अकल्पित - 2 Dr Naeem Shaikh द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अकल्पित - 2

मला स्वतःबद्दल करीश्माकडून बरंच काही कळालं. मी २६ वर्षीय तरूण, त्याच शहरात माझं भाड्याने घेतलेलं एक घर आणि स्वतःचं फोटोस्टुडीयो होतं. गेल्याच महिन्यात सर्व संमतीने आमच्या लग्नाची तारीख काढली. मी अनाथ असल्याने माझ्या बाजूने फक्त माझे मित्र होते. मला भूतकाळातल्या गोष्टी आठवत नव्हत्या. पण करीश्मा सोबत असल्यामुळे सुरुवातीला मला याचा त्रास झाला नाही.

ज्या दिवशी मला डिस्चार्ज दिलं, त्या दिवशी जाण्याआधी मला आणि करीश्माला डॉक्टरांनी त्याच्या केबीनमध्ये बोलावुन घेतले.

“अपघातात यांच्या डोक्याला मार लागला आहे. आम्ही यांचा सि.टी. स्कॅन केला. जखम बाहेरून नाही, पण आतून जास्त आहे. त्या अपघातात मेंदूच्या काही भागाला इजा झाली आहे आणि त्यामुळे यांची पुर्णतः मेमरी गेली आहे. याचा अर्थ असा की यांना आता भूतकाळातल्या गोष्टी आठवणार नाहीत...”

डॉक्टराला मध्येच थांबवत करीश्माने त्यांना विचारले.

“हे तर तुम्ही आम्हाला पाच दिवसांपुर्वीसुध्दा सांगितलं होतं.”

“बरोबर आहे तुमचं... पण काल आम्ही दिल्लीच्या प्रसिध्द दोन न्युरोलॉजीस्ट डॉक्टरांना यांच्या केसच्या संबंधीत रिपोर्ट्स दाखवले. त्यांच म्हणनं आहे की यांना यांचा भूतकाळ कधीच आठवणार नाही आणि आठवलं तरी दोन तिन आठवणी. यापेक्षा जास्त नाही.”

डॉक्टर चेहेरा पाडून बोलत होते.

“म्हणजे याला कधीच काहीच आठवणार नाही का¿”

करीश्माने काळजीने विचारले.

“आता मी तुम्हाला तेच तर सांगितलं. काही प्रसंग कदाचित आठवतीलसुध्दा... पण त्याची शक्यता १ टक्के, एवढीच आहे.”

“याच्यावर काही उपाय¿”

“तसे हे आता नॉर्मल आहेत. फक्त त्यांना भूतकाळात काय झालं होतं ते त्यांना आठवणार नाही. पण यांना तुम्ही भूतकाळातल्या गोष्टी सांगून ही कमी सुध्दा दूर करु शकता....”

“पण मला भूतकाळ आठवणाप नाही.”

माझ्या तोंडून नकळत ते वाक्य बाहेर पडलं.

“असं निराश होऊ नका. मान्य आहे की भूतकाळातल्या आठवणींच मणुष्याच्या जिवनात खुप महत्त्वाचं स्थान असतं. पण गेलेला काळापेक्षा तुमचं जिवन जास्त महत्त्वाचं आहे. या अपघातात तुमचा जिव गेला असता तर... आठवणी गेल्या, पण जिव वाचलाना. असं सकारात्मक दृष्टीने आयुष्याकडं पाहायचं.”

करीश्माने आणि मी एकमेकांकडं पाहिलं. आम्हाला तेच करावं लागणार होतं जे डॉक्टर सांगत होते. आमच्या समोर दुसरा पर्यायसुध्दा नव्हता. डॉक्टर पुढं बोलू लागले.

“आता तुम्ही घरी जाऊ शकता. चेकअपसाठी महिन्यानंतर परत या.”

एवढं बोलून डॉक्टरांनी डोकं हलवत जाण्याची परवाणगी दिली.

*****

हॉस्पीटलमधून मला माझ्या घरी घेऊन न जाता. करीश्मा तिच्या घरी घेऊन गेली. ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत राहत होती. त्या दिवसासाठी मी तिच्याच घरी राहणार होतो.

त्या दिवशी मी बेडवर बसून माझे जुने फोटो पाहत होतो. माझ्या सोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या मानसांची नावं करीश्मा मला सांगत होती. फोटोचा ऍल्बम तिच्या हातात होता आणि ती मला एक - एक करुन फोटो दाखवत होती. फोटो पाहाण्यात आम्ही मग्न झालो असताना दाराची बेल वाजली. तिने फोटोचा एल्बम माझ्या हातात देऊन दार उघडले. दारात पोलीस कॉन्स्टेबल होते. हे तेच दोन पोलीस कॉन्स्टेबल होते, जे हॉस्पीटलमध्ये आले होते.

“आदित्य देसाई हेच का¿”

त्यातल्या एकाने दारातून माझ्याकडे बोट दाखवलं करीश्माला विचारले.

“यांना ओळखपत्र दाखवलं होतं ना¿ आता अजून काय पाहिजे यांना¿”

मी जागीच बसुन बोलत होतो. मला थांबवत करीश्माने कॉन्स्टेबलला विचारले.

“हाच आदित्य देसाई आहे. पण झालं काय¿”

“तुम्हाला आमच्या सोबत पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल.”

“पण कशासाठी¿”

“ते आमचे साहेब तुम्हाला सवीस्तर सांगतील. आधी तुम्हाला तिथं जावं लागेल. आम्ही तुम्हाला घ्यायला आलोय.”

पोलीसांकडून दोन मिनीटाची सवलत मागुन करीश्मा माझ्या जवळ आली आणि म्हणाली.

“आपल्याला जावं लागेल.”

मी काही न बोलता, काही न विचारता त्यांच्यासोबत जाण्यास तैयार झालो.

*****

दोन तासात आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो.

दोन्ही कॉन्स्टेबल आमच्या मागे उभे होते. मी आणि करीश्मा इन्स्पेक्टरांच्या समोरच्या खुडचीवर बसलो होतो.

“तर तुम्ही आदित्य देसाई आणि तुम्ही करीश्मा यांच्या होणाऱ्या मिसेस् ¿”

इन्स्पेक्टरांनी आम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारला. कदाचित त्यांना त्यांच्या कॉन्स्टेबलांवर विश्वास नसावा. त्यांच्या प्रश्नावर आम्ही फक्त होकारार्थी मान डोलवली. इन्स्पेक्टरने त्यांच्या टेबलावरचे एक कागद आमच्या समोर सरकवून विचारले.

“यावरचं अक्षर तुमचं आहे का¿”

इन्स्पेक्टर माझ्याकडे पाहून विचारत होता. पोलीसांना झालंय तरी काय¿ असा प्रश्न मी स्वतःला विचारला. ज्या मानसाला स्वतःच नाव आठवत नाहीये, त्या मानसाला त्याचं अक्षर कसं होतं हे कसं आठवणार.

“माहित नाही हे अक्षर माझंच आहे की नाही... मेमरी लॉस्...”

त्यांनी ते पत्र करीश्माच्या समोर धरला आणि विचारले.

“तुम्ही ओळखू शकता का¿... तुमच्यावरही जबरदस्ती नाही. तुम्हालासुध्दा आठवत नसेल तर आम्ही हस्ताक्षर तज्ञाकडून माहिती करुन घेऊ.”

“त्याची काहीच गरज नाहीये. हे अक्षर आदित्यचंच आहे.”

इन्स्पेक्टरने पत्र स्वतःजवळ घेतलं आणि वाचू लागले.

“या पत्रावर पाठवणाऱ्याच्या नावाच्या जागी आदित्यचं नाव आणि पाठवणाऱ्याच्या पत्त्याच्या जागेवर आदित्यच्या घरचा पत्ता आहे. आदित्येने पोलीसांना २१ नोव्हेंबरच्या दिवशी हे पत्र लिहिले होते. यात लिहिलंय – ‘मी आदित्य.... मी खुन होताना पाहिले आहे. मी खुन करणाऱ्याला आणि ज्याचा खुन झाला दोघांना ओळखतो. ज्याचा खुन झाला ती माझीच मैत्रिण होती. पुर्ण माहिती मी पत्रात लिहू शकत नाही आणि ही माहिती देण्या करता पोलीस स्टेशनमध्येसुध्दा येऊ शकत नाही. मी फक्त तुम्हाला माहिती मिळावी यासाठी हे पत्र लिहिले आहे. या पत्रासोबत मी....’ ”

पत्र वाचन तिथेच थांबवत इन्स्पेक्टरने पत्र टेबलावर ठेवले आणि पुन्हा माझ्याकडे पाहून त्यांनी विचारले.

“तर याबद्दल तुम्हाला काही आठवतंय का¿”

“तुम्हाला आम्ही किती वेळा सांगायचं की आदित्यची मेमरी अपघातात नष्ट झाली आहे. त्याला स्वतःचं नाव आठवत नव्हतं, मग त्याला या सगळ्या गोष्टी कशा आठवतील¿”

या वेळी माझ्या ऐवजी करीश्मा त्यांच्यावर चिढली.

“मला असं म्हणायचं होतं की या संदर्भात तुम्हाला काही आठवतंय का¿”

इन्स्पेक्टरने त्याचे शब्द बदलत स्वतःला सुरक्षीत केले.

“या पत्रा संदर्भात तर काहीच आठवत नाही. पण काहीसं आठवतंय... पण माहित नाही, ते माझे स्वप्न होते की माझ्या भूतकाळात घडालेली घटना.”

“तुम्हाला जे काही आठवत असेल ते तुम्ही आम्हाला सांगा.”

“मी हॉस्पीटलमध्ये डोळे उघडण्याआधी काहीतरी पाहिल्यासारखी अस्पष्ट अशी घटणा असावी. मी सुरुवातीला एका मुलीला रडताना पाहतो. नंतर एका मानसाला पाहतो जो होडीवर उभा आहे. नदीच्या काठावरून फ्लॅश लाईट त्याच्या दिशेने येताना त्याला दिसतं. जणू कोणीतरी किनाऱ्यावरून फोटो काढत असावं. त्याची होडी नदीच्या मधोमध आहे. त्याच्या हातात काहीतरी आहे. काळं आणि गोलसर, असं काही. तो ती गोष्ट पाण्यात फेकतो. किनाऱ्यावरचा तो फ्लॅश लाईटवाला माणुस पळून जातो. काही वेळाने तो माणुस बगीच्यासारख्या ठिकाणी खड्डा करून त्यात काहीतरी लपवतो...”

“कोण त्या खड्ड्यात लपवतोय¿ आणि काय¿”

“कोणी लपवलं, काय लपवलं, मला काही माहित नाही.”

आमच्या संभाषणाच्या मध्येच करीश्मा म्हणाली.

“इन्स्पेक्टर, याला भूतकाळातलं काही आठवत नाहीये आणि डॉक्टरांनीसुध्दा सांगितलंय की याला भूतकाळातल्या कोणत्याच गोष्टी कधीच आठवणार नाहीत. त्यामुळं मला वाटतंय याने हे सगळं स्वप्नात पाहिलं असणार.”

“पण मला असं वाटत नाही. यांनी जे काही पाहिलं किंवा यांना जे काही आठवतंय ते फक्त एक स्वप्न नाही. माझ्या अंदाजानुसार किणाऱ्यावर थांबुन फोटो काढणारा व्यक्ती दुसरा कोणी नाही, स्वतः आदित्य असणार. कारण पत्राच्या शेवटच्या ओळीत यांने लिहिलं - ... पत्रासोबत मी तुम्हाला फोटो पाठवत आहे. आणि हा फोटो यांनी आम्हाला पाठवला.”

त्यांनी टेबलाच्या ड्रॉव्हरमधून फोटो काढून आमच्या समोर ठेवला. तो फोटो मावळत्या सुर्याच्या लालसर प्रकाशात काढला होता. नदीच्या मधोमध एक होडी होती आणि होडीवर दोन माणसांच्या सावल्या दिसत होत्या. होडी आणि कॅमेरा यांमधील अंतर जास्त असल्याने आणि कमी प्रकाशामुळे फोटोतल्या त्या दोघांना ओळखणे कठीन होते.

“विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की, ज्याच्या घरात फोन आहे. तो व्यक्ती पत्र लिहून खुन झाल्याची खबर देतो. खुन झाल्याची बातमी आमच्यापर्यंत चार पाच दिवसांनी पत्राद्वारे पोहोचते. पण या चार पाच दिवसात बेपत्ता झाल्याची किंवा खुन झाल्याची बातमी आमच्या पोलीस स्टेशनमध्ये येत नाही...”

इन्स्पेक्टर त्यांच्या मनातली शंका व्यक्त करत होते. त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं करीश्माजवळ होती.

“आदित्यचा फोन आठवड्यापासून बंद पडलाय. त्याने मला गेल्या रवीवारीच सांगितलं होतं. त्यामुळे या प्रकरणात आदित्यची काहीच चुक नाही. आणि राहिला प्रश्न कोणाचा खुन झाला आणि कोणी केला, तर ते तुम्ही शोधून काढा. कारण आदित्यला जेवढं काही आठवलं तेवढं त्याने सांगितलं. या पलीकडं जाऊन त्याला काहीच आठवणार नाही. त्यामुळे या पुढं आम्ही तुम्हाला मदत करु शकणार नाही.”

करीश्माचे वाक्य ऐकून इन्स्पेक्टर आवाज चढवत म्हणाला.

“खरं आहे की या पुढे यांची आम्हाला काहीच मदत होणार नाही. पण तुमचं नाव या प्रकरणात कुठंही आलं तर तुमच्या मदतीची आम्हाला नक्कीच गरज पडेल आणि अशा परिस्थिति तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागेल.”

इन्स्पेक्टर आणि करीश्मा एकमेकांना रागात पाहत होते. त्यांमधला वाद आणखी वाढू नये म्हणून मी इन्स्पेक्टरकडून जाण्याची परवाणगी घेतली.

“आमचं काम झालं असेल तर आम्ही जावू शकतो का¿”

इन्स्पेक्टरने मान हलवून जाण्याचा इशारा केला. आम्ही तिथून निघालो. आम्ही जात असताना इन्स्पेक्टर शेजारच्या कॉन्स्टेबलने इन्स्पेक्टरला विचारले.

“सर, हा केस सुध्दा तसाच आहे. मला वाटतंय हा खुन त्यानेच केला असणार.”

“जसं या आदित्यने सांगितलं, जर खुन तसाच झाला असेल तर शंभर टक्के हा खुनसुध्दा त्यानेच केला आहे. एकदा डेड्बॉडी हाती लागली तर सर्व काही स्पष्ट होईल.”

आम्ही दारातुन बाहेर आल्यामुळे पुढं त्यांच्यात काय बोलणं झालं ते मला ऐकता आलं नाही.

२८ नोव्हेंबर १९९४,

करीश्मा मला माझ्या घरी घेऊन आली होती. त्या घरासोबत माझ्या बऱ्याच आठवणी, बऱ्याच भावणा मी भूतकाळात जोडल्या असतील. पण आता माझं घर माझ्यासाठी फक्त एक अनोळखी जागा होती. फक्त एका अपघाताने त्या सर्व आठवणी एका झटक्यात पुसून टाकल्या.

“माझं घर असं असेल मला वाटलं नव्हतं.”

घरात प्रवेश केल्या बरोबर मी करीश्माला म्हणालो. घरातल्या गोष्टी जागच्या जागी नव्हत्या. सोफ्यावर कपडे, टेबलवर पुस्तकं, खिडकीवर पडदे नव्हते, त्यांच्या जागी खिडकीच्या काचेला वर्तमानपत्र लावलेले, आणि कोंदट वास.

“तू एक फोटोग्राफर होता, एक आर्टीस्ट... आणि त्यात तू बॅचलर. त्यामुळे तुझं घर असं आहे.”

मी घरातली प्रत्येक वस्तू बारकाईने पाहत होतो. घरात फिरता फिरता आम्ही दोघं एका दारासमोर आलो. हॉलमधून किचन सहज दिसत होता, याचा अर्थ तो दरवाजा बेडरूमचा असावा असा मी अंदाज लावला.

“हा बेडरुम आहे का¿”

मी करीश्माला विचारले.

“माहित नाही. तू या रुमला सिक्रेटरूम म्हणायचास. मी तुझी होणारी बायको असून तू कधी मला या रुममध्ये जाऊन दिलं नाहीस.”

जास्त काही विचार न करता दार उघडून मी आत आलो. माझ्या मागोमाग करीश्मासुध्दा आली. त्या रुममध्ये प्रवेश करताच आम्हा दोघांना आश्चर्याचा धक्काच बसला. रुम छोटीच होती. रुममध्ये एक टेबल आणि त्या टेबलावर ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्ही. रुममधल्या फरशीवर सगळ्या वस्तू अस्ताव्यस्थ पडलेल्या. पण ज्या गोष्टीमुळे आम्हाला धक्का बसला, ती गोष्ट भिंतींवर होती. भिंतीवर असंख्य अंग प्रदर्शन करणाऱ्या महिलांचे फोटो चिटकवलेले. त्या फोटोंची संख्या इतकी होती की भिंतीला कोणता रंग दिला होता, हे समजणे अशक्यच. त्या क्षणी करीश्माकडे पाहण्याची माझी हिम्मतच होत नव्हती. उगच त्या रुममध्ये आलो असं झालं होतं.

“छ्छी... भूतकाळात काय झालं मला माहित नाही. पण या पुढं मी कोणत्याही मित्राला रुममेट म्हणून ठेवणार नाही. तसंही आपण लग्नानंतर सोबत राहणार आहोत. पण तो पर्यंतसुध्दा मी या घरात कोणत्याही मित्राला ठेवणार नाही.”

बोलता बोलता मी करीश्माकडे तिरक्या नजरेने पाहिले. ती माझ्याकडे रागात पाहत होती.

“तू या घरात एकटाच राहतो. तुझा कोणीही रुममेट नाहीये. आणि आज कळालं की तू या रुममध्ये मला कधी येऊ देत नव्हतास.”

“सॉरी.”

मी पुढं बोलणार तरी काय. ती रुममधून बाहेर निघून गेली. तिच्या मागोमाग मी सुध्दा रुममधून बाहेर आलो. तिचा राग शांत व्हावा यासाठी मी तिला म्हणालो.

“मी ही रुम कधीच उघडणार नाही आणि कधी चुकून उघडला तरी रुममध्य जाणार नाही.”

मी बोलत असताना ती अचानकपणे माझ्या दिशेने ती वळाली आणि ओरडली.

“परत तू या रुममध्ये जा तर खरं... जर तू या रुममध्ये पायसुध्दा ठेवला तर मी...”

“तुझी शप्पत मी त्या रुममध्ये पाय सुध्दा ठेवणार नाही.”

मी तिच्या समोर हात जोडून उभा होता. तेवढ्यात दारातून आवाज आला.

“आद्या¡¡”

आम्ही दोघांनी दारच्या दिशेने पाहिलं. भरदार दाढी मिश्याने सजलेला माझ्याच वयाचा एक व्यक्ती दारात उभा होता. त्याच्या दोन्ही हातात कापडी पिशव्या होत्या.

“अबे आद्या, अठ्ठावीस तारीख आली पण तू मला फोन केला नाहीस. तू मला २५ तारखेला फोन करणार होतास. ते तर बरं झालं आज मीच आलो, नाहीतर उद्या माझी ओफिसमध्ये वाटच लागली असती. खरतर तुला माझा प्रोजेक्ट सांभाळायला द्यायलाच नव्हतं पाहिजे. पण आता...”

तो बोलत बोलत घरात घुसला. त्याची नजर करीश्मावर पडताच त्याचं बोलणं त्याने थांबवलं. माझ्या शेजारी उभा राहून त्याने मला विचारले.

“ही कोण¿”

“ही कोण म्हणजे¿ ही माझी बायको आहे. पण तू हे विचारणारा कोण¿ आणि असा घरात कसा घुसलास¿”

“ही बायको¡ आणि मी कोण¡ तू मला ओळखत नाहीस¿ तुला काय वाटतं, असं करशील आणि मी तुला सोडून देईन. आधी माझा प्रोजेक्ट दे आणि नंतर तुझं हे नाटक कर.”

मी करीश्माकडे पाहिले आणि “हा कोण¿” असं इशाऱ्यात तिला विचारले.

“कोण तुम्ही¿ मी तुम्हाला ओळखलं नाही.”

करीश्माने त्याला विचारले.

“सेम हिअर. कोण तुम्ही¿ मी तुम्हाला ओळखलं नाही¿”

तो करीश्माकडे पाहून म्हणाला. मी त्याच्या जवळ जात विचारलं.

“खरं खरं सांग कोण आहेस तू¿”

“काय आद्या, आपल्या मित्राला विसरलास का¿”

“तू माझा मित्र आहेस¿”

मी त्याच्याशी बोलत असताना करीश्माने मध्येच विचारले.

“मी तर तुला कधी आदित्य सोबत नाही पाहिलं¿”

“आणि मी सुध्दा कधी आदित्यच्या बायकोला नाही पाहिलं. तो तर मॅरीड् नाहीये. मग तुम्ही कोण¿”

“ही माझी होणारी बायको आहे.”

मी त्या दाढीवाल्याला सांगितलं.

“आपण इतके दिवस सोबत राहिलो, एकत्र फिरलो. पण तू कधीच मला तुझ्या लग्नाबद्दल सांगितलं नाहीस.”

“अरे मला सुध्दा दोन दिवसांआधीच कळालं.”

राहुल माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेन पाहू लागला. त्याच्या मनात काय चाललं असेल याची कल्पना येताच करीश्माने त्याला माझ्या अपघाताची घटणा सविस्तर सांगितली.

“खरतर सात दिवसांपुर्वी आदित्यचा एक्सीडेन्ट झाला होता. त्यात याच्या डोक्याला मार लागला आणि त्यात याची पुर्ण मेमरी गेली. आदित्य भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी विसरला आहे. त्यामुळे याला काहीच आठवत नाहीये. दोन महिन्यांपुर्वीच आमच्या लग्नाची तारीख फिक्स झाली होती...”

राहुल डोक्याला हात लाऊन खाली बसला. मी त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिलो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.

“काय झालं¿”

“तू सगळं विसरला म्हणजे तुझ्या हे सुध्दा लक्षात नसेल की माझ्या घराची चावी कुठंय ते¿”

“चावी¡ आणि घराची¡ पण तू मला का दिली होतीस ती चावी¿”

“मी दोन आठवड्यापुर्वी गावी गेलो होतो. त्या वेळी माझा प्रोजेक्ट आणि घराची चावी तुला दिली होती. तुला मी म्हणालो होतो की चावी आणि प्रोजेक्ट सांभाळून ठेव. मी २८ ला येईन आणि ओफीसला जाता जाता चावी आणि प्रोजेक्टची फाईल घेऊन जाऊन. जर तुला २८ तारखेला बाहेर जायचं असेल तर तू मला २५ तारखेच्या आत फोन करून सांग करून मला सांगणार होतास आणि घरी असलास तरी तू फोन करणार होतास. तुझ्या फोनची वाट पाहत होतो मी. पण तुझा फोन नाही आला, म्हणून मी काल गावावरून निघालो.”

“माझी स्मृती गेलीये, घर पळुन गेलं नाहीये. तुझी चावी आणि प्रोजेक्ट असतील घरातच कुठंतरी.”

करीश्मा उभी राहून आमचं नाटक पाहत होती.

“आदित्य, मी जाते. संध्याकाळी येईन.”

असं बोलून तिने तिची बॅग उचलली आणि बाहेरच्या दिशेने निघाली. मी दारापर्यंत तिच्यासोबत गेलो आणि ती गेल्यावर वळून माझ्या दाढीवाल्या मित्राकडं पाहिलं.

*****

माझ्या त्या दाढीवाल्या मित्राचं नाव राहुल होतं. मी आणि राहुलने मिळून किचन, हॉल आणि स्टोअर-रूममध्ये त्याची चावी आणि प्रोजेक्टची फाईल शोधली. पण ते काही सापडले नाही. शोधता शोधता दुपारची संध्याकाळ कधी झाली, कळालंच नाही.

“जाऊदे... किती शोधणार अजून. घराची चावी तर आहे. ड्युब्लीके बनवून घे.”

मी त्याला दिलासा देत म्हणालो.

“ते तर करावंच लागणार आहे.”

या शोधकामाच्या दरम्यान विस्कळीत झालेल्या सामानाचा आणखी पसारा करून ठेवला. त्या कचऱ्याच्या ढिगात आम्ही दोघं बसुन शुण्यात पाहत होतो.

त्याच अवस्थेत राहून राहुलने मला विचारले.

“काय रे, तू तुझ्या होणाऱ्या बायकोवर प्रेम तर करतोस ना¿”

त्याने अचानक असा प्रश्न का विचारला असेल, हा प्रश्न माझ्या मनात आला. पण आधी मी त्याला खरं होतं ते सांगितलं.

“मला काय माहित. मला दोन दिवसांन आधीच तर कळालंय... पण एक गोष्ट आहे. मी तिच्यावर प्रेम करत होतो की नाही माहित नाही पण ती माझ्यावर खुप प्रेम करत होती आणि करत आहे.”

“पण हे तुला कसं कळालं¿”

“पोलीसांनी तिला सांगितल्या बरोबर ती हॉस्पीटलमध्ये आली, माझ्या सोबत तिथे राहिली, तिथल्या हॉस्पीटलमध्ये माझ्यावर झालेला सगळा खर्च तिने भरला, मला ती तिच्या घरी घेऊन गेली, आज मला माझ्या घरी घेऊन आली आणि आता थोड्या वेळात माझ्यासाठी जेवन घेऊन येणार आहे.”

“पण मला असं वाटतं की तुमच्यात काहीतरी झालं असणार किंवा तुला ती आवडत नसणार... किंवा वेगळं काहीतरी झालं असणार. असं काही नसतं तर गेल्या महिन्याभरात तू एकदातरी तिचा किंवा तुमच्या लग्नाचा उल्लेख माझ्यासमोर केला असतास. आणि जर प्रेम करत असतास तर मला हमखास सांगितलं असतंस. पण तू असं काहीच केलं नाहीस.”

“असेल काहीतरी... कदाचित मी तुला सरप्राईझ् देणार असेन.”

आम्ही बोलत असताना करीश्मा तिथे आली. आम्हाला कचऱ्यात बसलेला पाहून तिला धक्काच बसला.

“हे काय¿ मी सकाळी गेले होते तेव्हा घर फक्त घान होतं आणि तुम्ही अर्ध्या दिवसात घराची कचरापेटीच केलीत.”

“अरे याच्या घराची चावी आणि याचा प्रोजेक्ट शोधत होतो. त्यामुळे...”

मी स्वतःचे कपडे झटकत उभा राहिलो. ती रागात माझ्याकडे पाहत होती. तिचा रागावलेला चेहेरा पाहून मला हसू आले. मला हसताना पाहून ती आणखी चिढली.

“सॉरी. तुझा असा चेहेरा पाहून हसू आलं. सॉरी – सॉरी. तू दहा मिनीट बस. आम्ही साफ करतो सगळं.”

मी आणि राहुल घर साफ करायला घेतलं. करीश्मानेही आम्हाला मदत केली. दिड तासत घर आवरून झालं. घर माझ्या अपेक्षापेक्षा जास्त सुंदर होतं. घर आवरता आवरता आम्हाला संध्याकाळचे आठ वाजले होते. करीश्मा येताना सोबत माझ्यासाठी जेवन घेऊ आली होती. फ्रेश झाल्यानंतर आम्ही जेवायला सुरूवात केली. जेवताना कोणाच्याही तोंडातून एकही शब्द बाहेर आला नाही. आम्ही तिघं शांतपणे जेवलो. पण जेवण झाल्या बरोबर राहुलला काहीतरी आठवलं.

“आदित्य, आपण तुझ्या आख्ख्या घरात शोधलं. पण चावी आणि प्रोजेक्ट काही सापडली नाही. आता घरात कुठंच नाहीये म्हणजे शंभर टक्के चावी आणि प्रोजेक्ट तुझ्या बेडरूममध्येच असणार.”

मी पुर्ण दिवस त्याला बेडरूमपासून मुद्दाम लांब ठेवलं. मला या गोष्टीचा जास्त राग येत होता की राहुलने करीश्मा नसताना हा प्रश्न का विचारला नाही. त्याने माझ्या बेडरूमबद्दल विचारताच मी करीश्माकडे पाहिलं. पुन्हा ती माझ्याकडे रागाने पाहत होती.

“राहुल...” मी त्याला डोळा मारत म्हणालो “राहुल मी तुला सांगितलं होतं ना की आपण त्या रुममध्ये नाही जाऊ शकत...”

“कधी म्हणालास¿”

“कधी काय... अडीच तासापुर्वीच म्हणालो होतो ना तुला...”

“मला तरी आठवत नाही. आपण हॉल, किचन आणि स्टोअर रुममध्ये चेक करुनच बसलो होतो. तेवढ्यात करीश्मा...”

त्याला थांबवत मी म्हणालो.

“तू विसरला असशील. पण काही हरकत नाही. आता पुन्हा एकदा सांगतो. त्या रुममध्ये आपण जाऊ शकत नाही.”

“का जाऊ शकत नाही¿ आत कोणी आहे का¿”

“आत कोणीही नाहीये. आपण तिथं जाऊ शकत नाही कारण तो रुम... फक्त महिलांसाठी आहे.”

“काय खोटं बोलतोय. म्हणे महिलांसाठीच रुम... आत माझ्यासाठी काहीतरी सरप्राईझ् ठेवलंय वाटतं.”

“नाही, तिथं कसलाही सरप्राईझ् नाही. खरंतर मी करीश्माला वचन दिलंय की मी त्या रुममध्ये कधीच पाय नाही ठेवणार.”

“पाय ठेऊ शकत नाही ना. मग हातावर चालत जा...”

असं बोलून तो हसू लागला. आम्ही शांत होतो आणि त्यात राहुल जोरजोरात हसत होता. त्याचं हसून झाल्यावर तो पुढं म्हणाला.

“मस्ती केली रे मी... मला असं म्हणायचं होतं की तू पाय नाही ठेऊ शकत ना, तर तू नको येऊस. मी एकटा आत जाऊन शोधतो.”

त्याची युक्ती चांगली होती. या युक्तीने माझा वचनही मोडणार नव्हतं आणि त्याला त्याच्या गोष्टींचाही शोध घेता येणार होता. राहुलला रुममध्ये जाण्यास परवाणगी देण्याआधी एकदा करीश्माकडे पाहिले आणि स्मितहास्य करून, डोकं हलवत इशाऱ्याने “त्याला होकार देऊया” असं सांगितलं. करीश्मा टेबलावर प्लेट आपटून किचनमध्ये निघून गेली. त्यावरून तिनेसुध्दा तिचं उत्तर इशाऱ्यातच दिलं.

“राहुल, नाही. मी तुला त्या रुममध्ये जाण्याची परवानगी देऊ शकत नाही. सॉरी.”

मी मोठ्या आवाजात बोलत होतो. जेणेकरून तो आवाज करीश्मा पर्यंत पोहोचावा. माझ्या जवळ येऊन राहुलने मला दबक्या आवाजात विचारले.

“मॅटर काय आहे¿”

मी त्याला सवीस्तर माहिती त्याच्या कानात सांगितली.

“अच्छा तर असं काय...”

बोलता बोलता तो पुन्हा त्याच्या जाग्यावर गेला. करीश्मा किचनमधून बाहेर आली. आम्ही दोघं तिच्याकडं शांतपणे पाहत होतो. ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली.

“किचनच्या बरोबर विरूध्द बाजूला बाथरूम आहे आणि बाथरूम समोर बेसीन. बेसीनच्या डाव्या बाजूला खाली पाईप ठेवलाय.”

एवढं बोलून ती माझ्या प्रायव्हेट रूममध्ये गेली.

“काय झालं वहिणीला¿ काय बोलत होती¿ बाथरूम, बेसीन, पाईप.”

“माहित नाही तिच्या मनात काय चाललंय¿”

राहुलने त्याची खुडची सरकवत - सरकवत माझ्या जवळ आणली आणि दबक्या आवाजात म्हणाला.

“मला एक सांग. लग्नानंतर सुध्दा तुम्ही ती रुम बंदच ठेवणार आहात का¿”

त्याच्या प्रश्नाचा माझ्याकडं काहीच उत्तर नव्हतं.

“माहित नाही भविष्यात काय होणार आहे.”

करीश्मा रुमच्या बाहेर आली. तिने तिची बॅग उचलली आणि दारापर्यंत गेली. दार उघडत ती आमच्या दिशेने पाहून म्हणाली.

“मी उद्या सकाळी येते.”

ती गेल्यावर आम्हाला करपल्याचा वास येऊ लागला.

“वहिणीने गॅसवर काही ठेवलंय का¿ काहीतरी करपल्यासारखं वाटतंय.”

राहुलने हवेत वास घेत विचारले.

“नाही रे. गॅसवर काही करपलं नाहीये. वास तर असा येतोय जणू प्लास्टीक किंवा टायरला जाळलं असावं.”

माझ्या प्राईव्हेट रुममधून धूर निघताना आम्ही पाहिलं आणि काय झालं होतं, काय जळालं होतं ते समजलं. आम्ही धावत बाथरूमच्या दिशेने गेलो. बादल्यांमध्ये पाणी नव्हतं. शेवटी आम्ही नळाला पाईप जोडाले आणि त्या पाईपच्या सहाय्याने रुममध्ये लावलेली आग विझवली.

या अग्नी कांडात माझा टि.व्ही. कितपत जिवंत होता ते आम्ही तपासून पाहिले नाही. मी एक मोठा बॉक्स घेऊन आलो. जळालेल्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यात भरू लागलो. जळालेला कचरा बॉक्समध्ये भरताना माझ्या हाती अर्धवट जळालेली फाईल लागली.

“काय रे, तुझं नाव राहुल ‘आत्रे’ आहे का¿”

मी राहुलला विचारले.

“हो. माझं आडनाव आत्रे आहे. पण तुला कसं कळालं¿”

मी आनंदाने उडी मारली आणि त्याच्या हातात ती फाईल देत म्हणालो.

“तुझा प्रोजेक्ट सापडला.”

त्याने फाईलची पाने उलटून पाहिली. प्रत्येक पान अर्ध्यातून जळालेलं होतं. त्याच्या प्रोजेक्टची ती अवस्था पाहून त्याला रडू आले असणार. पण त्याने स्वतःचं रडणं आवरून माझ्याकडे रागात पाहिले.

“मला म्हणायचं होतं की प्रोजेक्ट इथं सापडला म्हणजे चावी सुध्दा इथंच कुठंतरी असणार... आणि चावी जळत नाही.”

मी हसत हसत बोलत होतो. मला वाटलं मला हसताना पाहून त्याचा राग कमी होईल. पण तसं काही झालं नाही. त्याने रागाने त्याच्या प्रोजेक्टची फाईल कचऱ्याच्या बॉक्समध्ये फेकून दिली.

*****

दुसरीकडे मी पाठवलेल्या पत्राच्या आणि फोटोच्या आधारावर शहरात कोणी बेपत्ता झाला आहे का, किंवा कोणाचे मृतदेह सापडतले आहे का, याचा शोध पोलीस घेत होती. शहरातल्या नद्यांमध्ये, शहराबाहेरच्या नद्यांमध्ये, तलावांमध्ये शोध कार्य चालू होते.

मी काहीसा दुःखी होतो. इतके दिवस झाले पण माझ्या ओळखीचे फक्त दोनच व्यक्ती मला भेटले होते. मी आणि राहुल घराच्या गच्चीवर बसून मावळत्या सुर्याला पाहत असताना मी त्याला विचारले.

“काय रे. माझे मित्र मैत्रिणी नव्हत्या का¿”

“होते की... म्हणजे आहेत दोन - तिन. पण कोणापर्यंत ही बातमी पोहोचली नाहीये की तुझा एक्सीडेंट झाला आहे आणि तू असा टोटल मेमरी लॉसचा पेशंट झाला म्हणून.”

“जाऊदे. कोणाला नाही कळालं तेच बरं झालं.”

“पण सायलीला तर सांगावं लागेल ना.”

“कोण सायली¿”

“सायली, तुझी बेस्ट फ्रेंड होती... पण तिचं काय झालं रे¿”

“मला वाटतंय तुला सुध्दा मेमरीचा थोडा प्रोब्लेम आहे. तू सारखा कसा विसरतोस की मी भूतकाळातल्या गोष्टी विसरलोय म्हणून. मग मला कसं आठवणार कोण सायली आणि तिचं काय झालं ते¿”

“ते मला माहित आहे. पण एक चान्स घेतला. काय आहे ना तू नॉर्मल असताना सायलीबद्दल मला कधीच काहीच सांगतलं नव्हतंस. कॉलेजनंतर ती कुठं गेली, तुमच्यात काय झालं की नाही, तू काहीच सांगितलं नाहीस. सायली, तू आणि मी एकाच कॉलेजमध्ये, एकाच क्लासमध्ये होतो. तेव्हा तुझे फक्त दोनच बेस्टफ्रेंड होते. एक मी आणि एक सायली. मी फक्त नावासाठी बेस्टफ्रेंड होतो आणि सायली जरा जास्तच बेस्ट होती. तुझे प्रत्येक निर्णय तू सायलीला विचारून घ्यायचास. तुम्ही म्हणायचा की तुम्ही गल्फ्रेंड बॉयफ्रेंड नाहीत म्हणून. पण पुर्ण कॉलेजला खरं काय आहे ते माहित होतं. तुमच्यात पुढं काय होईल¿ तुमचं लग्न होईल का¿ हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा होती. पण कॉलेज संपल्यावर तू कुठं गायब झाला कोणाला कळालंच नाही. गेल्याच वर्षी आपली भेट झाली. तेव्हापासून मी तुला सायलीबद्दल कितीतरी वेळा विचारलं, पण तू काहीच सांगितलं नाहीस आणि आता सांगूही शकणार नाहीस.”

त्यानंतर आमच्यामध्ये काही वेळासाठी शांतता पसरली. काही वेळाने अचनाक मला पोलीसांना दिलेल्या पत्राची आठवण झाली.

“अरे तुला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. माझा एक्सीडेन्ट होण्याआधी मी पोलीसांना एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात मी लिहिलं होतं, की मी माझ्या मैत्रिणीचा खुन होताना पाहिला आहे आणि खुन कोणी केला ते सुध्दा मला माहित आहे आणि त्या मी पत्रासोबत त्यांना एक फोटोसुध्दा पाठवला होता. फोटो संध्याकाळच्या वेळी काढल्यामुळे फोटोत कोण आहे ते निट दिसत नाहीये.”

“तू पत्रात कोणाचं नावं लिहिलं होतं का¿”

“पत्रात मी कोणाचीच नावं लिहिली नव्हती. मी फक्त एवढंच लिहिलं होतं की मी खुन करणाऱ्याला आणि खुन झालेल्याला ओळखतो.”

काही वेळासाठी राहुलने विचार केला आणि म्हणाला.

“सलील आणि रशमी.”

“कोण सलील आणि रशमी¿”

“सलील तुझा मित्र आणि रशमी तुझी मैत्रीण. तू मला नेहेमी म्हणायचास की सलील आणि रशमी यांच्यामध्ये क्रॉस आहे. आधी ते दोघं एकमेकांवर प्रेम करायचे. पण नंतर रशमीमुळं त्यांच्यातलं नातं तुटलं. त्यामुळे सलील रशमीबद्दल मनात राग धरून बसला होता. सलीलने दोन वेळा रशमीला मारून टाकण्याची धमकीसुध्दा दिली होती. त्याच्या अशा स्वभावाला रशमी सुध्दा वैतागली होती. तू म्हणालास की भविष्यात त्यांच्यापैकी कोणीतरी एक, दुसऱ्याचा खुन करू शकतो. पण मला त्यावेळी हे कळालं नव्हतं की तुला यातुन काय फायदा होणार होता. तू या सगळ्याने खुप खुश होतास... कदाचित तू त्यांना ब्लॅकमेल करून स्वतःचा फायदा करून घेणार असशील.”

“पण मी माझ्या मित्रांसोबत असा का वागेन¿ आणि जर मला ब्लॅकमेलच करायचं होतं तर मी तो फोटो पोलीसांना का पाठवला असता.”

“कारण तू नालायक होतास.”

त्याच्या तोंडून माझ्यासाठी ‘नालायक’ हा शब्द बाहेर पडताच मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले.

“म्हणजे, भूतकाळातला आदित्य खरंच नालायक होता. पण आता तू सगळं विसरला आहेस. म्हणून मग तू तो आदित्य राहिला नाहीस.”

“एक काम करू. त्या दोघांपैकी एकाच्या घरी जाऊ. तो बेपत्ता असेल तर दुसऱ्याने त्याला मारलं असणार असं सिध्द होईल. आणि जर तो घरी असेल तर त्याने दुसऱ्याला मारलं असेल असं समजायचं.”

“आणि समज जर दोघांनी एकमेकांना मारलं नसेल तर¿”

“तर ते दोघं आपापल्या घरी असतील.”

माझ्या युक्तीवर काही वेळ त्याने विचार केला आणि विचार करून झाल्यावर म्हणाला.

“ओके. तुझ्या फोटो स्टुडीओत त्यांचा पत्ता असेल.”

एवढं बोलून राहुल जिन्याच्या दिशेने निघाला. मी जाग्यावरून उठत त्याला विचारलं.

“माझा फोटो स्टुडीयो आहे¿”

पण माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता तो पुढं निघून गेला. मला करीश्माकडून माझ्या फोटो स्टुडीओबद्दल कळालं होतं. कदाचित ही गोष्ट त्यालाही माहित होती.

*****

१ डिसेंबर १९९४,

सकाळी ७ वाजता शहरा जवळच्या नदीमध्ये,

नेहेमी प्रमाणे नदीवर पोहोण्यासाठी आलेली मुलं पोहता पोहता मर्यादेपेक्षा जास्त पुढं जात होती.

“ए कारट्यांनो... पुढं जाऊ नका. मी जाळं टाकलंय तिकडं.”

त्याना नदीत पुढं जाताना पाहून ट्युबवर बसलेला दामोदर (मासे पकडण्यासाठी आलेला व्यक्ती) त्यांना ओरडला. त्याच्या आवाजाने मुलं पुन्हा किनाऱ्याच्या दिशेने वळाली. तो ट्युबला पाण्यावर पुढं सरकवत त्याच्या जाळ्यापर्यंत पोहोचला. नेहेमी प्रमाणे जाळं ओढून जाळ्यात अडकलेले मासे तो गोळा करत होता. एका विशिष्ठ जागेवर पोहोचल्यावर त्याला पाण्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटलं. त्याने जाळ्याला ताकदीनं ओढण्याचा प्रयत्न केला पण त्याला तो ओढता आला नाही. त्याच्या जवळ असणाऱ्या लोखंडी सळईने जाळे अडकलेल्या ठिकाणी वार करून जाळ सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात काहीतरी तुटल्यासारखे वाटले. त्याने रॉड पाण्याच्या बाहेर काढले आणि पाण्याच्या त्या भागाकडे पाहू लागला. जाळे जिथे अडकले होते, त्या भागातून मानवीय शरीराचा तुटलेले हात तरंगत वरती येताना त्याने पाहिले. तो दृश्य पाहून तो घाबरला आणि जलद गतीने तिथून किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचे ट्युब जाळ्यात अडकल्याने त्याला पुढं जाता येत नव्हतं. त्याने ट्युबमधून उडी मारली आणि पोहत किनाऱ्यावर आला. किनाऱ्यावर पोहोचताच त्याने पोलीस स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.

*****

आम्ही फोटो स्टुडीओमधून रशमीचा पत्ता घेतला आणि तिच्या घरी गेलो. दारावरची कुंडी वाजवली. दार एका वृध्द महिलेने उघडले.

“आजी, रशमी इथंच राहती का¿”

मी त्या वृध्द महिलेला विचारले.

“हो ती इथंच राहती, तुम्ही कोण¿”

“मी तिचा मित्र, आदित्य. आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो.. त्याला भेटायचं होतं.”

“पण ती घरी नाहीये.”

त्या महिलेने वाक्य उच्चारताच मी आणि राहुलने एकमेकांकडं पाहिलं. रशमीचं घरी नसनं आमचा अंदाज चुकीचा नसल्याचा एक पुरावा होता. आम्ही विचार करत असताना त्या वृध्द महिलेने दार लाऊन घेतले. दार बंद होण्याचा आवाज होताच आमचं लक्ष दाराकडे गेलं. आम्ही पुन्हा दार वाजवून त्या वृध्द महिलेला दार उघडायला लावले.

“आजी, रशीमी घरी नाहीये तर कुठं गेली¿”

“माहित नाही कुठं गेली¿”

“माहित नाही म्हणजे¿ तुम्हाला सांगून गेली नाहीये का¿”

“तिलाच तर शोधतोय गेल्या दहा दिवसांपासून.”

“दहा दिवसांपासून¡”

“हो, तिला जाऊन दहा दिवस झालेत. अजून ती घरी आली नाहीये.”

त्या वृध्द महिलेनुसार रशमी गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता होती आणि मी पोलीसांना पत्र लिहून सुध्दा दहा दिवस झाले होते. आम्ही त्या महिलेचा निरोप घेतला आणि तिथून निघालो.

आम्ही रशमीच्या घरापासून काही अंतरावर जाऊन थांबलो.

“हे बघं, माझं तुला रशमी आणि सलीलमधल्या भांडणांबद्दल सांगणं, माझं पोलीसांना दहा दिवसांपुर्वी पत्र लिहिणं, त्यात त्यांना सांगणं की माझ्या मैत्रिणीचा खुन झाला आहे आणि मी तो खुन होताना पाहिला आहे, रशमीचं दहा दिवसांपासून बेपत्ता असणं, याचा अर्थ सलीलने रशमीचा खुन केला असणार. मी त्याला खुन करायचा पाहिलं असणार आणि स्वतःला वाचवण्यासाठी त्याने मला मारण्याचा प्रयत्न केलं असणार.”

“असं होऊ शकतं... पण असंच झालं असंल हे कशावरून¿”

“पण परिस्थितिवरून तर असंच वाटतंय की आपला संशय खरा आहे.”

“मग आता आपण काय करायचं.”

“काय करायचं म्हणजे¿ पोलीसांना सांगायचं.”

“वेड लागलंय का. पोलीसांच्य झंझडीट कशाला पडायचं. आधीच पोलीसांना पत्र लिहून तू मोठी चुक केलीस आणि आता पोलीसांकडं जाऊन आणखी एक चुक करू नकोस.”

“पण...”

“पण – बिन काही नाही. तुला जायचं असेल तर तू जा. मी नाही पोलीसांच्या मॅटरमध्ये पडणार.”

मी एकटा तरी कुठं जाणार. करीश्मा आणि राहुल सोडून इतर कोणालाही मी ओळखत नव्हतो.

“घरी येणार की आता इथंच उभा राहणार आहेस¿”

राहुल त्याच्या दुचाकीवर बसून मला विचारले.

*****