प्रिय सोना..
रिटायरमेंट नंतर चार पाच दिवस इकडे तिकडे आवरा आवरी करण्यात गेले माझे पेन्शन पेपर्स, बँकेचे इतर सर्व डॉक्युमेंट तू व्यवस्थित एक फाईल करून त्यात लावून ठेवलेस आपल्या घरात कोणताही महत्वाचा कागद आला, कोणतेही बिल भरले की ते व्यवस्थित त्या त्या फाईल ला लगेच गेले पाहिजे ही तुझी शिस्त होती आणि ती तुझी तू पाळत होतास पहिला आठवडाभर आपण भरपूरहॉटेलिंग केले बँकेत चक्कर मारून मिळालेल्या पैशाची व्यवस्थित योजना करून गुंतवणूक केली शेवटच्या आठवड्यात दिवाळी होती त्याची तयारी सुरू केली घरची साफसफाई सजावट वगैरे घरचे फर्निचर बदलून नवीन घेतले मला एक आराम खुर्ची घ्यायची होती तिची खरेदी झाली दिवाळीत मुलगा व त्याचे कुटुंब कोल्हापुरात येत असतआता बरोबर आपले लाडके छोटे पिल्लू पण यायचे होते मागील वर्षी पण ते आले होते पण तेव्हा रजा नसल्याने तिच्याशी मनसोक्त खेळता नव्हते आले आता यावर्षी निवांतपण होते फराळाचे काही पदार्थ करायचे होते काही आणायचे होते त्याची तयारी केली यावेळी दिवाळीत आठवडाभर येणार आहे त्यावेळी कुठेतरी फिरायला जाऊ असा सुनेचा msg होता खूपच आनंद झाला या सगळ्या गडबडीत अजून रिटायरमेंट ला मिळालेल्या भेटी उघडून बघायचे राहिलेच होते ते सगळे सामान तसेच बेडच्या खालच्या कप्प्यात ठेवून दिले होते बघू नंतर असे म्हणून पुढील तयारीला लागलो दिवाळी खुप छान पार पडली पोरीला नवा फ्रॉक, तिच्या आवडीची खेळणी घेतली आपल्याकडे कोणत्याच सणाला त्यांनी आपल्या दोघांसाठी कपडे घेणे वगैरे प्रथा त्यांनी कधीच ठेवली नव्हती आपण त्यांनाघेतलेले कपडे त्यांना पसंत येत नसत किंबहुना पसंतीचे घेतले तरीही त्यांच्याकडून ते वापरले जात नसत त्यामुळे सुनेला, मुलाला पैसे दिले दिवाळी झाल्यावर चार दिवस कुणकेश्वर मालवण ट्रिप केली तुला खूप दगदग झाली होती त्यात ते ट्रिप चे ड्रायव्हिंग तुझ्याकडे असल्याने आता घरी गेलो की विश्रांती घेऊ असे तुझे बेत चालले होते पण घडणार वेगळेच होते कारण ट्रिप मधून आल्यावर त्यांनी मला सांगितले की आता तू रिटायर्ड आहेस तेव्हा मुलीला सांभाळायला दोघेही तिकडेच चला मुलीला सांभाळायला मेड आहेत पण त्यांनी सुटी घेतली तर आमच्या कामाची पंचाईत होते तुम्ही आल्यावर जरा घरात आणि त्यांच्यावर पण लक्ष राहील अचानक हा प्रस्ताव समोर आला, जास्त विचार करायला वेळच नव्हता पोरीसोबत राहायला मिळेल म्हणून आनंद पण होता लगेच उद्या निघायला लागणार होते भरभर सामानाची आवराआवर सुरू झाली सध्या दोन तीन आठवडे तरी राहायचे होतेच पुढे अधूनमधून कोल्हापूरला काही कामासाठी ये जा करावी लागणार होती आवश्यक ते सामान गोळा करून तू पॅकिंग केलेस आणि आपल्या गाडीतून आपण चौघे आणि पिल्लू निघालो सुद्धा आता पुणे मुक्काम सुरू झाला पिल्लू सोबत दिवस मस्त सुरू झाले फ्लॅट मोठा होता आपल्याला स्वतंत्र खोली होती बाथरूम टॉयलेट आतच होते आपल्या सामाना साठी एक कपाट रिकामे करून दिले होते तिला बघायला दिवसाला दोन मेड होत्या पण ती अजिबात मला सोडत नव्हती सतत मला चिकटून रात्री झोपायला पण तिकडे जायला तयार नसे तिच्या आईच्या ड्युटी च्या वेळा जास्त होत्या दिवसाचे बारा तास ती फुल बिझी असे तिचा बाबा घरीच कामात असे अधून मधून तो खोली बाहेर आला की पिल्लू थोडा वेळ त्याला चिकटत असे बाकी आपला रोजचा दिनक्रम तिथे सुरू झाला नेहेमीप्रमाणे सकाळी चहा घेऊन फिरायला जाणे आल्यावर पिल्लू उठलेले असे त्याला घेऊन खाली जायचे कोपऱ्यावर कुत्री असत ती दाखवायची कधी त्यांना खायला घालायचे वर येईपर्यंत तिची पहिली मेड आलेली असे याच वेळात स्वयंपाकी बाईचा स्वयंपाक सुनेचा डबा हे सर्व चालत असे पिल्लूच दूध पिऊन झालं की मेड थोड्या वेळाने तिला अंघोळ घालत असे तोपर्यंत आपण अंघोळ करून आपला नाश्ता चालू असे आपल्याबरोबर तीही फळे ,पोहे वगैरे खात असे नंतर मस्त तिच्याशी बॅट बॉल, इतर खेळ खेळायचे गप्पा मारायच्या दुपारी तीच जेवण आपल्यासोबत असे जेवण झाले की तिला झोपवून तिची मेड जायची तिची झोप झाली की परत खेळणे ती फार खेळकर हसरी होती आपला मुलगाही लहानपणी तसाच होता संध्याकाळी परत तिची मेड आली की आपण दोघे, तिची मेड तिला बाबागाडीतून जवळच्या बागेत नेत असू तिथे मनसोक्त खेळली की घरी येऊन तिला भात ,पोळी भरवत असू ती तिच्या आईची वाट पहात असे कधी कधी कंटाळून आपल्या सोबत झोपत असे तिची आई आली की तिला आत घेऊन जात असे रविवारी बाजार करायला आपण तिला सोबत नेत असू तिला भाजी खरेदी खुप आवडायची आपण महिन्यातून चार पाच दिवस कोल्हापूरला जाऊन आपली काही कामे करत असू तुझे काही पेशंट तुझी वाट पहात असत त्यांना भेटून परत पुण्यात जात असू पोरगी कायम मला चिकटून असे सगळी तिला आजीचा चिकट गुंडा म्हणत मी जरा देखील दृष्टीआड झालेले तिला चालत नसे तू म्हणायचा तुझे आणि तिचे डिव्हाईन रिलेशन आहे.❤️.तिच्या सहवासात स्वर्ग सुख मिळत होतं ती खूप “गप्पिष्ट” होती गोष्टी ऐकायला तिला भयंकर आवडायचे किती गोष्टी आपण दोघांनी सांगितल्या तरी तिचे समाधान नसे सारख्या नव्या नव्या गोष्टी तिला हव्या असायच्या..मग तिच्यासाठी आपण नवीन गोष्टी वाचून ठेवत असू काही दिवसांनी ती दुपारी थोडा वेळ पाळणाघरात जायला लागली तिथेच ती जेवून येत असे तिचा बाबा तिला सोडत असे आपण आणायला जात असू तिकडे जरी तिचे खाणे झाले असले तरी आल्यावर परत ती आपल्या सोबत जेवत असे दही भात भरवलेला तिला खूप आवडे मधल्या काळात आपण एक मस्त यूरोप टूर करून आलो अशी टूर करावी असे आपण कोणतेच स्वप्न पाहिले नव्हते पण अचानक समोर संधी आली त्या टूर ची तयारी बरेच दिवस चालू होती तू हौसेन मला ऍमेझॉन वरून वेस्टर्न कपडे मागवले होतेस एकूण बारा दिवस टूर होती काही शर्ट पॅन्ट तू आपल्या दोघांसाठी मॅचिंग मागवल्या होत्या आपण टूर भरपूर एन्जॉय केली आपल्याला अगदी मस्त ग्रुप भेटला होता भरपूर नाच गाणी.. जाईल तिथे धमाल केली DDLJ सिनेमात दाखवले ते सारे युरोप आपण आपल्या नजरेने पाहिले आपल्या ग्रुप मधले लोक रोज आपले कपडे बघून आपल्या रसिकपणाची चर्चा करीत असत एक प्रवासाचा अविस्मरणीय टप्पा पार पडला होता भरपूर फोटो व्हिडिओ केले परत आलो तेव्हा आपली नात आपल्या वाटेकडे डोळे लाऊन बसली होती तिचे आपले वेगळे नाते तयार झाले होते “अरे आबा” अशी ती तुला हाक मारायची तिचा स्वभाव “चिकित्सक” होता आजुबाजुला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत तिला प्रश्न पडत सांगत तू तिला ते सर्व सोप्या पद्धतीने गंमत जंमत करीत सांगत होतास आपण पुण्यात असताना आपल्या कोल्हापूरच्या घरात चोरी झाली आपल्याकडे झाडांना पाणी घालायला येणाऱ्या मुलीने आपल्याला फोन करून सांगितले आपण ताबडतोब निघालो त्या दिवशी शनिवार होता आपली सून घरात होती कोल्हापूरला ताबडतोब जाऊन बघितले पोलिस चौकशीला आले होते माझे एक मंगळसूत्रघरातले पैसे, तुझे नुकतेच घेतलेले नवे कपडे , गॅस शेगडी, टीव्ही अशा वस्तू चोरीला गेल्या होत्या चटकन तक्रार नोंदवून परत आलो तेव्हा नेमकी नातीला सांभाळणारी मेड रजेवर होती त्यामुळे लगेच परत यावे लागले आश्चर्य म्हणजे आपल्या घरी कोणीच त्या चोरीची फारशी चौकशी केली नाही जास्त काही इंटरेस्ट पण दाखवला नाही मात्र काही दिवसांनी आपल्याकडे चोरी केलेले चोर पकडले गेले पैसे, तुझे कपडे, गॅस शेगडी वगैरे मिळाले नाही पण माझे मंगळसूत्र त्यांनी घेऊन वितळले होते त्याऐवजी नवीन मंगळसूत्र करून मिळाले जे पूर्वीपेक्षा थोडे जास्तच होते.असाच अनुभव पूर्वी आपल्या गाडीबाबत सुद्धा आला होता तेव्हा सुद्धा पैसे जास्त मिळाले होते जे होते ते बऱ्यासाठी होते…हे तुझे नेहेमीचे वाक्य नेहेमीच प्रत्ययाला येत होते