Mantrochchaar ka karava books and stories free download online pdf in Marathi

मंत्रोच्चार का करावा

मंत्रोच्चार का करावा?

तुम्ही आस्तिक असाल किंवा नास्तिक! तुम्ही रोज नकळत मंत्रोच्चार करत असताच. मंत्र वेगवेगळे असू शकतात पण त्याचा आयुष्यावरचा प्रभाव मात्र सकारात्मक असतो हे अगदी नक्की.. कधी कधी मंत्रोच्चार हा बऱ्याच जणांचा सवयीचा भाग असतो. कधी कधी काही विशिष्ट वेळी मंत्रोच्चाराला प्राधान्य दिल जात. परीक्षेचा निकाल असेल, मनात कोणत्यातरी गोष्टीबद्दल धाकधूक असेल,किंवा अशांत असलेल मन शांत करायचं असेल तर आपोआप मंत्रोच्चार केला जातो! आणि त्याचा सकारात्मक परिणाम सुद्धा आयुष्यावर झालेला दिसून येतो. आपण जे मंत्र म्हणतो त्याचा सरळ प्रभाव आपल्यावर झालेला दिसून येतो. पण त्या मंत्रांचा आपल्या आयुष्यावर काय आणि कसा परिणाम होतो हे माहिती आहे? बरेच वेळा कोणीतरी सांगताय म्हणून आपण मंत्र म्हणतो. किंवा वर्षानुवर्ष चालत आलंय म्हणून मंत्र म्हणले जातात. मंत्र नुसते म्हणाले जातात पण मंत्रांमुळे काय फायदा होतो हे आपल्याला कदाचित महिती नसेल..हे माहिती करून घेण्यासाठी त्यामागच शास्त्र समजून घेण अत्यंत गरजेच आहे. जेव्हा कोणती गोष्ट मनापासून करतो तेव्हा त्याचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात वाढलेला दिसून येतो. मंत्रोच्चार केल्यामुळे आयुष्यावर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. काही मंत्रोच्चार खूप प्राचीन काळापासून चालत आले आहेत. त्याच महत्व सुद्धा खूप आहे. मंत्रोच्चार केल्यामुळे फक्त मनावरच नाही तर पूर्ण शरीरावर सुद्धा चांगला परिणाम झालेला दिसून येतो. मन प्रसन्ना राहण्यास मदत होते आणि आयुष्यातले ताण आपोआप कमी होण्यास देखील मदत होते. मंत्रोच्चार केल्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. मंत्रोच्चार हे आत्म्यासाठीच औषधच आहे.

*मंत्रांचा अर्थ-

मंत्र म्हणजे काय असा प्रश्न पडण साहजिक आहे. मंत्राची फोड केली कि त्यात २ भाग झालेले दिसतात. पहिला भाग म्हणजे, "मन" आणि दुसरा भाग म्हणजे "त्र"... त्यात 'त्र' म्हणजे साधन! ह्याचा अर्थ, मंत्र म्हणजेच 'मनाच साधन'.. मंत्रांमध्ये असलेले प्रभावी शब्द, आवाज किंवा व्हायब्रेशन हे ध्यानाच्या वेळी वापरले जातात. आणि त्याचा चांगला परिणाम प्रत्येकाच्याच आयुष्यावर झालेला दिसून येईल.

* मंत्रोच्चार करण्याचे उपयोग-

मंत्रोच्चार केल्यानी खूप फायदा झालेला दिसून येतो. मंत्रोच्चार म्हणजे एक मंत्र सतत बऱ्याच वेळा उच्चारणे. मन्र सतत उच्चारल्याने त्याचा प्रभाव मनावर खोल रुजण्यास मदत होते. आणि मंत्रांचा सकारात्मक प्रभाव शरीरावर आणि मनावर झालेला दिसून येतो. मंत्रोच्चाराचे फायदे-

१. मंत्रोच्चारामुळे मन एका गोष्टीकडे लक्ष दिल जात आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.

२. वारंवार मंत्रांच उच्चारण केल्यामुळे तुमच्या मध्ये आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये सुद्धा सकारात्मकता येते.

३. मंत्रोच्चार केल्यामुळे मनातले गोंधळ दूर होण्यास मदत होते आणि मन शांत बनते.

४. मंत्रोच्चार करण्याचा अजून एक महत्वाचा उपयोग म्हणजे जागृतता येण्यास मदत होते.

५. मनातले नकारात्मक विचार, भीती किंवा कोणत्यातरी गोष्टीची काळजी मंत्रोच्चार केल्यामुळे कमी होण्यास मदत होते आणि मन शांत बनते. मन शांत झाले कि आपोआपच कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

६. मंत्रोच्चार केल्यामुळे विचार क्लिअर होतात. मनातले गोंधळ कमी होतात. आणि माह्त्वाच म्हणजे, मंत्रोच्चार केल्यामुळे तुम्ही वर्तमान क्षणात राहू शकता.

७. मंत्रोच्चारामुळे मन प्रसन्न राहण्यास मदत होते.

८. भांडण, कलह ह्यापासून दूर राहण्यासाठी मंत्रोच्चाराचा उपयोग केला जातो.

९. अस्वस्थ मन शांत करण्यासाठी मंत्रोच्चार अत्यंत प्रभावी असतात. म्हणजेच भरकटलेल मन ताळ्यावर येण्यास मदत होते.

* आपण जे मंत्र म्हणतो ते मंत्र म्हणतांना प्रत्येक शब्दाचा उच्चार योग्य होतो आहे न त्याकडे लक्ष देण गरजेच असत. मगच त्या मंत्रोच्चाराचे चांगले परिणाम तुम्ही अनुभवू शकता. वेगवेगळे परिणाम मिळण्यासाठी पुराणात वेगवेगळे मंत्र सांगितले गेले आहेत. योग्य मंत्राच्या उच्चारणाने त्याचा फायदा तुमच्या आयुष्यावर झालेला तुम्हाला दिसून येऊ शकतो. आणि तुम्ही तुमच आयुष्य बदलवून टाकू शकता. आयुष्यातली सगळी नकारात्मकता जाऊन आयुष्य सकारात्मक बनण्यास मदत होते. आणि सकारात्मकता आली कि आयुष्य आनंदानी भरून जात.

* काही मंत्र ज्यांच्या उच्चारणाने तुमच्या आयुष्यात बदल झालेला तुम्ही पाहू शकाल-

१. ओम-

* ओम मंत्राचा अर्थ- सृष्टीच्या निर्माणाच्या वेळी ओम ध्वनी गुंजली आणि त्यानंतर पूर्ण ब्रम्हंडा मध्ये ओम ह्या ध्वनीच गुंजन पसरलं. ओम हा शब्द अ, ऊ, म आणि चंद्रांच्या मिलापानी तयार झालेला शब्द आहे. ओम हा मंत्र जन्म,मृत्यू आणि पुनर्जन्म याचं प्रतिनिधित्व करतो. ओम हा अनादी काळापासून चालत आलेला साऊंड आहे.

* आधुनिकतेशी जुळवून घेण्याची प्रक्रिया आणि त्याचे परिणाम-

ओम च उच्चारण केल्यामुळे तुम्ही विश्वाशी एकरूप होण्यास मदत होते. योग किंवा ध्यानाच्या सुरवातीला आणि शेवटी ओम चा जप केला जातो. ओम चा जप वेगवेगळ्या पद्धतीनी केला जाऊ शकतो. प्रत्येक पद्धतीचे वेगवेगळे उपयोग आहेत. दीर्घ ओम किंवा एकदम कमी वेळेचा ओम चा जप केला जाऊ शकतो. त्याचबरोबर, एकदम खालच्या स्वरात किंवा एकदम वरच्या पट्टीत सुद्धा ओम म्हणला जाऊ शकतो. ओमकाराचा उपयोग गायक लोकांना सुद्धा होतो.

* ओम मंत्रोच्चाराचे फायदे-

१. ओम चा जप केल्यानी ताण कमी होण्यास मदत होते.

२. एकाग्रता वाढवण्यासाठी ओम मंत्राचा जप उपयुक्त आहे.

३. ओम च्या व्हायब्रेशन्स मुळे रक्तपुरवठा सुधारण्यास मदत होते.

४. शरीरातले टॉक्झिन ओम च्या मंत्रोच्चारामुळे बाहेर टाकण्यास मदत होते.

५. सकाळी उठल्यावर ओम चा जप केल्यानी तुम्हाला फ्रेश वाटण्यास मदत होते आणि त्याचबरोबर तुमचा ताण कमी होण्यास मदत होते.

६. ध्यान आणि ओम उच्चारण रात्री झोपण्यापूर्वी केल तर शांत झोप लागण्यास मदत होते.

७. ओम म्हणाल्यामुळे आवाज सुधारण्यास मदत होते.

२. गायत्री मंत्र-

* गायत्री मंत्र- ॐ भू: भुवः स्वः । तत्स॑वि॒तुर्वरेण्यं॒भर्गो॑ । दे॒वस्य॑ धीमहि । धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त् ॥

* गायत्री मंत्राचा अर्थ- विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरुप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो. तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. आमची सत्कर्म -सद्विचार-सदाचार-सद्माषण सद्वर्तनाकडे प्रवृत्त होवोत.

* आधुनिकतेशी जुळवून घेण्याची प्रक्रिया आणि त्याचे परिणाम-

गायत्री मंत्र मध्ये २४ अक्षरे आहेत. ह्या २४ अक्षरांचा मानसिक आणि शारीरिक परिणाम दिसून येतो. गायत्री मंत्राच उच्चारण केल्यामुळे शरीरावर आणि मनावर खूप चांगला परिणाम झाल्याच दिसून येत. गायत्री मंत्र हा खूप प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा जप १०८ वेळा केल्यानी त्याचा जास्ती परिणाम झाल्याच दिसून येईल. पण वेळ मिळाला कि ३, ९, १८ वेळा ह्या मंत्राचा जप करू शकता. गायत्री मंत्रामुळे अडथळे दूर होण्यास मदत होते.

* गायत्री मंत्रोच्चाराचे फायदे-

१. गायत्री मंत्राचा जप मन शांत करण्यास मदत करतो.

२. गायत्री मंत्रामुळे डोक्यात व्हायब्रेशन जाणवतात आणि आणि त्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

३. गायत्री मंत्र म्हणतांना खोल आणि संयमित श्वासाची गरज लागते. त्यामुळे श्वासोश्वास सुधारण्यास मदत होते.

४. गायत्री मंत्र म्हणाल्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

५. मेंदूतल्या मज्जा तंतूंच काम गायत्री मंत्र म्हणल्यामुळे सुधारण्यास मदत होते.

६. गायत्री मंत्र म्हणाल्यामुळे मन खंबीर बनण्यास मदत होते आणि त्याचबरोबर नैराश्याला स्वतापासून दूर ठेऊ शकता.

७. गायत्री मंत्र म्हणल्यावर रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते आणि स्कीन ग्लो होण्यास देखील मदत होते.

८. नियमित गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.

३. ओम नमः शिवाय-

* ओम नमः शिवाय चा अर्थ- हा मंत्र शिवाचा आहे. शिव भक्तांचा हा आवडता मंत्र आहे. ह्याचा अर्थ शिवाला नमस्कार. शिव कल्याणकारी मानले जातात पण जर शिवाची वक्र नजर पडली तर प्रलय सुद्धा येऊ शकते अस सांगितलं गेल आहे. सृष्टी च्या उत्पत्ती, स्थिती आणि संहारचे अधिपती शिव आहे. ओम नमः शिवाय हा महामंत्र आहे ज्यांनी सगळ्या इच्छा पूर्ण होतात. हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे. ह्या मंत्राच उच्चारण सकाळी उठल्यावर अंघोळ झाल्यावर १०८ वेळा केल्यानी फायदा मिळतो.

* आधुनिकतेशी जुळवून घेण्याची प्रक्रिया आणि त्याचे परिणाम-

१. ओम नमः शिवाय हा मंत्र उच्चारल्यामुळे स्वतः मधली नकारात्मकता आणि आजूबाजूला असलेली नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर सकारात्मकता येण्यास मदत होते. आणि आयुष्य साकारात्माक्तेनी जगण्याची गरज हल्ली खूप वाढली आहे.

२. ओम नमः शिवाय ह्या मंत्रामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

३. तुमच मन अशांत झाल असेल तर ओम नमः शिवाय ह्या मंत्रामुळे मन शांत होऊन स्थिरता मिळते.

४. ओम नमः शिवाय ह्या मंत्रोच्चारामुळे इंद्रियाचं काम व्यवस्थित होण्यास मदत तर होतेच पण त्याचबरोबर मन सुद्धा नीट राहत. मनातले नको ते विचार बाहेर पडण्यास मदत होते.

५. ओम नमः शिवाय हा मंत्र ताण घालवण्यासाठी अत्यंत महत्वाचा मंत्र आहे. ह्या मंत्र्याच्या उच्चारणाने आत्मा, मन आणि शरीर रिलॅक्स होण्यास फायदा होतो.

४. गणेश मंत्र-

* गणेश मंत्र- ओम गम गणपतये नमः

* गणेश मंत्र अर्थ- सगळ्या अडथळ्यांच निवारण करणाऱ्या गणपती च मी पूजन करतो. हा गणपतीचा मंत्र आहे. तो रूट चक्र अर्थात मूलाधार चक्राचा मंत्र आहे. आयुष्यात सारखे अडथळे येत असतील, मनात गोंधळ असतील तर ह्या मंत्राचा खूप उपयोग होतो. काही दिवस हा मंत्र म्हणाल्यामुळे डोक्यातले आणि मनातले गोंधळ कमी झाल्याच दिसून येत. बऱ्याच लोकांच गणपती हे आराध्य दैवत असत. कोणताही नवीन काम करण्या आधी ह्या मंत्राचा जप केल्यानी चांगले रिझल्ट्स मिळण्यास फायदा होतो.

* आधुनिकतेशी जुळवून घेण्याची प्रक्रिया आणि त्याचे परिणाम-

१. गणेश मंत्र नियमित म्हणल्यामुळे शिस्त लागण्यास मदत होते.

२. गणेश मंत्राच्या उच्चारणाने मन स्थिर होऊन वागण्यात समतोल राखला जातो.

३. गणेश मंत्रामुळे शांतता आणि आनंद मिळून आयुष्यात सकारात्मकता येते.

४. ह्या मंत्रामुळे एकाग्रता वाढते आणि काम व्यवस्थित होण्यास मदत होते.

५. गणेश मंत्रामुळे आयुष्यातले अडथळे दूर होण्यास मदत होते.

६. गणेश मंत्राच्या उच्चारणाने नकारात्मकता कमी होण्यास मदत होते.

५. शांती मंत्र-

* शांती मंत्र- ॐ सह नाववतु ।
सह नौ भुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै ।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

* शांती मंत्र अर्थ- हा शांती मंत्र सगळ्यांनाच माहित असलेला मंत्र आहे. ह्या मंत्राचा अर्थ आहे, 'हे परमात्मा, आम्हा दोघांची म्हणजेच गुरु शिष्यांची साथ रक्षा करा. आमच्या दोघांच पालन पोषण करा. आम्ही दोघ एकत्र शक्ती प्राप्त करू, आम्हाला प्राप्त झालेली विद्या तेजप्रद हो आणि आम्ही दोघ परस्परांचा द्वेष न करो. आमच्या दोघांमध्ये फक्त स्नेह असो.' म्हणायला आणि लक्षात ठेवायला एकदम सोप्पा असलेला हा मंत्र उपयुक्त आहे. ह्यात ३ वेळा शांती म्हणाल जात. त्यात पहिल्या वेळी जेव्हा शांती म्हणता तेव्हा तुम्ही शारीरिक वेदनेपासून मुक्त होता. आजारपण इत्यादी बद्दलचे नकारात्मक विचार बाजूला टाकले जातात. जेव्हा तुम्ही दुसऱ्या वेळा शांती म्हणता त्यावेळी आध्यात्मिक ओझी कमी होतात. त्याचबरोबर नकारात्मक भावना म्हणजे, राग,द्वेष, मत्सर, ताण, चिंता ह्या नकारात्मक भावना कमी होतात. आणि जेव्हा तुम्ही शेवटचे शांती म्हणता तेव्हा तुम्ही नैसर्गिक आपटी, अपघातांपासून लांब राहता. म्हणजेच, तुम्ही पहिल्यांदा शांती म्हणता तेव्हा तुमच मन शुद्ध होता. दुसऱ्या शांतीच्या वेळी मन आणि आत्मा शुद्ध होतो आणि तुमची आध्यात्मिक प्रगती होते. आणि शेवटी म्हणालेल शांती तुम्हाला कोणत्याही आपत्तीपासून वाचवतो. अश्या प्रकारे प्रत्येक शांती च्या वेळी तुम्ही ध्यान केल तर त्याचा उपयोग होतो. हा मंत्र रोज म्ह्नाल्यानी फायदा झाल्याच दिसून येत.

* आधुनिकतेशी जुळवून घेण्याची प्रक्रिया आणि त्याचे परिणाम-

१. शांती मंत्र मुळे मन शांत होण्यास मदत होते. त्याचबरोबर आजूबाजला असलेली नकारात्मकता कमी होण्यास मदत होते.

२. ह्या मंत्रामुळे मनावर सय्यम राहतो.

३. ह्या मंत्राच्या उच्चारणाने शरीर सुद्धा शांत होण्यास मदत होते.

४. ह्या मंत्रातल्या प्रत्येक शांतीवर ध्यान केल्यानी बरेच फायदे मिळण्यास मदत होते.

हे काही मंत्र जे आपण नेहमीच म्हणतो.. याचबरोबर यासारखे अनेक मंत्र आहेत जे तुम्ही म्हणत असाल. आपल्याला योग्य वाटतो असा मंत्र निवडून म्हणल्यामुळे तुमच आयुष्य नक्की बदलून जाईल. तस पाहायला गेल तर कोणताही मंत्र म्हणाला तरी मन शांत व्हायला मदत होतेच. मंत्रोच्चारामुळे मनातले विचार कमी होतात आणि शांत वाटत. मंत्रोच्चार केल्यामुळे शांती मिळण्यास मदत होते.. त्याच बरोबर आयुष्यातली नकारात्मकता कमी होण्यास देखील मदत होते आणि कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहायची सवय सुद्धा लागेल. पुराणात दिलेले मंत्र अत्यंत प्रभावी असतात. आपण बऱ्याच वेळा म्हणायचं म्हणून मंत्र म्हणतो पण त्यावेळी ह्या मंत्रांचा हवा तो फायदा झालेला दिसून येत नाही. म्हणून आपण मंत्र म्हणतो तो योग्य पद्धतीनी म्हणन गरजेच असत. उच्चार स्पष्ट असण गरजेच असत. अस केल्यानी त्या आवाजातून ज्या लहरी निर्माण होतात त्याचा सकारात्मक परिणाम आपल्यावर झालेला दिसून येतो. मंदिराताल वातावरण जस शांत असत तस तुम्ही तुमच्या घरी सुद्धा बनवू शकता. एकत्रितपणे जर मंत्रोच्चार केला तर त्याचा अधिक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडलेला दिसून येईल. त्यामुळे दररोज जर संध्याकाळी एकत्रित पणे काही मंत्र म्हणले तर घरातलं वातावरण आणि तुमचा मूड सुद्धा चांगला राहण्यात मदत होईल. एकूणच काय, पुराणातले मंत्र आजच्या आधुनिक जगात बदल घडवायला सक्षम आहेत. मग तुम्ही सुद्धा याचा फायदा नक्की घ्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

अनुजा कुलकर्णी.

Email id- anuakulk@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED