वर्षातून एकदा येणारा गावाकडचा गावदेवीचा उत्सव.नवी नवरी असलेली स्पृहा कल्पनेनेच हरखून गेली.तिच्या माहेरचं गाव असं आता राहिलं नव्हतं.पण देवेशच्या घरचं म्हणजे तिच्या सासरचं मूळ गाव गोव्याजवळच्या छोट्या निसर्गसंपन्न खेड्यात. त्याचे चुलतकाका आणि त्यांचं कुटुंब आजही तिथे आहे.काजू,सुपारी सांभाळत गोव्यात आपलं दुकान सांभाळत शेतीही करत आहेत.
तसं गोवा म्हटलं की निसर्गसंपन्न भूमी,समुद्र,नारळी पोफळीची राया,काजूच्या बागा,जुनी मंदिरं हे चित्र समोर उभं राहतचं.
दिवाळीनंतरच्या त्रिपुरीच्या चांदण्यात गावातला उत्सव होत असे. खेळे होत. भजनं कीर्तनं महाप्रसाद होत असे. किरीस्ताँव छाप ल्यायलेल्या आजूबाजूच्या गावांपेक्षा हिंदू वळणाचं आणि घरांचं हे छोटेखानी गाव आडही लक्षवेधी होतं.फोंड्याजवळचं मडकी गाव.नवदुर्गा मंदिर असलेलं.
स्पृहाने उत्साहाने सगळी तयारी केली.तिच्या सासूबाईंनाही आश्चर्य वाटलं कारण स्पृहा एक संगणक अभियंता. सतत परदेशात projects वर जाणारी. पण इतकी हरखून गेली आहे.. कौतुकास्पदच आहे.
सासूबाईंनी तिला लग्नातली शिवलेली नऊवार साडी,नथ,मोठं मंगळसूत्रं असं सगळं बरोबर घ्यायला सांगितलं.लेकही सोवळं नेसून बायकोबरोबर मानाची पूजा करायला तयार झाला.
गावातल्या वेशीवरच नारळीच्या झापांनी मांडव सजवला होता. कौलारू उतरत्या छपराचं,मोठं अंगण असलेलं जुनं पण तरीही काळाच्या ओघात पून्हा तेल पाणी पिऊन नवं रूप घेतलेलं घर पाहुण्यांनी भरलं होतं.
घरापासून चालत पाच मिनीटं देऊळ होतं.
उत्सवासाठी मुंबई पूण्यातले किंबहुना परदेशात असलेले नातेवाइक,आडनाव बंधूही उत्साहाने आले होते.
या घरात रहायला अडचण होईल म्हणून स्पृहाच्या नवर्याने त्याच्या कुटुंबाची व्यवस्था फोड्यातल्या हाॅटेलवर केली होती. दिवसभर इथे थांबू आणि रात्री निवांत हाॅटेलवर परतू असं त्याच्या मनात.
पण या वातावरणात स्पृहा रमली.घरभर फिरली.तासाभरातच तिने सर्वांना आपलंसं केल.
मंदिरातली आरास, प्रसन्न नटलेली देवी,मंदिराबाहेरच्या दगडी बांधीव तळ्यात देवीच्या नौकाविहारासाठी सजवलेली नाव पाहून ती वेडीच झाली.
हौस म्हणून आणलेल्या हँडिकॅमवर सर्व चित्रीकरण तिने केलं.एकत्र चुलाण्यावरचा रूचकर स्वयंपाक, फुलांच्या वेण्या आणि हार तयार करर्या, माळा ओवणार्या नटलेल्या काकू,आत्या,आज्या,सासवा!!
चिमुरड्या शहरी आधुनिक पोशाखातल्या मुली, पाचवारी साडी नेसून गजरा घालून नटलेली ती स्वतः , देवीपुढची अंगणातली पालखी, त्या पालखीच्या मागे नाचणारी स्थानिक मंडळी,नारळ सुपारीच्या राया,पर्ह्याचा आवाज.....
रात्री दमून कधी झोपते असं तिला झालं.पाच वाजता चहा घेता घेता देवीचं ऐकलेलं भजन, देवळात चाललेली पणत्या लावण्याची तयारी हे सगळं ती भान हरपून पाहत राहिली.गुंगूनच गेली.
देवेशला म्हणाली की ईथेच थांबू रात्री घरी.उशिराने देवी नौकाविहाराहा नेतील ते कसं पहायला मिळणार हाॅटेलवर गेलो तर?
अग पण उद्या पहाटे आपल्यालाच पूजा करायची आहे उत्सवाच्या सांगतेची. नंतर गावजेवण. आपण निघायचय संध्याकाळी परत. परवा आॅफिस गाठायचय नं म्हणून तर ड्रायव्हर घेऊन आलो आहोत रात्री जायचं परत म्हणून..
हो.उशिराने जाऊ. पण थांबू.
रात्री असंख्य पणत्यांच्या प्रकाशात देवी आणि मंदिर ऊजळलं.देवी प्रसन्न मनाने नौकेत फिरूनही आली आणि आरतीनंतर निद्रीस्त झाली.
पूजा आटोपून प्रसाद घेऊन मंडळी निघाली.
स्पृहा पुण्यात आॅफिसला पोहोचली पण मनात ऊत्सवच होता.तिचा मित्र अनिश एडिटिंग करायचा. तिने दूसर्या दिवशी अनिशला गाठलं आणि शूटीग पहायला घरी बोलावलं.
मला यावर छोटी फिल्म करायची आहे.हे सगळं शहरात पोचायलाच हवं पुढच्या पिढीपर्यंत. केवढ्या मोठ्या आनंदाला मुकतात ही मुलं आणि आपणही. वर्षातून एकदा वेळ काढणं कठीण नाही या आनंदासाठी.
अनिशला हे आव्हान होतं. स्पृहा काही चित्रीकरणातली तज्ज्ञ नव्हती. पण तिने टीपलेली दृश्य त्याने प्रयत्नपूर्वक जोडली. सासू सासरे आणि चुलत आजेसासूबाई यांच्याकडून माहिती गोळा झाली उत्सव परंपरेची. अनिशची मैत्रीण नेहा सुरेख लिहायची. नेहाने संहिता लिहीली.
मित्र मैत्रिणींच्या उत्साहातून हौसेने एक उत्तम माहितीपट तयार झाला. असंच कुणाला कुणाला हौसेने कौतुकाने दाखवला गेला. यू ट्यूबची लिंक शेअर केली गेली.सोशल मीडियावर अचानक या माहितीपटाने प्रसिद्धी मिळवली. अनीशला व्यावहारिक बारकावे माहिती असल्याने अधिकृत प्रमाणपत्र घेऊन माहितीपट आंतरराष्टीय महोत्सवात दाखल झाला.एवढच नव्हे तर उत्तेजनार्थ पूरस्कारही त्याला मिळाला.
या धांदलीत स्पृहा पंधरा दिवस यू एसला कामासाठी धावती भेटही करून आली. अख्खं घर माहितीपटमय झालं.
स्पृहाच्या उत्साहाचं आणि कल्पनेचं प्रचड कौतुक झालं घरात.
माहितीपटाचं प्रमाणपत्र आणि जिंकलेलं पारितोषिक देवीला अर्पण करायला स्पृहा आणि देवेश अनिशसह मार्गस्थ झाले.... मनातून तृप्तता आणि भक्तिभाव घेऊन...
व्यवहार सोडून चालत नाही आणि आधुनिक काळात शहरात राहण्याशिवाय पर्याय नाही. हे खरं असलं तरी आपल्या पूर्वजांची ही परंपरा सांभाळण्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या गावी यायलाच हवं... नाही का?