतो हेही माहीत आहे पण त्यानंतर तू जे डाॅक्टर असल्यासारखा भाषण देतोस नं ते ऐकण्याची पेशंटची मन: स्थिती नसते म्हणून तुला सांगते. वाईट वाटून घेऊ नकोस आणि रागाऊ नको.”
 
अपर्णा काम करतच बोलली.
 
“ नाही मॅडम. नेहा मॅडम आत्ताच आल्या पण रोज आल्या की आपुलकीने माझी विचारपूस करतात.मला छान वाटतं. म्हणून मला आत्ता काळजी वाटली.”
 
पांडूरंग म्हणाला. यावर अपर्णा म्हणाली,
 
“ आत्ता तू फक्त चहा नेऊन दे. नंतर त्यांची विचारपूस कर. चालेल नं? मॅडमना पण बरं वाटेल. रोज तुझी विचारपूस करतात नं?”
 
पांडूरंग कडे बघत अपर्णा हसली.
 
“ मॅडम तुम्ही म्हणता तसंच करीन. येऊ मी?”
 
“ हो.ये. पांडुरंग आणखी एक चहा घेऊन लगेच ये. काऊंटरवर सदाशिवशी चहा कोणाला हवाय. काय झालं मॅडमना या शिळोप्याच्या गप्पा मारत बसू नको. जे काय सांगायचं ते नंतर सांग”
 
“ साॅरी मॅडम. लगेच येतो.”
 
पांडूरंग निघून गेला. अपर्णा स्वतःशीच हसली. पांडूरंग नावाप्रमाणेच पांडुरंग होता. अख्ख्या जगाची काळजी करणारा.
 
अपर्णा कामात गुंतली.
 
________________________________
नेहाला बरं वाटलं का? रमण शहा आता काय प्लॅन करेल? बघू पुढील भागात.