निकिता राजे चिटणीस - भाग १९ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निकिता राजे चिटणीस - भाग १९

निकिता राजे चिटणीस

भाग  १९

भाग १८   वरून  पुढे  वाचा .........

शशिकला चिटणीस

मी ऑफिस मधे जायला सुरवात केली. मला काही नवीन वाटल नाही कारण कंपनी च्या सुरवाती पासून मला सर्व गोष्टींची माहिती होती. मी डायरेक्टर बोर्डावर असल्यामुळे मी रोजच्या रोज आढावा पण घ्यायची सवय स्वत:ला लाऊन घेतली होती. काही मुद्दे वादाचे कारण पण ठरायचे. असो. सांगायचा मुद्दा असा, की परिस्थितीवर पूर्ण पणे नियंत्रण मिळवायला फारसा त्रास झालाच नाही. गणित हा माझा विषय असल्याने सगळी आकडेवारी चटकन ध्यानात यायची. रोजच्या रोज निकिता बद्दल पण feedback मिळायचा. निकिता पण रोज रात्री सर्व सांगायची आणि त्यावर चर्चा पण व्हायची. हळू हळू नितीन पण चर्चेत भाग घ्यायला होता. काउन्सेलिंग चा पण परिणाम दिसायला लागला होता. जवळ जवळ वर्ष असंच गेलं. निकिताला आता फॅक्टरी वर चांगलीच पकड बसवता आली होती. एक दिवस अचानक नितीन म्हणाला की “मी पण आज ऑफिस ला येणार.” आम्हा दोघींना खूप आनंद झाला. आणि मग रुटीन सुरू झाल. नितीन पहिल्या सारखा कामात पूर्ण पणे बुडून गेला. मग मी ऑफिस मध्ये जाण थांबवल. पण निकिता च फॅक्टरीत जाण चालूच होत.

हळू हळू नितीन ने फॅक्टरी मध्ये पण जायला सुरवात केली. आठवड्यातून दोनदा तो फॅक्टरीत जायचा. सगळ कसं सुरळीत झाल होत. पण दोन वर्ष जावी  लागली स्थिर स्थावर व्हायला. अधून मधून इंस्पेक्टर पाटील यायचे हाल हवाल विचारायला. पण मनातून काही धागा दोरा मिळतो का हे बघायचे. मी फारसं लक्ष द्यायची नाही. ते त्यांच काम करत होते. करू द्या असा विचार करून काही बोलायचे नाही. मी असा विचार करत होते की दोन वर्ष झालीत खूप ताण सहन केला. आता थोड रीलॅक्स व्हायला पाहिजे. बऱ्याच वर्षांपासून नर्मदा प्रदक्षिणा करायचं मनात होत. त्या कल्पनेला मूर्त स्वरूप द्याव असा वाटलं. म्हणून मी निकिता शी बोलले.

“मी आणि राधाबाई नर्मदा परिक्रमा करायला जाऊ का ? तुला काय वाटत.”

“किती छान. आई मला पण यायला आवडेल. आपण तिघीही ही जावू. पण मला अस वाटत की अजून नितीन पूर्णपणे सावरला आहे की नाही याचा नीट अंदाज येत नाहीये. थोड थांबून मग जावूया. नाही तर आपण कोणीच नाही आणि म्हणून तो पुन्हा dipression मध्ये. अस नको व्हायला.” – निकिता.

“तू म्हणतेस ते बरोबर वाटतंय आपण नंतर जावू.”

आणखी एक दीड वर्ष गेल. मधल्या काळात निकिता च्या योजने प्रमाणे शाळेच्या फी आणि पुस्तकं आणि इतर खर्च यांच अनुदान जाहीर केल. दिवाळीला सीनियर सिटिजन साठी आणि एकंदरच औषधोपचारांसाठी पण अनुदान जाहीर केल. सगळे खुश होते. नितीन आता फूल फॉर्म मध्ये आला होता. मग आम्ही आमचा नर्मदा प्लान त्याला ऐकवला. त्यानी पण लगेच हो म्हंटल. म्हणाला गेली दोन तीन वर्ष तुम्ही माझ्यासाठी फार खस्ता खाल्ल्या तेंव्हा आता जरा मनमोकळ फिरून या. मी आता ठीक आहे माझी काळजी करू नका. आम्ही लगेच बूकिंग केल. एक महिन्यांनी आमची यात्रा ओंकारेश्वरा पासून सुरू झाली. ओंकारेश्वर हे इंदूर जवळ नर्मदेच्या काठी असलेलं ज्योतिर्लिंग स्थान आहे. तिथून यात्रा सुरू झाली. यात्रा बसनीच होणार होती. सर्व व्यवस्था ट्रॅवल कंपनी ने अगदी चोख केली होती त्या मुळे  काहीच त्रास झाला नाही. आता परतीचा प्रवास सुरू झाला होता. 

आम्ही ओंकारेश्वरला पोचलो तेंव्हा संध्याकाळ झाली होती. आता संध्याकाळी हॉटेलवरच आराम करून उद्या ओंकारेश्वरचे दर्शन घेतल की पुण्याचा मार्ग धरायचा. असा विचार करून आम्ही जेवून रूम वर आलो. फोन वाजला. कोण आहे पाहिल तर वाघूळकर साहेब. वाघूळकर मला का फोन करताहेत काही कळेना. नितीन तिथे असतांना वाघूळकरांनी मला फोन करायचं काहीच कारण नव्हतं. तसंच काही कारण असतं तर नितीननेच केला असता. निकीताला सांगितलं तर तिला पण आश्चर्य वाटलं. रिंग बंद झाली. निकिता म्हणाली की “आई नितीनला पुन्हा डिप्रेशन तर नसेल आल ?” मा‍झ्याही मनात अगदी हाच विचार आला होता. काही सुचेना. पुन्हा रिंग वाजली. “आई घ्या फोन.” निकिता म्हणाली. “आणि स्पीकर वर टाका.”

“हॅलो”

“शशी मॅडम, मी वाघूळकर बोलतोय.”

“बोला.” वाघूळकरांचा आवाज रडवेला होता. काळजात एकदम चर्र झाल.

“मॅडम कुठे आहात ? ओंकारेश्वरला पोचलात का ?” – वाघूळकर

“हो, आजच पोचलो. पण फोन का केला होता ? आणि तुमच्या आवाजाला काय झाल ? असा का येतोय, काही प्रॉब्लेम आहे का ?” – मी विचारलं.

“काही नाही मॅडम ठसका लागला म्हणून, दूसर काही नाही. पण मॅडम रघुवीर ला गाडी घेऊन तिथे पाठवल आहे. तो कालपासून तिथेच आहे. त्याला काळवतो. उद्या सकाळीच ७ वाजे पर्यन्त निघा. रघुवीर आत्ता येईलच तुमच्या हॉटेलवर. बाकी काही नाही.” – वाघूळकर  

“रघुवीर ला कशाला धाडलं?, आम्ही बसनेच आलो असतो की. सगळ्यांच्या बरोबर”

“नाही मॅडम इतक्या दिवसांचा प्रवास, शरीर थोड अवघडल्या सारखं होत म्हणून पाठवल. बर ठेवतो आता. बाकी विशेष काही नाही. इथे आल्यावर बोलूच.”- वाघूळकर  

हुश्श! दोन मिनिटांकरता चांगलच दडपण आल होत ते गेल. तेव्हडया दोन मिनिटांत काय काय विचार मनात येऊन गेले. अर्ध्या तासांनी रघुवीर आला. सकाळी येतो म्हणून सांगून गेला. सगळ ठीकच तर आहे अस म्हणाला.

रात्री ७ वाजता रघुवीर म्हणाला “इथे एक चांगला ढाबा आहे आपण जेवून घेऊ.”

“अरे घरी गेल्यावर जेवू. काय पिठल भात करायला फारसा वेळ लागणार नाही. तू पण आमच्या बरोबरच  जेव.” राधाबाई म्हणाल्या.

“मॅडम मला भूक लागली आहे. दिवस भर ड्रायव्हिंग करतो आहे. थोडा पायांना पण आराम मिळेल.” रघुवीर म्हणाला.  

आम्हाला पण ते पटलं. आम्ही सगळेच जेवायला थांबलो. रघुवीर जातीने आमच्या जेवणाकडे लक्ष देत होता. आम्हाला आश्चर्यच वाटल. आम्ही विचारलं सुद्धा “एवढं लक्ष देतो आहेस, काय कारण आहे. आता जेवायला बसलो आहोत तर आम्ही पोटभर जेवुच की. साहेबांनी सांगून पाठवल का काय. ?” तर नुसताच हसला.

घरी पोचायला रात्रीचे नऊ वाजले. घरात शिरलो तर मीटिंगच भरलेली दिसली. वाघूळकर, चोरघडे, वाटवे बाई, दामले, चिंतामण भाऊजी, विमल, निखिल, सगळेच होते. सगळ्यांचे चेहरे गंभीर होते. समोरच नितीनचा फोटो होता. हार घातलेला. उदबत्ती लावली होती. मला गरगरायला लागलं. निकिताने पाहिले आणि ती चक्कर येऊनच पडली. तिला सावरायला वाटवे धावल्या पण त्यांना जमल नाही आणि दोघीही पडल्या. राधाबाईंनी मला धरल नाहीतर मी पण पडलेच असते. त्यांनी मला रडत रडतच सोफ्यावर बसवल.

“राधाबाई हे काय झाल हो” मला धड बोलता पण येईना. राधाबाईंना पण रडू अनावर झाल होत. निखिल निकिता ला सावरायला धावला. त्यानी आणि दामल्यांनी निकिता  ला सोफ्यावर बसवल. पाणी चेहऱ्यावर मारल. निकिता भानावर आली. माझ्या कडे बघितल आणि तिचा बांधच फुटला. तिला थांबवणं अशक्य होत

तास दीड तास कोणीच बोलत नव्हत. शेवटी ती शांतता मला असह्य झाली. मी वाघूळकरांना विचारल.

“हे कस काय घडलं. केंव्हा झाल ?”

“मॅडम चार दिवसांपूर्वी दुपारी नितीन साहेबांनी बबनला हाक मारली आणि जेवणाची तयारी करायला सांगितली. डबा आलाच होता. बबनने सर्व गरम करून डिश  मध्ये वाढून दिल. आणि तो बाहेर बसला. दहा मिनिटांनी आत डोकावल आणि ओरडतच माझ्या केबिन मध्ये आला. साहेब कसे तरीच दिसताहेत अस म्हणाला. मी जेवण टाकून तसंच धावत गेलो. मला धावतांना पाहून चोरघडे आणि वाटवे मॅडम पण आल्या. साहेब बेशुद्ध पडले होते. लगेच अॅम्ब्युलन्स बोलावली आणि हॉस्पिटलला नेल. त्याच वेळी चिंतामण काकांना पण फोन केला. ते पण लगेचच हॉस्पिटलला आलेत. डॉक्टरांनी तपासल आणि म्हणाले कार्डियाक अरेस्ट असू शकत. तो पर्यन्त निखिल पण आला होता. सर्टिफिकेट मोठ्या डॉक्टरांनी पाहिल्यावर  देऊ अस डॉक्टर म्हणाले. दोन तासांनी आम्हाला बोलावून सांगितलं की बॉडी काळी निळी पडली आहे. पोलिस केस आहे. आम्ही पण पाहिल खरंच शरीर काळ नीळ पडल होत. मग बाकी सोपस्कार होऊन बॉडी मिळायला तिसरा दिवस उजाडला. शरीराची अवस्था इतकी वाईट होती की ताबडतोब अन्त्य संस्कार करवा लागला. निखिलनीच केल सगळं.” वाघूळकरांनी सविस्तर सांगितलं.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.