गया मावशी Pralhad K Dudhal द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गया मावशी

गया मावशी ....

    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते….

  त्या काळात शाळेला दिवाळीची तीन आठवडे सुट्टी असायची. एकूण आर्थिक परिस्थिती अशी होती की सुट्टीत फारसे कुठे जायची पद्धत नव्हती.सुट्टीत मुले फार फार तर त्यांच्या मामाच्या गावाला किंवा एखाद्या नातेवाईकाकडे जायची! 

    आमच्या मामीचे आणि आमच्या आईचे फारसे सख्य नव्हते त्यामुळे तिकडे जायचा प्रश्नच नव्हता.

    त्यावेळी सगळे सगेसोयरे साधारणपणे शेजारच्या गावात,शेजारच्या तालुक्यात किंवा फार फार तर पंधरा वीस मैलातच असायचे.अशा  गावाला जायचं तर तिकडे जाणारी एखादी बैलगाडी शोधायची, नाही तर आपली हक्काची पाय गाडी ठरलेली!त्या काळात गावात क्वचित  एखाद् दुसरी सायकल असेल फार तर…,

आमच्या गावावरून माझ्या मामाच गाव बारा तेरा मैलावर होते.

  दिवाळीनंतर  सात आठ दिवसांनी अचानक एखाद्या दिवशी आई फर्मान काढायची …

 "चल रे ,आपल्याला मावशीने बोलावलंय!" 

अशा संधीची मी तर वाटच बघत असायचो.एखादा ठेवणीतला धुवट सदरा चढवला अंगावर की झाला गडी तयार! 

  खळद हे तसे तर माझ्या मामाचे गाव,पण त्याच गावात माझी एक बहिणही राहायची, शिवाय आईची मोठी बहीण अर्थात माझी गया मावशीही राहात होती….

  मला माझ्या आईच्या या मोठ्या बहिणीकडे का कुणास ठाऊक;पण जायला खूप आवडायचं! 

   फार फार तर पाच फूट उंची आणि वयाच्या साठीतली ही मावशी थोडी बोबडी आणि मान हलवत बोलायची.त्यातच सासवड जेजुरी भागातल्या बोलीभाषेचा एक विशिष्ट लहजा तिच्या बोलण्यातला असायचा.

 तिचे ते मजेशीर बोलणे मला सतत ऐकावे वाटायचे!

    माझ्याशी बोलताना मावशी अगदी माझ्या वयात येऊन बोलायची,माझे लाड करायची,त्यामुळे असेल कदाचित;पण मला तिच्या घरी जायला आणि रहायालाही आवडायचं.

 मावशीच्या घरी त्याकाळी सर्वसामान्य लोकांच्या घरी असायची तशी गाडगी (मडकी) एकावर एक रचून केलेल्या उतरंडी असायच्या.

   सगळ्यात खाली मोठे मडके आणि मग त्याच्यावर त्याच्यापेक्षा लहान आकाराचे मडके अशी रचना करत चांगली आठ नऊ मडकी एकावर एक रचलेली असायची.घरातल्या एखाद्या भिंतीच्या आधाराने अशा पाच सहा उतरंडी ओळीने रचलेल्या असायच्या.त्या काळात सर्वसामान्य लोकांच्या घरात असली नसलेली सगळी दौलत अशा गाडग्यामडक्यात भरलेली असायची….

   तर, दिवाळी झाल्यावर आठवडाभर उलटला की मावशीचा तिच्या धाकट्या  बहिणीला, म्हणजे माझ्या आईला ' एकदा भेटून जा ' असा निरोप हस्ते परहस्ते यायचा...

 निरोप आला की आम्हा मायलेकांची अनवाणी पायाने मावशीकडे जत्रा निघायची...

  दोन तीन तास चालून आम्ही एकदाचे मावशीकडे पोहोचलो की आई मावशीला दरवाजातून हाक मारायची,मावशी धावतच ओट्यावर यायची.मला जवळ घेऊन मुके घेत सुटायची, हाताला पकडून घरात घेऊन जायची.

    तिथेच बाजूला शिंदेशाही पगडी घातलेले माझे काका गालातल्या गालात हसत आमचा तो स्वागत सोहळा बघत असायचे...

आमच्यासाठी काय करू नी काय नको असे तिला व्हायचे.तिच्या त्या प्रेमात मी अक्षरशः भिजून निघायचो!

   माझ्यासाठी चाललेली तीची ती लगबग बघून मला मी एखादा व्हीआयपी असल्याचा फील यायचा! 

    या स्वागत समारंभातून थोडी फुरसत झाली की मग तिचा मोर्चा तिच्या घरातल्या त्या उतरंडीकडे वळायचा.

   एका एका मडक्यात जपून राखून ठेवलेला एक एक पदार्थ बाहेर यायचा आणि माझ्या ताटात पडायचा.कापण्या, रवा आणि बुंदीचे लाडू,करंज्या तिने माझ्यासाठी खास राखून ठेवलेले पदार्थ ती मला आग्रहाने खायला लावायची!

    मी हळू हळू मोठा होत गेलो आणि आमची ही गयामावशी अजूनच थकत गेली.मी पुढच्या वर्गात गेलो आणि तिच्याकडे जाणे जवळपास थांबले.

  मधल्या काळात काकाही वारले होते. 

  असाच सातवी आठवीत असताना सुट्टीत मावशीकडे डोकावले.दिवाळीनंतर जवळ जवळ महिना होवून गेलेला होता...

मला बघून मावशीला खूप म्हणजे खूपच आनंद झाला होता....

मावशी आता खूपच थकली वाकली होती.तीची मान डूगुडूगू हलत होती...

मला बसवून ती तिच्या उतरंडीत मडक्यात  काहीतरी शोधत होती. 

तीन चार उतरंडी उचकल्यावर तिचे इवलेसे डोळे आनंदाने लुकलुकले....

 तिने एक बुंदीचा लाडू काढून माझ्यासमोर धरला..

"लेकरा तू मला भेटायला येशील वाटलेच होते,बघ तुझ्यासाठी एक लाडू राखून ठेवला होता बघ! चल खा बर आता..." 

तिच्या डोळ्यातून प्रेम पाझरत होते.

मी तो बुंदीचा लाडू हातात घेतला. 

त्याला खरं तर अर्ध्या भागात भुरा लागलेला होता; पण माझ्या प्रिय गयामावशीने माझ्यासाठी ठेवलेला तो मेवा मी डोळे झाकून खाऊन घेतला!

आज  खूप वर्षे मागे पडलीत.आज ना ती मावशी राहीली ना माझी आई! 

  रोजच्या शहरी धबडग्यात सगळ्या आठवणी पुसट होत हळू हळू  पुसत चालल्या आहेत;पण दिवाळी संपली की माझ्या या गयामावशीची आठवण येतेच आणि माझ्यासाठी तिने राखून ठेवलेल्या त्या लाडवांची चव अलगद जिभेवर येते!!!

     ...... ©प्रल्हाद दुधाळ. पुणे.

          ( 9423012020)